प्रा. मं. गो. राजाध्यक्ष rajapost@gmail. com

प्रा. नंदा देशपांडे हा माझा जे. जे.मधला सहाध्यायी. निरनिराळय़ा काडय़ापेटय़ांचा संग्रह करणे हा त्याचा आवडता  छंद. एक दिवस त्याने मला सांगितले की, त्याच्या भावाने स्वाक्षऱ्यांचे एक प्रदर्शन दादरच्या बालमोहन शाळेत भरविले आहे व ते पाहण्यासाठी नंदा मला सांगत होता. त्याचा भाऊ विजय हा एअर इंडियात होता व त्याला मोठमोठय़ा लोकांच्या सह्य गोळा करण्याचा छंद आहे याची जुजबी माहिती मला होती; पण प्रदर्शन भरविण्याप्रत त्याने किती स्वाक्षऱ्या जमविल्या आहेत याची मात्र माहिती अजिबात नव्हती. दुसऱ्याच दिवशी मी बालमोहनमध्ये गेलो अन् प्रदर्शनाची जागा शोधू लागलो, तर चक्क चार वर्ग भरून सह्यंची मांडणी केली होती आणि सह्य कोणाच्या? तर ज्या लोकांची नुसती नावे जरी घेतली तरी मस्तक आदराने झुकावे अशांच्या! त्यामध्ये स्वा. सावरकर होते, धोंडो केशव कर्वे होते, जयप्रकाश नारायण होते, मदर तेरेसा होत्या, सर्व मंगेशकर कुटुंबीय, जनरल माणेकशा, देव आनंद, राज कपूर, नर्गिस व सुनील दत्त, दिलीपकुमार, फुटबॉलसम्राट पेले, जे. आर. डी. टाटा, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, पतोडी, पॉली उम्रीगर असे सर्वच होते. अगदी चंद्रावर पहिले पाऊल टाकणारा नील आर्मस्ट्राँगदेखील होता. जगातील कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीचे नाव घ्या, विजयच्या पंक्तीला ती हजर होती आणि हे सर्व पाहून विजयप्रति मीच खुद्द नतमस्तक झालो. पैसे खर्चून अतक्र्य गोष्टी जमविणारे, त्यांचा संग्रह करणारे मी अनेक छंदी पाहिले आहेत; पण स्वत: एकेक जगप्रसिद्ध व्यक्तीला भेटून, त्यांना मनवून, त्यांची स्वाक्षरी मिळविणारा एकमेव विजय त्या दिवशी मी सर्वार्थाने पाहिला. अर्थात त्या दिवशी विजयशी माझी भेट झाली नाही; पण घरी आल्यानंतर मी विजयला फोन केला आणि माझी ओळख देऊन मला ते प्रदर्शन त्याच्या सान्निध्यात पुन्हा पाहायची इच्छा व्यक्त केली; आणि दुसऱ्याच दिवशी मी तेथे जाताच खुद्द विजय स्वागताला हजर होता. नंतर त्याने मला या सर्व स्वाक्षऱ्या कशा प्रकारे गोळा केल्या, काही वेळा अडचणीही आल्या, त्यातून कसा निभावलो याची वर्णने ऐकविली. म्हणजे विजय सांगत होता आणि मी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो.

Kangana Ranaut Vikramaditya Singh Himachal Pradesh Mandi Loksabha Election 2024
Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट
loksabha election 2024 Priority is given to local issues in the campaign in Marathwada
मराठवाड्यातील प्रचारात स्थानिक मुद्द्यांनाच प्राधान्य
Sangli, Vishal Patil, vishal patil sangli,
सांगलीची जागा कॉंग्रेसलाच मिळेल, विशाल पाटलांचा विश्वास; खासदार संजयकाका पाटलांना मैदानात येण्याचे आव्हान
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : वंचित नव्हे, मविआच भाजपची ‘बी टीम’?

मुळात विजय देशपांडे दादरचे रहिवासी. अनेक सांस्कृतिक उपक्रमांचे माहेरघर अशा या दादरमध्ये अनेक लोकोत्तर व्यक्तीही राहत असत. एका दुपारी विजय शिवाजी पार्कवर एक क्रिकेट मॅच पाहायला गेला असता त्याच्याकडील वही-पेन मागून घेऊन एक वृद्ध गृहस्थ जिमखान्याच्या आत गेले आणि काही वेळातच बाहेर आले ते अनेक प्रसिद्ध अशा खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेऊन. तेव्हा विजयनेही जिमखान्यात जाऊन काही खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. त्यापैकी पहिले होते संदीप पाटील यांचे वडील एम. एस.पाटील. आणि येथून सुरू झाला विजयचा स्वाक्षरी संग्रहाचा प्रवास. वडील संगीतप्रेमी असल्याने घरी अनेक शास्त्रीय संगीतकारांची ऊठबस असे. त्यामध्ये राम मराठे, पं. सुरेश तळवलकर असे विविध कलावंत असत. त्यामुळे त्यांच्यासोबत पं. भीमसेन जोशी, उस्ताद बडे गुलाम अली खान, पं. हरिप्रसाद चौरसिया अशांच्या मैफिली ऐकायला मिळाल्या. त्याचसोबत स्वाक्षऱ्यांचा संग्रहदेखील वाढू लागला. याच सुमारास संयुक्त महाराष्ट्र चळवळीने जोर धरला होता. शिवाजी पार्कवर अनेक दिग्गज नेत्यांची व्याख्यानांच्या निमित्ताने वर्णी लागत होती. आचार्य अत्रे, कॉ. डांगे, अरुणा असफअली, जॉर्ज फर्नाडिस, एस. एम. जोशी अशा तोलामोलाच्या नेत्यांची नेहमीच भाषणे होत असत. त्या वेळी स्टेजच्या पाठीशी जाऊन विजय उभा राहत असे अन् स्वाक्षरीसाठी त्यांना गाठत असे. त्यानंतर ‘अमर हिंद व्याख्यानमाला ही विजयला स्वाक्षरी संग्रहासाठी मोठीच पर्वणी असे. त्यात वि. स. खांडेकर, न. र. फाटक, ना. सी. फडके, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, वि. आ. बुवा, वसंत बापट यांसारख्या कवी, साहित्यिकांनी विजयच्या स्वाक्षरी संग्रहात जागा मिळविली.

स्वाक्षरी मिळविण्यात विजयला जसे यश मिळत गेले, तसेच काही वेळा मनस्तापही सोसावा लागला. भारताचे तत्कालीन अर्थमंत्री डॉ. चिंतामणराव देशमुख हे कधीच कोणाला स्वाक्षरी देत नसत. त्यांच्या एका भाषणाच्या वेळी विजयने त्यांना गाठले. स्वाक्षरीसाठी विनंती करताच त्यांनी स्पष्ट नकार दिला. असे अनेक प्रयत्न विजयने केले; पण नेहमीचाच नकार मिळत गेला. एक दिवस विजयला कळले की, डॉ. देशमुख चर्चगेटच्या अ‍ॅम्बॅसॅडर हॉटेलमध्ये भोजनास येणार आहेत. विजयने आधीच जाऊन तेथे वर्णी लावली; पण नेहमीचीच नकारघंटा मिळाली. पुढचे दोन-तीन तास विजयाने खाली उतरून चक्क भटकण्यात घालविले. चिंतामणराव लिफ्टमधून बाहेर पडले, तेव्हा पुन्हा विनंती- आर्जवे सुरू केली. आतापर्यंत ते विजयला ओळखू लागले होते. त्यांनी वही मागितली, खिशातून आपले पार्करचे सोनेरी पेन काढले आणि चक्क त्यांनी स्वाक्षरी केली. रिझव्‍‌र्ह बॅंकेचे  गव्हर्नर असताना त्यांची नोटांवर सही असे. विजयने तोच आनंद त्या दिवशी मिळविला.

असेच एकदा नकळत विजयच्या हाती अचानक मोठे घबाड लागले. विजय हा क्रिकेटप्रेमी. क्रिकेट हा त्याचा धर्म होता. शिवाजी पार्कवरील प्रत्येक सामन्याला तो हजेरी लावीत असे. क्रिकेटमधील जेवढी माहिती आणि ओळख त्याला होती तेवढी इतर खेळांविषयी नव्हती. फुटबॉल या खेळाविषयी त्याचे ज्ञान म्हणजे पायाने मारायचा बॉल म्हणजे फुटबॉल एवढीच त्या खेळाविषयी त्याची माहिती होती. विजय एअर इंडियामध्ये नोकरीला होता. एकदा तो तिकीट आरक्षण खात्यात काम करत असताना त्याच्या मित्राने त्याच्या हातात आलेला एक टेलेक्स दिला. त्यात एका पॅसेंजरची माहिती होती. त्याखाली त्याचे नाव होते. सुप्रसिद्ध फुटबॉल खेळाडू  एडसन अरांतूस द पेले. विजयला फुटबॉलमध्ये रस नसल्याने त्यातील खेळाडू कोण याबद्दल त्याला विशेष माहिती नव्हती; पण त्याच्या मित्राला विजयचे सह्य मिळवायचे वेड माहीत होते; व एवढय़ा मोठय़ा व्यक्तीची सही त्याला मिळावी याच हेतूने त्याने त्याची माहिती दिली होती. २५ जानेवारी १९७६ची ही गोष्ट होती. त्या रात्री पेले विमानतळाजवळील सेंटॉर हॉटेलमध्ये राहणार होते आणि दुसऱ्या दिवशी २६ तारखेला जाणार होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता विजयने पेले यांच्या रूमचा दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडला आणि एक अर्धवट झोपेतील काळसर वर्णाचा बांधेसूद शरीरयष्टीचा गृहस्थ समोर उभा होता. बिलकूल न रागावता त्याने आपले डोळे चोळले. विजयने त्यांना सही देण्याविषयी विनंती केली. एवढय़ात त्यांचे मॅनेजर आले व ते विजयला म्हणाले, ‘‘आता ते झोपेत आहेत. ते ९ वाजता प्रस्थानद्वाराकडे असतील त्या वेळी तुम्ही त्यांची सही घ्या.’’ बरोबर ९.१० ला सेंटॉरचा कोच पेलेंना घेऊन विमानतळावर आला. तेथील सर्व सोपस्कार आटोपल्यावर विजयने तेथेच रेंगाळणाऱ्या एका फोटोग्राफरला पकडून त्याला काही फोटो घेण्याची विनंती केली आणि त्याने पेले यांची भेट घेतली. पेलेंनी विजयला सही तर दिलीच, शिवाय कॉफी पाजली व निघताना शेकहॅंड केला. सही मिळवून विजय आला व दोन दिवसांनी आपण किती मोठा पराक्रम केला आहे याची पेलेंविषयी माहिती घेतल्यावर विजयला समजले.

हाच प्रसंग विजयवर अंतराळवीर युरी गॅगारीन याच्या मुंबईभेटीच्या वेळी घडला. विजय सतत आपणासोबत आपली स्वाक्षरी वही बाळगत असे आणि रस्त्यावर सिग्नलला गॅगारीनची गाडी थांबलेली त्याने पाहिली व धावत जाऊन आपली वही आत सारण्याचा प्रयत्न केला. एवढय़ात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांचा दंडुका हातावर बसला आणि त्याची वही खाली पडली. तितक्यात हिरवा सिग्नल मिळून गाडी निघून गेली आणि विजयची संधीही हुकली. एकदा भारतरत्न डॉ. पां. वा. काणे यांना विजयने पत्र लिहून स्वाक्षरी पाठविण्याची विनंती केली. त्यावर डॉ. काणे यांनी विजयला लिहिले की, ‘स्वाक्षरी घेणे अशा प्रकारच्या गोष्टी या पाश्चात्त्य कल्पना असल्याने मी कधी कोणाला स्वाक्षरी वगैरे देत नाही,’ आणि पत्राचा समारोप करताना त्यांनी खाली आपली स्वाक्षरी केली होती आणि विजयचे ईप्सित साध्य झाले.

विजयने देशविदेशातील अनेक महनीय व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या मिळविल्या. काही वेळा त्याला धारिष्टय़देखील करावे लागले आहे. एकदा क्लाइव्ह लॉइडचा वेस्ट इंडिजचा संघ परत जाताना लंडनहून मुंबईमार्गे सिडनीला जाणार होता. त्या वेळी ‘स्पोर्ट्स स्टार’ या साप्ताहिकामधील डबल स्प्रेडवर संपूर्ण टीमचा मोठा रंगीत फोटो छापला होता आणि विजयला त्यांच्याच छायाचित्रावर त्यांच्या स्वाक्षऱ्या घ्यायच्या होत्या. मुंबईत काही वेळच दुसऱ्या विमानात बसण्यासाठी त्यांना मिळणार होता. येथे विजयला एअर इंडियात काम करत असल्याचा फायदा झाला. त्याचे स्वाक्षरी वेड माहीत असल्याने कस्टम अधिकाऱ्यांनी थोडा वेळ त्याला आत सोडले. थोडय़ाच वेळात लंडनहून खेळाडूंना घेऊन विमान आले. पुढील प्रवासाचे विमान जवळच उभे होते.  सिडनीच्या विमानात एकेक खेळाडू चढला. पाठोपाठ विजयही आत गेला आणि कर्णधार लॉइडपासून कालिचरण, मार्शल आदी सर्वाच्या स्वाक्षऱ्या आणि त्याही त्यांच्या छायाचित्रांवर आणि वहीत घेण्याचा विक्रम विजयने केला.. हे सर्व मी अचंबित होऊन विजयकडून ऐकत होतो. मी त्याला एकच गोष्ट सांगितली ती म्हणजे, एवढय़ा या अनमोल अशा ‘स्वाक्षरी संग्रहाची’ मांडणी- तीही तशीच देखणी असती तर दुधात साखर झाली असती. त्याचा भाऊ नंदा हा उपयोजित कलाकार. त्याचीही मदत झाली असती. रात्री मी घरी आलो. एखाद्या वेडाने झपाटलेला माणूस काय करू शकतो याचे ढळढळीत उदाहरण माझ्या डोळय़ासमोर होते. विजय जेव्हा एअर इंडियामध्ये मुलाखतीसाठी गेला होता त्या वेळी त्याने आपला स्वाक्षरी संग्रह सोबत नेला होता. तो पाहिल्यावर मुलाखत घेणाऱ्या सदस्यावर इतकी छाप पडली की, त्यांनी तात्काळ विजयला नेमणुकीचे पत्र दिले.

विजयच्या स्वाक्षऱ्यांची ठिकठिकाणी प्रदर्शने झाली. त्याच्या मुलाखती झाल्या. त्याच्याइतका मौल्यवान संग्रह कोणाचाच नव्हता. ‘लिम्का बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्ड’मध्ये विजयची विक्रमी नोंद झाली. मध्यंतरीच्या काळात त्याने स्वत:च्या ‘स्वाक्षरी संग्रहा’चे प्रसिद्ध केलेले पुस्तक मला पाठविले. सह्यंच्या बाबतीत विजय ‘विक्रमादित्य’ ठरला. त्यानंतर मात्र मला विजयबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. एक दिवस ‘ऑटोग्राफ कलेक्टर्स क्लब ऑफ इंडिया’च्या पेजवरून २८ जानेवारी २०१७ रोजी विजय नावाचा विक्रमादित्य नाहीसा झाल्याचे मला कळले. काही माणसे जातात त्यांना उगीच आपण गेलो असे म्हणतो, कारण त्यांनी एखाद्या ध्येयाच्या मागे वेडय़ासारखे लागून एवढे प्रचंड कार्य केलेले असते की, त्या रूपाने ही माणसे नेहमीच शाश्वत असतात, चिरंजीव असतात!