एकाच घनाच्या दोन सरी..

भवतालातील मरगळीच्या आयुष्यात कला, संगीत, साहित्यसंस्कृतीचे महत्त्व िबबविणाऱ्या ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ची आठ दिवसांची रंगतमैफल मुंबई, कल्याण, ठाणे, पार्ले आदी शहरांतील सजग आणि जाणकार श्रोत्यांनी उचलून धरली. लेखनाच्या भूमिकांपासून ते समाजाच्या बदलापर्यंतच्या अनेक प्रश्नांवर वक्त्यांनी भाष्य केले. लोकनृत्य, अभिवाचन आणि विविध कलांनी भावसंपन्न अनुभूती देणाऱ्या यातील निवडक सत्रांची शब्दचित्रे..

अंबरीश मिश्र

साहिर लुधियानवी आणि सुरेश भट अद्वैत आहे. फैज अहमद फैज यांचा या दोघांवरही पुष्कळ प्रभाव.. साहिरला ‘फैजियन पोएट’ म्हणतात इतका फैजचा त्यांच्यावर प्रभाव. आणि ‘एल्गार’च्या प्रस्तावनेतच सुरेश भट म्हणतात- फैज हे माझे दैवत आहे. फैजने उत्तम कवीची ओळख सांगितली आणि या दोघांनी ती उत्तमप्रकारे आपल्या कवितांमधून साकार केली. फैजला १९५७-५८ साली पाकिस्तानातील अयुब खान सरकारने तरुंगात टाकले. तेव्हा तो म्हणाला, ‘मला पेन द्या, पाटी-पेन्सिल द्या, पुस्तके द्या..’ पण त्याची ही इच्छा पूर्ण केली गेली नाही. त्याने तुरुंगातल्या भिंतींवर शेर लिहिला- ‘मता-ए-लौह-ओ-क़लम छिन गई तो क्या ग़म है, कि ख़ून-ए-दिल में डुबो ली हैं उँगलियाँ मैं ने’ : कागद-कलम ही माझी मालमत्ता हिरावून घ्याल तुम्ही, तरी हृदयाची दौत आणि बोटांच्या लेखण्या करेन मी! याला कवी म्हणतात आणि बाकी कवडे पुष्कळ असतात आणि ते असावेत असे माझे मत आहे. कारण त्यांच्यामुळे कवितेचा माहौल होतो, पण ते कवी नसतात. रेडिओ, गाण्यांच्या तबकडय़ा आणि कवीसंमेलने यांमुळे सुरेश भटांचे नाव जनमानसांत खूप झाले. गज़्‍ालमुळे त्याचे खूप नाव झाले. आणि साहिरला सिनेमांमुळे खूप लोकप्रियता मिळाली. पण त्यावर तसे फारसे लिहिले गेले नाही. त्याच्या प्रातिभधर्मावर आपल्याला फारसे माहीत नाही. त्याला जाऊनच ४५ वष्रे झाली, तरी त्याच्यावर दोन-तीन पुस्तकेच उपलब्ध आहेत. आणि विशेष म्हणजे तो स्वत:वर फारसे बोललेला नाही. भटांवर मात्र मराठी माणसाने अमाप प्रेम केले आणि त्यांच्यावर खूप काही लिहूनही आलेले आहे. मी या दोघांनाही भेटलो हे माझे भाग्य.

देशाची फाळणी झाली तेव्हा साहिर होते पाकिस्तानात. जन्म लुधियानाचा, शिक्षण पंजाबचे.. लाहोरमध्ये ते दोन-तीन वर्तमानपत्रांचे संपादन करत होते. ते कम्युनिस्ट होते म्हणून पाकिस्तान सरकारने त्यांच्यावर बंदी घातली. त्यानंतर आईला घेऊन ते दिल्लीला आले. सहा महिन्यांनंतर त्यांना जाणीव झाली- ‘मला मुंबईला जावे लागेल.. मुंबई माझी वाट पाहतेय..सिनेमा माझी वाट पाहतोय..’ त्यांची सिनेमात गाणी लिहिण्याची प्रचंड इच्छा होती. प्रेम धवन यांच्या ओळखीतून त्यांना पहिला चित्रपट मिळाला- ‘आझादी की राह पर’ पण हा सिनेमा काही फार चालला नाही. त्यानंतर एस. डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेले ‘नौजवाँ’चं ‘ठंडी हवाएॅं लहरा के आए’ला थोडीफार प्रसिद्धी मिळाली. पण त्याहूनही जास्त चांगले आणि गाजलेले गाणे, ज्याच्यामुळे साहिरचा सिक्का पक्का झाला ते कुठले?

त्याआधी या गाण्याची गोष्ट. मुंबईत अड्डा कल्चर नाही.. इथले व्यापारी फक्त सिक्के मोजतात.. या वातावरणात एसडींचे मुंबईत मन लागेना. त्यांचे तीन चित्रपट आपटले होते. या सगळय़ाला कंटाळून ते कोलकात्यात जायला निघाले. त्यावेळेस एस. मुखर्जी यांच्याकडून समजूत काढली गेली की, ‘मशाल’ आणि ‘बाझी’ चित्रपट आहेत त्याची वाट पाहा. त्यावेळी ‘मशाल’ नावाच्या सिनेमातले मन्नादा याचे ‘मत रो माता लाल तेरे बहुतेरे’ हे गाणे खूप चालले. ‘बाजी’ चित्रपटही खूप गाजला, तेव्हा एस. मुखर्जी त्यांना म्हणाले की, मी तुला एक महिन्यासाठी कोलकात्याला सुट्टीवर पाठवतो. ते कोलकात्याला गेलेही. त्यावेळी कोलकात्यात म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या लोकांच्या तोंडी ‘तदबीर से बिगडम्ी हुई तक़दीर बना ले, अपने पे भरोसा है तो इक दाव लगा ले’ हे गाणे ऐकले. हर्षभरानेच मुखर्जीना त्यांनी फोन केला. मुखर्जीनी त्यांना लगेच मुंबईत बोलावून घेतले.

तदबीर म्हणजे युक्त्याप्रयुक्त्यांनी स्वत:चे नशीब बदल, अशी ही ग़ज़्‍ाल; पण हिंदी सिनेमात त्याचं कॅब्रे गीत झाले. तेही, ‘क्या ख़ाक वो जीना हे जो अपने ही लिए हो। खुद मिटके किसी और को मिटनेसे बचा ले।।’ यासारखा अर्थगर्भ शेर कायम ठेवून.

हिंदी सिनेमाच्या गाण्याला वेगळी विधा म्हणून, जॉनर म्हणून साहिरने निराळी ओळख मिळवून दिली. दुसऱ्या महायुद्धानंतर किस्मत, अनमोल घडी, रतन हे सिनेमे गाण्यांमुळे चालल्याचे लक्षात आल्यावर गाण्यांमधली गुंतवणूक स्टुडिओ मालकांनी वाढवली, अशा काळात साहिर मुंबईत आला. पण ‘तुमच्या सुरावटीनुसार मी गाणे रचणार नाही. माझ्याकडे तयार कविता आहेत’ हे म्हणणे त्याने कायम ठेवले. ‘तल्खियाँ’ हा साहिरचा काव्यसंग्रह १९४६ चा आणि साहिरच्या कवितांवरच नव्हे तर व्यक्तित्वावर बेतलेला गुरुदत्तचा ‘प्यासा’ १९५७ मध्ये प्रदर्शित झाला. त्यात ‘जला दो इसे फूँक डालो ये दुनिया’ आहेच; पण ‘जाने क्या तूने कही। जाने क्या मैने सुनी। बात कुछ बन ही गई।।’सारखे उत्तम ‘सिडक्शन साँग’सुद्धा आहे- कदाचित त्यावेळचा समाज फारच सात्त्विक असल्याने त्यांना यातले सिडक्शन भिडलेही नसेल. पण देहाचा बाजार, उपासमार, विषमता या संदर्भातला ‘सनाख्म्वान-ए-तकदीस-ए-मशरिक कहाँ हैं?’ हा साहिरचा सवाल (अर्थ : पौर्वात्य संस्कृतीचा अभिमान बाळगणारे कुठे आहेत?) मात्र सुटसुटीत शब्दांत ‘प्यासा’नं विचारला : ‘जिन्हे नाज़्‍ा है हिन्दपर वो कहाँ हैं?’ – तो आजही लागू पडतो, असेच अनेकांना वाटेल. कारण साहिर काय किंवा गुरुदत्त काय, निव्वळ त्या-त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांवर भाष्य करण्यात धन्यता मानणारे नव्हते. कलेचे भान तात्कालिकापेक्षा वरचे असते, हे त्यांना माहीत होते. इथे हे भान म्हणजे : कवी हा नेहमी प्रस्थापितविरोधीच असतो. तो मानवतेचा चिरंतन कायदा सांगत असतो.

‘उष:काल होता होता काळरात्र झाली। अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ हे सुरेश भट १९७७ मध्ये सांगताहेत. ते तुम्हाला यापेक्षा निराळे वाटणार नाही, याचे कारण म्हणजे कवितेचे मूळ दु:खाच्या उद्गारात आहे. दु:खभावनेपासून आज आपण दूरच पळतो, पण ती एक मुक्तिदायी भावना आहे. भटांच्याही कवितेत, ग़ज़्‍ालमध्ये प्रेम आणि विद्रोह आहे. ‘मी न साधी चौकशी केली घनांची, ऐन वैशाखातला मी पूर होतो’ सारखे भटांचे शेर अनेक. व्यवस्थेविरुद्धच्या रागाने पराकोटी गाठल्यावर कवीची प्रज्ञाच जणू त्याला प्रेमभावनेकडे वळवत असावी. सुरेश भटांचा प्रभाव माझ्यावर अतोनात होता. पण अलीकडे पुन्हा दोनतीन दिवसांत सुरेश भटांचे संग्रह वाचले, तेव्हा त्यांच्या काही शब्दयोजना पटल्या नाहीत.

‘गम और खुशी में फर्क न महसूस हो जहां’ या अवस्थेला पोहोचण्यासाठी कवीला कुठल्या धर्माची गरज नसते, हे साहिरच्या गाण्यांमुळे पटते. हिंदी सिनेमातली गाणी हेच जणू आपले अध्यात्म ठरावे, इतके काम साहिरने केले आहे. ते पाहिल्यावर धर्म.. राजकीय निष्ठांपायी घेतल्या जाणाऱ्या भूमिका.. अशा साऱ्या लौकिक बडिवाराच्या पलीकडे जाणे म्हणजे काय हे कळू लागते.

साहिर आणि सुरेश भट यांच्याबद्दल आणखीही बोलता येईल, कारण आरती प्रभूंच्या शब्दांत, ‘एकाच घनाच्या दोन आम्ही सरी, प्राणावर एक दुजी अंगावरी’ असे या दोघांचे होते!

उत्तम कलाकृती साहित्यातूनच घडतात

चंद्रकांत कुलकर्णी

कथा-कविता-भाषण अशा कोणत्याही साहित्याच्या प्रकारावरून माध्यमांतर होऊ शकते. आपल्याकडे त्याची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. याबाबत माझे छोटे अवलोकन असे आहे की, जेव्हा कथा-कादंबरी लिहिली जाते तेव्हा त्या लेखकाला माहिती नसते की पुढे याचे काय होणार आहे. मुळात त्यांनी ते माध्यमांतरासाठी लिहिलेले नसते. लेखकाची अनुभवधारणा आणि व्यक्त होण्याची पद्धत या प्रक्रियेमध्ये ती निर्मिती होते. पुढे कुणाला तरी त्याचे माध्यमांतर करायला वाटणे यात खरी गंमत आहे. उदाहरण सांगता येईल ते श्री. दा. पानवलकर यांच्या ‘सूर्य’ नावाच्या आठ पानी कथेवर विजय तेंडुलकरांनी ‘अर्धसत्य’ हा चित्रपट लिहिला. पानवलकरांच्या मूलधारणेतून आलेल्या कथेत काय होते, तेंडुलकरांना त्यात काय जाणवले आणि कुठल्या पद्धतीने मांडले हा मोठा इतिहास आहे. जगभरातील उत्तम कलाकृतींचा मूलस्रोत पाहिला तर तो साहित्यच आहे. परदेशातील उत्तमोत्तम चित्रपट पाहिले तर त्यामागे साहित्य असल्याचे कळेल. आपल्याकडे महाभारत असेल किंवा पाश्चात्त्य जगतात शेक्सपिअर. आपण त्यांच्याच गोष्टी पुन्हा वापरतोय. लिहितानाच एखाद्या माध्यमासाठी ठरवून लिहिले जात असेल तर त्याचे आकृतिबंध आणि चौकट वेगळे असतील.
सध्या आपल्याला आवडले ते करणे, यावर वेगवेगळय़ा पद्धतीने बरीच मर्यादा आलेली आहे. सध्याच्या परिस्थितीतदेखील आमच्यापैकी काही लोक आवडले तेच करू पाहत आहेत, म्हणून वेगळे प्रयोग होतायत, असे मला वाटते. वाचनालयातून एखादे पुस्तक आणायचे. त्यावर नाटक- मालिका- चित्रपट करायचे असे होणार नाही. मर्यादा येत असल्या तरी विरोध होऊ शकणाऱ्या कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे धाडस वेगळे आहे.
अशा अनेक कलाकृती आहेत, ज्यांना विरोध व्हायला हवा होता, पण त्या इतक्या चाणाक्षपणे सादर करण्यात आल्या, की विरोध कशाला करायचा, हे पाहणाऱ्यांना कळालेच नाही.

माध्यमांचे बलस्थान तपासणे गरजेचे..

अभिराम भडकमकर

प्रत्येक माध्यमाचे स्वत:चे बलस्थान असते आणि तशा मर्यादाही असतात. ते ते माध्यम हाताळताना बलस्थान काय ते तपासले पाहिजे. कादंबरीत शब्दांतून दृश्य उभे करायचे असते आणि चित्रपटामध्ये दृश्यातून बोलायचे असते. माध्यमांतर करताना मूळ साहित्यकृतीमधली दृश्यात्मकता लक्षात यायला हवी. माध्यमांची बलस्थाने लक्षात घेतली नाही, तर सिनेमा किंवा नाटक फसू शकते. मराठी साहित्याला मध्यमवर्गी म्हणायची आपली पद्धत आहे. व. पु. काळेंच्या कथांवर १९९२ साली दूरदर्शनवर ‘रास्ते’ नावाची मालिका करण्यात आली होती. त्याचे पटकथा-संवाद मी लिहिले होते. तेव्हा मी त्यांना सतत सांगत होतो की, हे तर मराठी मध्यमवर्गीय आहे. ते हिंदीत आपण का करतोय? ती मालिका दूरदर्शनवरून भारतभर पाहिली गेली. तिला समाजातील सर्वच स्तरांतून प्रतिसाद आला. वपुंना जे कथेतून सांगायचे होते ते माध्यमांतरानंतर दरभंग्यापासून दिल्लीपर्यंतच्या सर्वच प्रेक्षकांपर्यंत पोहोचत होते. ही माध्यमांतराची ताकद आहे.

विनोद न समजणारा समाज आजारी

मंदार भारदे

‘विदूषकांना मारायला उठलेला समाज हे आजचे भयाण वास्तव आहे. समाजाला विनोदनिर्मिती करणाऱ्यांकडून धोका नाही, तर विनोद करणाऱ्यांना मारणाऱ्यांकडून आहे. विनोद निर्मिती करणारे समाजविघातक नाहीत. विनोदी लेखक आजारी नसून त्यांना मारायला उठलेला समाज मानसिक आजारी आहे. त्यामुळे विनोदी लिखाणावर एक प्रकारची ‘सेन्सॉरशिप’ आहे, पुलंचा काळ हा निखळ विनोदाचा.. त्या वेळी समाजाची सांस्कृतिक भूक होती. आता ती राहिली आहे का असा प्रश्न पडतो. आपण मनाने प्रसन्न असू तरच विनोद समजून घेता येतो. आता आपण जगण्यातला रोमान्सच विसरून चाललो आहोत की काय असे वाटते. परिणामी आपल्यातली विनोदीवृत्ती, आस्वादकवृत्ती लोप पावत चालली आहे की काय, असेच वाटण्याचे सध्याचे दिवस आहेत.

पु. ल. देशपांडे यांचे अध्र्याहून अधिक साहित्य आताच्या महाराष्ट्राने जाळले असते. कारण त्यांनी इतिहास आणि पुराणांवर उपहासात्मक लिखाण केले आहे. पण सध्याच्या काळात समाजाच्या भावना सतत दुखावल्या जात आहेत. समाजातील सध्याचा भवताल पाहता टोकदार लिहिताना भीती वाटते अशी सध्याच्या विनोदी लेखकांची स्थिती आहे.

आजचे लिखाण सेन्सॉरशिपने बांधून ठेवले आहे की काय?

सॅबी परेरा

सध्या विनोदी लेखन करताना आपण कोणाच्या भावना तर दुखावत नाही ना याचीच धास्ती वाटते.. तरीही लेखन करावे लागते. त्यामुळे टोकदार उपहास प्रत्यक्ष लेखणीतून उतरण्यास मर्यादा येतात. अनेकदा असे वाटते की आपण आपले लिखाण सेन्सॉरशिपने बांधून ठेवले की काय?

आपण स्वत:वरील विनोदही स्वीकारायला हवेत आणि तशी वातावरण निर्मिती करायला हवी. लेखक जेव्हा विनोद करतो तेव्हा त्याला विसंगती दाखवायची असते. ती सहज समजून घेणे गरजेचे आहे. विनोदासह सुंदर जगणे आपल्याला टिकवता यायला हवे.

विनोदी लेखन हे अभिजात का नाही हा प्रश्न पडतो. महाराष्ट्रातील विनोदी लेखनाला सव्वाशे वर्षांची समृद्ध परंपरा आहे. ते सकस आहे. तरीही विनोदी लेखनाला अभिजात साहित्य मानले
जात नाही. अनेक मान्यवर तुमचे विनोदी लेखन आवडते असे खासगीत सांगतात, मात्र जाहीरपणे सांगत नाहीत. तसेच उत्तम पुस्तकांची निवड करतानाही विनोदी साहित्याचा फारसा विचार केला जात नाही.

सिनेमाचे व्याकरण वेगळे..

सुजय डहाके

सिनेमा या माध्यमाचे काही नियम आणि वेळेचे बंधन असते. तसेच त्याचे व्याकरणही असते. हे माध्यम कादंबरीसारखे वर्णनात्मक नाही. त्यात अलंकारिक भरपूर लिहिता येते. पण सिनेमाचे तसे नसते. त्यामुळे सिनेमा करताना दृश्यात्मकता शोधणे आव्हान असते. कथेच्या कलाटणीचे टप्पेही ठरवावे लागतात. जगभरातील अनेक सिनेमांत मध्यंतर असा प्रकारच नसतो. आपल्याकडे तो असतो. त्यामुळे विसाव्या मिनिटाला कहाणीत काही धक्कातंत्र देणारे प्रसंग, मध्यंतराआधी प्रेक्षकाला कोडय़ात, कुतूहलात टाकणारे प्रसंग रचावे लागतात. त्यामुळे सिनेमा करताना या व्याकरणाकडे पुरेपूर लक्ष द्यावे लागते. साहित्यकृती वाचूनच तिचे माध्यमांतर करावे की नाही, कसे करावे, याचा पहिला निर्णय होतो. मग व्यावसायिक साच्यात त्याला कसा बसवायचा याचा शोध होतो.

कर हवा, पण आम्हाला हक्क मात्र नाही

नक्षत्र बागवे

आम्हाला तुमचा विशेष अधिकार नको.. आम्हाला तुमची सहानुभूती नको.. आम्हाला हवा आहे समान अधिकार. हो, आम्ही समाजाने ठरवून दिलेल्या चौकटीत बसू शकत नसू कदाचित, पण ती चौकट तुम्ही ठरवली आहे म्हणून ती तुम्हाला परिपूर्ण वाटते; पण तशी नाही. या चौकटीतून तुम्ही आम्हाला बाहेर फेकले आहे, पण आम्हीही या चौकटीचाच एक भाग आहोत.. कारण तुम्ही जितके नैसर्गिक आहात तितकेच आम्हीही.. आमच्यातली ऊर्मी ही नैसर्गिकच आहे.. तुम्ही आखलेल्या चौकटीतले हक्क आमच्यासाठीही आहेत.. आणि आमचा लढा आम्हाला या चौकटीत सामावून घेण्यासाठीचा आहे.. आम्हाला ‘माणूस’ म्हणून वागणूक मिळविण्यासाठीचा आहे.

बॉलीवूड आणि मराठी चित्रपटांमधून जी पारिलगी व्यक्तिरेखा रंगविली आहेत, त्यामुळे आमच्या समुदायाचे भडक आणि बदनामी करणारे चित्र लोकांमध्ये उभे राहिले आहे. परिणामी आमच्याकडे लोक त्याच नजरेने बघतात- जे की चुकीचे आहे.

आमच्या मरण यातनाही किती.. पारिलगी म्हणून आम्ही रक्तदान करू शकत नाही. माझा जोडीदार आजारी पडला तर त्याच्या कन्सेंट फॉर्मवर सही करण्याचा अधिकार मला नाही. ज्या कुटुंबाने त्याला नकारले त्यांना मात्र त्या कन्सेंट फॉर्मवर सही करण्याचा अधिकार.. ते येतील किंवा येणार नाहीत तोपर्यंत माझा जोडीदार तिथेच खितपत पडणार.. मरण यातना भोगणार..

आम्हीही भारतातील अन्य नागरिकांप्रमाणेच कर भरतो, पण अन्य लोकांना जे मूलभूत अधिकार मिळतात, त्यापासून आम्ही मात्र वंचित. म्हणजे आम्ही टॅक्स भरायचा.. आम्हाला तुमच्यासारखे हक्क मात्र नाहीत. आमच्यातले अनेक जण नैराशेपोटी आत्महत्या करतात किंवा तसा प्रयत्न करतात. डेटिंग अ‍ॅपवरून समिलगी मुलांना डेटसाठी बोलावून नंतर लुबाडणे आणि ब्लॅकमेल करणे अशा घटना घडत असतात. कारण काय तर, तू गे आहेस हे समाजाला सांगेन. अनेकदा बलात्कार होतात. मग समाजानेच आम्हाला मान्यला दिली तर असे प्रकार घडणार नाहीत.

कुटुंबाची साथ

जामिनी बाविस्कर

ट्रान्स पर्सन म्हणून जगताना मला माझ्या आईची मिळालेली साथ मोलाची आहे. ती फार शिक्षित नसूनही तिने मला समजून घेतले हे मला आवर्जून सांगावेसे वाटते. तिने सहज समजून घेतल्याने की काय समाजानेही मला लगेच स्वीकारले. आमच्यासाठी कुटुंबाचा खूप पाठिंबा मोलाचा ठरतो. माझ्या या प्रवासात मी काम करीत असलेली कंपनी आणि माझ्या ऑफिसमधील सहकारी यांचे सहकार्यही खूप महत्त्वाचे आहे. मी ज्या कंपनीत काम करते तिथल्या पारिलगी कर्मचाऱ्यांचा समंजसपणे विचार करून धोरण ठरविणाऱ्या व्यवस्थापनामुळेही माझे जगणे सुस होऊ शकले. आमच्यासाठी हे खूपच आवश्यक आहे असे मला वाटते. ट्रान्स जेन्डर नेहमी टिंगल-टवाळीचा विषय ठरतात. त्यांना माणूस म्हणून कोणी समजून घेत नाही. पण तेही आता शिक्षण घेत आहेत. चांगल्या ठिकाणी काम करत आहेत. मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपड करीत आहेत. त्याला समाजाची उत्तम साथ हवी.

आपले मूल जपावे

अरुणा देसाई

पारिलगी मुलांना कुटुंबाने स्वीकारले तर समाजही सहज स्वीकारेल.. मुळात पालक म्हणून समाजाचा विचारच का करावा? मूल माझे आहे, मी त्याला साथ द्यावी इतकेच पालकाने करावे. आपले मूल समिलगी असणे हा काही त्याचा गुन्हा नाही हेही पालकांनी समजून घ्यायला हवे. याबद्दल तुम्हाला फारशी माहिती नसेल तर त्याविषयी आधी जाणून घ्या. तुमच्या मुलांच्या भावनांचा स्वीकार करा.. त्यांना समजून घ्या.

‘सेल्फ हेल्प’ आणि आपण शिस्त लावण्यासाठीच ‘स्व-मदत’ पुस्तके

डॉ. यश वेलणकर

आपण सेल्फ हेल्पची पुस्तके ढिगाने वाचतो. पण त्यातील महत्त्वाच्या बाबींचा अवलंब करतो का? तो जर करत नसू तर त्या सेल्फ हेल्प पुस्तकाचा काहीही उपयोग नाही. मात्र त्या पुस्तकात सांगितलेल्या सवयींचा अवलंब केला तर तुमच्या आयुष्याला शिस्त लागण्यास मदत होते. आपल्याला केवळ माहिती असणे पुरेसे नाही, त्यासाठी सरावही तितकाच महत्त्वाचा असतो. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनीही लिहिले आहे की, ‘एक तरी ओवी अनुभवावी’ – याचाच अर्थ ज्ञानेश्वरीची नुसती पारायणे करून उपयोग नाही, तर एक जरी ओवी अनुभवलीत तर तुमच्या जीवनाचे सार्थक होईल, असे त्यांना सुचवायचे आहे.

‘सेल्फ हेल्प’ केवळ पुस्तकातून नव्हे तर एखाद्या घटनेतून, कार्यक्रमातून, समाजमाध्यमावरील संदेश, व्हिडीओंच्या माध्यमातूनदेखील मिळू शकते. गीता, मनाचे श्लोक, संत साहित्य.. ही सेल्फ हेल्पची उत्तम उदारणे आहेत. पण आपण ती केवळ पाठांतरापुरतीच मर्यादित ठेवतो. त्यातील सार लक्षात घेऊन त्याचा स्वीकार केला तर आपले जीवन सुसंगत होईल.
सॅम्युअल स्माइल्स यांचे ‘सेल्फ हेल्प’ या नावाचेच पुस्तक आले आणि सेल्फ हेल्प या संकल्पनेवर आधारित पुस्तकांची मालिका सुरू झाली. ही एक मोठी बाजारपेठ आहे. या पुस्तकाने महात्मा गांधीही प्रेरित झाले. ते इंग्लंडमध्ये कायद्याचे शिक्षण घेत असताना त्यांनी हे पुस्तक वाचले. आपल्यातील कमतरता लक्षात घेऊन त्यानंतर त्यांनी स्वयंशिस्त, प्रयत्नातील सातत्य आणि वैयक्तिक चारित्र्य या गोष्टी त्यांनी स्वत:च्या आयुष्यात उतरविल्या.

लेखनात ‘उदगीरी’चा मुद्दाम वापर

प्रसाद कुमठेकर

मराठवाडय़ात ज्या बोलीभाषा बोलल्या जातात त्यांचे सर्वेक्षण झालेले नाही. त्यामुळे मराठवाडय़ात जी भाषा बोलतात त्याला मराठवाडी असे मानले जाते. एका बाजूला तेलंगणा आणि दुसरीकडे कर्नाटकच्या सीमेवरले भाग जवळ असल्याने काही बोलींवर कानडी तर काहींवर तेलुगू भाषेचा प्रभाव आहे. आमच्या उदगीर परिसरातील भाषेत कानडी शब्दांची सरमिसळ झाली. कादंबऱ्या लिहिताना उदगीरची भाषा निवडण्यामागे हे कारण होते, की मी ती नाही लिहिली, तर मग इतर कोण येऊन तिचा वापर करणार? प्र. ई. सोनकांबळे यांच्या ‘आठवणींचे पक्षी’ या पुस्तकात मराठवाडी बोलीचा वापर दिसतो. पण समकालीन लेखक तिचा वापर करीत आहेत. मी लिखाणात खूप उशिरा आलो. पूर्वी टीव्ही शो, मालिका लिहायचो. २००८ साली ‘बगळा’ नावाचा चित्रपट लिहिला होता. ती पटकथा कुणी करायला तयार होईना म्हणून काही वर्षे तशीच पडून राहिली. एका मित्राने त्यावर कादंबरी होऊ शकेल हे सुचविले. त्यानंतर पटकथेपासून कादंबरी असा माझ्या ‘बगळा’ या पुस्तकाचा प्रवास झाला. याचा फायदा असा की मला लिहिण्याचा माझा ‘फॉर्म’ सापडला. ‘टीव्ही मालिका’ ही लोक कितीही मूर्ख, वाईट म्हणत असले तरी सर्वात कमी काम आणि सर्वाधिक दाम देणारी गोष्ट आहे. ‘राजा राणीची ग जोडी’ नावाच्या मालिकेत मी पात्रांच्या तोंडी समकालीन लेखकांच्या पुस्तकांचे संदर्भ दिले. एका भागात तर व्यक्तिरेखा ‘दामोदर प्रभू’ या लेखकावर चर्चा करताना दाखविले. मराठवाडय़ात नव्वदीपासूून मुलांची लग्ने ही खूप समस्या बनली आहे. ज्या घरांत सोफा असतो, त्यांना सुखवस्तू समजले जाते. त्या घरांत लग्नात कुठलीही अडचण येत नाही. त्यावर लिहिलेल्या ‘सोफा सो गुड’ या मीच लिहिलेल्या रिपोर्ताजवर आता कादंबरी येऊ घातली आहे.

लिहिणे स्वत:ला शोधण्यासाठी..

मृद्गंधा दीक्षित

वाचनाच्या बाबत घरातून चांगले वातावरण मिळाले. मी वकिली शिकल्यानंतर त्यात उमेदवारीही केली. पण मला त्याचा कंटाळा आला आणि लिहून पाहूया असे ठरविले. एकांकिका लेखन, वक्तृत्त्व स्पर्धा यांत आधी सहभागी होते. मी आठवी-नववीत असताना िवदा करंदीकर यांना ज्ञानपीठ मिळाले. त्यानंतर मला लेखक-कवींविषयी कुतूहल वाटायला लागले. आपण या जगताचा एक भाग व्हावे, याची बीजे तिथे रोवली गेली. गेल्या दहा वर्षांतला आपला भवताल सर्वार्थाने बदलला. त्यातील पहिली पाच वर्षे सैरभैर होती. आपल्याला आवडणारी माणसे, कलाकार किंवा वेगवेगळय़ा क्षेत्रांतील तारांकित व्यक्ती काहीतरी उग्र मते व्यक्त करताना दिसत होती. त्यांच्यावरील आपली आस्था कोलमडून पडायला लागली. खूप एकटेपणा वाटायला लागला. त्यातून लिखाण स्वत:ला शोधण्यासाठी उपयुक्त वाटायला लागले.

मला प्रेमकथाच का सुचतात?

हिनाकौसर खान

आपले जगणे खूप विसंगतीने भरलेले आहे. सध्याचा भवताल खूप विद्वेषाचा असताना जी अभावाची गोष्ट आहे, तीच मला सांगावीशी वाटते. माणसामाणसांमधील नातेसंबंध, मग ते स्त्री-पुरुषांमधीलच नाही तर समाजाच्या सर्वच पातळीवर द्वेषाच्या छटा दिसतायत. प्रत्येकाला खरे तर प्रेमच हवे असले, तरी कुटुंबापासून प्रत्येक पातळीवर आपण ते गमावलेले पाहतो. प्रेमापासून परावृत्त करण्याकडेच समाजाचा कल दिसतो. मला आधी कथा सुचतात, त्यामध्ये ‘प्रेम’ ही जगण्याची मूलभूत प्रेरणा म्हणून येते. त्या आस्थेतून आणि ओढीतून कथेमध्ये त्याचा समावेश असतो. लिहिताना मी व्यक्तिरेखेच्या बरोबर असते. कथा मग कुठल्याही भूगोलात घडली, तरी मला चालते. आपल्या भवतालातलेच लेखक नेहमीच मांडत असतो. पण वाचकांना ते त्याच्या भवतालातले वाटावे, ही सजगता लिहिताना यायला हवी.

शाळांमधूनच प्रबोधनाची गरज

प्रीशा अय्यर

आपण आपल्या वर्गातील मुला-मुलींपेक्षा वेगळे आहोत याची आधी स्वत:ला जाणीव होणे.. ती स्वीकारणे आणि त्यानंतर घरच्यांना त्याबद्दल माहिती देणे हा प्रवास तसा भीतीदायक.. प्रचंड मानसिक दडपणाचा.. यात काहींना कुटुंब नाकारते तर कधी सहज समजून घेतले जाते. कुटुंबाने ज्यांना समजून घेतले त्यांचा मार्ग कुंटुंबापुरता तरी सुकर होतो. अनेक लेस्बियन मुलींना ‘लग्न झाल्यावर सर्व काही सुरळीत होईल’ यासाठी जबदरस्ती केली जाते. अशावेळी या मुलींची भयंकर मानसिक कोंडी होते. मग अशावेळी अंधश्रद्धांना बळी पडणे, समिलगी व्यक्तींची लैंगिक अभिमुखता बदलण्यासाठी बाबा-बुवांकडे जाऊन मंत्र-तंत्र करून घेणे हा निव्वळ मूर्खपणा आहे. त्यापेक्षा पारिलगी लोकांबद्दल जाणून घ्या, नव्हे शाळा-कॉलेजांमधून याविषयी बोला, चर्चा करा.. तरच समाजात परिवर्तन होईल. याविषयी प्रबोधानाची नितांत गरज आहे.

व्यंगचित्राची ताकद

प्रशांत कुलकर्णी

साहित्यातील कलाकृतींचे व्यंगचित्रकलेतील विविध कलाप्रकारांशी कसे साधम्र्य आहे. ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांच्या ‘सह नौ भुनक्तु..’ या मालिकेचा फॉर्म एखाद्या कादंबरीचा आहे, तर हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांचे एखादे मुखपृष्ठ म्हणजे एखाद्या भावगीताची कशी आठवण करून देणारे. ‘अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे’ या संत रचनेतील भाव अमेरिकेतील व्यंगचित्रकारही उत्कटपणे रेखाटू शकतो.

बातमी एकच असते, पण त्यातील नेमकेपणा हा विनोद आणि चित्राच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम व्यंगचित्रकार करतो. आजकाल सर्वत्र बिबटय़ांचे हल्ले होत आहेत, या प्रश्नावर भाष्य करताना ‘हल्ला करण्याचा अधिकार हा बिबटय़ाचा नसून मानवाचा आहे’ हे त्यांचे उपरोधिक भाष्य असो वा कॉम्प्युटरच्या विळख्यात अडकलेली पुढील पिढी ही एक दिवस ‘हस्ताक्षर म्हणजे काय?’ हा प्रश्न विचारणार.. हे सारे व्यंगचित्रातून प्रभावीपणे मांडता येतं..

इतिहासाचे महत्त्व कायम

प्रा. श्रद्धा कुंभोजकर

आपण वर्तमानात जगतो. भविष्यातल्या विचारांचे आणि आताच्या जगण्याचे अधिष्ठान भूतकाळात असते. इतिहास समजून घेतला तर वर्तमान सुसह्य होतो आणि भविष्यासाठी विचार करायला काही आधार मिळतो. रोजचे जगणे चांगल्या पद्धतीने समजून घेता यावे, म्हणून इतिहास शिकायचा. इतिहास ही बदलांची वेध घेणारी शाखा आहे. बदलांबाबत स्वागतशील असले पाहिजे. अनेक साधने आपण एका तथ्यासाठी वापरू शकतो. संस्कृत इतकीच पाली, जैन व बौद्ध परांपरांची साधने महत्त्वाची आहेत. न घडलेल्या गोष्टी अनेकदा सांगितल्या जातात. घडलेल्या घटना आपण अनेकदा लक्षात ठेवत नाही. एखाद्या घटनेचे आपण पोवाडे गातो आणि महत्त्वाची घटना असूनही त्याची स्मृती कमी ठेवतो. तर हे स्मृतींचे राजकारण साधनांचे परीक्षण करताना लक्षात घ्यावे लागते. इतिहास जबाबदारीने सांगण्याची गोष्ट आहे. मात्र इतिहास शिकवताना मोकळीक हवी. पाठय़पुस्तक निर्मितीमध्ये अभ्यासकांनाच स्थान मिळायला हवे. बालभारतीच्या आजच्या पुस्तकामागे विशिष्ट हेतू दिसतो. गती नसणारी मंडळी पाठय़पुस्तके लिहिण्यास नेमली जातात. वर्तमान आहे तोपर्यंत इतिहास राहणार. माध्यमे बदलतील पण गतकालाच्या नोंदींचे म्हणजे इतिहासाचे महत्त्व कायम राहील.

‘एआय’मुळे इतिहासात मोठे बदल

हेमंत राजोपाध्ये

इतिहास साधने एकसाची नसतात. एकाच साधनांमध्ये परस्पर विसंगत जाणिवा असतात. वेदांमध्ये विसंगती आहेत, पण ती आपण प्रमाण मानत नाही. म्हणजेच अशास्त्रीय पद्धती काहींना प्रमाण वाटतात तसेच शास्त्रीय पद्धतीसुद्धा काहींना अप्रमाण वाटतात. म्हणजेच प्रामाण्य कायम बदलत राहते. मुळात प्रमाण काय मानायचे हा प्रश्न आहे. प्रामाण्य शब्द अधिकारशाहीकडे जाणारा आहे. साधनांकडे पाहायच्या पद्धती महत्त्वाच्या. प्रमाण मानणे हा व्यक्तिगत मुद्दा आहे.

ज्ञानशाखांची आंतरशाखीयता वाढेल, तेवढे प्रामाण्यांचे निकष बदलत जातील. प्रामाण्य ही सैल बाब आहे. महाभारत हे स्मृतीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. व्यासांचे महाभारत आज मिळत नाही. पण खरोखर व्यासांचे महाभारत आज आपल्याला मिळाले तर ते आपण प्रमाण मानणार नाही. चिकित्सा करतो ती वेदांची. लोकसाहित्यापर्यंत आपण अजून गेलेलो नाही. आदिवासींच्या रामायण, महाभारतांची आपण दखल घेतलेली नाही. इतिहासाचा अभ्यास करताना द्वैत कायमच राहणार. पाठय़पुस्तके लिहिणाऱ्यास अनौपचारिक प्रशिक्षण मिळायला हवे. कृत्रिम प्रज्ञेमुळे भाषांचे आणि समाजातील जाणिवांचे अस्तित्व परिवर्तित होईल. ‘एआय’मुळे इतिहासात मोठे बदल होतील.

आत्मसन्मानाकडे नेणारा मार्ग

प्रदीप कोकरे

माझ्यात लिहिण्याची प्रेरणा ही अर्थातच साठोत्तरी साहित्याच्या वाचनानेच निर्माण झाली असावी. त्या साहित्याशी वाचक म्हणून जुळवून घेता आलेच, शिवाय आपल्याकडेही असे काहीतरी सांगण्यासारखे आहे हेही त्यादरम्यान गवसले. सुरुवात अर्थातच कवितेपासून झाली. पण मी जे काही शोधत होतो त्याचा आवाका कवितेला पेलणारा नव्हता. कादंबरी अधिकचे काहीतरी मागत असते. म्हणून कादंबरीचा मार्ग स्वीकारला. याशिवाय आणखी एक प्रेरणा होती. आपल्याकडे चौकाचौकात डॉ. आंबेडकरांचे जे पुतळे दिसतात. त्यात बाबासाहेब बोट उगारून दिशा दाखवताना दिसतात. मला स्वत:ला तो आत्मसन्मानाकडे नेणारा मार्ग वाटतो. ती केवळ एक दिशा किंवा मार्ग नाही. माणूसपण जिथे नाकारले गेले आहे अशा माणसांना माणूस म्हणून जी ओळख मिळवण्यासाठी धडपड करायची आहे अशा असंख्य माणसांसाठी ते बोट प्रेरणास्रोत आहे. जोतिबा फुलेंच्या विचारांनी तो मार्ग दृढ केला. हा आधार मी प्रेरणा समजतो. अक्षरे गिरवायला सुरुवात केली ती या प्रेरणेनेच. लेखकाने रिअ‍ॅक्शनरी असू नये. काय घडतेय, घडवले जातेय याची कठोर आणि तटस्थपणे चिकित्सा त्याने करावी. मते प्रदर्शित करायची घाई त्याला असू नये किंवा आत्ता हे घडलेय तर त्यावर तुम्हाला काय वाटते, असा अट्टहासही नको त्याच्यामागे. चकित्सा वेळ मागते. कथात्म साहित्यही अशा संयमाची मागणी करते.

माणसाची कोंडी मांडतो

पवन नालट

‘मी संदर्भ पोखरतोय’कवितासंग्रह येण्यापूर्वीसुद्धा मी अनेक वर्षे लिहितच होतो, पण साहित्य अकादमी युवा पुरस्कार मिळाल्यानंतर एक प्रकारची समाजमान्यता मिळाली. पण त्याबरोबरच आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक अनुभवाशी अधिक प्रामाणिक राहून लेखन करण्याची जबाबदारी वाढली. या पुरस्कारानंतर चाणाक्ष वाचक पुस्तकाकडे आवर्जून वळले हे मला अधिक जाणवले. मी मुख्यत: कवितांमध्ये सामाजिक, राजकीय विचारमंथन अधिक केले, जे मला निर्भीडपणे, कवितांचा सर्जनात्मक आत्मा जपत लिहिणे महत्त्वाचे वाटते. एकदा मी रस्त्याच्या कडेला उभा होतो आणि तिथून कुण्या नेत्याचा ताफा वेगाने गेला. त्याची धूळ चेहऱ्यावर उडाली. मला वाटते ती धूळ माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या चेहऱ्यावर नव्हे तर लोकशाहीच्या चेहऱ्यावर उडालेली धूळ आहे. मी सामान्य माणसाची होणारी कोंडीच मांडत असतो. मला हे मिळाले नाही आणि ते मिळाले नाही, अभाव मला कधीच जाणवला नाही अभावातसुद्धा श्रीमंती असते. त्या श्रीमंतीच्या सकारात्मकतेने माणूस अधिक जिवंत जगतो असे मी मानतो.

कायम शोधत रहावे

प्रणव सखदेव

साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार हा तरुणांना दिला जातो तो प्रोत्साहनाकरिता. त्यामुळे हा पुरस्कार मिळाल्यावर निश्चितच आनंद झाला आणि जबाबदारी वाढली. कारण इथून पुढे आपल्याला आणखी काहीतरी जास्त काम करत राहिले पाहिजे, याची जाणीव झाली. माझी ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ ही कादंबरी म्हणजे लहान उपनगरातून मोठय़ा शहरात आलेल्या तरुण प्रोटॅगनिस्टचा जगाकडे, नातेसंबंधांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे.

खरं तर कविता साहित्य प्रकार फार सोपा आहे असा समज पसरला आहे. पण तो सर्वात कठीण साहित्य प्रकार आहे. त्यासाठी संयमाची गरज असते. त्यात नेणीव आणि जाणीव या दोन्ही बलांचा रेटा असतो. अनुभवाकडे विविध प्रकारे पाहावे लागते आणि मग त्यातून कविता निर्माण होते. मला शोध घेणे महत्त्वाचे वाटते. एखादी घटना घडते तेव्हा त्या घटनेच्या आगेमागे अनेक घटना असतात. ती घटना सुटी नसते. म्हणजे एकाच वेळी अनेक वास्तव कार्यरत असतात, जी मला माहीत नसतात. त्यांचा शोध घेणे आणि त्यातून समजलेले तुकडय़ातुकडय़ांचे वास्तव समजून घेऊन त्याची कथा-कादंबरी तयार करणे हे मला लेखक म्हणून माझे काम वाटते. आजचा काळ लेखनाला पोषक आहे, पण आव्हानात्मकही आहे.
कवितेचे गाणे करणे सोपे नाही..

समीर सामंत

कवी जेव्हा कविता लिहितो तेव्हा ती केवळ त्याची असते. गीत जेव्हा लिहिले जाते तेव्हा ते गायक, संगीतकार, गीतकार या सर्वाचे असते. गीतलेखन करताना त्याचे गाणे होणार आहेत हे लक्षात घेऊनच ते लिहिले जाते. कवितेचे गाणे करणे तितके सोपे नाही. कविता आणि गाणे या दोन वेगळय़ा गोष्टी आहेत. त्यामुळे कवितेचे गीत करणे तितके सोपे नाही.

तंत्र पाळणे आवश्यक..

मंदार चोळकर

गीतलेखन करताना अनेक गोष्टी नियंत्रित ठेवाव्या लागतात. गीतलेखन करताना काही गोष्टी जाणूनबुजून कराव्या लागतात. प्रसंगानुरूप गीत रचावे लागते. यातले तंत्र पाळावे लागते. अनेक गोष्टी ठरवून कराव्या लागतात. कवितेचे मात्र तसे नाही. ती टप्प्यावर भेटत जाते. ती कशी सुचावी, कधी सुचावी याचे तिला बंधन नाही. कवितेची सुरुवात करणे सहज शक्य होते, परंतु ती ज्याला लिहून संपवता येते तो कवी..

गाण्यात कविता असतेच असे नाही..

अश्विनी शेंडे

सुरुवातीला माझी अशी धारणा होती की, कविता आणि गाणी या दोन वेगळय़ा गोष्टी आहेत. कुठल्याही कवितेला चाल लावता येऊ शकते. त्याचे उत्तम गाणे करता येते. त्यामुळे कवितेचे सहज गाणे होऊ शकते, परंतु प्रत्येक गाण्यात कविता असतेच असे नाही.