पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या शताब्दी वर्षांचा प्रारंभ नुकताच झाला. मध्यंतरी काही समाजविघातक शक्तींनी संस्थेत घुसून केलेल्या विध्वंसक कृत्यामुळे भांडारकर संस्था अकस्मात प्रकाशझोतात आली होती. मात्र, तिथे चालणारं संशोधनकार्य हे आत्यंतिक मौलिक तसंच अस्सल आहे याची जाणत्या मंडळींना निश्चितपणे जाणीव आहे. शताब्दीनिमित्ताने प्राच्यविद्येतील संशोधनात वैश्विक कामगिरी बजावणाऱ्या या संस्थेच्या कार्याचा मागोवा घेणारा खास लेख..
‘‘पाश्चात्त्य आणि भारतीय विद्वानांमध्ये परस्परांना सहकार्य करण्याची वृत्ती हवी; एकमेकांची निंदा करण्याची नव्हे. आपणा सर्वाचं एकच समान उद्दिष्ट हवं, ते म्हणजे-सत्याचा शोध. चिकित्सक विद्वानानं आपलं काम न्यायाधीशासारखं आहे असं समजलं पाहिजे..’’ हे उद्गार आहेत सर रामकृष्ण गोपाल भांडारकर यांचे.

पुण्यात १९१९ साली भरलेल्या अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेच्या पहिल्या अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी प्राच्यविद्येच्या क्षेत्रातील संशोधनाविषयी आपले विचार विस्ताराने मांडले. या जागतिक कीर्तीच्या थोर विद्वानाचं कार्य चिरस्वरूपात राहावं आणि त्यापासून अभ्यासकांच्या पुढच्या पिढय़ांना प्रेरणा मिळावी यासाठी भांडारकरांच्या विद्यार्थ्यांनी आणि सहकाऱ्यांनी एक संशोधन संस्था स्थापन केली, ती म्हणजे ‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर’ होय. ६ जुल १९१७ रोजी भांडारकरांच्या ८० व्या वाढदिवशी स्थापन झालेल्या या संस्थेने आता शंभराव्या वर्षांत पदार्पण केलं आहे. नव्याने स्थापन झालेल्या या संस्थेनं काही संशोधन प्रकल्प हाती घेणं गरजेचं होतं. औंधचे संस्थानिक भवानराव पंतप्रतिनिधींनी महाभारताची चिकित्सापूर्ण आवृत्ती तयार करावी असा प्रस्ताव मांडून त्याचा शुभारंभ करण्यासाठी एक लाख रुपयांची देणगीही दिली. रामायण-महाभारतासारख्या ग्रंथांचं महत्त्व मुद्दाम सांगायची आवश्यकता नाही. महाभारताच्या हजारो पोथ्या असून त्यांमधील श्लोकांची संख्याही वेगवेगळी आहे. श्लोकांच्या पाठांमध्येही फरक आहे. या पोथ्यांचं चिकित्सक दृष्टीने संशोधन करून त्याची संशोधित आवृत्ती तयार करणं हे एक मोठंच आव्हान होतं. त्याकरिता संस्थेनं जगभरातून महाभारताच्या सुमारे सोळाशे पोथ्या गोळा केल्या. त्यापकी ७३४ निवडक पोथ्यांमधून संस्थेतील विद्वानांनी ४८ वर्षांच्या प्रदीर्घ परिश्रमांनंतर महाभारताची एकोणीस खंडांची प्रचंड आवृत्ती १९६६ साली पूर्ण केली. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या हस्ते ती प्रकाशित करण्यात आली. या आवृत्तीतील मुद्रणदोष शोधून नवी आवृत्ती तयार करण्याचा उपक्रम संस्थेनं आता हाती घेतला आहे. त्याचबरोबर महाभारतातील विविध विषयांची सूची तयार करण्याचं काम सुरू आहे. महाभारतामध्ये सांगितलेले पर्वत, देश, गावे, प्राणी, वनस्पती, व्यक्ती, वस्तू इत्यादी गोष्टींची सूची तयार करण्याचं ते काम आहे. महाभारताच्या या सांस्कृतिक सूचीचे दोन खंड प्रकाशित झालेले आहेत. ‘महाभारताचा उपसंहार’ या नियोजित प्रकल्पासाठी ही सूची उपयुक्त ठरेल. या संशोधनामुळे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर ही जागतिक महत्त्वाची संस्था म्हणून नावारूपाला आली. याबरोबरच इतरही महत्त्वाच्या संशोधनामुळे संस्थेच्या लौकिकात भर पडली आहे.
भांडारकर संस्थेने प्रकाशित केलेला दुसरा महत्त्वाचा संशोधन प्रकल्प म्हणजे ‘धर्मशास्त्राचा इतिहास’! महामहोपाध्याय डॉ. पांडुरंग वामन काणे यांनी हा ग्रंथ ३७ वष्रे अविश्रांत परिश्रम करून पूर्ण केला. मुंबई उच्च न्यायालयात वकिली करण्याचे काम सांभाळीत काणे यांनी पाच खंडांमध्ये विभागलेला सुमारे ६२०० पानांचा हा ग्रंथ एकटय़ाने लिहिला यावर विश्वास बसणे कठीण आहे. या ग्रंथाच्या उपसंहारामध्ये काणे यांनी आपल्या कार्यपद्धतीचा तपशील दिला आहे. या महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दल काणे यांना १९६४ साली ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान बहाल करण्यात आला. ग्रंथाच्या लेखनाकरिता ‘भारतरत्न’ पदवीने सन्मानित झालेले काणे हे आजवरचे एकमेव विद्वान आहेत. काणे यांचं कार्य जसं मोठं, तसंच त्याची दखल घेणारे तत्कालीन जाणकारही मोठेच.
प्रसिद्ध प्राच्यविद्यापंडित आणि संस्थेचे मानद सचिव डॉ. रामचंद्र नारायण दांडेकर यांनी तयार केलेली ‘वेदिक बिब्लिओग्राफी’ ही वेदाभ्यासाठी उपयुक्त अशी संदर्भसूची हे तिसरं महत्त्वाचं प्रकाशन. जगभरात होणाऱ्या वेदाभ्यासाची ही सूची होय. सहा खंडांच्या या सूचीत सुमारे साठ हजार ग्रंथ आणि लेखांच्या नोंदी समाविष्ट असून सध्या तिच्या सातव्या खंडाचं काम सुरू आहे. भारतामध्ये प्राच्यविद्या म्हणजे भारतविद्या आणि भारतविद्या म्हणजे प्राधान्याने संस्कृतविद्या अशी समीकरणं तयार झाली आहेत. वस्तुत: प्राचीन भारताच्या वाङ्मयीन इतिहासात प्राकृत आणि पाली या अभिजात भाषांमधील वाङ्मयाचं योगदानही महत्त्वाचं आहे. तसंच धम्रेतिहासात जैन आणि बौद्ध धर्माचं योगदानही विसरता येणार नाही. या अभ्यासास चालना देणारा संस्थेचा प्रकल्प म्हणजे अर्धमागधी, महाराष्ट्री, जैन महाराष्ट्री इ. प्राकृत भाषांचा ऐतिहासिक कोश. ‘सन्मतितीर्थ’ या संस्थेच्या सहकार्याने संस्थेने हा प्रकल्प १९८७ साली हाती घेतला आणि त्याचे प्रधान संपादक म्हणून संस्कृत, प्राकृत, भाषाशास्त्र या विषयांचे नामवंत विद्वान डॉ. अ. मा. घाटगे यांची नियुक्ती केली. या शब्दकोशाचे कार्य सध्या प्रगतिपथावर असून ते एक ऐतिहासिक महत्त्वाचे कार्य ठरेल.
स्वत:च्या संशोधन प्रकल्पांखेरीज अन्य संशोधन संस्थांच्या सहकार्याने काही संशोधन प्रकल्प हाती घेण्याची संस्थेची योजना आहे. ‘ऑक्सफर्ड सेंटर फॉर हिंदू स्टडीज्’ (OCHS) या ऑक्सफर्ड विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्राने ‘भागवत महापुराण’ या ग्रंथासंबंधी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून त्यासाठी भांडारकर संस्थेचं सहकार्य मागितलं आहे. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून अहमदाबाद येथून प्रसिद्ध करण्यात आलेल्या भागवत महापुराणाच्या चिकित्सापूर्ण आवृत्तीची समीक्षा करण्याचं कार्य संस्थेनं हाती घेतलं आहे. तसंच महाराष्ट्रातील भागवत संप्रदाय व भागवत पुराणविषयक मराठी वाङ्मय यासंबंधीचा संशोधनपर ग्रंथही तयार करण्यात येणार आहे. याशिवाय संस्थेनं काही वैयक्तिक संशोधन प्रकल्पांसाठीही अनुदान दिलेलं असून त्यांचं कार्यही समाधानकारकपणे सुरू आहे. संस्थेचा प्रकाशन विभाग कार्यरत असून त्या विभागातर्फे एक संशोधन-कालिक ‘Annals of Bhandarkar Oriental Research Institute’ या नावाने प्रसिद्ध केलं जातं. त्याच्या ९३ व्या अंकाच्या संपादनाचं काम सध्या चालू आहे. संस्थेनं आजपावेतो सुमारे तीनशेहून अधिक संशोधनात्मक ग्रंथ प्रसिद्ध केले आहेत. हे संशोधन ग्रंथ वेद, व्याकरण, कोशशास्त्र, योग, बौद्ध धर्म, जैन धर्म, भारतीय तत्त्वज्ञान, इतिहास, साहित्य अशा विविध विषयांशी संबंधित असून त्यामध्ये संस्कृत, पाली, प्राकृत आणि इतर भाषांमधील वाङ्मयाचा परामर्श घेण्यात आला आहे.
संशोधनाच्या क्षेत्रात विद्वानांच्या विचारांचं आदानप्रदान महत्त्वाचं असतं. त्यासाठी परिषदांचं आयोजन केलं जातं. भांडारकर संस्थेनं स्थापन केलेल्या अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेच्या पहिल्या अधिवेशनाचा उल्लेख या लेखाच्या प्रारंभी आला आहे. या परिषदेची अधिवेशनं तेव्हापासून नियमितपणे भारतात विविध ठिकाणी आयोजित केली जातात.
संशोधन संस्थेला साजेसं असं संस्थेचं ग्रंथालय असून त्याचा शुभारंभ भांडारकरांनी भेट दिलेल्या २,२०० अमूल्य ग्रंथांच्या संग्रहानं झाला. संस्थेच्या ग्रंथालयात सध्या १,३५,००० पुस्तकं आणि नियतकालिकं असून संशोधन क्षेत्रातलं अत्यंत महत्त्वाचं ग्रंथालय असा त्याचा लौकिक आहे. ग्रंथालयाचं डिजिटायझेशन आणि ऑटोमेशन सध्या करण्यात येत आहे. तसंच टप्प्याटप्प्यानं या ग्रंथालयाचं रूपांतर ई-लायब्ररीमध्ये करण्याची योजना असून त्यामुळे जगभराच्या अभ्यासक तसंच वाचकांना या ग्रंथालयाचा लाभ इंटरनेटच्या माध्यमातून घेता येईल.
संस्थेकडे सुमारे अठ्ठावीस हजार हस्तलिखित पोथ्यांचा संग्रह आहे. मुंबई प्रांताच्या सरकारच्या योजनेतून गोळा केलेल्या सुमारे सतरा हजार पोथ्या भांडारकर संस्थेला १९२२ साली देण्यात आल्या. संस्थेनं त्यात सुमारे अकरा हजार पोथ्यांची भर घातली. काश्मीरमधून गोळा केलेल्या आठशेहून अधिक पोथ्या हे या संग्रहाचं वैशिष्टय़ आहे. त्यातील ऋग्वेदाच्या पोथीची नोंद युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये घेण्यात आलेली आहे, तर पाच हस्तलिखितांना ‘राष्ट्रीय महत्त्वाची हस्तलिखिते’ म्हणून मान्यता मिळालेली आहे. या संग्रहाचे पहिले क्यूरेटर डॉ. परशुराम कृष्ण गोडे यांनी आपल्या ४२ वर्षांच्या कारकीर्दीत हा संग्रह तर सांभाळलाच; पण त्याचबरोबर हस्तलिखितांच्या आधारे तब्बल ४७४ शोधनिबंधही लिहिले. या संग्रहात थायलंड, म्यानमार, श्रीलंका, तिबेट, चीन अशा निरनिराळ्या देशांतलं बौद्ध वाङ्मय (त्रिपिटक) असून, ‘अवेस्ता’ या पारशी धर्मग्रंथाच्या तसंच पíशयन भाषेतल्या मौल्यवान हस्तलिखितांचा संग्रहही आहे. भारत सरकारच्या ‘राष्ट्रीय पाण्डुलिपि मिशन’चं (National Mission for Manuscripts) महाराष्ट्र राज्यासाठीचं केंद्र भांडारकर संस्थेमध्ये असून हस्तलिखितांच्या नोंदणीचं आणि वैज्ञानिक पद्धतीनं जतन करण्याचं काम तिथं चालतं.
भांडारकर संस्था ही मुख्यत: संशोधनाला प्राधान्य देणारी संस्था असून तिथं महाविद्यालयं आणि विद्यापीठं यांच्या धर्तीवर अभ्यासक्रम चालविले जात नाहीत. तसंच त्यांचं अनुकरण करणंही संस्थेस अभिप्रेत नाही. तथापि इतरत्र न चालविले जाणारे वैशिष्टय़पूर्ण, प्रयोगशील अभ्यासक्रम चालवणं हे संस्थेच्या उद्दिष्टांशी सुसंगत असं महत्त्वपूर्ण कार्य करण्याची संस्थेची योजना आहे. यासंदर्भात संस्थेनं काही उपक्रम नुकतेच हाती घेतले आहेत. जुल २०१५ मध्ये संस्थेनं पारशी धर्मग्रंथ अवेस्ताविषयक अभ्यासवर्ग सुरू केला. त्यास पारशी आणि इतर भारतीय जिज्ञासूंनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. दहा दिवसांच्या या कार्यशाळेत एकूण ८० विद्यार्थी सहभागी झाले. या कार्यशाळेमध्ये प्रा. श्रीमती अल्मुट िहत्से या लंडन विश्वविद्यालयातील नामवंत विदुषींनी अध्यापन केलं. या उपक्रमाला ‘पाझरेर’ या दिल्लीतल्या संस्थेचं बहुमोल सहकार्य लाभलं. फेब्रुवारी २०१६ मध्ये पाणिनीच्या व्याकरणासंबंधी एक उच्चस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत अध्यापनासाठी संस्थेनं संस्कृत व्याकरणाचे जागतिक कीर्तीचे अमेरिकन विद्वान प्रा. जॉर्ज कार्दोना यांना निमंत्रित केलं. प्राचीन अध्ययन पद्धती आणि आधुनिक चिकित्सक दृष्टिकोन यांचा तौलनिक विचार करणाऱ्या या विद्वानाच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी भारतातून तसेच जपान, जर्मनी या देशांमधून विद्यार्थी आले. एकूण साठपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. या दोन्ही कार्यशाळांसाठी संस्थेच्या हितचिंतकांनी भरघोस आíथक साहाय्य केलं.
संस्थेच्या कार्यासाठी आधुनिक सुविधांनी युक्त असं सभागृह तसंच अतिथीगृहाची नितांत आवश्यकता आहे. तसंच संस्थेच्या स्थापनेनंतर लगोलग बांधण्यात आलेल्या संस्थेच्या ऐतिहासिक वास्तूचं नूतनीकरण करणंही गरजेचं आहे. त्यासाठी केंद्र शासनाने मदतीचा हात पुढे केला आणि पाच कोटी रुपयांचं अनुदान देऊ केलं. हा प्रकल्प हाती घेतल्यानंतर संस्थेला अनेक तांत्रिक समस्यांना तोंड द्यावं लागलं आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी बराच वेळ खर्च करावा लागला. तथापि आता या समस्यांचं निराकरण पुष्कळशा प्रमाणात झालं असून शताब्दी वर्षांत किमान नवे सभागृह बांधून पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. शताब्दी वर्षांत आणखी काही उपक्रम संस्थेने हाती घेतले आहेत.
१.एकूण दहा नव्या संशोधन ग्रंथांचं प्रकाशन करणं.
२.संस्थेच्या महत्त्वाच्या प्रकाशनांच्या नव्या आवृत्त्या काढणं.
३.सर भांडारकर आणि भांडारकर संस्था यांच्या कार्याविषयी जनजागृती करणं.
४.भांडारकरांनी केलेले तुकाराम गाथेवरील लेखन प्रसिद्ध करणं.
५.दोन आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांचे आयोजन.
६.अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेचे आयोजन.
७.पारशी धर्मग्रंथ अवेस्ताविषयक अभ्यासवर्ग स्थायी स्वरूपात सुरू करणं.
८.भारतविद्याविषयक सुसज्ज संग्रहालय आणि प्रेक्षागृह उभारणं.
नुकताच ६ जुल रोजी संस्थेच्या शताब्दी वर्षांस प्रारंभ झाला. त्यानिमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये शताब्दी निधीची योजना मांडण्यात आली. या योजनेत संस्थेच्या वर उल्लेखिलेल्या योजनांच्या परिपूर्तीसाठी सुमारे शंभर कोटी रुपयांचा निधी जमविण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. या आवाहनाला हितचिंतकानी लगोलग प्रतिसादही दिला आणि एक कोटी सहा लाख रुपयांची देणगी जाहीर झाली. आणखीही देणग्या मिळू लागल्या आहेत. हितचिंतकांच्या या बहुमूल्य साहाय्यातून संस्थेचे संकल्पित प्रकल्प मार्गी लागतील असा विश्वास आहे.
(लेखक भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरचे मानद सचिव आहेत.)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संस्थेकडे सुमारे अठ्ठावीस हजार हस्तलिखित पोथ्यांचा संग्रह आहे. मुंबई प्रांताच्या सरकारच्या योजनेतून गोळा केलेल्या सुमारे सतरा हजार पोथ्या भांडारकर संस्थेला १९२२ साली देण्यात आल्या. संस्थेनं त्यात सुमारे अकरा हजार पोथ्यांची भर घातली. काश्मीरमधून गोळा केलेल्या आठशेहून अधिक पोथ्या हे या संग्रहाचं वैशिष्टय़ आहे. त्यातील ऋग्वेदाच्या पोथीची नोंद युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये घेण्यात आलेली आहे, तर पाच हस्तलिखितांना ‘राष्ट्रीय महत्त्वाची हस्तलिखिते’ म्हणून मान्यता मिळालेली आहे. या संग्रहाचे पहिले क्यूरेटर डॉ. परशुराम कृष्ण गोडे यांनी आपल्या ४२ वर्षांच्या कारकीर्दीत हा संग्रह तर सांभाळलाच; पण त्याचबरोबर हस्तलिखितांच्या आधारे तब्बल ४७४ शोधनिबंधही लिहिले.
डॉ. श्रीकान्त बहुलकर

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The bhandarkar oriental research institute centenary year start
First published on: 17-07-2016 at 02:10 IST