‘लोकरंग’मधील (२० जुलै) अतुल पेठे यांच्या ‘आजारी समाजाच्या नोंदी’ या शीर्षकाच्या लेखातून आजच्या समाजमनाचं एक अतिशय चिकित्सक आणि चिंतनात्मक चित्र अगदी संयमी भाषेमध्ये समंजसपणे मांडलेलं आहे. प्रत्येक संवेदनशील वाचकाला निश्चितच आपल्या विस्कटलेल्या यातनादायी सामाजिक आकलनाला नेमकेपणानं शब्दबद्ध केल्याची अनुभूती येते. आज अनेक कारणांनी भारतीय समाज अनेक कौटुंबिक, सामाजिक आणि मानसिक विवंचनांनी त्रस्त आहे. संवेदनशील माणसांच्या मनातील समाजाच्या वेगानं वाढणाऱ्या दुरवस्थेचं स्वरूप, आवाका व त्याचं समग्र आकलन इतकंसं स्पष्ट होत नव्हतं. त्याचं नेमकं निदान सापडत नव्हतं… लेखकाने या सामाजिक आजारांचं नेमकेपणानं सिटीस्कॅन आणि एमआरआय काढून कोणताही आक्रस्ताळेपणा किंवा आक्रमकता टाळून अतिशय सौम्य भाषेमध्ये गेल्या एक-दीड दशकांमध्ये अनपेक्षितपणे विविधांगानी पीडित समाजाचं आणि समाजमनाचं नेमकं विदारक चित्र आणि निदान मार्मिकपणे मांडलेलं आहे. समाजात आज एक विचित्र सार्वत्रिक अस्वस्थता आणि हताशपणा निर्माण झालेला आहे. समाजमाध्यमांच्या अखंड ढगफुटीमुळे लोक अंधश्रद्ध, व्यसनाधीन, असंवेदनशील आणि असहिष्णू बनत आहेत. भीती, संशय पसरवला जात आहे. भडक, असंवेदनशील विचार रुजवले जात आहेत. आर्थिक विषमता तीव्र झाल्यामुळे मनावर नकारात्मक परिणाम होत आहेत. बेजबाबदार वर्तन, रस्त्यांवरील आवाजाचे प्रदूषण, सोशल मीडियावरील अश्लील भाषा यामुळे संवेदनशीलता आणि संयम हरवला आहे. लोक पटकन भडकतात, सुन्न होतात. अभ्यासाविनाच आत्मविश्वासपूर्वक मतप्रदर्शन करतात. लैंगिक शिक्षणाचा अभाव मानसिक गोंधळ वाढवतो आहे. सामाजिक गरजांचा उलटा क्रम लावला जातो आहे. सुमारतेचे उदात्तीकरण होते आहे. अनुभवाऐवजी आत्मविश्वासावर आधारित नेतृत्व वाढते आहे. कामाचे कौशल्य गमावणे हे गंभीर सामाजिक लक्षण बनले आहे. आहार, व्यायाम व फिटनेसची अति चर्चा, अनुभव व शहाणपणाची कमतरता आणि एकाकीपणा वाढत आहे. प्रत्यक्ष जगापेक्षा काल्पनिक जगात जगणे सोयीस्कर वाटते. समज, संवाद, विचार यांचा अभाव निर्माण झाल्याने अभ्यास, चिकित्सा आणि वाद-प्रतिवाद गमावले गेले आहेत. सुसंवाद हरपल्यामुळे मनाचा अंतर्नाद ऐकू येत नाही.

  • डॉ. अर्जुन कुंभार, गारगोटी.

समाजाचं प्रबोधन आवश्यक

‘लोकरंग’मधील (२० जुलै) अतुल पेठे यांच्या ‘आजारी समाजाच्या नोंदी’ या लेखात महाराष्ट्रातील सजग जनतेच्या व सामाजिक कार्यकर्त्याच्या मनातील घालमेल शब्दबद्ध केली आहे. त्यांची मानसिक स्थिती सोदाहरण उलगडून दाखवली आहे. काही धर्मांध, लुच्चे समाजात विद्वेष, मत्सर पसरवून अनाठायी भीती निर्माण करून आपली पोळी भाजून घेत आहेत. तर काही स्वार्थांध समाजात टोकाची आर्थिक विषमता तयार करत आहेत. सदृढ समाजासाठी खरोखरच भारतीय संस्कृतीतील सभ्यता आणि शांतता या मूल्यांची पुनर्जोपासना करणे गरजेचे आहे. आज महाराष्ट्रातील विविध चळवळीतील कार्यकर्त्यांची सर्वच बाजूने मुस्कटदाबी होत असल्यामुळे ते विचलित झाले आहेत, अशा वेळी त्यांचे प्रबोधन आवश्यक आहे. अशा कार्यकर्त्यांना मानसिक उभारी देण्यासाठी महाराष्ट्रात विविध ठिकाणी कार्यशाळा आयोजित करता येतील काय याचा विचार करायला हवा.

  • विनोदसिंह पाटील, सिंधुदुर्ग.

ठोस कृती करण्याची वेळ

‘लोकरंग’मधील (२० जुलै) अतुल पेठे यांचा ‘आजारी समाजाच्या नोंदी’ हा अतिशय वास्तववादी, प्रत्ययकारी लेख आहे. व्यसने, अंधश्रद्धा, असंवेदनशीलता, असहिष्णुता, अस्थिरता या साऱ्यांतून बिथरलेले आणि बिघडलेले मन प्रकट होत आहे हे अगदी खरे आहे. पण दुर्दैव हे आहे की, त्यात सुशिक्षित, शांत, संस्कारी मुले भरडली जात आहेत. मी बघितलेला असाच एक तरुण माझ्यासमोर इतका वैतागलेला होता की, ‘‘यांना रस्त्यावरील साधे नियम पाळता येत नाहीत. घेतात कशाला एवढ्या मोठ्या गाड्या? सर्व गाड्यांना आग लावून देईन मी एक दिवशी.’’ या प्रतिक्रियेतूनच या लेखातील विचारांचा प्रत्यय येतो. हे जगभर चालू आहे. अनेक लोक आतून अस्वस्थ आहेत. काही लोक त्रास देत आहेत तर काही लोकांना त्रास होत आहे. पण भय वाटते की, ज्यांना त्रास होत आहे ते लवकरच दुसऱ्या बाजूला जाणार तर नाही ना? जुन्या ‘सारांश’ सिनेमामधील अनुपम खेर यांचे वाक्य आठवते, ‘I have no hopes for this country…’ किती वर्षं माणसाने आशेवर जगत राहायचे हा प्रश्न आहे.

हल्ली मोठ्यांबरोबरच लहान मुलांचे वागणे ही फारच बदलले आहे. फक्त ‘पाहिजे म्हणजे पाहिजे’ ही संस्कृती बळावली आहे. बालमानसशास्त्राचा पुन्हा नव्याने अभ्यास करावा की काय अशी गंभीर परिस्थिती ओढवली आहे. काहीतरी ठोस कृती करण्याची वेळ आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सद्या:स्थितीचे चपखल वर्णन!

‘लोकरंग’मधील (२० जुलै) अतुल पेठे यांचा ‘आजारी समाजाच्या नोंदी!’ हा लेख म्हणजे सद्या:स्थितीचे उत्तम वर्णन! पर्यावरण, राजकारण, सामाजिक स्थिती, कोणतेही क्षेत्र असो, वाढती उदासीनता, भ्रष्टाचार, काहीही बोलणे, त्याविषयी टीव्ही चॅनेलवर भाष्य, वाढती बेकारी, महागाई, गुणवान व्यक्तींची उपेक्षा, वाढती गुंडगिरी, प्रदूषण अशा अनेक समस्यांची मोठी यादीच दिली आहे. त्यातून समाजमाध्यमांवर येणाऱ्या खोट्या पोस्ट, कोणाची तरी बाजू घेऊन होणारे वादविवाद! विशेष म्हणजे जे काही सुरू आहे ते योग्यच आहे असे काही लोकांना वाटते. तरीही अनेक व्यक्ती आपल्या क्षेत्रात प्रामाणिकपणा दाखवून काम करीत आहेत, नवीन पिढी यातूनही मार्ग काढून वाटचाल करीत आहे, परिस्थितीवर भाष्य करणारे लेखक, कवी यातून आशादायक चित्र दिसते. पुढील काळात काय होईल हे सांगणे कठीण असले तरी चांगल्या गोष्टी टिकवण्यासाठी होणारे प्रयत्न यातून चांगले बदल होतील हा विचार मानसिक बळ देणारा ठरतो.

  • प्र. मु. काळे, नाशिक.