‘लय’लूट या मलबाराव सरदेसाई यांच्यावरील ‘स्नेहचित्रे’त १९९४ साली ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये त्यांच्यावर लिहिलेल्या लेखाचा आणि तो लेख आता उपलब्ध नसल्याचा उल्लेख होता. दुसऱ्याच दिवशी गोव्यातील ‘नवप्रभा’चे संपादक परेश प्रभु यांनी त्या मूळ लेखाची प्रत पाठवली. ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक पराग करंदीकर यांनी तो छापण्याची परवनागी दिली. एका संपादकाने लिहिलेला, दुसऱ्याने सांभाळलेला आणि तिसऱ्याने प्रसिद्धीची अनुमती दिलेला हा लेख… मलबारावांचे मोठेपण दाखवून देणारा…
वयाच्या चौथ्या वर्षी मला संगीताची व्याधी आणि पुस्तकांचा आजार जडला. आमचं घराणं संगीतप्रेमींचं. वडील श्रीमंत माधवराव (हे आदिलशहाचे जागीरदार) गाण्याचे रसिक होतेच, पण आईचाही कान तयार झाला होता. आई गायक नेवरेकर यांच्या घराण्यातली. त्या काळी गोव्यातील देवळात उत्सवप्रसंगी भजनी सप्ताह व्हायचे. आमच्या गावचा सावई वेरेचा भजनी सप्ताह त्यातही जास्त नामांकित होता. महाराष्ट्र, गोव्यातील कलाचार्य यानिमित्ताने आमच्या गावात जमत. सात दिवस अखंड २४ तास नुसता संगीताचा उरूस चालायचा. विठ्ठल कवळेकर, खाप्रुमाम पर्वतकर, ज्येष्ठ तबलिये दत्ताराम नानोटकर, हरिश्चंद्र केरकर, पंढरी जुवेकर अशी बुजुर्ग मंडळी त्यात सहभागी व्हायची. हे सगळं माझ्या अजूनही डोळ्यापुढं दिसतंय.
त्याच काळात कधी तरी मला वाजवायची गोडी लागली. आई-वडीलही इतके हौशी की, त्यांनी माझ्यासाठी लहानसा मृदुंग करवून घेतला. सप्ताहातल्या कलाकारांसारखं आपणही वाजवावं, मुख्य म्हणजे ‘कलाकार’ म्हणून ओळखलं जावं, याची एक नशा चढू लागली होती. या संगीतशौकात आईवडिलांचा कधी अडथळा आला नाही. त्यांनी दत्ताराम नानोटकरांसारख्या अजोड तबलावादकाकडे माझ्या तबलावादनाचा श्रीगणेशा करवून दिला. पुढे थोड्या दिवसांनी दुसरे एक कलाकार हरिश्चंद्र केरकर आमच्याकडे आले होते. तेव्हा वडिलांनी हौसेने ‘जरा काही वाजून दाखव’ म्हणून मला सांगितलं. दत्तारामही तिथं होते. जे काही थोडं फार येत होतं ते मी पेश केलं. ते ऐकून दत्तारामजी वडिलांना म्हणाले, ‘‘हे प्रकरण भयंकर आहे. याचा ओढा लयकारीकडे जाणार हे दिसतंय. त्याला खाप्रुमाम पर्वतकरांकडे पाठवा!’’
योग नव्हता
दत्तारामजींनी सूचना केली होती, तरी खाप्रुमाम यांच्याकडे शिकण्याचा योग आला नव्हता. मधे मग मी साधारण गाणंही शिकलो. बासरी वाजवता यायला लागली. स्वतंत्र पेटीवादन करू लागलो. साथीलाही जायला लागलो. आमच्या गावातले ज्येष्ठ पेटीवादक रघुवीर देवीदास यांना वडिलांनी खास मला पेटी शिकविण्यासाठी आणलं. या देवीदासचा भाचा महादू त्या वेळी तबल्याच्या साथीला यायचा! त्याच्यामुळे तबल्याची बोलभाषा वळणी पडली. नंतर दुसरे एक ज्येष्ठ तबलिये मला तबला शिकवायला यायचे. सकाळी तबला आणि संध्याकाळी पेटी असं शिक्षण चालायचं. माझी तबल्यातली एकंदर गती पाहून गोव्यातील काही चांगल्या घुमटवादनकारांनी घुमटवादन शिकविलं! या घुमटवादनशास्त्राच्या काही प्राचीन अशा चोपड्याही त्यांनी मला दिल्या. संगीत शिक्षणाबरोबरच मला वाटतं संगीतविषयक वाङ्मय जमा करण्याची सुरुवातही त्याच वेळी झाली असावी! ताल लेखनाचाही अभ्यास तिथूनच सुरू झाला. अख्ख्या भारतात त्या वेळी ज्यांचं नाव पेटीवादनासाठी घेतलं जायचं ते पी. मधुकरराव गोव्याचे. मधुकर पेडणेकर हे त्या काळी पं. काशीकरबुवा, बेगम अख्तर यांना साथ करायचे, म्हणजे बघा! त्यांचा आमचा परिचय. काही कारणांमुळे त्यांना गोव्याला येऊन राहावं लागलं. ते आमच्याकडेच आले मग! काही दिवसांकरिता म्हणून आलेले हे पी. मधुकरराव चार वर्षं राहत होते. त्यांच्याकडूनही गानशास्त्राचं मार्गदर्शन झालं होतं.
खाप्रुमामचा चमत्कार
त्यावेळचे दुसरे अवलिये म्हणजे लयभास्कर खाप्रुमाम पर्वतकर. खाप्रुमाम म्हणजे तालवाद्याच्या क्षेत्रातला शेवटचा अधिकारी. लय-तालाच्या विश्वात हा माणूस एवढा गुरफटलेला होता की, ते झोपले तरी त्यांच्या हातापायांनी कसला न् कसला तरी ठेका घेतलेला असायचा. यात कसलीही अतिशयोक्ती नाही. एका तालात दुसरा कोणताही ताल वाजवून त्यांना एकाच वेळी समेवर आणणं, एका हाताने एक ताल- दुसऱ्या हाताने दुसरा, दोन्ही पायांनी दोन निरनिराळे ताल- तोंडाने पाचवा- आणि समोर तबल्यावर वाजवायचा सहावा… तरीही सर्वांची सम मोजून अचूक एकत्र आणायची. असला चमत्कार करणारे खाप्रुमाम एकमेव. म्हणूनच ते लयभास्कर. नंतर तेही आमच्याकडे येऊन राहू लागले. त्यांच्याकडून शिक्षण तर सुरू झालंच, पण वेगवेगळे ठेके मिळवून लिहून ठेवायचीही सवय लागली.
आमच्या गोव्यात ‘काले’ व्हायचे-बालक्रीडाकाले म्हणजे तुम्ही ‘दशावतारी’ म्हणता ते. त्यांच्याकडे अनेक ठेके असतात, ते मी मिळवून ठेवू लागतो. ‘पालखीचे पेणे’ हाही खास गोमंतकीय प्रकार आहे. ‘पेणे’ म्हणजे पालखीचे थांबे. ‘ता धि ताधिं त्रकदा गदिगन् ध- आ’ असे ठेके मी जमवून ठेवलेत. गोव्यात ‘कबंध गीते’ नावाचा एक प्रकार होता. तोही मी जमवून ठेवलाय, ‘जखणी’ हा एक गायनप्रकार होता. आता ‘देखणी’ म्हणून एक प्रकार गायला जातो. त्यापेक्षा जखणी वेगळी, ती माझ्याकडे आहे. पूर्वी ‘वट’ म्हणून एक अवघड प्रकार गायला जायचा. आता तराणा सर्रासपणे द्रुत लयीत गायला जातो. परंतु वट म्हणजे ‘आस्थायी’ तराणा. तो माझ्या गाठीला आहे. ‘दस्तक’ हा प्रकारही माझ्या संग्रहात आहे.
गायनविषयक जे मिळेल ते जमवायची मग सवयच लागली. आमच्या बांदोड्याला लक्ष्मीबाई नावाची एक गायिका होती. ती कर्नाटक ढंगानेही गायची. मला वाटतं, तिकडेही ती शिकून आली होती. तर तिच्या माळ्यावर काही हस्तलिखितं पडून आहेत, असं कानावर आलं. येनकेनप्रकारेण ती हस्तलिखितं मी मिळवली अन् गोमंतकियांच्या तालवाद्याची माहिती, कलाकारांची माहिती देणारं एक घबाडलंच गवसलं!!
शिळाप्रेसवरील नाटकं
संगीतविषयक इतर पुस्तकं, हस्तलिखितंही जमवत होतोच!
शिळाप्रेसवर छापलेली त्या वेळी जमवलेली नाटकं, अजून माझ्याकडे आहेत. त्या वेळचं ‘विवेकानंद’ नावाचं असं एक नाटक माझ्याकडे आहे. वासुदेव रंगनाथ शिरवलकर नामक लेखकाचं ‘तुकाराम’ नावाचं नाटक त्या वेळी खूप गाजलं होतं. १९०७ सालच्या या नाटकातील पुढे बाबाजी राणे यांनी म्हटलेल्या ‘प्रभात काली सकाळी उठोनी’ या अत्यंत लोकप्रिय पदावरच पुढे वसंत देसाईंनी होनाजी बाळा यांची प्रसिद्ध भूपाळी बांधली, असा माझा समज आहे… तर ते नाटक त्या पदासह अजून माझ्या संग्रही आहे.
आता नाटकाचा विषय निघालाच आहे म्हणून सांगतो. अनेकांच्या संग्रहात ‘सं. मानापमान’, ‘सं. विद्याहरण’ ही नाटकं असतील; परंतु या नाटकांच्याच इतक्या मोलाची नाटकं माझ्या दफ्तरात आहेत. १८९८ साली श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांना अर्पण करण्यात आलेलं ‘संगीत कलावती’ हेही नाटक माझ्याकडे आहे. या नाटकाच्या मुख्यपृष्ठावरच श्रीमंत सयाजीरावांचा फोटो आणि तब्बल चार ओळींची त्यांची उपाधी छापण्यात आली आहे. त्यात नाटकाचं नाव शोधावं लागतं. १८७५ सालचं वासुदेव गणेश केळकर यांचं ‘राजपुत्र वीरमणि आणि रत्नप्रभा नाटक’ अशा नावाचं नाटकही माझ्याकडे आहे.
‘किर्लोस्कर नाटक मंडळी’संबंधी
नाटकांच्या संदर्भात आवर्जून सांगायलाच हवं असं एक पुस्तक माझ्याकडे आहे. नाटकाच्या इतिहासात किर्लोस्कर संगीत मंडळाचं महत्त्व काही मी सांगायला हवं, असं नाही. तर त्या काळी किर्लोस्कर मंडळींची जी जी नाटकं झाली, त्यातील सर्व कलाकारांची माहिती, त्यांचे फोटो, त्यांच्या भूमिका असं एक संकलन छापलं गेलं होतं. त्या एकाच पुस्तकावरून तुम्हाला किर्लोस्कर नाटक मंडळींचा समग्र आढावा घेता येईल, नाट्यप्रेमी माणसाला हे पुस्तक मी अगदी अभिमानाने दाखवतो. प्रती लाखमोलाच्या आहेत. १९११ साली प्रसिद्ध झालेल्या या विशिष्ट प्रतीमध्ये नाटकातल्या पदांबरोबरच खालती पदाची सरगम दिली आहे. पदांची मूळ चाल व ती-ती सरगम हा दुर्मीळ प्रकार झाला. १९११ सालच्याच त्या प्रती अजून माझ्याकडे आहेत.
हे सोडाच. पण ‘डायमंड चिंतामणी शिलाप्रेस’ने १८५० सालच्या आसपास छापलेले ‘भोजनबंधू पानतंबाखू’ असे नामांकित नाटक माझ्या संग्रहात आहे. कोणी गोविंद नारायण नामक लेखकाने ते लिहिलं आहे. ‘कल्पतरू प्रेस’ने छापलेलं, सहा आणे किमतीचं ‘सं. नारायणराव पेशवे’ हेही आहे. १८९२ साली हे नाटक छापलं गेलं होतं. त्याआधीचं आणि मुखपृष्ठावर ‘संगीत रत्नकांता’ नाटक ७ अंकी असा विचित्र, ठसठशीत मथळा धारण करणारं शिलाप्रेसचं नाटक १८८५ साली आलं होतं. त्या वेळी १,५० रु. किमतीचं हे नाटक मी अजून जपून ठेवलंय.
‘व्यवहारोपयोगी नाटक’
तत्पूर्वी कोणी ‘स्वदेशहितेच्छू नारायण दीनानाथ इस्कापर, जस्टीस ऑफ पीस, दुय्यम भाषांतरकार, उच्च न्यायालय’ या अजब माणसाने ‘व्यवहारोपयोगी नाटक’ याच नावाचं एक नाटक १८५९ साली छापलं होतं. तेही माझ्याकडे आहे. गोमंतकीय भास्कर गोविंद रामाणी, मुंबईच्या डॉ. रामाणी यांचे वडील, या लेखकाने १८६० साली ‘साध्वी तारा अथवा योग्य मोबदला’ हे नाटक लिहिलं होतं. ‘सहा आणे’ (८. खर्चासह)-
प्रसिद्ध झालेल्या प्रत्येक संगीत नाटकाची एक तरी प्रत माझ्याकडे आहेच. हा दावा जरी अतिशयोक्तीपूर्ण वाटला तरी तो खराच आहे. काही पुराण, प्राचीन नाटकांची नावं मी दिली. अशी खूप नाटकं आहेत. सर्वांची नावं काही आठवत नाहीत. वयाची ८४ गाठल्याचा हा एक तोटा. अजूनपर्यंत मी अशी नाटकं जमवतोय. कालच्या ‘मत्स्यगंधा’पर्यंत जवळपास सर्वच नाटकं, त्यावरची समीक्षा, प्रतिक्रिया, टीका माझ्याकडे आहे. संगीत नाटकाच्या पार उगमापासूनचे हे प्रवाह अभ्यासूंसाठी उपलब्ध आहेत. अर्थात आता कोणाला अभ्यास फारसा करायला नको असतो ते सोडा.
हे झालं नाटकांविषयी! पण त्यापेक्षाठी काही मौल्यवान सांगीतिक साहित्य माझ्या दरबारी आहे. ते साहित्य अक्षरश: अमोल आहे.
संगीतावरचे पं. विष्णू नारायण भातखंडे यांचे ग्रंथ अनेकांच्या संग्रहात असू शकतील. परंतु हे ग्रंथ लिहिण्यासाठी पं. भातखंडे यांनी ज्या ग्रंथाचा आधार घेतला, ते माझ्या संग्रहात आहेत. या ग्रंथांवर पं. भातखंडे यांनी जागोजागी खुणा केल्या आहेत. ‘Office copy’ असा शिक्का मारून पं. भातखंडे यांनी त्याखाली आपली स्वाक्षरी केली आहे. मला हे ग्रंथ मुंबईच्या रस्त्यावर मिळाले. १९१९ सालचे हे ‘अनुपसंगीत रत्नाकर’ आणि ‘अनुप संगीतांकुश’ हे ग्रंथ म्हणजे शास्त्रीय संगीतावरची ‘गीता’ आहे. शास्त्रीय संगीतावर तुम्ही काय पाहिजे ते विचारा. या पुस्तकात तुम्हाला सापडेल.
आमच्या माशेलचे यशवंत आमोणकर हे विख्यात सारंगिये. हे यशवंत आमोणकर म्हणजे आताच्या किशोरी आमोणकरांचे सासरे. ते एकदा माझ्याकडे आले. मी आजारी होतो. त्यांनी मला उठवलं अन् चार पुस्तकं दिली. मी हरवूनच गेलो. म्हटलं, मला कशाला देताय, मुलाबाळांकडे द्या. तर ते म्हणाले, ‘शेतभात, संपत्ती वगैरे मुलाबाळांना वाटून दिली. या दुर्मीळ पुस्तकांची जागा मात्र तुमच्याकडेच.’ मी पाहिलं, तर फिरोज फ्रेमजी यांचा ‘Encyclopedia of Indian Music’ हा १९२७ सालचा ग्रंथराज त्यात होता. पं. भातखंडे यांचीही काही पुस्तकं त्यात होती. त्यांच्याकडून काही दुर्मीळ ‘धृपदं’ही मिळाली.
अतिमहनीय ग्रंथ
विख्यात गायिका गिरिजाताई केळेकर यांच्याकडेही अडगळीत काही पुस्तकं होती. आमच्या काही मित्रांनी ती पाहिली; परंतु त्यांना काही त्या पुस्तकांचं मोल समजलं नाही. एका बैठकीत त्या मित्रांच्या बोलण्यातून याचा उल्लेख आला. मी बैठक सोडून गाडी काढली अन् थेट गिरिजाताईंच्या घरी गेलो. ते बाड कुठं आहे, विचारलं. गिरिजाताईंनाही खूप आनंद झाला. त्यांनी ते मला देऊन टाकलं. ‘कल्याण मेलजन्य रागांचे स्पष्टीकरण’ हा अतिमहनीय ग्रंथ मला त्यात मिळाला.
अ. का. प्रियोळकर यांच्या बोलण्यातून एकदा एका पुस्तकाचा उल्लेख आला. तेही असंच कोणाकडे पडून होतं. शोधता शोधता ‘संगीताचे रस’ हे पुस्तक माझ्या हाती लागलं.
आणखी एका पुस्तकाचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. मुंबई इलाख्याचे त्यावेळचे श्री. इ. क्लेमंटस् या साहेबाने भारतीय संगीतशास्त्र, त्याची लिपी यावर ‘ STUDY OF INDIAN MUSIC’ हे अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिलं आहे. १९१३ साली ‘लॉगमन्स, ग्रीन अॅण्ड कं.’ने छापलेलं हे पुस्तक क्लेमंटस् साहेबांच्या सहीसह मी जपून ठेवलंय.
रागांवर सर्वांगाने प्रकाश टाकणारं, ‘संगीत पारिजात’ हे आणखी एक अमूल्य पुस्तक माझ्याकडे आहे. रागांवर भाष्य करताना त्यात चार-चार ‘षड्ज’ सांगितले आहेत. आताच्या गायकांकडून त्यातला फार फार तर एकच गायला जातो. त्यामुळे ‘मेघमल्हार’ गायल्यावर पाऊस कुठं पडतो? असा प्रश्न हे गायक विचारतात. या प्रकारातील दंतकथा सोडा, पण त्या वेळी कोणता षड्ज वापरला जात होता, हे कोणाला ठाऊक आहे?
याशिवाय ‘संगीत रत्नाकर’ तर माझ्याकडे आहेच, पण संगीतातील श्रुतींवर भाष्य असलेलं ‘नारदीय शिक्षा’ हेही माझ्या संग्रहात आहे. संगीतातीत लक्षणशास्त्रांवरचं ‘आर्यासंगीत’ हे आणखी एक महत्त्वाचं पुस्तक माझ्याकडे आहे. पुण्याच्या एम. एस. सप्रे यांनी मला काही पुस्तकं पाठविली होती, त्यात हे पुस्तक मला मिळालं, असं आठवतंय.
‘संगीत पारिजात’च्या आधी प्रकाशित झालेलं ‘हनुमत मर’ हेही माझ्याकडे आहे. ‘चतुर पंडिताने (म्हणजे मला वाटतं भातखंडेच) १९३४ साली प्रकाशित केलेलं ‘श्रीमल्लक्ष्यसंगीतम्’ हेही आहे, ‘रत्तिलम्’ही आहे. १९१२ सालचा ‘रागविबोध प्रवेशिका’ हा ग्रंथही मी जपलाय. तसाच १९५० सालचा ‘स्वरमेलकलानिधी’ हा ग्रंथही!!
संगीतश्रुती सिद्धांत
१९१७ मध्ये छापलेला ‘संगीत सुधाकर’ माझ्या संग्रहात आहे. ‘स्वयंभु शब्द’ हेही माझ्याकडे आहे. १९३६ साली प्रसिद्ध झालेलं ‘दिलखुश उत्सादी गायकी’ हे पुस्तकही मी ठेवून दिलंय, पंडित केशवानंदस्वामी यांचं असंच एक प्राचीन पुस्तक म्हणजे ‘संगीतश्रुती सिद्धांत’ हे माझ्याकडे आहे. पुस्तकाच्या किमतीच्या जागी या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर लिहिलं आहे – किंमत- स्वरजिज्ञासा
याचबरोबर आणखी महत्त्वाचं म्हणजे २९० वर्षांपूर्वीच ‘हृदयकौतुकम्’, ‘हृदयप्रकाश’ हे ग्रंथही मी मिळविले आहेत. वयाची ८३ वर्षं आता पूर्ण झालेली असल्याने ते कसे मिळवले, कधी मिळवले असा बारीक तपशील काही आता आठवत नाही. ‘श्रीमंजरान कविविरचितम्’, ‘संगीत गंगाधरम्’ हेही माझ्याकडे आहे आणि ‘पंडित अपातुलस्युपाख्य काशीनाथप्रणित’, ‘रागकत्पद्रुमांकुर’ हे १९११ सालचं पुस्तक मी बाळगून आहे. त्याच्या नंतरची म्हणजे १९१८ साली प्रसिद्ध झालेली ‘श्री वेंकटेश्वर दीक्षित विरचिता’, ‘बतुर्दण्डिप्रकाशिका’ही मी साभिमान सांभाळत आहे. पुण्याच्या ‘ज्ञानप्रकाशा’त १८५० साली छापलेला ‘गायनप्रकाश’ हा ग्रंथही मी मिळविलेला आहे. ‘रागकोश’सुद्धा आहे. माझ्याकडे ‘व्यंकटमुखी’, ‘शतरागनिरूपण’ हे ग्रंथही आहेत.
नुसती पुस्तकंच नव्हे, तर महत्त्वाचं संगीतही मी जपून ठेवलंय, यातला महत्त्वाचा आणि आठवणारा किस्सा म्हणजे, मी एकदा पी. मधुकरच्या मागे लागून त्याला बेगम अख्तरकडे मला न्यायला लावलं. तिच्यासमोर काय बोलायचं, आपल्याला कोणता राग हवाय हे मी त्याला आधीच बजावून ठेवलं होतं. खास गोव्याहून मुंबईला तिच्या घरी आम्ही पोहोचलो. गप्पाटप्पा झाल्यावर मधुकर अख्तरी बाईंना म्हणाला, ‘‘तुम्ही बऱ्याच दिवसांत अमुक राग गायला नाहीत?’’
बाई म्हणाल्या, ‘‘असं? चल मग धर सूर.’’ बाई धुवॉंधार गायल्या. आम्ही प्राणांचे कान करून ऐकत होतो. गाणं संपतं अन् आम्ही धावत खालच्या इराण्याच्या हॉटेलात जाऊन बसलो. कागद मागून घेतले अन् बाई गायल्या त्या रागाची सरगम लिहून काढली. तुम्ही गाण्यात रस घेता म्हणून विचारतो, ऐकलायत् का कधी ‘मारु सारंग’ हा राग! तो राग आम्हाला ठरवून त्या दिवशी अख्तर बाईंकडून मिळाला, त्या रागाची, त्या वेळी पी. मधुकरने लिहून काढलेली सरगम अजून मी जपून ठेवलीये. मारुबिहाग सर्वच गातात. ‘मारू सारंग’ ऐकलायत् का कधी? तो आहे माझ्याकडे, ‘लंकदहन सारंग’ हा दुर्मीळ रागही माझ्याकडे आहे. आता काही जण त्याचा संबंध थेट रावणाच्या लेकेशी जोडून त्याचा उच्चार ‘लंकादहन सारंग’ असा करतात. पण तो ‘लंकदहन सारंग’च आहे. ‘मारूवसंत’ हा राग तर मला पी. मधुकरनेच शिकविला.
मेघांची परण
गोव्यातले पूर्वीचे काही कलाकार तबल्यावर चक्रपरण वाजवायचे. मोठा अवघड प्रकार! पहिल्या समेवर पहिला धा, दुसऱ्या समेवर दुसरा धा… असा हा प्रकार असतो. त्याचं हस्तलिखित तयार करून मी पुलंना पाठवून दिलं. पुलं यात फार रस घेतात. गोव्यात आले की, माझ्याकडे एक बैठक असतेच त्यांची.’ दुसरी अशी मी मिळवून ठेवली आहे ती म्हणजे ‘मेघांची परण’ , ‘गिडगिंद गिडगिंद करान् गिडगिंद…’ अशी ही परण वाजवणं जाऊ द्या नुसती. चांगली म्हणता आली तरी ढग गडगडल्याचा भास होईल. तीही मी जपून ठेवली आहे. व्याघ्रपरणही आहे.
माझ्याकडच्या विविध पुस्तकांतल्या रागांची संख्या मोजली, तर ती किमान १६ हजार भरेल. त्यामुळेच आजचे कोणी कलाकार ‘मी नवीन राग निर्माण केला’ असं जेव्हा सांगतात, तेव्हा मी त्याकडे दुर्लक्ष करतो. कसा विश्वास ठेवायचा त्यावर?
दुर्मीळ रेकॉर्डस्ही
नुसती पुस्तकंच नाही, तर दुर्मीळ प्राचीन म्हणता येतील अशा रेकॉर्डस्ही आहेत माझ्याकडे! सुंदराबाई, मलकाजान, शाहीर पांडुरंग खाडिलकर, खाप्रुमाम पर्वतकर, मास्टर दीनानाथ, केसरबाई… तुम्ही नावं घ्याल त्यांची रेकॉर्ड माझ्याकडे आहे. शिवाय या साऱ्या कलाकारांच्या छायाचित्रांचा प्रचंड संग्रह माझ्याकडे आहे. त्यात कोण नाही? केसरबाई, मोगुबाई, पी. मधुकर, पोरगेलेशी किशोरी, नीनू मुजुमदार, मिसरूड फुटू लागलेले भीमसेन-कुमार यांचा एकत्र फोटो आहेच, शिवाय शिवरामबुवा बने, निवृत्तीबुवा, दाढीधारी ऋषीसारखे स्वामी पर्वतकर, व्हायोलिनवाले पं. गजाननबुवा जोशी, दीनकर अमेंबल, वझेबुवा, कागलकर असे शेकडो फोटो आहेत. एवढे सारे दिग्गज तुम्हाला एकत्र क्वचितच मिळतील.
यांचे फोटोच काय, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, गेली अनेक वर्ष वृत्तपत्रात जी संगीताची परीक्षणं छापून येतात त्याच्या कात्रणांची फाईलही मी करून ठेवली आहे. अनेक वर्षांपासूनची समीक्षणं त्यांत आहेत. संगीताच्या प्रवाहांचा आढावा घेताना ही परीक्षणंही मौलिक ठरतात. हे झालं लेखनाविषयी. त्याच्या जोडीला अनेक हत्यारंही आहेत. आमचं सरदार घराणं. गाण्यातली आणि शिकारीतली अशी दोन्ही हत्यारं आहेत. जवळपास २० प्रकारचे तबले आहेत. जुना दिलरुबा, पियानो, ऑर्गन, बुलबुल तरंग, मृदुंग अशी सर्व साधनं आहेत. ‘तुकाराम’ म्हणून गाजलेल्या विष्णुपंत पागनीसांनी खुद्द दिलेले टाळ-मृदुंगही मी जपून ठेवलेत.
पैशासाठी नाही
मुंबईचे एक संगीतप्रेमी वकील (नाव आता आठवत नाही) एकदा हा संग्रह पाहायला आले. थक्कच झाले पाहून! म्हणाले, ‘‘लाखो रुपये किंमत होईल याची.’’ मी सांगितलं : ‘‘माफ करा. मी पैशासाठी कधी संगीत केलं नाही. संग्रहही त्यासाठी नाही केला. केवळ शौक म्हणून पदरचे पैसे ओतून मिळेल त्या किमतीत मी हे सारं जमा केलं. याची किंमत काय करणार.’’ कुमार, भीमसेन असे कलाकार माझ्याकडे गाऊन गेलेत. एकदा सुचेता भिडे-चाफेकर तार करून हे सारं पाहायला आली. ते पाहिलं आणि म्हणाली, ‘‘तंजावरला मला जे जे काही मिळालं, ते सारं तुमच्याकडेही आहे.’’ तिने तिला हवे ते तुकडे घेतलेही.
आता खंत म्हणाल तर असे कोणी जिज्ञासू कलाकार भेटत नाहीत. पं. अभिषेकी, सुचेता असे थोडेफार येतात. पण सध्याच्या पोटभरू कलेच्या शोधात असणाऱ्या कलावंतांसाठी हे उपयोगी नाही. स्पाँडिलायटिस आजारामुळे माझं तबलावादन जवळपास थांबलंच आहे. उल्हास सुखठणकर हा एकमेव तबलावादक मात्र शोधत आता. तो सध्या माझ्याकडून हे घ्यायचा प्रयत्न करतोय, पण तोच काय, जो येईल त्याला मी हे लयकारीचं भांडार द्यायला तयार आहे, माझी शिकवायचीही तयारी आहे.
संग्रहाचं म्हणाल तर आता हे सारं सांभाळणं तसं अवघडच होतं. ८३ वर्षांचं वय लक्षात घेता, ते तसं त्रासाचंच आहे. खर्चीकही आहे. माझ्या संग्रहातल्या साडेतीनशे नाटकांना नुकतीच वाळवी लागत होती. हे सारं सांभाळायची उस्तवारी आता जमत नाही. इथली कला अकादमी हे सारं मागतेय, पण त्यांना द्यायला जीव होत नाही… पण तरीही कोणी तरी हे सांभाळायला हवं असंही वाटतं!
– अशा कात्रीत सध्या मी आणि माझा हा संग्रह सापडलो आहोत.
(शब्दांकन : गिरीश कुबेर)