अंजना मेहरा आणि मीरा देवीदयाळ यांनी आपापल्या वाटेवरून आपापले कला-प्रवास केले. पण दुसऱ्यासारखं काहीतरी करून नाव कमावण्याचा प्रयत्न नाकारणं, वाटचाल संथ असली तरी आपले आग्रह पूर्णपणे पाळणं, आणखी-आणखी बाहेर पाहणं, हे दोघींच्याही वाटचालीची व्याप्ती वाढवणारं ठरलं…

अंजना मेहरा आणि मीरा देवीदयाळ या दोघींचा जन्म दिल्लीतला आणि लग्नानंतरचं आयुष्य मुंबईत गेलं. दोघींनीही आता पंच्याहत्तरी ओलांडली आहे… या असल्या बिनमहत्त्वाच्या भौतिक सारखेपणाचीच यादी वाढवायची तर, ‘दोघीही दक्षिण मुंबईत राहातात,’ असंही नमूद करता येईल. पण इथे या दोघींबद्दल एकाचवेळी विचार करायचा तो केवळ वरवरच्या सारखेपणासाठी नाही. चित्रकार म्हणून दोघींनी जगाकडे पाहिलं, त्या वेळच्या रूढ चित्रणपद्धतींना फाटा देऊन स्वत:ची पद्धत शोधली, पुढे त्या जगाबद्दल चित्रांमधून बोलू लागल्या, ही अभिव्यक्ती करताना त्यांनी आपापला संयत सूर कायम ठेवला असा साधारण त्या दोघींमधल्या सारखेपणाचा धागा आहे, तो आपल्यासाठी अधिक महत्त्वाचा. एरवी त्या दोघींतली प्रत्येकजण इतर चित्रकारांपेक्षा निराळी आहे, तशीच एकमेकींपेक्षाही भिन्न आहे. म्हणजे आधी एकीबद्दल, मग दुसरीबद्दल इथं लिहिलं जाणार, ते तुकडे वाचकांनी जोडायचे. आहे तयारी?

तशी तयारी असेल, तर अंजना मेहरा यांच्या चित्रांचा अनुभव अधिक सहजपणे घेता येईल. मीरा देवीदयाळ यांचीही चित्रं अधिक चटकन भिडतील. त्याहीपेक्षा, स्त्री म्हणून जगाकडे पाहून जगाचा अर्थ लावून तो चित्रांतून मांडण्याच्या पद्धती स्वीकारताना ‘मीच खरी’, ‘माझंच ऐका’ असा आग्रह या अंजना मेहरा किंवा मीरा देवीदयाळ यांनी धरलेला नसणं हे वैशिष्ट्यही लक्षात येईल. ते वैशिष्ट्य कुणा एकटीचं नसणं, हेही महत्त्वाचं आहे. मीरा देवीदयाळ (या दोघींपैकी) वयानं किंचित मोठ्या. जन्म दिल्लीत, पण शिक्षण कोलकात्याच्या लॉरेटो कॉन्व्हेन्टमध्ये झालं. मुंबईत आल्यावर, इथल्या जे. जे. कला महाविद्यालयातच तेव्हा संध्याकाळचे अर्धवेळ कलावर्ग चालायचे तिथं शिकू लागल्या. पण त्याआधीच मुंबईकडे पाहताना, मीरा यांचं कलाशिक्षण सुरू झालं होतं. कुठेतरी रस्त्याकडेला एवढंस्सं देऊळ. त्याची रंगसंगती, तिथली मूर्ती किंवा तसबीर यांच्याभोवतीचं भक्तिमय वातावरण वाढवण्यासाठी केलेली सजावट हे सगळं आटोपशीर जागेत संपलं की, मग पुन्हा निराळ्या रंगांतल्या भिंती- तिथं सिनेमाची किंवा आणखी कसली जाहिरातसुद्धा. ही ‘शहरी लोककला’ का म्हणू नये, असा प्रश्न मीरा यांना पडला. तोच त्यांच्या पहिल्या प्रदर्शनाचा विषय ठरला. कलादृष्टी म्हणून जी ‘किच’ किंवा गावंढळ/ हिणकस मानली जाते, तिच्यातलं सौंदर्य मीरा यांनी कॅनव्हासवरल्या चित्रांद्वारे कलादालनांत मांडलं. हे झालं १९८२ च्या सुमारास. भूपेन खक्कर वगैरे वगळता फार कुणी ‘शहरी लोककले’ कडे लक्ष देत नसताना. नंतर २००१ मध्ये ‘किच किच होता है’ नावाचं – १५/१६ चित्रकारांचा समावेश असलेलं एक प्रदर्शनच दिल्लीच्या ‘गॅलरी एस्पास’नं भरवलं. त्यात मीरा यांचा समावेश नव्हता. कारण तोवर त्या निव्वळ ‘किच’ म्हणून या दृश्यांकडे पाहत नव्हत्याच. त्यांनी आता अख्ख्या शहराकडे, त्यातल्या विषमतांकडे पाहणं सुरू ठेवलं होतं. ‘किच’ म्हणा किंवा ‘शहरी लोककला’ म्हणा- त्यातल्या अतिसुलभ (प्रमाणशीर नसूनही कसला आकार आहे हे कळेल इतपत) आकारांकडे, बटबटीत रंगांकडे किंवा तोचतोपणाकडेही विषमतेचा भाग म्हणूनच पाहायला हवं, हे मीरा यांच्या चित्रांतून प्रेक्षकालाही उमगत होतं.

निव्वळ कुतूहल किंवा चौकसवृत्तीनं किच अथवा शहरी लोककलेकडे पाहावंसं मीरा यांना वाटलं असेलही, पण अनुकंपा, सहानुभाव यांतून त्यांची पुढली चित्रं घडत गेली. फुलं सुंदर असतात, फुलाफुलांची रंगीबेरंगी चादरही सुंदर असते… पण ती चादर ओढून रस्त्याकडेला झोपावं लागणाऱ्यांचं जगणं कसं असतं? काश्मीरच्या किंवा अन्य कुठकुठल्या शानदार बगीच्यांची चित्रं ट्रकवर, अलमारीवर असतात. त्या उद्यानांमध्ये कधीकाळी राज्यकर्त्यांचा प्रणयविलास रंगत असेल… पण मुंबईतली कुणी प्रेयसी तिच्या प्रियकरासह ‘शक्ती मिल’च्या ओसाड आवारात जाते, तिथं तिच्यावर बलात्कार होतो… या शहरी कामजीवनाचा त्या ‘आदर्शवत’ प्रणयविलासाशी काही संबंध आहे का? – असे प्रश्न मीरा यांची चित्रं विचारू लागली. प्रेक्षकाला विचारप्रवृत्त करू लागली. कधी फोटो, कधी स्क्रीन प्रिंट, कॅनव्हासवर डिजिटल प्रिंट घेऊन त्यावर रंगवणं… अशा निरनिराळ्या साधनांतून ही चित्रं घडली होती. पण त्यांतल्या तांत्रिक बाजूपेक्षाही चित्रांतली दृश्यं, चित्रविषय मीरा यांच्यासाठी महत्त्वाचा होता. त्यामुळे मीरा यांनी अलीकडच्या काही वर्षांत संगणकीय प्रतिमांकनाचाही वापर पुरेपूर केला. टोलेजंग, नीरस दिसणाऱ्या इमारतींचा पसारा या प्रतिमांकनातून भेसूरही दिसू लागला. तीन पडद्यांवरच्या व्हिडीओ मांडणशिल्पातूनही मीरा यांनी शहराची घुसमटवणारी उभी वाढ आणि त्यातल्या माणसाचं क्षुद्रत्व दाखवलं. अगदी अलीकडे मीरा यांनी इन्स्टाग्रामवर प्रकाशित केलेली चित्रं शहराच्याही बाहेर पाहणारी आहेत. या ताज्या चित्रांमध्ये महिला प्रामुख्यानं दिसते. तिच्या जगाची स्थिती तिच्यामुळे कळते. या चित्रांमध्ये किचसारखी दृश्यरचना केवळ शहरी लोककला म्हणून येत नाही. ती आता मीरा यांचीही चित्रपद्धतच आहे. या चित्रांतली महिला कधी बांधकाम मजूर असते, कधी ‘विकासा’च्या नावाखाली उभारलेल्या द्रुतमार्गांच्या जाळ्यातून ती पाण्यासाठी पायपीट करत असते… हे विषमतेचं व्यापक रूप आजचं आहे. अर्धशतकापूर्वी हौस म्हणून चित्रकलेकडे वळलेल्या मीरा देवीदयाळ या आता अनुभवी चित्रकार आणि विद्यामान काळाच्या भाष्यकारही ठरल्या आहेत.

अंजना मेहरा यांच्या दृश्य- आठवणी दिल्लीच्या चाँदनी चौकातून सुरू होतात. विशेषत: एकमेकांलगतची घरं, गच्च्यांवरून एकमेकांशी होणारा संवाद असं वातावरण. गजबजगर्दी इथंही होती पण मुंबईसारखा कोंदटपणा नव्हता. तो मुंबईत अंजना यांनी पहिल्यांदा अनुभवला ‘जेजे’त शिकताना. मग पुढल्या कलाशिक्षणासाठी त्यांनी सरळ बडोदे गाठलं. महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या दृश्यकला विभागात अंजना मुद्राचित्रण शिकल्या. पण लग्नानंतर संसार ऐन मुंबईत- नागपाड्यात मांडावा लागला. तरीही ते ठिकाण सोयीचं आणि घरातल्या खोल्या प्रशस्त यांतच बहुधा समाधान मानावं लागलं अंजना यांना. मग त्यांच्या चित्रांमध्ये मात्र आकार बरेच (आणि लहानलहान) असले तरी एखादाच रंग प्रकर्षानं दिसू लागला. घुसमट थेट न दाखवता, त्या रंगाच्या दादागिरीतून दिसू लागली. मुंबईची उभी वाढ टिपणारं ‘पाइप ड्रीम्स’ हे प्रदर्शन २००८ मध्ये भरलं, त्यात पिवळा रंग होता. इमारतींऐवजी तो रंगच अंगावर येत होता. इमारती- किंवा एकंदर वाढ- दिसत होती, पण तो प्रत्यय देणारे आकार लहानच होते.

तोवरचा, म्हणजे १९७० च्या दशकापासून ते २००७ पर्यंतचा अंजना मेहरा यांचा प्रवास अंतर्मुखतेकडून बहिर्मुखतेकडे झाला असावा, असं त्यांची चित्रं सांगतात. ही चित्रंही एखाद्याच रंगात – किंवा कमीत कमी रंगांमध्ये असायची. हेल्मेट, ऑक्सीजन मास्क या ‘संरक्षक’ प्रतिमा या चित्रांमध्ये होत्या. पाणी आणि अवकाश हे जणू फार फार काल्पनिकच असावं अशा प्रकारे या चित्रांमध्ये आणलं जायचं. पाश्चात्त्य चित्रपटांतून पाहिलेली काही दृश्यंही (उदा.- विमान पाण्यात उतरलंय) असावीत. पण एकंदरीत अंजना मेहरा यांच्या चित्रांना भूमीच नाही- नुसत्या भावनाच आहेत, असं वाटायचं. नागपाड्याच्या घरी एकदाच जायला मिळालं तेव्हा हे आरोपवजा निरीक्षण त्यांना बोलून दाखवलं. अंजना यांनी प्रतिवाद केला नाही, पण बोकडाचं चित्र दाखवलं. ‘असा बोकड, तू ज्या जिन्यानं इथं वर आलास ना, त्या जिन्यापुढल्या चौकात कापतात’- असं त्या म्हणाल्या! थोडक्यात, अंजना यांच्या चित्रांची भूमी फक्त माहीतगारांनाच माहीत असू शकते, अशी परिस्थिती तोवर तरी राहिली होती.

नागपाड्याचं ते घर अंजना यांना सोडावं लागलं. ही जुनी भक्कम, बळकट इमारत पाडली जात असताना असंख्य फोटो त्यांनी टिपले. त्यातून साकारलेलं, डिजिटल कोलाज आणि रंगकाम यांचा मेळ घालणारं प्रदर्शन मात्र आजवरच्या त्यांच्या कामापेक्षा निराळंच होतं. इथं ती वास्तू थेट प्रेक्षकाला भिडत होती. मुळात ‘नेहमीचं’ चित्रकाम सोडून हे फोटो-आधारित काम अंजना यांनी मांडणं नवं होतं. जे भक्कम ते उद्ध्वस्त करायचं आणि नवंच काहीतरी उभारायचं हा खेळ जगात तर जोरातच सुरू असताना हे प्रदर्शन भरतंय, याचीही जाणीव प्रेक्षक म्हणून त्या चित्रांना सामोरं जाताना होत होती.

यातून कुतूहल वाढलं ते आता यापुढे अंजना मेहरा काय करणार याचं. चित्रांमधून शहराबद्दल- मुंगीसारखं जगणाऱ्या माणसांच्या भावनांबद्दल बोलणारं ते नवं प्रदर्शन होतं. त्यात मध्यमवर्गीयतेची आठवण देणाऱ्या काही खुणा होत्याच, पण आधी जी निव्वळ गुंतागुंतीच्या रेषेतून केलेली पोतनिर्मिती वाटली तिथं अतिबारीक अक्षरांमध्ये काहीतरी लिहिलंय, ते जवळच ठेवलेल्या भिंगांमधून पाहिल्यावर प्रेक्षकाला वाचता येत होतं. कधी कविता, कधी हिशेब, कधी कायदा… असं सगळंच होतं ते. अंजना मेहरा यांचा दीर्घ पल्ल्याचा प्रवास आता फक्त स्वत:ला प्रतिसाद देणारा राहिलेला नाही, ही चित्रं बाहेरच्या जगाचाच विचार करणारी आहेत, हे चित्रांमधल्या दृश्यांतून समजा नाहीच कळलं तरी अक्षरांची मदत त्यासाठी होत होती.

थेट रूढ शैलींचा आधार अंजना यांनी नेहमीच नाकारला. पण त्याऐवजी दुसरा कुठला एकच आधार घेतला, असंही नाही. त्यांची रेषा बारीक, त्या रेषेतले आकार एकतर लहान किंवा पोकळ वाटणारे, यावर त्यांनी हेल्मेट, विमान, बोकड आदी आकार मोठे दाखवून मात केली होती. भाष्य सूचकपणेच मांडणारी ही सारी चित्रं होती.

मीरा देवीदयाळ आणि अंजना मेहरा एकसारख्या नाहीत, पण त्यांचे प्रवास सारखे आहेत. किंवा त्यांनी आपापल्या वाटेवरून केलेल्या प्रवासांसाठी त्यांच्याकडे असलेल्या सामग्रीत साम्य आहे- खरेपणा जपणं, दुसऱ्यासारखं काहीतरी करून नाव कमावण्याचा प्रयत्न नाकारणं, वाटचाल संथ असली तरी आपले आग्रह पूर्णपणे पाळणं ही ती सामग्री. प्रवास एका रेषेतला नसतो, हे दोघींनीही ओळखलं. त्यामुळे दोघींच्याही साधन-हाताळणीची, दृश्यविषयांची, अभिव्यक्तीची व्याप्ती वाढत गेली. त्या दोघींनाही आज जर ‘ज्येष्ठ’पद मिळत असेल तर ते या व्याप्तीमुळे

abhijit.tamhane@expressindia.com