चक्रधर स्वामींबद्दलचे विधान चुकीचे

‘लोकरंग’ (२४ जानेवारी) मध्ये ‘तुका लोकी निराळा’ या सदरात तुलसी आंबिले यांनी ‘उजळावया आलो वाटा’ या शीर्षकांतर्गत लेख लिहिला असून, त्यात संत तुकाराम, ज्ञानेश्वर व नामदेवांबद्दल माहिती दिली आहे. तसेच त्याच लेखात श्रीचक्रधर स्वामींचे विचार मांडले आहेत. ते मांडत असताना त्यांनी ‘श्रीचक्रधर स्वामींची हेमाद्री पंडिताने १२७४ मध्ये हत्या केली. (त्यानंतर जे जिवंत झाले व उत्तरापंथास […]

‘लोकरंग’ (२४ जानेवारी) मध्ये ‘तुका लोकी निराळा’ या सदरात तुलसी आंबिले यांनी ‘उजळावया आलो वाटा’ या शीर्षकांतर्गत लेख लिहिला असून, त्यात संत तुकाराम, ज्ञानेश्वर व नामदेवांबद्दल माहिती दिली आहे. तसेच त्याच लेखात श्रीचक्रधर स्वामींचे विचार मांडले आहेत. ते मांडत असताना त्यांनी ‘श्रीचक्रधर स्वामींची हेमाद्री पंडिताने १२७४ मध्ये हत्या केली. (त्यानंतर जे जिवंत झाले व उत्तरापंथास गेले अशी महानुभवांची मान्यता आहे)’ अशी चुकीची माहिती दिली आहे.
श्रीचक्रधर स्वामींची हेमाद्री पंडितांकडून १२७४ मध्ये हत्या झालेली नाही. हत्येनंतर ते जिवंत झाले व उत्तरापंथास गेले, ही माहिती चुकीची आहे. श्रीचक्रधर स्वामी यांनी स्त्री-पुरुष समानता, अस्पृश्यता निवारण, स्त्री-शूद्रांना मोक्षाचा अधिकार व समाजातील जातिभेद नष्ट करण्याचे अतिशय महत्त्वाचे कार्य ८०० वर्षांपूर्वीच केले. म्हणूनच ते महानुभाव पंथीयांचेच नाही, तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान व प्रेरणास्थान आहे. श्रीचक्रधर स्वामींचे जीवांच्या उद्धाराचे कार्य संपल्यामुळे आपला शिष्यपरिवार श्रीगोविंदप्रभू यांच्याकडे सोपवून त्यांनी उत्तरपंथे प्रयाण केले.
सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचा वध (हत्या) झाला व नंतर ते जिवंत झाले, या घटनेवर व अजून काही मुद्दय़ांवर अमरावतीच्या वरिष्ठ स्तर न्यायालयात १९८० साली केस नं. SP. Civil Suit No. 57/1980 दाखल करण्यात आली होती. या केसचा निकाल १० डिसेंबर १९९७ ला दिला गेला. त्यात विरोधक ‘श्रीचक्रधर स्वामींचा वध झाला व नंतर ते जिवंत झाले’ हे सिद्ध करू शकले नाहीत. या निकालाच्या विरोधात ते अमरावतीच्या जिल्हा सत्र न्यायालयात अपिलात गेले. तेथेसुद्धा त्यांना यश आले नाही. नंतर विरोधकांनी नागपूर उच्च न्यायालयात अपील दाखल केले. या अपिलाचा निकाल नागपूर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश चांदूरकर यांनी २७/२/२०१५ रोजी दिला. त्यांनीही खालच्या कोर्टाचा निकाल जसाच्या तसा कायम करून तो कसा योग्य आहे यावर सविस्तर निर्णय दिला. म्हणजेच श्रीचक्रधर स्वामींची हत्या (वध) झाली व नंतर जिवंत झाले, हे कोणत्याही कोर्टात सिद्ध होऊशकले नाही. त्यामुळेच श्रीचक्रधर स्वामींची हत्या हेमाद्री पंडितांकडून १२७४ मध्ये झाली. त्यानंतर ते जिवंत झाले व उत्तरापंथास गेले, हे लेखकाचे विधान ग्रा होऊ शकत नाही.
– अखिल भारतीय महानुभाव महामंडळ

विडंबनगीते पाठवा..
येत्या होळीनिमित्ताने राजकीय, सामाजिक तसेच सांस्कृतिक जगतातील विसंगती आणि विरोधाभासांची खिल्ली उडविणारी विडंबनगीते ‘लोकरंग’ पुरवणीत प्रसिद्ध करण्याचे आम्ही ठरविले आहे. तरी मूळ गाण्यांचा संदर्भ देऊन स्वरचित विडंबनगीते पाठवावीत. ती प्रदीर्घ नसावी. आपली विडंबनगीते १२ मार्चपर्यंत- ‘लोकरंग’ पुरवणी, लोकसत्ता संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल- १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई- ४००७१० किंवा lokrang@expressindia.com या ई-मेलवर पाठवावीत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Wrong statement about chakradhar swami