|| वर्षां गजेंद्रगडकर

काळ कुठलाही असो, आपल्या आतली ज्योत सांभाळत उजेडाच्या दिशेनं चालत राहणं बहुसंख्य स्त्रियांना अवघडच असतं. पण अनेक जणी घर आणि स्वतची आवड या दोन्ही गोष्टी सांभाळत आपल्यापुरतं एक लहानसं अवकाश निर्माण करतात आणि ‘जर-तर’मध्ये स्वतला न अडकवता, मिळालेल्या यशाचा आनंद मनपूत अनुभवत राहतात. प्रसिद्ध गायिका अनुराधा मराठे यांचं ‘स्वरानुराधा’ हे आत्मकथन याचाच प्रत्यय देणारं आहे.

धुळ्यामध्ये एका मध्यम परिस्थितीतल्या कुटुंबातला अनुराधाबाईंचा जन्म. पण घरात श्रीमंती होती ती सुख-समाधानाची. शिवाय नाटक व संगीतासारख्या कला आणि क्रीडाप्रेम त्यांच्या सगळ्या घरातच रुजलेलं होतं. अशा कलासक्त कुटुंबातून त्या पुण्यात लग्न करून आल्या ते मात्र संगीताचा गंध नसलेल्या घरात. माणसं अतिशय प्रेमळ, नाती जपणारी; पण मध्यमवर्गीय विचारांच्या व वृत्तीच्या कुटुंबात असतात तशा मर्यादा, बंधनं आणि जबाबदाऱ्या होत्याच. लग्नाआधी जपलेला, वाढविलेला गाण्याचा कोंब सुकून जाण्याचीच शक्यता जास्त होती. परंतु अनुराधाबाईंना त्यांची कलाच स्वस्थ बसू देत नव्हती. सुरुवातीला सुगम संगीत आणि शास्त्रीय संगीत अशा दुहेरी वाटेवरून चालताना शास्त्रीय संगीताच्या रियाजाला मात्र पुढे वेळ मिळेना. त्यामुळे सुगम संगीताचं बोट धरून अनुराधाबाई चालत राहिल्या आणि त्यानंच त्यांचा प्रवास सुंदर केला.

जवळपास एक हजाराहून अधिक रंगमंचीय कार्यक्रमांनी अनुराधाबाईंची कारकीर्द घडवली आहे. शिवाय आकाशवाणी, अभिवाचन यांसारख्या इतर व्यासपीठांवरही त्या गायल्या आहेत. लग्नानंतर सुटलेली अभिनयाची सोबत पुन्हा अचानक सामोरी आल्यावर तिचं बोट त्यांनी पुन्हा सहजपणे धरलं आहे. या वाटचालीत गजानन वाटवे, बाबूजी, यशवंत देव, मंगेशकर भावंडं यांसारख्या ज्येष्ठ प्रतिभावंतांपासून चतन्य कुंटे, श्रीपाद उंब्रेकर यांसारख्या तरुण कलाकारांपर्यंत अनेकांचा सहवास त्यांना लाभला आहे आणि या सगळ्या अनुभवांनी त्यांना समृद्ध केलं आहे.

आवड आणि क्षमता असूनही शास्त्रीय संगीताची वाट चोखाळता न आल्याचं दुख त्यांनी कधीच केलं नाही. उलट मिळालेल्या संधींमधून स्वतचं स्थान निर्माण करताना, अनुराधाबाईंनी संसारातल्या जबाबदाऱ्याही प्रेमाने निभावल्या. मध्यमवर्गीय कुटुंबातली नाती जशी त्यांनी सांभाळली तसे स्वागतशील आणि आस्वादक वृत्तीमुळे संगीताचे नवे प्रवाहही त्यांनी आपलेसे केले. अनुराधाबाईंच्या या सगळ्या आत्मकथनाचं वैशिष्टय़ म्हणजे त्यांनी कुठेच दुखाचा, निराशेचा, कडवटपणाचा सूर आळवलेला नाही. जे निसटलं, त्याची खंत न करता; जे मिळालं, त्याविषयीचं उत्कट समाधान व्यक्त करणाऱ्या अनुराधाबाईंनी आयुष्याकडे, सहवासातल्या सगळ्याच माणसांकडे समंजस दृष्टीनं पाहिलं आहे. मोठय़ा मानसन्मानांची अपेक्षा न धरता कलेच्या क्षेत्रात रमता आल्याचा आनंद हेच मोठं यश मानून त्या आपल्या वाटेनं शांतपणे चालत राहिल्या आहेत.

स्वरांच्या सोबतीने झालेला अनुराधाबाईंचा हा प्रवास आजही अनेकींना बळ देणारा आहे. घर सांभाळून आपलं लहानसं, प्रसन्न अवकाश निर्माण करता येतं, हा विश्वास हे पुस्तक वाचून अनेकींना मिळू शकतो, ही या आत्मकथनाची जमेची बाजू!

‘स्वरानुराधा’- अनुराधा मराठे,

अनुबंध प्रकाशन, पुणे,

पृष्ठे – २६४, मूल्य – ३६० रुपये