गेली चाळीस वर्ष ‘राजहंस प्रकाशना’चं सुकाणू समर्थपणे सांभाळणारे दिलीप माजगावकर ११ नोव्हेंबरला वयाची ८० वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्त त्यांची ‘पत्र आणि मैत्र’ आणि ‘वाणी आणि लेखणी’ ही दोन पुस्तके प्रकाशित होत आहेत. ‘पत्र आणि मैत्र’मध्ये माजगावकरांचा विविध नामवंतांशी चिंतनशील, भावगर्भ पत्रसंवाद एकत्रित पाहायला मिळतो. त्यातील श्री. पु. भागवत यांनी पाठवलेल्या पत्रास दिलेलं उत्तर..
आदरणीय श्रीपु..
सप्रेम.
आपलं पत्र येऊन दोन महिने झाले. इतक्या विलंबानं पत्र लिहिताना मनात एक अपराधी भावना आहे. कामात होतो म्हणून पत्र लिहू शकलो नाही, हे लिहिणं सत्याला धरून होणार नाही. तसा असतो, तर यापूर्वी लिहिलं असतं. वस्तुस्थिती सांगायची तर आपल्याला लिहिताना एक दडपण जाणवतं. यापेक्षा समक्ष भेटीत बोलू, हा विचार मनात अनेकदा बळावला. मुंबईत आलोही. श्री. मंगेश पाडगावकर यांची भेट झाली. त्याही वेळी आपल्या भेटीचा विषय काढताना जीभ अडखळली. माझी मन:स्थिती समजावी, यासाठी विस्तारानं लिहिलं.
आपल्यामागची कामं आणि आपली प्रकृती यातून सवड काढून ‘अमृतसिद्धी -१’ बारकाईनं बघितलं. काही शंका, काही रुचिभेद मोकळेपणानं कळवलेत. मनापासून आनंद वाटला. त्यातील एक-दोन मुद्दय़ांबाबत मी अर्थात सहमत आहे (उदा. खंड क्रमांक स्पाइनवर असणं). इतर बाबतींत मी समक्ष भेटीत माझा विचार व अडचणी सांगेन. एक लक्षात आलं, की आपण उपस्थित केलेल्या सर्व मुद्दय़ांचा मी विचार केलेला होता. अर्थात यानिमित्तानं निर्मितीबाबतचा आपला दृष्टिकोन अधिक तपशिलात जाणून घेता आला, हे मला महत्त्वाचं वाटतं. माझ्याविषयी, माझ्या कामाविषयी आपण जे कौतुकानं लिहिलं आहे, तो आपल्या मनाच्या मोठेपणाचा आणि मनाच्या श्रीमंतीचा भाग आहे असं समजून त्याविषयी लिहिणं टाळतो. अर्थात आपल्यासारख्या श्रेष्ठींनी (अलीकडे राजकारणी मंडळींनी या शब्दाची रयाच घालवली आहे.) माझ्या धडपडीकडे इतक्या बारकाईनं व कौतुकानं बघावं, याचा मला खचित आनंद व थोडा अभिमान वाटला. (घरी सौ.ना म्हणालोही, की आज गोड शिरा करायला हरकत नाही.) स. ह. देशपांडे पत्र वाचून म्हणाले की, श्रीपुंचं हे हृद्गत म्हणजे अ-घोषित मानपत्रच आहे. असो.
श्रीपु, अलीकडच्या काळात एक विचार मनात येत असतो. काहींशी त्याबाबतीत बोलतोही. श्री. पाडगावकर यांच्याशी या अनुषंगानं अनेकदा चर्चा करतो. तो आपल्याशी आज बोलतो. आखीवपणापेक्षा मोकळय़ाढाकळय़ा स्वरूपात मांडतो. माझ्याही मनात तो पूर्ण आकारला नसावा. गेल्या दहा-बारा वर्षांतल्या राजहंसच्या पुस्तकांबाबत बरीच मंडळी कौतुकानं बोलतात. ते ऐकायला बरंही वाटतं हे नाकारण्यात काय अर्थ आहे? पण थोडाच वेळ. नंतर जाणवतं, की हे कौतुक नेमकं कोणत्या गोष्टीचं असतं? पुस्तकाची निर्मिती, त्याची विक्री यंत्रणा, त्याची जाहिरात, वेळापत्रक या तुलनेनं गौण भागांकडेच मंडळी अधिक लक्ष देतात. त्या गोष्टींना आजच्या बदलत्या काळात निश्चित असं महत्त्व आहेच. मी तर ते मानतो. त्याप्रमाणे शक्यतो काटेकोरपणे व व्यावसायिक शिस्तीत त्या करण्याचा प्रयत्नही असतो. पण या गोष्टी नंतर येत असतात. मुळात मी माझा वाचक फार गंभीरपणे घेतो Do not underestimate your reader and voter, हा माझ्या विचाराचा पक्का धागा असतो.
त्या दृष्टीनं माझा वाचक, त्याची मानसिकता, त्याच्या सवयी, आवडीनिवडी, त्याच्या भोवतालच्या राजकीय-सामाजिक परिस्थितीत होत जाणारे बदल, त्यातून अपरिहार्यपणे येणाऱ्या एक प्रकारच्या धास्तावलेपणातून तो शोधत असलेला आधार यांबाबत माझ्या मनाच्या कोपऱ्यात सतत विचारांचा खेळ चालू असतो. तो माझ्या छंदाचा भाग बनावा, इतपत चालू असतो आणि त्यातून मी शोधत असतो विषय, जे वाचक आज स्वीकारण्याच्या मन:स्थितीत आहेत असे विषय; मग मला विषयांचं बंधन काचत नाही. माझ्या मनासारखा विषय मिळाला, की मग मी शोधतो लेखक. ही जोडी जेव्हा मनाप्रमाणे जमून येते; तेव्हा तो लेखक नवा का नामवंत, पुस्तक स्वतंत्र का अनुवाद, लहान का मोठं या सगळय़ा गोष्टी मला त्यापुढे गौण वाटतात. डॉक्टरचं सारं लक्ष जसं नाडीवर असतं, तसं माझं लक्ष वाचकाच्या मनातील विचारांचा ठाव घेत असतं. त्याच्या विचारांची आंदोलनं आपण समजून-जाणून घ्यायला हवीत, असं वाटत राहतं. याचा अर्थ ‘मागणी तसा पुरवठा’ असं सोपं-सुटसुटीत गणित माझ्या मनात नसतं.
त्यापलीकडे जाऊन काही टिकाऊ स्वरूपाचं, वाचकाला दीर्घकाळ विचार करायला प्रवृत्त करू शकणारं साहित्य आपण शोधलं पाहिजे; त्यासाठी शक्य तितकी नजर उंच करून प्रयत्न केले पाहिजेत, असं वाटत असतं. या शोधयात्रेत हाताशी लागून जातात ‘काव्र्हर’, ‘टॉलस्टॉय’, ‘ओअॅ सिस’ यांसारखी स्वतंत्र चरित्रं वा प्रवासवर्णनं, ‘काश्मीर’, ‘तिसरी क्रांती’ इ. राजकीय विषयांवर लिहिलेली पुस्तकं; ‘शुभमंगल’, ‘इंदिरा’सारखे अनुवाद आणि अलीकडे ‘राजहंस’ची कोणती पुस्तकं वाचकांनी मोठय़ा प्रमाणात स्वीकारली असं विचाराल तर माझ्या आणि वाचकांच्या विचारांच्या तारा जिथे जुळून आल्या, तीच पुस्तकं वाचकांनी जवळ केली. असा विश्वास ज्या पुस्तकांबाबत मला वाटत राहतो, तिथे मग माझ्या मदतीला येतात माझी बरी निर्मितिमूल्यं, विक्री कौशल्य, जाहिरात तंत्र, थोडा धोका पत्करून डाव टाकण्याचा माझा स्वभाव इ. गोष्टी आणि जिथे माझी आणि वाचकाची चुकामूक होते तिथे वरील गोष्टी माझ्या मदतीला येत नाहीत आणि याबाबतीत काही काळानंतर विचार केला असता बहुतांश वेळा वाचक बरोबर असतो. चूक माझी असते, असंच वाटत राहतं.
मला विचारात पाडणारा, सतावत असणारा प्रश्न आहे, की माझी (पुस्तकांच्या निवडीमागची) ही विचारपद्धती बरोबर वाटते का? तिच्या मर्यादांची मला पुरेशी जाणीव आहे. मुळात माझ्या मर्यादांची मला नको तितकी जाणीव आहे. (हा सावध पवित्रा मात्र नाही.) ललित विषयांबाबत तर हे प्रकर्षांनं जाणवतंच. कदाचित या कारणानंच राजहंसच्या ललित विषयातील ग्रंथांना मर्यादा पडलेल्या असतील; पण त्या स्वीकारण्यावाचून आता गत्यंतर नाही. त्यातून बाहेर येण्याचा माझ्यापरीनं माझा प्रयत्न सुरूच असतो. केव्हा तरी यासंबंधात आपल्याशी बोलायचं मनात आहे. असो. पत्र कदाचित भलत्याच दिशेला वळलं, असं आपल्याला वाटण्याचा दाट संभव आहे; पण माझी शंका मी पुरेशा स्पष्टपणे मांडली, असं समजतो.
पत्राला उत्तर आलं, तर आनंद वाटेल; पण आपल्या प्रकृतीमुळे किंवा कामामुळे आपण लिहू शकला नाहीत तरी मला समजण्यासारखं आहे.
‘चित्रमय स्वगत ३’ फक्त पाहिलं. माझी प्रत आल्यावर सावकाश बघेन. आपण त्या कामातून मोकळे झालात की नाही? नवे संकल्प काय आहेत? श्री. द. न. गोखले यांचं गांधींवरील पुस्तक व श्री. पाडगावकर यांचं ‘कबीर’ या पुस्तकांविषयी मला कुतूहल आहे. पुण्यात आलात तर कळवा. भेट घेईन. घरी घेऊन जाईन. निवांत बोलू.
कळावे.
दिलीप माजगावकर
२८ मार्च १९९६