सुकुमार शिदोरे
अमरजीत सिंग दुलत यांनी दीर्घकाळ गुप्तचर विभागाचे अर्थात, ‘आयबी’च्या सह-संचालकपदी, नंतर ‘रॉ’चे प्रमुख म्हणून आणि पुढे वाजपेयी-काळात पंतप्रधानांचे काश्मीर-सल्लागार म्हणून काम केले. अशा समृद्ध कारकीर्दीतील आणि वैयक्तिक जीवनातील अनुभवांवर आधारित असे आत्मकथनपर मूळ इंग्रजी पुस्तक ‘ए लाइफ इन द शॅडोज्’ दुलत यांनी २०२३मध्ये प्रसिद्ध केले. आता त्याचा मराठी अनुवाद त्याच नावाने प्रसिद्ध झाला आहे.

अभ्यासू वृत्ती, प्रांजळपणा आणि नर्मविनोद हे लेखकाचे ठळक गुण. या स्मृतिचित्रपर कथनाद्वारे या माजी गुप्तचर अधिकाऱ्याने एकप्रकारे वाचकांशी मित्रत्वाचे नाते जोडण्याचा प्रयत्न केला आहे. अनुवादक मिलिंद चंपानेरकर यांनी अनुवाद करताना हे सर्व लक्षात घेऊन केवळ आशयच नव्हे तर लेखकाचा विवक्षित ‘बाज’देखील अनुवादात समर्थपणे उतरवला आहे, हे विशेष!

गुप्तचर कार्यात आपला विशेष ठसा उमटवणारे म्हणून दुलत सर्वज्ञात आहेत. पुस्तकांत त्यांचे अनुभवपर आणि गंभीर चिंतनाचे बोल आहेत. जहालमतवादी युवकांच्या सतत संपर्कात राहून संवाद साधणे, त्यांना वश करणे हे जे तंत्र लेखकाने विशेषत: काश्मीरमध्ये अवलंबले, ते उपयोगी ठरले आणि त्याबाबत त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर वाखाणणी झाली.

एकूण नऊ प्रकरणांमध्ये रचनाबद्ध केलेल्या या पुस्तकातील सर्वांत महत्त्वाचे प्रकरण म्हणजे ‘भ्रमजाल: आरशांच्या निर्जन प्रदेशात’. यातून आपल्याला गुप्तचरांच्या कार्यपद्धतीबाबत आणि कार्याच्या स्वरूपाबाबत अंतर्दृष्टी लाभते. ‘रनिंग एजंट’, ‘डबल एजंट’, ‘खबरी’ यांच्या कार्यांचे स्वरूप कसे असते? ‘टेक्निकल इंटेलिजन्स’ आणि ‘ह्युमन इंटेलिजन्स’ यांतील फरक कसा महत्त्वाचा ठरतो? ‘हनी ट्रॅप’पासून सावध राहण्यासाठी कसे प्रशिक्षण दिले जाते? – अशा अनेक गोष्टींचा उलगडा होतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अशी कामे करताना त्यांना कशा प्रकारच्या मानसिक तणावांना सामोरे जावे लागते, त्याची अनुभूतीही आपल्याला यातून लाभू शकते.

पुस्तकात काश्मीरबाबत अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. १९८८मध्ये काश्मीरच्या ब्युरोची सूत्रे त्यांच्या हाती सोपवली गेल्यावर अल्प काळातच तेथे जहालमतवाद्यांच्या लढाऊ कारवायांचा उद्रेक सुरू झाला. अनेक सरकारी अधिकारीसुद्धा मारले गेले. तरीही जहालमतवादी युवकांशी संवाद साधण्याची भूमिका दुलत आग्रहपूर्वक रेटत राहिले.

‘डॉक्टर साहिब’ या स्वतंत्र प्रकरणात फारुक अब्दुल्ला याचे काश्मीरच्या राजकारणात असलेले महत्त्व व ‘काश्मिरीयत’ यांवर विस्तृत लिखाण आहे. फारुक अब्दुल्ला यांच्यासोबत विशेष मैत्री जुळलेल्या दुलत यांनी त्यांच्यासोबत विविध काळात झालेल्या भेटींच्या वर्णनातून त्यांच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला आहे. विशेष करून, अनुच्छेद ३७० रद्द झाल्यावर जेव्हा फारुक यांना स्थानबद्धतेत ठेवण्यात आलेले होते, तेव्हा त्यांच्याशी झालेला संवाद मोठा हृद्या असा आहे. एकंदरीत, पुस्तकात काश्मीरबाबत असे विविध मुद्दे लेखकाने हाताळले आहेत. या पुस्तकात १९९९मधील ‘आयसी-८१४’ विमानाचे दहशतवाद्यांकडून अपहरण’ ते ‘२६ नोव्हेंबर, २००८ रोजीचा मुंबईवरील दहशतवादी हल्ला’ – ज्यात सुरक्षा-व्यवस्थेला अपयश आले – अशा काही प्रकरणांची चर्चा केली आहे. ‘२६/११’च्या हल्ल्याचा प्रमुख खलनायक हेडली हा केवळ ‘सीआयए आणि ‘आयएसआय’ यांचाच ‘डबल एजंट’ नव्हता, तर आणखी एका एजन्सीचा मिळून ‘ट्रिपल’ एजंट होता असेही ते सूचित करतात.

यातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, दुलत यांचा १९९९ मध्ये भूतानचे राजे वांगचुक यांच्याशी झालेला संवाद. ‘गलवान’च्या आसपासच्या प्रदेशात ज्या घडामोडी होत होत्या त्याबाबत वांगचुक यांनी तेव्हा सूचित केले होते, ‘तुम्ही लोक आमच्यासाठी गोष्टी जरा अवघड करत आहात. चीन आमचा गळा घोटू पाहत आहे. आम्ही आमच्या देशाला भारताचा भाग असल्यागत मानतो. परंतु तुम्ही आमच्यासाठी गोष्टी सोप्या करत नाही.’ पुढे दोन दशकांनी म्हणजे, २०२०मध्ये जेव्हा ‘गलवान खोऱ्या’त भारत-चीन संघर्ष झाला, तेव्हा त्यांचे हे भाष्य खरे ठरल्याचे दुलत दर्शवून देतात.

आणखी एक महत्त्वाचे प्रकरण म्हणजे, ‘गुप्तचर मित्र : दोन स्पाय मास्टर्सची कहाणी.’ सध्याचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि ए.एस. दुलत या दोन गुप्तचर अधिकाऱ्यांच्या परस्पर-भिन्न अशा दृष्टिकोनांतील फरक लेखकाने त्यांचे वरिष्ठ अधिकारी एम. के. नारायणन यांच्याच उक्तीतून स्पष्ट केला आहे. दुलत यांचा मानवी संवादाधारित धोरणावर विश्वास, तर डोवाल यांचा बलाधारित (मस्क्युलर) कार्य-नीतीवर विश्वास. डोवाल यांच्या कार्यक्षमतेच्या संदर्भात त्यांच्या मिझोरम आणि पंजाब राज्यातील कामगिरीचे दुलत यांनी भरपूर गुणगान केले आहे. परंतु त्याचवेळी डोवाल यांचं व्यक्तिमत्त्व, त्यांची कार्य-नीती याबाबत त्यांना न रुचणाऱ्या गोष्टीही मोठ्या चतुराईने सूचित केल्या आहेत.

‘काही थोर व्यक्तींच्या सान्निध्यात’ या प्रकरणात, जेव्हा दुलत यांच्यावर अनेक महनीय अशा व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली होती, तेव्हा त्यांनी केलेली त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांबाबतची निरीक्षणे दिली आहेत. एकंदरीत, आगळ्यावेगळ्या विषयांवर अधिकारी व्यक्तीने लिहिलेले हे एक वाचनीय पुस्तक आहे. सर्वसाधारण वाचक व अभ्यासक दोहोंना मननीय वाटू शकते.

‘ए लाइफ इन द शॅडोज’, ए. एस. दुलत, अनुवाद- मिलिंद चंपानेरकर, रोहन प्रकाशन, पाने- ३१०, किंमत- ४९५ रुपये.

sukumarshidore@gmail.com