स्नेहचित्रांतील जवळपास सर्वच लेखांना वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला. पण गोविंदरावांवरच्या ‘लिप्त-अलिप्त’वर आलेल्या प्रतिक्रियांचा आकार यापेक्षा वेगळा होता. त्यातील अनेकांनी ‘शब्दमर्यादेमुळे लेख आवरता घेतलात, आणखी एक तरी लेख त्यांच्यावर हवा,’ अशी आग्रही सूचना केली. एका निवृत्त आणि आता तर दिवंगतही संपादकाविषयी अजूनही अनेकांना वाटत असलेलं हे कुतूहल विलोभनीय म्हणावं असं ! आशादायी आणि तितकंच आश्वासकही !! या भावनांचा आदर करून वाचकाग्रहास्तव गोविंदरावांच्या अन्य काही आठवणींचं हे आणखी एक स्नेहचित्र!
अनेक प्रसंग आहेत. यातले हे दोन सांगायलाच हवेत असे
यातला पहिला प्रसंग आहे १९८८ सालचा. राजीव गांधी यांच्या काळात माध्यमांची गळचेपी करणारं विधेयक मांडलं गेलं त्यावेळचा. ‘डिफेमेशन बिल १९८८’. राक्षसी बहुमत होतं त्यांच्याकडे त्यावेळी. त्यामुळे त्या विधेयकाला संसदेत विरोध होण्याचा कोणाकडून प्रश्नच नव्हता. राजीव गांधींना पंतप्रधानपदी येऊन चार वर्षं होऊन गेलेली. विश्वनाथ प्रताप सिंग वगैरे मंडळी त्यांच्या राजकीय स्थैर्यावर धडका देऊ लागलेली आणि माध्यमांनी त्यांना जेरीस आणलेलं, त्यामुळे कावलेल्या राजीव गांधी यांच्याकडून हा निर्णय घेतला गेला असणार.

पत्रकारितेसाठी हा मोठा धामधुमीचा आणि खूप काही शिकवून जाणारा काळ. गोविंदराव तळवलकरांच्या लिखाणाच्या प्रेमात पडून माझ्यासारखे आणखीही काही पत्रकारितेत आलेले. पुण्याला ‘रानडे इन्स्टिट्यूट’ला पत्रकारिता शिकत असताना मी तर उमेदवारीही ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये केलेली. त्यावेळी दिनकर गांगल रविवारच्या आवृत्तीचं काम पाहायचे. त्यांनी एक लेख माझ्याकडून लिहून घेतला. राजीव गांधी यांनी भरवलेलं ‘एशियाड’ नुकतंच संपलेलं आणि त्यासाठी विकत घेतलेल्या बसगाड्या नंतर महाराष्ट्र सरकारने घेतल्या. मुंबई-पुणे मार्गावर त्या नव्या कोऱ्या हिरव्या-पिवळ्या बसगाड्या मोठ्या झोकात धावत होत्या. गांगलांनी सांगितलं त्यावर लेख कर. मी दादरचा एशियाड स्टँड गाठला आणि ‘एशियाड’नं पुण्यापर्यंत प्रवास करून त्यावर काही लिहून दिलं गांगलांकडे.

डेक्कन क्वीन परवडत नाही आणि लाल एसटी (तेव्हा तिची ‘परी’ व्हायची होती.) नको वाटते असा नवमध्यमवर्ग कसा ‘एशियाड’कडे आकृष्ट झालाय अशी मांडणी. गांगलांनी तो लेख चमकदार केला आणि रविवारच्या ‘मटा’त ‘नवी एशियाड संस्कृती’ अशा शीर्षकानं तो छापला. गोविंदरावांच्या ‘मटा’त पान एकला आपला लेख आलाय… आता काय शिकायची राहिलीये पत्रकारिता असं मला झालं. ‘इंटर्नशिप’ संपली तरी मी आपला ‘मटा’त. शेवटी‘रानडे इन्स्टिट्यूट’चे तेव्हाचे प्रमुख प्र. ना. परांजपे यांनी गोविंदरावांना पत्र लिहिलं आणि ‘मला परत पाठवा’ असं त्यांना कळवलं. मी पुन्हा पुण्यात. ‘तरुण भारत’, ‘मुंबई सकाळ’ वगैरेंची चव घेऊन काही वर्षांनी पुन्हा ‘मटा’ असा तो प्रवास. लागलो त्या दिवशी गोविंदराव म्हणाले, ‘‘तिसऱ्या मजल्याचं लक्ष्य ठेवा.’’ (गोविंदराव सगळ्यांना- मग तो कितीही कनिष्ठ असला तरी- अहोजाहो करायचे.) ‘टाइम्स’ इमारतीत त्यावेळी ‘द टाइम्स ऑफ इंडिया’, ‘द इकॉनॉमिक टाइम्स’ची कार्यालयं तिसऱ्या मजल्यावर होती. म्हणजे इंग्रजी पत्रकारितेत जायचंय हे डोक्यात ठेवा, असा गोविंदरावांच्या म्हणण्याचा अर्थ. पहिल्याच दिवशी ‘इथे राहू नका’ हा त्यांचा सल्ला. तो पाळायचा होताच. पण तोपर्यंत तिथं राहून बरंच काही शिकायचं होतं.

राजीव गांधी यांचं माध्यमांची मुस्कटदाबी करणारं विधेयक हा त्यातला एक धडा. या विधेयकाविरोधात देशभर क्षोभ उसळला. जवळपास शंभरहून अधिक ठिकाणी पत्रकारांची निदर्शनं वगैरे झाली. मोर्चे निघाले. ‘आणीबाणी’ची खंत मनात असल्यामुळेही असेल; पण गोविंदरावांनी राजीव गांधी यांची सालटी काढायला सुरुवात केलेली. ‘टाइम्स’मध्ये गिरीलाल जैन, आर. के. लक्ष्मण आणि इकडे गोविंदराव… दुपारी लक्ष्मण हे गोविंदरावांकडे यायचे. त्यांना पाहून बोलायला जावं असं वाटायचं, पण धीर व्हायचा नाही. त्या सगळ्या काळात पत्रकारितेत मोठी धामधूम होती. एक दिवस बंद पाळला वर्तमानपत्रांनी. त्या दिवशी मुंबईत मोर्चा निघाला. लक्ष्मण, निखिल चक्रवर्ती, खुशवंत सिंग, कुलदीप नय्यर वगैरे नेतृत्व करत होते मोर्चाचं. गोविंदरावांना निमंत्रण द्यायला ते आल्याचं आठवतंय कार्यालयात.

नंतर अवघ्या काही दिवसांनी संध्याकाळी कार्यालयातनं निघताना गोविंदराव चीफ-सबच्या टेबलकडे आले. ते तसे आले की एखाद्या यू-क्लीपचा बळी ठरलेला. ती अर्धी सरळ करून ते कान कोरत बोलायचे. ते टेबलापाशी आले की आम्ही कनिष्ठ मंडळी सावरून बसायचो. चीफ-सबशी ते काही बोलले आणि जाताना म्हणाले, ‘‘आज राजीव गांधी आपलं विधेयक मागे घेतील… बातमीकडे लक्ष ठेवा.’’

आणि खरोखरच तशी बातमी आली. राजीव गांधींनी माध्यमांसाठीचं ते काळं विधेयक मागे घेतलं. माझ्या डोक्यात भुंगा. गोविंदरावांना हे सांगितलं कोणी? वास्तविक त्यावेळी ज्येष्ठांनी तुडुंब भरलेल्या ‘मटा’त मी आणि आणखी दोघे-तिघे एकदम दुर्री होतो. सगळ्यात कनिष्ठ. पण एका गोष्टीनं आमच्या गटाला या ज्येष्ठांच्या चळतीला वळसा घालून गोविंदरावांशी थेट संधान बांधता आलं. ती गोष्ट म्हणजे संगणक. तेव्हा पत्रकारांनी संगणक वापरून आपला मजकूर आपणच जुळवावा की नाही, यावर घनघोर चर्चा झडत होत्या. आम्ही नव्या दमाची मंडळी संगणक साक्षर होतो, पण ज्येष्ठांचा त्यास विरोध. ‘‘आपण काय ऑपरेटर व्हायचं का?’’ हा या ज्येष्ठांचा प्रश्न. जोरदार युनियनबाजी सुरू होती त्यावरनं. अगदी संप वगैरेही झाले. आम्ही तरुण मंडळी ज्येष्ठांच्या मते ‘ऑपरेटर’. आणि कौतुकाची बाब म्हणजे या सगळ्यातले ज्येष्ठतम गोविंदराव हे संगणकवाल्या आमच्या पक्षात. ते संगणक वापरायला लागले. एक एक बोटानं ‘इथे इथे बैस रे मोरा’ सारखं अग्रलेख स्वत:च टाइप करणं शिकू लागले. हा ‘विंडोज्’च्या आधीचा काळ. करड्या संगणक पडद्यावर फ्लुरोसंट हिरव्या रंगातल्या ‘डॉस’वर काम करायला लागायचं. मोठ्या फ्लॉपी डिस्कवर ते सेव्ह करायचं. ते करताना प्रत्येकासाठी स्वतंत्र कमांड द्यायला लागायची. ते आदेश काही गोविंदरावांच्या लक्षात राहायचे नाहीत. आणि मधेच लिहिता लिहिता मजकूर गायब व्हायचा. मग ते घाईत केबिनबाहेर यायचे. ‘मजकूर उडाला…’ असं सांगत. आम्हा तरुण वर्गाला ही मोठी संधी असायची. गोविंदरावांच्या केबिनमध्ये जायचं आणि संगणकावरचा हरवलेला मजकूर पुन्हा काढून द्यायचा. गोविंदराव मग विचारायचे… ‘‘हे कसं जमलं?’’ दररोज किमान एकदा तरी हा प्रकार व्हायचा. त्यामुळे एक झालं. आमची गोविंदरावांबाबतची भीड एकदम चेपली. ज्येष्ठ आपल्या आडमुठ्या विचारांत अडकलेले. संगणकांनं आमच्या पिढीला त्यामुळे गोविंदरावांच्या जवळ नेलं.

त्यामुळेच ‘‘राजीव गांधी हे विधेयक मागे घेतील हे तुम्हाला कसं कळलं?’’, हा प्रश्न विचारण्याची संधी मला मिळाली. हे विधेयक मागे घेतल्यानंतरच्या दिवशी माझी साप्ताहिक सुटी होती. पुढच्या आठवड्यात सकाळी ८.३०ची शिफ्ट. अग्रलेख लिहून झाला की गोविंदराव गुहेतनं बाहेर यायचे. डेस्कवर येऊन ‘‘काय विशेष?’’ हा त्यांचा प्रश्न. चीफ सब उत्तर द्यायचा. त्या दिवशी विषय तोच होता. राजीव गांधींचं हे विधेयक. ती संधी मी साधली आणि विचारलं, ‘‘तुम्हाला हे आधी कसं कळलं?’’

‘‘सुमन दुबेचा फोन होता.’’ सुमन दुबे विख्यात इंग्रजी पत्रकार. ‘इंडिया टुडे’चा माजी संपादक आणि राजीव गांधी यांचा माध्यम सल्लागार. इतक्या मोठ्या पत्रकारानं गोविंदरावांना हे स्वत: फोन करून सांगावं… मलाच धन्य वाटलं. याविषयी मी नंतर पुन्हा एकदा गोव्यात त्यांना विचारणार होतो.

*

दुसरा प्रसंग पुण्यात ‘टेल्को’मधल्या कुख्यात संपाचा. पुढच्याच वर्षीचा. १९८९ सालचा. राजन नायर या नव्या कामगार नेत्यानं या संपाच्यानिमित्तानं साऱ्या पुण्याला वेठीला धरलेलं. त्याची भयंकर दहशत होती. शनिवार वाड्यासमोर त्याचं धरणं आंदोलन सुरू होतं. महाराष्ट्र सरकार पार कावलं गेलं होतं त्यामुळे. राज्यातल्या औद्याोगिक वातावरणावर त्याचा परिणाम होत होता. या संपाची कोंडी फोडायची कशी याचं उत्तर कोणाला सापडत नव्हतं. मुख्यमंत्रीपदी होते शरद पवार. दिल्लीतनं काँग्रेसश्रेष्ठींकडनं या संपाबाबत त्यांच्याकडे विचारणा होत होती.

आणि त्या दिवशी संध्याकाळी पाचच्या सुमारास एक गोरीपान, उंच, सुटाबुटातली व्यक्ती गोविंदरावांना भेटायला आली. सगळ्या कार्यालयात एकच खळबळ. दाराशी सगळे जमले. आधी काही कोणाला माहिती नव्हतं- म्हणजे गोविंदरावांनी सांगितलेलंही नव्हतं- कोण येणार आहे ते. आणि जेव्हा सगळ्यांना कळलं साक्षात रतन टाटा हे जातीनं गोविंदरावांशी चर्चा करायला आलेत तेव्हा वातावरणात अशा संमिश्र भावना दाटून आल्या. साधारण अर्धा तासभर होते ते गोविंदरावांच्या केबिनमधे. निघाल्यावर गोविंदराव सोडायला गेले त्यांना लिफ्टपर्यंत. ते परत पुन्हा केबिनमधे. काय, कशाला आले होते ते वगैरे काही नाही. थोड्या वेळानं साडेसहाच्या आसपास निघाले गोविंदराव घरी जायला. शिरस्त्याप्रमाणे चीफ सबच्या टेबलपाशी आले. एका यू-क्लीपचा बळी घेतला. विशेष काय ते विचारलं. निघताना इतकंच म्हणाले… ‘‘आज रात्री टेल्कोचा संप मिटल्याची बातमी येईल. लक्ष ठेवा.’’

पण एडिशन जाईपर्यंत, म्हणजे रात्री पावणेबारापर्यंत वगैरे, अशी काही बातमी आली नाही. चीफ सबनं गोविंदरावांना फोन करून विचारलं, ‘‘काय करू?’’

‘‘बातमीसाठी एडिशन थांबवू नका… पानं पाठवून द्या. बातमी येईल.’’ गोविंदरावांचं उत्तर. लेट सिटी एडिशन गेली. त्यावेळी आम्ही मंडळी बऱ्याचदा ऑफिसमध्येच मुक्काम करायचो. रात्री गाणंबजावणं, कविता वगैरे कार्यक्रम. आणि पहाटे पहिल्या लोकलनं घरी असा परिपाठ. त्या दिवशी तसंच होतं. पण पहिल्या लोकलसाठी निघायच्या आत पहाटे साडेतीनच्या आसपास फोन खणखणला. न्यूजएजन्सीच्या घंटा वाजल्या. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर धरपकड केली… राजन नायरला ‘उचलला’ आणि संप मोडून काढला. गोविंदराव म्हणाले होते त्या प्रमाणे संप ‘मिटला’.

*

त्याच वर्षीच्या डिसेंबरात मी पहिल्यांदा गोव्याला गेलो. निवडणुका होत्या. आल्यानंतर बदली होऊन काही वर्षांसाठी तिकडे जाणार होतो. पण काही ना काही कारणानं जाणं लांबत होतं. मुख्य प्रश्न होता बायकोची बदली, सात-आठ महिन्यांची मुलगी आणि गोव्यात राहायची व्यवस्था. तिकडे घर बघायला वेळ जात होता. पण मधेच, १९९०च्या फेब्रुवारी महिन्यात ऑफिसमध्ये फोन आला. ‘‘गिरीश कुबेर आहेत का?’’ पहिल्यांदा आला तेव्हा मी यायचो होतो ऑफिसमध्ये. देवरूखकर म्हणून क्लार्क होते त्यांनी सांगितलं, ‘‘चार नंतर करा.’’ त्या प्रमाणे परत फोन आला. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातला कोणी कर्मचारी होता. मला कळेना फोन कशाला ते. तो म्हणाला, ‘‘तुम्हाला सरकारी क्वार्टर मंजूर झालीये; ताबा घ्यायला कधी येताय?’’

गोविंदराव कार्यालयात होते. त्यांच्या कानावर घातलं. ते म्हणाले, ‘‘हो… प्रतापसिंग राणेंचा गेल्या आठवड्यात फोन होता, विचारत होते तुमचा माणूस कधी येणार ते. त्यांना म्हटलं त्याच्या घराचा प्रश्न आहे. त्यांनी सरकारी क्वार्टर मंजूर केली.’’

पुढच्याच महिन्यात मी डोंबिवलीतलं चंबुगवाळं आवरून गोव्याला गेलो. महिन्याभरात बायकोचीही बदली झाली. शिवाजी सावंत म्हणून वृत्तसंपादक होते त्यावेळी. निघताना म्हणाले, ‘‘आता गोविंदराव अधिक निवांतपणे भेटतील… गोवा त्यांची आवडती जागा !’’

*

मग पुढच्या पाच-सहा वर्षांत गोविंदरावांच्या पुण्याईनं अनेक बैठकांचा साक्षीदार होता आलं. यातली प्रत्येक बैठक ही शास्त्रीय संगीताच्या एखाद्या बैठकीइतकी सुरेल आणि रसाळ.

एकदा तर असं झालं की, गोविंदराव असताना श्री. पु. भागवत व त्यांची पत्नी पणजीत होते. नुकतेच तात्यासाहेब (शिरवाडकर… त्याविषयी नंतर कधी स्वतंत्रपणे) येऊन गेलेले. ‘द गोवा हिंदु असोसिएशन’चे रामकृष्ण नायक, वसंतराव जोशी, तात्यासाहेब, पुलं वगैरेंनी फोंड्याजवळ ‘स्नेहमंदिर’चा घाट घातलेला. हे या सगळ्यांचं स्वप्न होतं. म्हटलं तर वृद्धाश्रम आणि तसं म्हणायचं नसेल तर थकल्या-भागल्यांचा ‘लागले नेत्र रे पैलतीरी’ अशा अवस्थेतला उरल्यासुरल्या आयुष्याचा मधुघट. तो उभारण्यासाठी हे सगळे आपली ताकद पणाला लावून प्रयत्न करत होते. त्यानिमित्तानं वारंवार त्यांचं येणं व्हायचं. गोविंदरावही तिथे असले की सगळे जमायचे.

मांडवी हॉटेलमध्ये गोविंदरावांची खोली ही बैठकीची ठरलेली जागा. मांडवीचा तेव्हाचा व्यवस्थापक आणि आताचाही मित्र सतीश कामत जातीनं बैठकीत काय हवं-नको ते पाहायला असायचा. गोविंदराव असले की ‘किसमूर’ हा पदार्थ ठरलेला. सुका बांगडा बारीक किसून/ चिरून, त्यात ओलं-खोबरं, कांद्या-पापडाचे बारीक तुकडे करून मिसळून एक प्रकारची केलेली कोरडी कोशिंबीर किंवा चटणी म्हणा हवं तर! खाताना ती कुरकुरीत लागायला हवी. म्हणजे ताजी ताजी बनवायची. तर त्या बैठकीत श्री-सौ श्रीपु, रामकृष्ण नायक, श्री-सौ सीताकांत लाड, वसंतराव, प्रभाकर आंग्ले आणि मोहनदास सुखटणकर असा सगळा गोतावळा जमलेला. नुसती बहार होती. तात्यासाहेबांचा ताजा दौरा. त्यामुळे गाडी त्यांच्या कवितेकडे वळली. वातावरणातल्या नशेला हातातल्या ग्लासमधला ओलावा मिळालेला. मग एकदम मोहनदास उभे राहिले आणि त्यांनी ‘ओळखलंत का सर मला… पावसात आला कोणी’ सुरू केली. त्यावेळी पहिल्यांदा ‘कणा’ नाट्यानुभावात ऐकली. ती इतकी परिणामकारक होती की अजूनही ती तशीच्या तशी लक्षात आहे. पाठ न करताच पाठ झाली. (पण त्याचा परिणाम असा की, आता अन्य कोणी ती सादर करायला लागलं की नकोसं होतं. असो.) मग तात्यासाहेबांचा गद्यावतार सादर झाला. या सगळ्यात सर्वात गप्प श्रीपु. मधेच एखादा ‘वा’. इतकंच.

त्यावेळी गोविंदरावांनी वसंत कानेटकरांवर काही टीकात्मक लिहिलं होतं. नायकांना राहवलं नाही. त्यांनी तो विषय काढला. गोविंदरावांना म्हणाले, ‘‘तुम्ही कानेटकरांवर फार अन्याय करता. वसंतराव आणि तात्यासाहेब दोघेही नाशिककर. नायक त्याचा संदर्भ देत म्हणाले, ‘‘नाशकात गेलात की तात्यासाहेबांना भेटता… कानेटकरांना नाही.’’ कानेटकर हेही ‘गोवा हिंदु’चे लेखक. गोविंदरावांनी मग कानेटकर आणि तात्यासाहेब यांच्यातला फरक उलगडून सांगितला. रामकृष्ण नायक यांचं तरी समाधान झालं नाही. ते तोच मुद्दा रेटू लागले. मग चर्चेत दोन तट. एकमेकांनी आपापल्या उताऱ्या केल्या. आणि मग गोविंदरावांनी हुकुमाचा एक्का वाटेल असं विधान केलं. खास त्यांच्या धारदार शैलीत. त्यावर श्रीपुंचा मोठ्ठा ‘वा’ फक्त कानावर आला. बाकी एकदम सुन्नशांतता. काही क्षण तसेच. मग रामकृष्ण नायक उठले आणि गोविंदरावांना मिठी मारून त्यांच्या गालाचा मुकाच घेतला त्यांनी. म्हणाले, ‘‘मानलं… विषय संपला.’’ आणि मग सगळ्यांच्या हसण्याचा सामुदायिक चित्कार… आणि मग कवितेचा प्रवाह पुन्हा वाहू लागला. श्रीपुंनी गाडी पु. शि. रेग्यांकडे वळवली. सतीश जेवायचं की नाही, विचारायला आला तेव्हा कुठे घड्याळ, वेळ वगैरेची जाणीव झाली. एक वाजून गेलेला.

या अशा बैठका अनुभवणं प्रचंड श्रीमंत करून जाणारं… या दौलतीला मोल नाही.

*

एक संध्याकाळ मात्र यापेक्षा वेगळी. तीनच जण. गोविंदराव, सहकारी पत्रकार संजीव साबडे आणि मी. स्थळ होतं दोना पावलाच्या रस्त्यावर बीचवरचा मार्टिन्स बीच कॉर्नर. वाळूत टेबल-खुर्च्या मांडलेल्या. दोन-तीनच पदार्थ असायचे ‘मार्टिन्स’कडे. प्यायला फक्त बिअर. आणि खायला शिंपले, स्क्विड्स वगैरे सीफूड. एका कोपऱ्यातल्या टेबलावर गोविंदराव आणि आम्ही दोघे.

गप्पांत गोविंदरावांचा सगळा पत्रकारितेचा प्रवास आमच्यासमोर एखाद्या गालिच्यासारखा उलगडत गेला. त्यावेळी त्यांना विचारलेलं राजीव गांधी यांच्या ‘त्या’ विधेयकाबाबत… निखिल चक्रवर्ती, आर. के. लक्ष्मण वगैरेंनी मोर्चा काढला त्या विरोधात… तुम्हीही खूप टीका केली होती त्यावर… मग मोर्चाला का नाही गेलात?

‘‘हे मोर्चे-बिर्चे काढणं पत्रकारांचं काम नाही. पत्रकार/ संपादकानं वर्तमानपत्रातल्या दोन कॉलमाच्या खिडकीच्या बाहेर पडू नये, ही ब्रिटिश परंपरा. मी ती पाळतो.’’ हे गोविंदरावांचं उत्तर. इतकंच.

ते ऐकून गोविंदरावांविषयीच्या भारलेपणाचा गुणाकार होत असताना मी म्हटलं, ‘‘तुम्ही तुमच्या अनुभवांविषयी लिहायला हवं. आत्मचरित्र वगैरे.’’ त्यांनी ती कल्पना धुडकावून लावली. ‘‘त्याची गरज नाही. ते योग्यही नाही. आपण फक्त साक्षीदार असतो या सगळ्याचे. साक्षीदारानं गरजेपेक्षा जास्त व्यक्त व्हायचं नसतं.’’

*

त्यानंतर जवळपास दोन दशकांनी ‘टाटायन’च्या निमित्तानं रतन टाटा यांची मुलाखत घेताना त्यांना मी ‘टेल्को’चा संप, त्यांचं गोविंदरावांना भेटायला येणं वगैरेंची आठवण सांगितली. रतन टाटा इतकंच म्हणाले, ‘‘‘ओह… गोविंद वॉज अ जेम ऑफ अ पर्सन’.’’

*

उठता बसता व्यक्त होणाऱ्या कंठाळी जमातीची पैदास दिवसागणिक वाढत असताना असा अव्यक्त राहण्याचा आनंद निश्चितच अनुकरणीय! आणि आदरणीय देखील!!

girish.kuber@expressindia.com