अरुंधती देवस्थळे arundhati.deosthale@gmail.com

‘‘ही खुर्ची मी स्वत: बनवलीय! यातून तुम्हाला पडायची भीतीच नको, मिस्टर वोलार्ड. फक्त तोल सांभाळून बसून राहा. तसंही पोज करताना हलायचं नसतंच. सांगतोय ना मी तुम्हाला.. खरंच, एखाद्या सफरचंदासारखे बसा बरं. सफरचंद कसं काही हालचाल न करता ढिम्म बसून असतं ना, तसंच.’’ भरीला पाडून बसवलेल्या मॉडेलशी वागण्याची ही रीत होती- पोस्ट इम्प्रेशनिस्टिक काळातलं बडं प्रस्थ ठरलेल्या, तऱ्हेवाईक स्वभावाच्या फ्रेंच चित्रकाराची- म्हणजे पॉल सेझाँची! ‘कार्ड प्लेयर्स’ (९७  X १३० सें. मी.) साठी एक मॉडेल म्हणून बसवलेले मध्यमवयीन वोलार्ड म्हणजे तेच विख्यात आर्ट डिलर, सेझाँसकट मॅने, मातीस वगैरेंची चित्रं विकणारे! चित्रकला हे सेझाँच्या जीवनाचं एकमेव लक्ष्य होतं. पुढे हे चित्र एक इतिहास घडवणारं ठरलं. आजवरच्या लिलावात ते सर्वात जास्त किमतीला विकल्या गेलेल्या चित्रांत चौथ्या क्रमांकावर असून, एवढय़ातच त्याची किंमत २८८ मिलियन डॉलर्स आली होती!! 

kasturi cotton
कस्तुरी कॉटन…देशातील सर्वोत्तम कापूस!
IPL 2024 Lucknow Super Gitans vs Gurajat Titans Match Updates in Marathi
IPL 2024: चित्त्याच्या चपळाईने बिश्नोईने टिपला झेल, सारेच झाले अवाक; पाहा व्हीडिओ
Loksatta Lokrang A Journey into Documentary Creation movies dramatist
 आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘मला खूप भूक लागली होती…’
ring of fire
विश्लेषण : भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे ‘रिंग ऑफ फायर’ नेमके कुठे आहे? या भागात सर्वाधिक भूकंप का होतात?

फ्रान्समधल्या अतिशय निसर्गरम्य एक्स ऑन प्रोव्हान्समध्ये जन्मलेल्या पॉल सेझाँचे (१८३९-१९०६) बँकर वडील करडय़ा शिस्तीचे. त्यांनी पॉलच्या इच्छेविरुद्ध त्याला वकिलीचं शिक्षण घ्यायला लावलं. पण  पॉलने ते सांभाळत अर्धवेळ आर्ट स्कूलमध्ये प्रवेश घेतला. नंतर व्यवहारी वडिलांशी भांडून नवयुवक पॉल पॅरिसला गेला. तिथे बालमित्र एमिल झोलाला भेटला. सुरुवातीच्या कठीण काळात झोलाने त्याची साथ निभावली. भविष्यकाळात हे दोघे आपापल्या क्षेत्रांत नाव कमावणार होते. पण दीर्घकाळची त्यांची मैत्री पुढे कलेवरूनच कायमची तुटणारही होती. कारण काय, तर झोलाने लिहिलेली ‘दि मास्टरपीस’ ही कादंबरी सेझाँच्या आयुष्यातील संघर्षांवर आधारित असल्याचं सर्वतोमुखी झाल्याने आपलं दु:ख, अपमान चव्हाटय़ावर आल्यासारखं वाटून त्यांनी झोलाशी संबंध तोडून टाकले.   

सेझाँची सुरुवात काळ्या-करडय़ा रंगाचं प्रभुत्व असलेल्या जलरंगातील निसर्गचित्रांनी झाली. १८६५ पासून ते आयुष्याच्या अखेरीपर्यंत जन्मस्थान एक्सच्या पर्वतांची काढलेली जलरंग आणि तैलरंगातील काही चित्रं कलेतील मास्टरपीसेस ठरली खरी; पण सुरुवातीला त्यांना पॅरिसच्या कलावर्तुळाने हेटाळणीनं वागवलं होतं, इकोले दि बूझाँमध्ये प्रवेश नाकारला होता. नवचित्रकारांना संधी देणाऱ्या सलोने एक चित्र स्वीकारलं, पण पुढली सगळीच नाकारली. दोन्ही कलाशाळांत प्रवेश न मिळालेले सेझाँ तासन् तास लूव्रमध्ये जाऊन बसत आणि नामवंत कलाकारांच्या कलेवर टिपणं आणि रेखाचित्रं काढत राहत. चित्रं काढून, मिळेल त्या भावात ती विकून रंग विकत घेत. अतिसंवेदनशील स्वभावाच्या सेझाँना त्याकाळी प्रत्येक कलाकाराच्या वाटय़ाला सुरुवातीला अटळपणे येणारे नकार झेपेनात. ते एक्सच्या घरी परतले. नाइलाजाने वडिलांच्या बँकेत कामाला लागले. अधूनमधून चित्रं काढायचे, पण स्वत:चं काम स्वत:ला पसंत पडत नव्हतं. अंतर्मन कलाशिक्षण आणि अभिव्यक्तीची वाट शोधायला सांगत होतं. पॅरिसला परतून तशाच मन:स्थितीत केलेल्या सुरुवातीच्या चित्रांचं एक उदाहरण म्हणजे मेटामॉफरेसिसमधील कथेवर आधारित ‘दि अ‍ॅबडक्टशन’ हे डार्क मूडमधलं तैलचित्र (१८६७). त्यांच्या शैलीवर ओल्ड मास्टर्सचा प्रभाव स्पष्ट दिसतो. विकाराच्या लालभडक रंगात पेटलेला हक्र्युलस आणि त्याच्या बाहुबलासमोर निश्चेष्ट पडलेली गौरांगी. सेझाँ चित्रात स्त्री-पुरुषांचे चेहरे किंवा भावना दाखवत नाहीत.. एखादाच फीचर फार तर. जणू काही त्या व्यक्तीचं माणूसपण महत्त्वाचं नसावं.. एक वस्तू म्हणूनच तिचं अस्तित्व! खडकाळ प्रदेश, दूर कुठेतरी निळं-सावळं पाणी. दूर कोणी दोन मानवी आकृती. तेव्हापासूनच सेझाँची कॉम्पोझिशनवरची पकड डोळ्यांत भरण्यासारखीच. मॉने, रेनूआं वगैरे मंडळींनी त्याच्या एकेक सुटय़ा फटकाऱ्यांच्या मिश्रणांतून अखेरीस साकार होणारं चित्र पाहून त्यांच्या शैलीवर ‘ही  चित्रं की फटकाऱ्यावर फटकारे मारून भिंतीवर केलेलं गवंडीकाम..?’ यासारखी झोंबणारी टीकाही केली होती. पण सेझाँना त्यांच्याहून नऊ-दहा वर्ष मोठे चित्रकार कॅमील पिसारो मार्गदर्शक म्हणून मिळाले. त्यांनी त्यांना चित्रातील काळ्या, तपकिरी गडद छटा आणि कॉन्ट्रास्ट कमी करून लाल, पिवळा आणि निळा या मूलरंगांचा आणि मिश्र छटांचा वापर सुचवला. हा महत्त्वाचा सल्ला सेझाँची कलादृष्टीच बदलून त्यांच्या अभिव्यक्तीला वेगळं वळण देणारा ठरला. सेझाँना इम्प्रेशनिझमची चाकोरी, विशेषत: प्रकाशाला दिलं जाणारं महत्त्व अवास्तव वाटत होतं. सेझाँची चित्रं पाहिल्यास त्यात प्रकाशाचं भान किंवा त्याचं गतिशीलत्व जाणवत नाही. रंग, प्रकाश किंवा सावल्यांचं अस्तित्व एकसुरी वाटण्याइतपत स्थिर. कारण पटत नाही ते करायचं नाही. रेनूआं, मॉने, मॅने, सिसली, देगा वगैरे तोलामोलाची इम्प्रेशनिस्ट मंडळी भेटूनही त्यांचा सेझाँवर फारसा प्रभाव पडला नसावा. पण ‘खोलीत बसून नव्हे, ‘ken plein air’ (खुल्या आकाशाखाली) चित्रं काढत जा,’ हा पिसारोंचा सल्ला मात्र त्यांना ग्राह्य वाटला. तो त्यांनी आयुष्यभर जपलाही. पॅरिसचे आणि सेझाँचे मात्र आयुष्यात नंतरही कधी जमले नाही.

सेझाँनी केलेल्या अनेक पोट्र्रेट्समध्ये वर्तमानपत्र वाचणाऱ्या वडिलांचं एक भारदस्त चित्र आहे. आईची तर अनेक आहेत. आणि ती विशेष अशासाठी की, त्यांची आई कोणी सुंदरी नव्हती. चेहऱ्यावर एक कोरेपण.. आतली उदासी लपवणारं. सेझाँचं म्हणणं असायचं, ‘पोट्र्रेटचा विषय असलेली व्यक्ती दिसते तशीच उतरायला हवी. तिच्या मनाचा ठाव घेणारं काहीतरी चित्रात आलं तर ते खरं पोट्र्रेट. नटूनथटून पोट्र्रेटला बसणाऱ्या पॅरिसच्या अमीर-उमरावांच्या बायकांच्या ध्यानीमनी फक्त प्रदर्शनाचा भाव असतो, म्हणून मी ती कामं नाकारतो. मला साधारण माणसांचीच चित्रं काढायला आवडतात.’ सेझाँने झोलाचं एक पोट्र्रेट केलं होतं. पण ते त्या दोघांच्याही पसंतीला उतरलं नाही म्हणून कदाचित नष्ट केलं असावं. त्यांनी १९०० मध्ये एक सेल्फ पोट्र्रेट केलं होतं. सेझाँच्या चित्रांबद्दल एक महत्त्वाचं निरीक्षण म्हणजे ते बायकांच्या बाबतीत अतिशय लाजाळू असल्याने त्यांची बहुतेक चित्रं पुरुष मॉडेल्सची असत.. स्वस्तात उपलब्ध असलेल्या आम माणसांपैकी.

वडिलांनी पैसा हाती आल्यावर ‘जाँख दि बूफाँ’ ही एका उमरावाची शानदार हवेली खरीदली होती आणि सगळं कुटुंब तिच्यात राहायला गेलं. तोवर सेझाँचं प्रेमप्रकरण सुरू झालं होतं. त्यांना एक मुलगाही झाला होता. पण  ते त्यांनी वडिलांपासून लपवून ठेवलं. याचा गौप्यस्फोट झाला तेव्हा सेझाँना वडिलांकडून मिळणारा भत्ता थांबला आणि हलाखीची स्थिती सुरू झाली. सेझाँची ‘स्टील लाइफ’मधली चित्रं याच कालखंडातली ‘‘‘‘Painting from nature is not copying the object, it is realizing one’ s sensations.’’ हे सेझाँचं अतिशय महत्त्वाचं विधान त्यांच्या ‘स्टिल लाइफ विथ अ‍ॅपल्स’ या मालिकेइतकंच प्रमाणभूत मानलं जातं.

‘बेदर्स’ ही सेझाँची बहुचर्चित ठरलेली मालिका.. आयुष्याच्या शेवटच्या दशकभर काढलेली. यात त्यांनी दोनशे चित्रं काढली.. जी अनेक कलासंग्रहालयांमध्ये पाहता येऊ शकतात. विवस्त्र नाहणारी स्त्री हा त्या काळात गाजलेला विषय मॉने, सुरात, पिसारोसारख्या अनेक चित्रकारांनी रंगवलेला. सेझाँबद्दल समीक्षकांचा आक्षेप होता, की ते स्त्रीदेहाच्या सौंदर्याचं चित्रण टाळतात. स्त्रियांचे देह बाह्यरेखेपुरते आणि चेहरे कोरे असतात. शिवाय एकेका चित्रात अनेक जणी आणि इतक्या जवळ असूनही एकमेकींशी काही संबंध नसल्यासारख्या.. म्हणून ते अनैसर्गिक वाटतं. काही चित्रांत तर पाणीही नसतं. हे सगळं खरं असलं तरी निळ्या छटांचं आकाश आणि निळ्या देहरेखांच्या आकृतींमध्ये काहीतरी नक्की आहे- जे मनाला मोहवतं, त्यांच्याकडे परत परत बघायला भाग पाडतं.

सेझाँ मंद, शांत गतीने चित्रं रंगवत असत. ब्रशचा एकेक फटकारा लावून, एकाच गोष्टीकडे वेगवेगळ्या कोनातून, मूडमधून जाणवणाऱ्या संवेदना धाडसाने, प्रामाणिकपणे मांडणारी चित्रांची भाषा. म्हणूनच त्यांची शैली कायम बदलत राहिली आणि शेवटच्या टप्प्यात क्युबिझमच्या वळणापर्यंत जाऊन पोहोचल्याचं त्यांच्या ‘माऊंट सेंट विक्टोरी’मधल्या शेवटच्या काही चित्रांत आणि ‘दि हाऊस इन प्रोव्हेन्स’ मालिकेत जाणवतं. मूळ सपाट जमिनीवर असलेलं घर त्यांनी एका कोनातून कललेलं दाखवलं आहे. त्यांना ‘स्वान्त सुखाय’ काम करायचं असे. कमाई आणि कीर्ती त्यांच्या दृष्टीने दुय्यम असल्याने ते आपल्या कलेशी प्रामाणिक राहू शकले. त्यांच्या मृत्यूनंतर पिकासो, ब्राक आणि मातीस या त्यांच्या मागोमाग येणाऱ्या प्रशंसकांनी त्यांना आधुनिक कलेचं जनकत्व बहाल केलं आहे. समकालीन कलासमीक्षकांना मात्र सेझाँचं चित्रकलेतलं योगदान समजायला उशीरच झाला. सेझाँनी त्यांची पत्नी होर्टेन्स आणि मुलाला त्यांच्या कुटुंबाच्या भव्य घरापासून दूरच ठेवलेलं होतं. आई जिवंत असेस्तोवर ते रोज तिला भेटायला येत, तिच्याबरोबरच जेवत. तिला आपल्या गाडीतून बाहेर फिरायला नेत. आई गेल्यावर कुटुंबाने हवेली विकली आणि त्यातल्या वाटय़ामुळेही सेझाँना सधनता प्राप्त झाली. एक्सपासून फार दूर नसलेला भूमध्य सागरकिनाराही जाऊन राहण्यासाठी त्यांचा फार आवडता. आयुष्याच्या संध्याकाळी एकांतप्रिय सेझाँ अगदी रोज नदीकाठी जाऊन चित्रं रंगवत. एकदा असेच ते वादळी पावसात सापडले आणि मधुमेहाने पोखरलेल्या शरीराने न्यूमोनियासमोर हार मानली. त्यांच्या अंत्ययात्रेत अनेक कलाकार सामील झाले होते. आता एक्समध्ये त्यांचा फारच सुंदर स्टुडिओ जसाच्या तसा ठेवलेला आहे. तो आपल्याला पाहता येतो. त्यांच्या काही चित्रांच्या प्रतिकृती आणि घराचा काही भागही. थोडय़ाच अंतरावरच्या म्यूझी ग्रानेटमध्ये त्यांची काही चित्रं पाहता येतात. आणि शेवटी त्यांच्या चिरनिद्रेचं स्थळही! हे सगळं एका दिवसात करता येतं. निसर्गरम्य, शांत एक्स अनुभवल्यावर वैयक्तिक आयुष्याचं खासगीपण कसोशीने जपणारे, चित्रकलेचे साधक सेझाँ एखादं पुस्तक वाचून गोष्ट समजावी तसे जवळचे वाटायला लागतात.