एक जर्मन ज्यू तरुणी.. ‘व्रात्यस्तोम विधी’ करून हिंदू धर्मात आलेली. प्रकांड बुद्धिमान अशा ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांची अर्धागिनी शीलवती केतकर होऊन असिधाराव्रत स्वीकारलेली! तिची कहाणी..
१९ डिसेंबर १९१९ रोजी ईडिथ कोहन ही जर्मन तरुणी इंग्लंडहून बोटीने मुंबईत आली आणि मुंबई बंदरात उतरली. पण ज्या कंपनीने तिला नोकरीसाठी बोलावलं होतं, त्यांच्यापैकी कोणीच तिला घ्यायला आलं नव्हतं. तिच्याबरोबरचे इंग्रज सहप्रवाशी तिला एकटीला बराच वेळ ताटकळत असलेली पाहून म्हणाले, ‘‘पाहा बरं, या हिंदी लोकांवर विश्वास ठेवाल आणि पस्तावाल.’’ जसजसा वेळ जाऊ लागला तसा तिचा धीर खचू लागला. आणि सहप्रवासी म्हणाले ते खरं की काय, ही शंका मनात येऊ लागली. आणि तेवढय़ात तिला भारतीय पोशाखातले एक गृहस्थ येरझारा घालताना दिसले. ते मधूनमधून मिस् कोहनकडे पाहत होते.
पुणेरी पगडी, बंद गळ्याचा पांढरा कोट नि उपरणं, एक हात वस्त्रात गुंडाळलेला. आपल्या मैत्रिणीवर धक्काप्रयोग करण्यासाठी ते असं वागत होते. १९१२ साली ते भारतात परतले होते. ते आता सात वर्षांनी कोहनला भेटणार होते. ते होते डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर. सात वर्षांत ते थोडे स्थूल झाले होते.
परंतु मिस् कोहनने त्यांना ओळखलं आणि ती त्यांच्याजवळ जाऊन त्यांना म्हणाली, ‘‘आपण डॉ. केतकर का?’’ ते गंभीरपणे म्हणाले, ‘‘हो. अर्थातच!’’ नंतर त्यांनी तिला ट्रामनं बोरीबंदरला (छत्रपती शिवाजी टर्मिनस) नेलं. आणि तिथल्या कँटीनमध्ये जेऊ घालून मग वांद्रे इथे त्यांच्या चुलतबहिणीच्या बंगल्यावर आणलं.
मिस् कोहन आणि डॉ. केतकर हे इंग्लंडमध्ये एकमेकांच्या प्रेमात पडलेलं जोडपं. पण त्याचा उच्चार त्यांनी त्यावेळी केला नव्हता.
१९१२ साली भारतात परतल्यावर मराठी ज्ञानकोशाची निर्मिती करण्यासाठी केतकरांनी लिमिटेड कंपनी स्थापन केली. या कोशाला जर्मन आणि फ्रेंच भाषांतरकाराची गरज होती. आणि त्यासाठी डॉ. केतकरांनी आपल्या मैत्रिणीला भारतात नोकरी देऊ केली. म्हणून मिस् कोहन त्यांच्या बोलावण्यावरून आल्या. इंग्लंडला केतकर भेटले तेव्हापासून मिस् कोहन यांना भारताबद्दल आस्था निर्माण झाली होती. केतकरांचं आपल्या मातृभाषेवरचं, मराठीवरचं प्रेम त्यांना माहीत होतं म्हणून त्या ती भाषा येताना थोडीफार शिकूनही आल्या.
ज्ञानकोशाची पुणे शाखा १ एप्रिल १९१८ रोजी पुण्यात उघडली गेली. म्हणून नागपूर सोडून डॉ. केतकर पुण्यात स्थायिक झाले आणि तुळशीबागेत पेंडसेवाडय़ात राहू लागले. डॉ. केतकरांना मिस् कोहनशी विवाह तर करायचा होता, पण त्यांच्या मनावर असलेला हिंदुत्व अभिमानाचा मुख्य अडसर त्यांना ते करू देत नव्हता.
१९१२ ते १९१९ डॉ. केतकर जरी भारतात होते तरी ते मिस् कोहन यांना पत्रं व भेटी पाठवत असत. त्यात ट्रामच्या तिकिटासह चित्रविचित्र गोष्टी असत. मिस् कोहन यांचं प्रेम शुद्ध, उत्कट आणि स्थिर आहे याची डॉ. केतकरांना खात्री पटली होती. मिस् कोहन त्यांच्या कार्यालयात काम करीत होत्या. ‘हिस्टरी ऑफ इंडियन लिटरेचर’ या विंटरनिट्झच्या सुप्रसिद्ध जर्मन ग्रंथाचं भाषांतर मिस् कोहनकडे सोपवण्यात आलं होतं. पंधरा पृष्ठांना एक पौंड याप्रमाणे त्यांना मोबदला दिला गेला.
असो. डॉ. केतकर आणि मिस् कोहन यांना एकमेकांबद्दल अतीव प्रेम असल्यामुळे मिस् कोहन यांनी हिंदू धर्माचा स्वीकार करून हिंदू संस्कृतीत मिसळून जायचा निर्णय घेतला आणि केतकरांच्या मनातली आडकाठी दूर झाली. परंतु मिस् कोहन यांनी आपल्या लग्नाबद्दल वडिलांच्या मार्फत लो. टिळकांचा सल्ला विचारला, तेव्हा लो. टिळकांनी तात्त्विकदृष्टय़ा त्यांच्या विवाहास अनुकूल मत दिलं. ‘मात्र डॉ. केतकर हा श्रीमंत मनुष्य नाही. त्याला लेखणीच्या जीवावर उपजीविका करावी लागणार आहे. तेव्हा हे ध्यानात घेऊन वाटल्यास विवाह करावा,’ असा इशाराही दिला. पण केतकर जसे होते तसेच मिस् कोहन यांना हवे होते. त्यामुळे हिंदू धर्म स्वीकारून विवाह करण्याचं ठरलं. अर्थात लो. टिळकांनी दिलेला इशारा तंतोतंत खरा ठरला. लग्नानंतर काही र्वष सुखात गेली. नंतर मात्र दोघांना अर्धपोटी राहावं लागलं. केतकरांना मृत्यू येण्यापूर्वी वैद्यकीय मदतही नीट मिळाली नाही. या पुढच्या गोष्टी झाल्या.
त्यांच्या विवाहामुळे पुण्यात मात्र सनातन्यांच्या बालेकिल्ल्यात हलकल्लोळ माजला. लग्न होण्यापूर्वी तिशी उलटलेलं हे जोडपं (म्हणजे डॉ. केतकर ३६ वर्षांचे, तर मिस् कोहन ३३ वर्षांच्या!) पुण्यात रस्त्यातून हातात हात घालून फिरत. तेव्हा फ्रॉक घातलेल्या गोऱ्या कोहनबरोबर पगडी घातलेले डॉ. केतकर डुलत निघाले की पुणेकरांना विरोधाभासाचं प्रेक्षणीय दृश्य दिसे. आणि मग गावात पक्की बातमी पसरली- ही दोघं लग्नबंधनात अडकणार.
डॉ. केतकर नेहमी आपल्या मतानं वागणारे. त्यामुळे मिस् कोहन यांना हिंदू करून घ्यायचं, यासाठी त्यांनी अथर्ववेदामधला ‘व्रात्यस्तोम विधी’ करायचं ठरवलं. ‘वेदानुयायी लोकांपासून पोशाख वगैरे बाबतीत भिन्न असलेले लोक म्हणजे ‘व्रात्य’ आणि त्यांची स्तुती म्हणजे ‘स्तोम’! व्रात्यांना कोणताही पारमार्थिक उपदेश न करता, किंवा त्यांच्याकडून पश्चात्तापाची अपेक्षा न करता वैदिक समाज जेव्हा स्तुतीपूर्वक त्यांचा स्वीकार करी, तेव्हा व्रात्यस्तोमाचा विधी वेदकाळी केला जाई.’ (संदर्भ- डॉ. केतकरांचं चरित्र. लेखक- द. न. गोखले) हिंदुत्व हे पारमार्थिक मतावर अधिष्ठित नाही, अशी केतकरांची धारणा होती.
पण त्यावेळी मिस् कोहन यांना हिंदू धर्मात घेण्यासाठी व्रात्यस्तोम विधी करायला कुणी पुरोहित सहजासहजी मिळेना. डॉ. केतकारांनी लो. टिळकांना ‘तुम्ही या विधीच्या वेळी गृहपती व्हा,’अशी विनंती केली. टिळक म्हणाले, ‘‘यात मला अडकवू नका. व्रात्यस्तोम विधीला कोणी आक्षेप घेतला तर त्याचे समर्थन मी करीन,’’ असं आश्वासन मात्र त्यांनी दिलं.
नंतर ज्ञानकोश संपादक खात्याचे व्यवस्थापक य. रा. दाते यांनी व्रात्यस्तोम विधीचं पौरोहित्य स्वीकारलं. दुसरे संपादक चिं. ग. कर्वे यांनी त्यांना मदत केली. आणि २१ मार्च १९२० रोजी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ‘व्रात्यस्तोम विधी’ करून हिंदू झालेल्या ईडिथ कोहन यांचं नामकरण ‘शीलवती’ करण्यात आलं.
असा ‘व्रात्यस्तोम विधी’ न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांनी करावा असा दबाव त्यांच्यावर होता. कारण होतं- त्यांची मानसकन्या सखू ही १३ वर्षांची झाल्यावर तिच्या लग्नाचं बघताना नवऱ्या मुलाकडून ही मागणी आली. कारण लग्नापूर्वीच सखू ऋतुस्नात झाली होती. तेव्हा प्रायश्चित्त घेण्यासाठी हा विधी करा, असं सांगितल्यावर रमाबाईंनी ते नाकारलं आणि दुसरा मुलगा बघून मुलीचं लग्न केलं. रमाबाई रानडे यांना विधी करायला सांगण्यात आलं प्रायश्चित्त घेण्यासाठी; परंतु डॉ. केतकरांचा आपल्या वेदकालीन ग्रंथांचा प्रचंड अभ्यास असल्याने त्यांनी व्रात्यस्तोम विधीचा वेगळा अर्थ लावून विधी केला. इथे डॉ. केतकरांची प्रतिभा चकित करणारं वेगळं रूप धारण करते.
शीलवतीबाईंनी मग इंग्लंडला असलेल्या आपल्या वडिलांना आपल्या लग्नाचा बेत कळवला. आणि १४ मे १९२० रोजी विशिष्ट वैदिक पद्धतीला अनुसरून शीलवती आणि डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा विवाह झाला. अर्थातच पुण्यातल्या वृत्तपत्रांनी, संस्थांनी या लग्नावर टीका केली. रामशास्त्री आखवे यांनी म्हटलं, ‘‘केतकरांनी व्रात्यस्तोम विधी जसाच्या तसा केला नाही. सोमयागापासून निराळा केला.’’ केतकरांनी उत्तर दिलं, ‘‘अतिप्राचीन काळी व्रात्यस्तोम सोमयागाला जोडलेला नव्हता.’’ ज्यांनी या विधीमध्ये भाग घेतला त्या दाते आणि कर्वे यांना बहिष्काराला सामोरं जावं लागलं. ज्ञानकोश कार्यालयातली सनातनी मंडळी केतकर दाम्पत्याला बाटगी समजू लागली. गंमत म्हणजे ज्ञानकोश कार्यालयाचा गणपती बसला तेव्हा केतकर दाम्पत्याला वेगळं जेवायला बसावं लागलं.
डॉ. केतकर सतत काहीतरी नवं करण्यासाठी प्रसिद्ध होतेच. त्यांचा ज्ञानकोशाचा ज्ञानयज्ञ, त्याची विक्री, केतकरांचं कादंबरीसह अफाट लेखन यांत ते गुरफटलेले असताना ज्ञानकोश विकण्यासाठी ते प्रवासाला जात. शीलवतीबाई घर सांभाळत. आणि केतकरांना पत्रव्यवहारापासून अनुवादापर्यंत मदत करीत. लग्नानंतर शीलवतीबाई पेंडसे यांच्या वाडय़ात केतकरांबरोबर राहू लागल्या. मनानेही त्या हिंदू बनू लागल्या. साडी नेसण्याची कला त्यांनी बॅ. गाडगीळांच्या पत्नीकडून शिकून घेतली आणि झग्याऐवजी अधूनमधून साडी नेसू लागल्या. एकदा त्यांना पेंडसेवाडय़ातल्या एका बाईने नऊवारी नेसवून अंबाडा घालून दिला. केतकर घरी आले तेव्हा शीलवतीबाईंचा पोशाख पाहून म्हणाले, ‘‘असलं काही करू नकोस. तू आहेस तशीच मला हवी आहेस. बदल ते नऊवारी लुगडं.’’
शीलवतीबाईंनी केतकरांच्या अस्ताव्यस्त घराला घरपण आणलं. त्यांचे कपडे, अर्निबध खाणं-पिणं याला शिस्त लावली. पत्नीबरोबर केतकर इंग्रजीत बोलत आणि तिने करून दिलेला पाश्चात्य पोशाख आवडीने घालीत. लोक म्हणत, ‘‘केतकर बायकोला हिंदू बनवायला गेले, पण तिनेच त्यांना ख्रिस्ती बनवले.’’ पण अशा कुजबुजीकडे केतकर लक्ष देत नसत. डॉ. केतकरांचं व्यक्तिमत्त्व मनस्वी असलं तरी समजूतदार होतं. शीलवतीबाईंना स्वत:ला मतं असली तरी त्यांनी आपलं सर्वस्व केतकरांच्या पायी अर्पण केलं आहे असं त्यांचं वागणं असे, हे विद्वानांच्या लक्षात येई. पुण्यात हे नवपरिणीत जोडपं लोकांच्या कुतूहलाचा विषय होता. घरातलं सामान, भाजी वगैरे आणण्यासाठी दोघं बरोबर जात तेव्हा मुलांचे घोळके त्यांच्या पाठी लागत. मुलांना पाहून केतकर रागावत नसत, तर एका पिशवीत डाळ, चुरमुरे बरोबर घेत आणि मुलांना वाटीत असत.
डॉ. केतकरांना लोकांपुढे गंमत करण्याची लहर येई. एकदा ते पत्नीसह घरातला ड्रेसिंग गाऊन घालून सिनेमाला गेले. त्यांना चित्रपट पाहायचं वेड होतं. पती-पत्नी हातात शेंगा, पेरू व खाद्यपदार्थ खात खात हसत बोलत. रस्त्यात लोकांसमोर ते पत्नीला ‘डार्लिग’ म्हणत. तिचा निरोप घेताना गालाचा मुका घेत. ज्ञानकोशकार केतकर ते हेच का, असा लोकांना प्रश्न पडे.
लग्न होताच शीलवतीबाईंनी ज्ञानकोशाच्या कार्यालयातली नोकरी सोडली. त्यांना काहीतरी उद्योग असावा म्हणून ‘स्त्रीकर्मसदन’ नावाची संस्था केतकरांनी त्यांना काढून दिली. नवरा नसलेल्या स्त्रियांना उत्पन्नाचं साधन मिळावं म्हणून कपडे तयार करण्यासाठी ही संस्था काढून चार-पाच शिवणयंत्रं खरेदी केली. एक ख्रिश्चन माणूस कपडे बेतण्यासाठी ठेवण्यात आला. आता शीलवतीबाईंचा रिकामा वेळ कारणी लागला. परंतु बाराशे रुपयांचा तोटा सहन करून शेवटी संस्था बंद पडली, आणि शीलवतीबाई घरचं सांभाळू लागल्या.
शीलवतीबाईंचे वडील आणि बहीण पुण्यात येणार होते, म्हणून पेंडसेवाडय़ातली जागा सोडून केतकरांनी डेक्कन जिमखान्यावर लहानसा बंगला बांधला. तिथे केतकर कुटुंबाबरोबर कोहन मंडळी राहू लागली. पण काही काळाने केतकर लष्करात राहायला गेले. केतकरांना जवळचं कुणी नव्हतं. एका चुलतबहिणीचा उल्लेख शीलवतीबाईंनी केला आहे.
लग्नानंतर त्यांची तीन-चार र्वष सुखात गेली. सढळ हातानं पैसा खर्च झाल्यानं पैसे कमी पडू लागले. मूल होणार नाही हे लक्षात येताच त्यांनी मे १९२४ मध्ये एका चार वर्षांच्या मुलाला दत्तक घेतलं. डॉ. केतकरांच्या मोठय़ा दिवंगत भावाचं नाव दामोदर होतं. तेच नाव केतकरांनी त्या मुलाला ठेवलं.
दोन वर्षांनी १९२६ मध्ये एक तान्ही मुलगी त्यांनी दत्तक घेतली. डॉ. केतकरांनी तिचं नाव ‘वीरा’ ठेवलं आणि त्यांनी शीलवतीबाईंना सांगितलं की, शिवाजी महाराजांच्या कुटुंबातल्या एका स्त्रीचं हे नाव होतं. म्हणून मी ‘वीरा’ नाव ठेवलं. वीरा म्हणजे पराक्रमी आणि सत्यवचनी असा त्याचा अर्थ होता. शीलवतीबाई व डॉक्टर दोघांनाही मुलांचं वेड होतं. त्यामुळे त्यांचं घर आनंदानं भरून गेलं. केतकरांना मराठी भाषेचा अभिमान होता, तरी घरात इंग्रजी बोललं जाई आणि शीलवतीबाईंना मराठी ब्राह्मणी स्वयंपाक येत नसल्याने त्या पाश्चात्य पद्धतीचा स्वयंपाक करीत. परंतु हिंदूंचे, ख्रिश्चनांचे व ज्यूंचे सण ते साजरे करीत. दसऱ्याला तोरण बांधणं, सोनं वाटणं, दिवाळीला पणत्या, फटाके, रंगपंचमी, भाद्रपदात गणपती बसवत. आषाढी एकादशीचा उपास डॉ. केतकर निव्वळ पाणी पिऊन करीत आणि अंघोळीच्या वेळी पुरुषसूक्त म्हणत.
अतिशय प्रेमळ आणि कष्टाळू पत्नी केतकरांना मिळाली. शीलवतीबाईंचं केतकरांवर जीवापाड प्रेम होतं. त्यांच्या जीवनाशी त्या एकरूप झाल्या होत्या. केतकर प्रवासाला जात त्यावेळी त्यांचा रोज एकमेकांना पत्र लिहायचा प्रघात होता. त्यासाठी पुण्याचा घरचा पत्ता असलेली करड, पाकिटं शीलवतीबाई डॉ. केतकरांपाशी देऊन ठेवीत- म्हणजे रोज केतकरांकडून पत्र येई. डॉ. केतकरांच्या मनात सतत उच्च विचारांची आवर्तनं सुरू असत. त्याबद्दल बोलून चर्चा करायला शीलवतीसारखी पत्नी त्यांना लाभली.
ज्ञानकोशाचं प्रचंड काम, कादंबरीलेखन, स्वत:ची तीन नियतकालिकं, अनेक विषयांवर निरनिराळ्या नियतकालिकांत लेखन, ऐतिहासिक, समाजशास्त्रीय, संशोधनात्मक लेखन, इंग्रजी लेखन असा डॉ. केतकरांचा ज्ञानयज्ञ सुरू होता तो शीलवतीबाईंच्या साहचर्यानेच. १९३१ साली हैदराबाद इथे झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
लग्नानंतरची चार-पाच र्वष- विशेषत: मुलं दत्तक घेतल्यावर, शीलवतीबाईंचे वडील व बहीण घरात राहायला आल्यावर केतकर दाम्पत्याचं आयुष्य आनंदमय झालं. नंतर खर्चाच्या मानानं पैशांची आवक कमी होऊ लागली आणि त्यांना उपास पडायला लागले. तरीही केतकरांबरोबर शीलवतीबाई आनंदात होत्या.
डॉ. केतकर गेल्यावर थोर लेखिका दुर्गाबाई भागवत यांच्याशी शीलवतीबाईंचा परिचय झाला. त्याबद्दल लिहिताना दुर्गाबाई म्हणतात, ‘‘प्रथम विद्यापीठात त्या मला भेटल्या. मी तर केतकरांना पाहिलेलंही नव्हतं. तेव्हा त्यांना जाऊन वर्ष व्हायचं होतं. ओळखीनंतर आठवडाभराने असेल- आम्ही घरात जेऊन गप्पा मारत होतो. मी खिडकीतून पाहिलं तेव्हा शीलवतीबाई परकर-पोलका नेसलेली आपली मुलगी वीरा हिच्यासह आमच्या घराचा जिना चढून तिसऱ्या मजल्यावर गेल्या आणि काही मिनिटांतच खाली उतरल्या. त्या कंपाऊंडबाहेर जात असताना मी वडिलांना ते सांगितलं. वडील म्हणाले, ‘‘पाहतेस काय? बोलाव त्यांना. केतकर होते तेव्हा ज्ञानकोश घ्यायला पैसे नव्हते. आज आहेत.’’ आणि वडिलांनी शीलवतीबाईंकडून ज्ञानकोश घेऊन त्या रकमेचा चेक दिला तेव्हा शीलवतीबाईंचा चेहरा उजळला. त्या दिवशीही शीलवतीबाई उपाशीच होत्या.’’ दुर्गाबाईंनी त्यांचं आणखी एक वैशिष्टय़ सांगितलं आहे, की ‘शीलवतीबाई पाश्चात्य पोशाखात असत. घरी इंग्रजीच बोलत. पण महाराष्ट्रीयांबद्दल कुणी वावगं बोललं तर ते त्यांना खपत नसे. मराठी भाषेवर त्यांचं प्रेम होतं. त्या मराठी लिहीत नसत, पण वाचताना भाषेचे बारकावे त्या उत्तम जाणत. त्यांच्या अनुवादकौशल्याने त्यांना भाषा-भाषांवर निरपेक्ष प्रेम करायला शिकवलं. त्यांची अनुपम इंग्रजी शैली विलक्षण होती. अनुवादकलेत त्या मला मार्गदर्शक ठरल्या. केंद्र सरकारनेही त्यांना शास्त्रीय अनुवादकांच्या समितीवर नेमलं होतं. वनस्पतीशास्त्र, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, मानववंशशास्त्र अशा नानाविध विषयांवर त्यांनी भरपूर अनुवाद केले.’
एकदा शीलवतीबाई दुर्गाबाईंना म्हणाल्या, ‘‘ज्या श्रेयासाठी मी जन्मभर झटले, ते आता या कामामुळे (अनुवाद) माझ्या पदरी पडले आहे. आता मला स्वत:साठी मागायचे काही उरले नाही. आणि तुला सांगते, हे (केतकर) आज असते तर नेहरू त्यांच्या गुणांचे चीज केल्याशिवाय राहते ना! स्वातंत्र्योत्तर काळ त्यांच्या (केतकरांच्या) कार्याला अनुकूल होता. पण मृत्यूपुढे इलाज नाही. दीर्घायुष्य हवे ते यासाठी.’’ दुर्गाबाई लिहितात, ‘‘शीलवतीबाईंचा बोलण्याचा तो शांत स्वर, तो सौम्य आवाज सांध्यकिरणांच्या सोनेरी गुलाबी रंगात मिसळून जात होता.’’ शीलवतीबाईंच्या हिंदुत्वनिष्ठेचं एक उदाहरण दुर्गाबाईंनी दिलं आहे.. ‘‘त्यांची वीरा मिळवू लागली नव्हती तेव्हा त्या हलाखीच्या स्थितीत होत्या. उपासमार होत होती. उपासानं आपण पिचून जाऊ नये म्हणून ही ग्रंथप्रेमी स्त्री ग्रंथालयात नाना तऱ्हेची पुस्तकं वाचून काढायची आणि कुठे भाषांतराचं काम मिळालं तर घ्यायची. त्यावेळी एका युरोपीयन बाईंचं हिंदूंच्या धार्मिक व लौकिक ग्रंथावर लिहिलेलं पुस्तक प्रसिद्ध होणार होतं. त्या बाई खूप श्रीमंत होत्या. त्या त्यावेळी भारतात आल्या होत्या. त्यांनी शीलवतीबाईंना विचारलं, ‘माझ्या जर्मन लेखनाचा अनुवाद कराल का?’ मग शीलवतीबाईंनी पुस्तक वाचलं. आणि त्या म्हणाल्या, ‘या पुस्तकात हिंदू धर्माची नालस्ती आहे. मी हिंदू आहे. याचा अनुवाद मी करणार नाही.’ आणि मिळणारे एक-दोन हजार रुपये त्यांनी घालवले. त्यावेळी मुलीचा भुकेजला चेहराही त्यांना मोहात पाडू शकला नाही.’
शीलवतीबाईंनी डॉ. केतकरांचं दहन न करता दफन केलं म्हणून अनेकांनी त्यांना नावं ठेवली. पण दफन करण्याची इच्छा केतकरांची होती. त्यावर त्या ठाम राहिल्या, इकडे लोकांनी दुर्लक्ष केलं.‘मीच हे सांगितलं पाहिजे’ हे शीलवतीबाईंनी केतकरांच्या मृत्यूनंतर २५-३० वर्षांनी लिहिलेलं पुस्तक वाचताना गलबलायला होतं. किती उत्कट प्रेम केलं त्यांनी केतकरांवर! डॉ. केतकरांच्या कार्याशी, त्यांच्या जीवनाशी त्या एकरूप झाल्या होत्या. त्यात दारिद्य््रा, उपासमार, लोकांनी केलेले अपमान, हेटाळणी असं त्यांनी खूप काही सोसलं. डॉ. केतकरांचा मृत्यू दारिद्य््राामुळेच झाला. पायातल्या फाटक्या बुटामुळे खिळा तळपायात घुसला आणि जखम झाली. मधुमेह असल्याने ती जखम बरी होईना. त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. दहा दिवस ते तिथे होते. पण वैद्यकीय सेवा नीट न मिळाल्यामुळे व अक्षम्य दिरंगाईमुळे केतकर गेले. आणि शीलवतीबाई एकाकी झाल्या. या पुस्तकात केतकर किती बुद्धिमान आणि थोर होते, हे त्यांनी अनेक प्रसंगांतून सांगितलं आहे. लोक केतकरांच्या विक्षिप्तपणावर टीका करीत, त्या टीकेलाही त्यांनी आपल्या पुस्तकातून उत्तर दिलं आहे.
२ फेब्रुवारी १८८४ साली जन्मलेले डॉ. केतकर १० एप्रिल १९३७ साली वारले, तर १८८७ साली जन्मलेल्या (जन्मतारीख उपलब्ध नाही.) शीलवतीबाई २२ नोव्हेंबर १९७९ साली वारल्या. त्यांची मुलगी लग्न होऊन दिल्लीला होती/ किंवा आहे. पूर्वी ती मुंबईत होती. पण आज तिची निश्चित माहिती उपलब्ध नाही. दत्तक मुलगा त्यांच्यापाशी राहिला नाही. परंतु शीलवतीबाईंनी केतकरांचं मोठेपण सतत जपलं. दुर्गाबाईंच्या सहकार्याने त्यांच्या दहाव्या पुण्यतिथीला- म्हणजे १९४७ साली ‘हिंदुइझम : इट्स फ्युचर इन् दि न्यू वर्ल्ड सोसायटी’ हे पुस्तक त्यांनी तयार केलं. दुर्गाबाई म्हणतात, ‘‘हे इंग्रजी पुस्तक तयार होताना इथेच डॉ. केतकरांशी माझा मनोमन सांधा जुळला. आणि या पुस्तकापासून डॉ. केतकरांनी माझ्या मनाचा कब्जा घेतला. अजूनही अनेक तऱ्हांनी ते मला झपाटून टाकतात..’’ असं दुर्गाबाईंनी जानेवारी १९६९ साली लिहिलं आहे. पुढे त्यांनी केतकरांच्या कादंबरीवर समीक्षा लिहिली.
डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्यासारख्या प्रकांड पंडित, ज्ञानमार्गी माणसाला सांभाळणं, त्यांचं लेखन जपणं, त्यांना मदत करणं आणि आयुष्यभराचा आधार देणं- हे शीलवतीबाईंनी अत्यंत प्रेमानं केलेलं कार्य विसरता येण्यासारखं नाही. त्यांच्याबद्दल किंवा त्यांनी लिहिलेलं केतकरांसंबंधीचं लेखन वाचताना डोळ्यांत पाणी जमा होतं. आतून गलबलायला होतं. त्याकाळच्या प्रख्यात प्रकाशकांनी- म्हणजे ह. वि. मोटे यांनी प्रथम शीलवतीबाईंच्या केतकरांबद्दलच्या आठवणी प्रसिद्ध केल्या. नंतर पॉप्युलर प्रकाशनाने त्याची दुसरी आवृत्ती काढली. डॉ. केतकरांच्या व्यक्तिमत्त्वाची, त्यांच्या अफाट कार्याची बूज समकालीन विद्वज्जनांनी राखली नाही, हे शल्य शीलवतीबाईंना विद्ध करीत होतं. ते पुस्तकरूपात अभ्यासकांपुढे आलं. शीलवतीबाईंना त्यासाठी जोड मिळाली ती विद्वान दुर्गाबाईंची. आणि डॉ. केतकरांनंतर बहीण हेटी कोहन हिने त्यांना मदत केली. पुढे तीही वारली. परंतु या इथल्या समाजात एकाकी शीलवतीबाईंना दुर्गाबाईंचा मानसिक आधार मिळाला, ही गोष्ट मला महत्त्वाची वाटली. ९२ वर्षांचं
आयुष्य शीलवतीबाई जगल्या. पण त्यावेळी त्या कुठे होत्या, त्यांची मुलं कुठे होती, याचा शोध घेऊनही माहिती मिळाली नाही. शेवटपर्यंत डॉ. केतकर हाच ध्यास शीलवतीबाईंना लागला असेल असं अनुमान काढता येतं.
n madhuvanti.sapre@yahoo.com