‘कलावंताची सामाजिक बांधीलकी’ वगैरे गोष्टी खरंच खूप जुन्या झाल्यात.. पण आजचेही दृश्यकलावंत करतात समाजाचा विचार. त्यांचं काय करायचं? त्यांच्याकडे कौशल्य नाही म्हणून हिणवायचं का? की व्हिडीओकलेला चित्रशिल्पकलेत स्थानच नाही असं मानायचं? असा विचार फक्त कोतेपणीच होऊ शकतो. एरवी आपण आजही समाजकेंद्री कलेचं स्वागतच करायला हवं, असा विश्वास ‘दृश्यकलेचं ऑलिम्पिक’ म्हणवल्या जाणाऱ्या व्हेनिसच्या बिएनालेनं यंदा दिला.. त्यातून दृश्यकलावंत आणि समाज यांच्या नात्यातली नवी वळणं दिसली..
गोष्ट आहे १९६० च्या दशकातली – किंवा, ही गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवणारे जॉर्ज द्रिवास म्हणतात त्याप्रमाणे, १९६८ सालची. युरोपातल्या विषाणूशास्त्रज्ञांनी एकत्र येऊन एक महत्त्वाकांक्षी प्रयोग केला, त्यातल्या काही फिल्मच आपल्याला सापडल्या असून व्हेनिसच्या बिएनालेत ग्रीस देशाच्या ‘पॅव्हिलियन’मध्ये आपण त्या सादर करतो आहोत, अशी पाटीच द्रिवास यांच्या नावानं लागली होती.. वर या सादरीकरणाचं नाव ‘लॅबोरेटरी ऑफ डायलेमाज्’ म्हणजे दुविधांची प्रयोगशाळा – असं या पाटीवर वाचतानाच शंका येत होती, की गोष्टबिष्ट सगळा एक बनाव आहे – फिल्म खोटय़ाच असणार – वगरे. पण बनाव कशासाठी? खोटी असेलही, पण ही गोष्ट काय सांगते आहे?
ही गोष्ट सांगण्यासाठी जॉर्ज द्रिवास यांनी दुमजली नेपथ्य उभारलं होतं! जे देश व्हेनिसच्या दृश्यकला द्वैवार्षकिीत (आर्ट बिएनाले) दर खेपेला भाग घेतातच, अशा देशांचे एकेक बांधीव ‘पॅव्हिलियन’ असतं. यांत भारत नाही, पण तुर्कस्तान किंवा अगदी सर्बयिा वा व्हेनेझुएलासारखे देश नेहमी असतात. ग्रीस तर प्रथमपासून (इतिहास १०० हून अधिक वर्षांचा असलेल्या) या व्हेनिस बिएनाले ऑफ आर्टमध्ये सहभागी असतो. त्यामुळे ग्रीक पॅव्हिलियन प्रशस्तही आहे. तर या अशा बांधीव जागेत द्रिवास यांनी उभारलेल्या त्या दुमजली नेपथ्यात आपण आधी पहिल्या मजल्यावर जायचं. तिथं कठडा असलेल्या सज्जासारखी रचना आणि कठडय़ावर मोठय़ा टीव्हीत ‘त्या’ फिल्मचा – पर्यायानं गोष्टीचाही – पहिला तुकडा. त्यात प्रयोगशाळेचे प्रमुख प्रोफेसर आपल्याला प्रयोगाची जी माहिती देतात, ती मोघम आहे. काही पावलं पुढे गेल्यावर दुसऱ्या तशाच टीव्हीत हे प्रोफेसर त्यांच्या चमूशी बोलताहेत- रोग नष्ट करण्यासाठी आपण मेहनत घेऊच, पण तुम्ही एकदा या बाजूनं, एकदा त्या बाजूनं विचार करावा म्हणून प्रयोगशाळेच्या खोल्याही मुद्दाम नागमोडी बांधल्याचं सांगतात. आपण खाली पाहावं तर, तशीच रचना दिसते.. आपणच प्रयोगशाळेत आहोत? नाही – ती तर आपल्याला वरून पाहता येते आहे. हुश्श! आता तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या टीव्हीत हा प्रयोग कावीळरोधक पेशी निर्माणाचा असल्याचं समजतं. या विखारी पण गुणकारी पेशी कशा निर्माण होत आहेत, याचं सूक्ष्मदर्शकी दृश्यरूप आपण पाहू शकतो. पण गोष्टीचं कथानक रंगतं ते, या विखारी पेशीच खूप जास्त झाल्यात आणि त्यातच आता काही अनपेक्षित अशा ‘परक्या पेशीं’ची भर पडली आहे असं या शास्त्रज्ञांना कळतं, तिथपासून! प्रश्न गंभीर आहे.. आपखुशीनं सहभागी झालेल्या काही रुग्णांच्या जिवावर हे प्रयोग चालले आहेत. परक्या पेशींमुळे किती अपाय होणार याची कल्पना शास्त्रज्ञांनाही नाही. पुढे काय? आता हा प्रयोगच बंद करायचा का?
उच्चस्तरीय बठकीत सर्व सहभागी संस्थांचे प्रमुख यावर खल करताहेत. कुणी म्हणतो, या प्रयोगामागे एक कल्याणकारी स्वप्न आहे म्हणून राहू द्या चालू प्रयोग. त्यावर लगेच आक्षेप असा, की माणसांचे जीव जाऊ दे का? किती माणसं मारणार तुमच्या स्वप्नासाठी? यावर कोणी उठून म्हणतो, व्यवहार पाहा आणि आपला पसा कारणी लागणार की नाही एवढंच मोजा. अखेर पसेवाल्या एका संस्थेची प्रमुख म्हणते, आम्ही तरी या प्रयोगात नाही. आम्ही आमचा सहभाग थांबवतो आहोत!
आता नवा प्रश्न – प्रयोगातून एकेक संस्था गळू लागल्यास त्या प्रयोगाचं आणि त्यापायी जे जीव टांगणीला लागलेत त्यांचे भवितव्य काय?
फिल्म इथे संपते; पण ही गोष्ट त्या कुठल्याशा प्रयोगाची नसून आजच्या युरोपीय संघाचं ते रूपक आहे, ही खूणगाठ प्रेक्षकांनी बांधलेली असते!
कलेनं जर राजकीय प्रश्न मांडायचेच असतील, तर ते ‘कलात्मकपणे मांडावेत’ म्हणजे कसे मांडावेत, याचा उत्तम नमुना म्हणजे द्रिवास यांची ही कलाकृती. वरच्या सज्जातून फिल्मचे तुकडे पाहात पाहात, प्रयोग फसणार असा भाग कथानकात आल्यानंतर प्रेक्षक खालच्या मजल्यावर येतात, भक्क रिकाम्या नागमोडी प्रयोगशाळेत पर्यटकासारखे फिरतात आणि मग अखेरच्या म्हणजे ‘निर्णायक उच्चस्तरीय बठकी’च्या टप्प्याकडे जातात. गोष्टीतला काळ प्रेक्षकासोबतच पुढे सरकतो, रिकाम्या प्रयोगशाळेवर काळ जणू गोठतो आणि मग दुविधेतच प्रेक्षकालाही ओढून ही प्रयोगशाळा थांबते. या कलाकृतीचा चित्र किंवा शिल्प या कलांशी खेटून संबंध नाही, हा आक्षेप खराच ठरेल; पण ग्रीक लोक – किंवा कलाक्षेत्र – त्या आक्षेपाचा बाऊ करत नाहीत, हेही दिसलंच होतं. ग्रीसमधल्या अथेन्सला ‘डॉक्युमेंटा’ या पंचवार्षकि जर्मन महाप्रदर्शनाचा दुसरा तुल्यबळ हिस्सा ठिकठिकाणी भरला होता, त्यापकी एक ठिकाण म्हणजे अगदी आपल्या कलाशाळांसारखाच मोठा इतिहास वगरे असणारं ‘अथेन्स स्कूल ऑफ आर्ट’. तिथले ‘डिग्री शो’- म्हणजे कलाशिक्षण पूर्ण होताना महाविद्यालयातच विद्यार्थ्यांनी लावलेली आपापली तीन तीन दिवसांची छोटेखानी प्रदर्शनं – पाहाताना नाटय़-चित्रपट अभिनेता म्हणून ग्रीसमध्ये नाव कमावणाऱ्या असिमिस अलेक्सिऊ यानं दृश्यकलेतल्या ‘पीएच. डी.’साठी केलेलं काम दिसलं. आधी ‘परफॉर्मन्स’ आणि मग त्याची ‘व्हिडीओकला’ अशा स्वरूपाचं काम होतं ते. पण ‘व्हेअर इज अवर हिरो?’ नावाच्या त्या छोटेखानी प्रदर्शनातून असिमिसनं तोच परिणाम साधला, जो चित्रमालिकेतून साधला गेला असता.
व्हिडीओ / चित्रपटसदृश कलाकृतींना दृश्यकला म्हणायचं का, याच्या चच्रेसाठी हा – परिणाम साधण्याचा – मुद्दा महत्त्वाचा आहे. दृश्यकलेचा प्रेक्षक काही संकेत मानणारा असतो आणि त्या संकेतांची पूर्तता झाल्यास बरं, असं त्याला वाटत असतं, असं गृहीतक या मुद्दय़ाच्या मुळाशी आहे. पण ‘दृश्यकलेत खरंच काही संकेत असतात का?’ हा प्रतिप्रश्न तर, मुद्दाच नाहीसा करणारा आहे! यावर उत्तर असं की, व्यक्तींच्या वा सजीव-निर्जीवांच्या संकेतमान्य आकारांबरहुकूम चित्रण करताना हळूच एखाद्या ओळखीच्या वा अनोळखी बाबीकडे नेणाऱ्या चित्रशिल्पांत (उदा. शकुंतलेचे पत्रलेखन) संकेत असतातच. ती संकेतमान्यता जर चालते, तर ग्रीक किंवा कोणत्याही व्हिडीओकलेतली का चालू नये आणि मुख्य म्हणजे, संकेतांतून नवसंकेतांकडे नेण्याचा प्रयत्न जर एखादा कथाप्रधान किंवा वर्णनप्रधान व्हिडीओही करत असेल, तर त्याला वर्णनप्रधान चित्राशी तुल्यबळ का मानू नये?
इथं मुद्दा निघेल तंत्रकौशल्याचा – ‘टेक्निक’चा किंवा ‘सौंदर्यपूर्ण अदाकारी’चा. असा मुद्दा किती तकलादू ठरेल, याची साक्ष (उदाहरणार्थ) डॅमिएन हर्स्ट या ब्रिटिश कलावंतानं व्हेनिसच्या दोन खासगी कलासंग्रहालयांत मांडलेल्या प्रचंड शिल्पांमुळे पटेल. जे टेक्निकलाच मान देतात, ते सारेजण हर्स्टच्या ‘रेक ऑफ द अनबिलीव्हेबल’ (अविश्वसनीयतेची नौकाडुबी) या प्रदर्शनातल्या अचाट / अवाढव्य आणि तरीही तसूतसूने तंतोतंत तंत्रकौशल्य दाखवणाऱ्या कलाकृती पाहून एकतर अवाक झाले किंवा (अवाक झाल्यानंतरही) बोटं मोडत बसले.. तो हर्स्ट काहीच स्वत: करत नसणार; सर्व ऑर्डरप्रमाणे बनवून घेत असणार.. म्हणून. पण या अशा साऱ्यांनी जे प्रदर्शन पाहिलं ते डॅमिएन हर्स्टचंच होतं आणि शिव्याही हर्स्टलाच होत्या, एवढं सांगितलं तरी पुरे!
संकल्पनेमुळेच चित्रकार मोठा ठरतो, हे पटण्यासाठी हर्स्टपर्यंत न जाता पुन्हा ‘शकुंतलेचे पत्रलेखन’ पाहता येईलच. पण टेक्निक वा कौशल्य (मदतनीसांकडे तरी) हवंच हवं, ही अपेक्षासुद्धा ओलांडण्याची धमक संकल्पनेत असते याची साक्ष डॉक्युमेंटा आणि व्हेनिस बिएनाले या दोन्ही महाप्रदर्शनांतून यंदाही पटत होती. ही धमक काही वरून पडलेली नाही. त्यामागे साधारण १९१५ सालापासून दृश्यकलावंतांनी केलेल्या प्रयोगांचा, ते प्रयोग स्वीकारले जाण्यासाठी कराव्या लागलेल्या वैचारिक संघर्षांचा आणि त्यातून झालेल्या घुसळणीचा इतिहास आहे. या घुसळणीतून आणि १९६०च्या दशकात कलेच्या बाजारीकरणाविरोधात आणि ‘सामाजिक जाणिवे’साठी जी बंडखोरी झाली त्यातून, दृश्यकलावंत असणं म्हणजे काय याचा अर्थ व्यापक झालेला आहे. पण त्या साऱ्या प्रेरणा आज कुठे आहेत हे कलाकृतींमधून आज पुन्हा पाहणं महत्त्वाचं आहे. व्हेनिस बिएनालेत महत्त्वाचं असतं ते मध्यवर्ती प्रदर्शन; त्यात यंदा या दृष्टीनं निराळं नियोजन पाहायला मिळालं. दृश्यकलावंत कसे असतात, कसे जगतात, ते समाजाशी कलेतून खरोखर नातं जोडू शकतात का? असं नातं जोडण्याचा जुना मार्ग म्हणजे ज्येष्ठ कलावंत होऊन एकप्रकारे समाजधुरीण होणं! पण त्यापेक्षा निराळे – कलाकृतीद्वारेच नातं जोडण्याचे मार्ग काही आहेत का? कलावंताला लोक भले जादूगार वगरे मानत असतील; पण दृश्यकलावंतांनाही कुठेतरी हे जादूमयतेचं आकर्षण असतं का? लैंगिकतेचा विचार दृश्यकलावंत कसा करतात? त्यातून विशेषत: महिलावर्गाबद्दलची कोणती नियत दिसते? कलावंत आतून एकटाच असतो हे ठीक, पण एखाद्या कलावंताला इतर कलावंतांचं आतूनच आलेलं एकटेपण भिडलं, त्यातून नवी कलाकृती निर्माण झाली, असं कधी होतं का? – या सर्व प्रश्नांची उत्तरं (अनुक्रमे) मारिया लाइ, ली मिंग्वेन; ओलाफुर एल्िंायासन, अब्दुल्ला अल सादी; ताउस माकाचेव्हा, हसन शरीफ; किकी स्मिथ, ल्युबोस पल्नी; टिबोर हायास, मरवान; कादर अतिया.. अशा अनेक दृश्यकलावंतांच्या कामांतून इथं मिळत होती. काही कलाकृती तर प्रेक्षक-सहभाग गृहीत धरणाऱ्या होत्या. आजच्या सेल्फी-जमान्यातले प्रेक्षक मात्र सेल्फीपुरताच सहभाग नोंदवताना दिसत होते.
डॉक्युमेंटा म्हणजे शहरभर विखुरलेलं एकच प्रदर्शन; तर व्हेनिसची बिएनाले म्हणजे एका मध्यवर्ती प्रदर्शनाखेरीज अनेक देशांची विविधांगी पॅव्हिलियन. या एकेका दालनांतल्या एकेका देशाच्या कलाकृतींचे सांगणं निरनिराळं; त्यातून तर दृश्यकलेच्या यात्रेचे अनेक वेगवेगळे आणि नवेसुद्धा मार्ग दिसत राहतात. पॅव्हिलियन संस्कृतीवर भरपूर टीका झाली आहे नि होत असते, तरी ही दालनं पाहावीशी वाटतात. शिवाय हल्ली पॅव्हिलियन-रचनेला फार धक्का न लावता काही प्रयोग केले जातात. उदाहरणार्थ, भारताचं ‘त्या खेपेपुरतं’ पॅव्हिलियन २०११ साली व्हेनिस बिएनालेच्या ५४ व्या खेपेला होतं. यंदा ‘डायास्पोरा पॅव्हिलियन’ होतं आणि स्लावोय झिझेक आदी विचारवंतांचे आशीर्वाद असलेलं, ‘देशहीनांचा देश’ उभारू पाहणाऱ्या ‘एनएसके’ या चळवळीचं पॅव्हिलियनही होतं. दक्षिण अमेरिकी देशांचं एकत्रित पॅव्हिलियन यंदा नव्हतं. ब्राझील, चिली, मेक्सिको आदींची स्वतंत्र पॅव्हिलियन होती. पण त्या एकत्रित पॅव्हिलियनच्या जागी यंदा न्यूझीलंडचं दालन होतं आणि त्यात लिसा रीहाना यांनी सुमारे ३५ फूट लांब पडद्यावर एक संथ फिल्म प्रदíशत केली होती. ‘कॅप्टन कुकचा प्रवास’ म्हणून एक जुनं १८०५ सालचं फ्रेंच भित्तिचित्र आहे आणि ते आजही वॉलपेपर स्वरूपात उपलब्ध असतं; त्यावर रीहाना यांची ही कलाकृती आधारलेली असली तरी संथपणे आणि कौशल्यपूर्णतेनं त्यांनी या नव्या फिल्मचा आशय वसाहतविरोधी ठेवला होता.
वसाहतवादाचं वर्तुळ आज युरोपातच घुसणाऱ्या निर्वासितांमुळे पूर्ण होतंय. अशा वेळी माल्टासारखा छोटासा भूमध्यसागरी देशही किती कासावीस आहे, हे ‘माल्टा पॅव्हिलियन’मधून दिसलं. निर्वासितांचा राग नाही, त्यांच्याबद्दल प्रेमच आहे पण सरकारी धोरणांवर रोष आहे, अशी मधली अवस्था आज या देशातल्या चित्रकारांची आहे आणि मुख्य म्हणजे, सरकारी अनुमतीशिवाय साकारच न होणाऱ्या ‘पॅव्हिलियन’पर्यंत ती पोहोचू शकली आहे. सरकार आणि दृश्यकलावंत यांचं असंच सशक्त नातं आर्यलड पॅव्हिलियनमध्ये स्वदेशाच्या ‘गर्भपात नीती’वर टीका करणाऱ्या जेसी जोनास यांची कलाकृती पाहताना जाणवत होतं. इथं जोनास अगदी खुबीनं, पर्यायी कायदा करा असं सुचवत होत्या.
कलेनं समाजाची नाडी ओळखावी, कलेनं कौशल्य रंजनातून प्रेक्षकांचं प्रबोधन करावं, कलेनं नुस्तं असावं आणि प्रसंगी धर्म / देश वगैरे पायदळी तुडवावं, कलेनं इतर प्रकारच्या कलांशी नातं जोडावं अशा विविध अपेक्षा एकाच वेळी विविध कलाकृतींतून पूर्ण करणारी ही यात्रा आजकालच्या कलाकृतींबद्दलचं कलाभान वाढवणारी ठरावी. ही यात्रा ‘लोकरंग’च्या वाचकांपर्यंत जरा विस्कळीतपणेच पोहोचली आहे, तो दोष पोटात घालून आधी मनन आणि मग वाटल्यास चर्चा व्हावी. कारण कलायात्रा एकटय़ाची नसते, ती थांबतही नसतेच; पण तरीही थोडं थांबून मनातच नकाशाचा ताळमेळ साधल्यास आणखी नव्या वाटा दिसत राहतात, जुन्या वाटा भिनत राहतात.
abhijit.tamhane@expressindia.com
