दीप्ती बरवाल
तु म्ही कधी ठिपक्यांनी चित्र काढलं आहे का? तु म्हणाल, ठिपक्यांनी चित्र कसं काढायचं? पण याच ठिपक्यांमध्ये जादू लपलेली आहे. त्यालाच डॉट पेंटिंग ( Dot Painting) असं म्हणतात. डॉट पेंटिंग म्हणजे, रंगाचे छोटे-छोटे ठिपके देऊन सुंदर चित्र तयार करणं. हे चित्र बनवायला खूप मजा येते आणि ते खूप सोपंही आहे.
डॉट पेंटिंग कसे करायचे ते बघूया!
सगळ्यात आधी कागदावर पेन्सिलनं तुम्हाला जे चित्र काढायचं आहे, त्याचा हलका आराखडा ( outline) तयार करा. जसे की, एखादं फूल, झाड, प्राणी, पक्षी किंवा तुमचे आवडते कार्टून… आता कान साफ करायच्या काड्या (इयर बड्स), पेन्सिलचा मागचा भाग, टूथपिक्स किंवा काडेपेटीची काडी रंगात बुडवून ठिपके द्यायला सुरुवात करा. हे ठिपके जवळ-जवळ आणि वेगवेगळ्या रंगांचे असतील तर चित्र खूप सुंदर दिसतं. डॉट पेंटिंगमध्ये कोणतेही जाचक नियम नसतात. आपण आपल्या आवडीनुसार रंगांची निवड करू शकतो, नवनवीन नमुने तयार करू शकतो आणि अमूर्त किंवा विशिष्ट चित्र काढू शकतो. विशेष म्हणजे, या कलेतून तुम्हाला केवळ एकाग्रता आणि संयमच मिळत नाही, तर तुमची कल्पनाशक्तीही वाढते.
लक्षात ठेवा, प्रत्येक ठिपका हा तुमच्या कल्पनाशक्तीचा एक आविष्कार आहे. यामुळे तुमचे चित्र खूप खास होईल. तर, आजच प्रयत्न करून पाहा. तुमचं डॉट पेंटिंगचं चित्र आम्हाला नक्की पाठवा.
deeptibarwal11@gmail.com
