डॉ. संजय मंगला गोपाळ
साने गुरुजींच्या चौऱ्याहत्तराव्या स्मृतिदिनी (११ जून) रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या त्यांच्या जन्मगावी ‘समता संगर संकल्प मेळावा’ आयोजित होत आहे. हे साने गुरुजींचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी अर्थात १२५ वे जयंती वर्ष. या निमित्ताने ‘साने गुरुजी १२५’ अभियानाअंतर्गत सर्वांना ज्ञात मातृहृदयी साने गुरुजींबरोबरच, लढवय्या सेनानी साने गुरुजींचे स्मरण अधिक औचित्यपूर्ण ठरेल.
मातृहृदयी साने गुरुजी सर्वांना माहीत आहेत. गुरुजींची ‘श्यामची आई’ वाचलेली नाही असा मराठी माणूस दुर्मीळ. त्यामुळे गुरुजींच्या या मातृहृदयी कोमल बाण्याचा इथे बोलबालाही खूप झालेला आहे. मात्र प्रत्यक्षात साने गुरुजी होते संत तुकोबारायांनी लिहून ठेवल्याप्रमाणे- ‘‘मऊ मेनाहूनि आम्ही विष्णुदास। कठिण वज्रास भेदूं ऐसे।’’ कोमल हृदयी साने गुरुजी अनेकदा आपल्या लेखनातून आणि प्रत्यक्ष छेडलेल्या अनेक आंदोलनातून आपल्याला कठीण वज्रास भेदण्याच्या आवेशात भेटतात, दिसतात.
दलितांना पंढरपूर मंदिर प्रवेशासाठी आमरण उपोषण
अनेक पुराणमतवादी रूढी परंपरांमुळे भारतात जाती-जातीत विषमता आणि अन्याय होत आला आहे. अनेक समाजसुधारकांप्रमाणे साने गुरुजीही या सामाजिक विषमतेविरुद्ध निर्धारपूर्वक लढले. स्वातंत्र्य लढ्याच्या काळात ‘आधी राजकीय की आधी सामाजिक’, हे द्वंद्व अनेकदा समोर येत असे. भारताचे स्वातंत्र्य अगदी हाकेच्या अंतरावर आलेले असताना १९४७ च्या मे महिन्यात महात्मा गांधीजींनी साने गुरुजींना तार करून कळवलं होतं की, ‘‘तुमचे उपोषण पूर्णत: चुकीचे आहे. पंढरपूरचे मंदिर लवकरच हरिजनांसाठी खुले केले जाईल. कृपा करून उपोषण थांबवा व तशी उलट तार करा!’’ अख्खा देश महात्मा गांधीजींना सर्वोच्च नेता मानत होता. साने गुरुजी स्वत: गांधीजींचे सच्चे अनुयायी होते. मात्र गुरुजींची सामाजिक समतेची तळमळ आणि त्यासाठी प्राणांची बाजी लावण्याची तयारी इतकी तीव्र होती की त्यांनी गांधीजींना सविस्तर पत्र लिहून उपोषण संपवण्यास नम्र नकार दिला. पत्रात गुरुजींनी लिहिलं- ‘‘महाराष्ट्रभर फिरून मी संगितले आहे की पंढरपूर मंदिर हरिजनांसाठी मोकळे झाले नाही तर मी उपवास करून निघून जाईन. त्यांच्या डोळ्यात पाणी येई. त्या अश्रूंची का मी वंचना करू? कायदा केव्हा होईल तेव्हा होवो. माझे डोळे त्याच्याकडे कधीच नव्हते. मी बडवे मंडळींसामोर उभा आहे… आत्मक्लेशाने ब्रिटिशांचीही हृदये आम्ही वळवू पाहतो, मग बडवे मंडळींची मी का पाहू नये?… काही क्षण असे असतात की सारे जग विरुद्ध झाले तरी आपण अचल राहावे ही तुमचीच शिकवण आहे.’’
हे आमरण उपोषण साने गुरुजींनी का सुरू केलं? हे उपोषण नेमकं स्वातंत्र्यप्राप्तीच्या सुमारासच का ठरवण्यात आलं? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं समजून घेणे आवश्यक आहे. पंढरपुरात आपले आमरण उपोषण सुरू करताना गुरुजींनी चंद्रभागेच्या पात्राजवळ जमलेल्या विशाल जनसमुदायासमोर केलेल्या दीर्घ भाषणातल्या पुढील भागातून ते आपणास समजू शकेल. साने गुरुजी म्हणाले होते, ‘‘प्रेममय बना म्हणजेच तुम्हाला सुखशांतीचा ठेवा सापडेल. परंतु हरिजनांना आजपर्यंत तुम्ही दूर ठेवीत आला आहात. अस्पृश्यांना जवळ घेतलेत की परमेश्वर जवळ येईल. खरा स्वधर्म येईल. म्हणून मी म्हणतो, अस्पृश्यता तरी नष्ट होवो, नाही तर माझे प्राण जावोत!’’ विनोबाजी म्हणतात त्याप्रमाणे, अस्पृश्यांचे वरील बंधने दूर करण्यासाठी स्पृश्यांनी झटले पाहिजे, अस्पृश्यांनी नव्हे. ज्यांनी अन्याय केला त्यांनीच तो धुवून काढला पाहिजे. म्हणून माझ्या या प्रचाराला स्पृश्योद्धार मोहीम म्हणतो…
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण!
गुरुजींनी शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढवलेले अनेक लढेही प्रेरणादायी आहेत. अलीकडे आपल्याकडे महामार्ग, मुक्त मार्ग किंवा फ्री वे, समृद्धी महामार्ग अशा विविध महामार्गांची चढाओढ लागलेली आहे. या मार्गांवरून धावणाऱ्या गाड्यांवर लावल्या जाणाऱ्या टोल संदर्भात उलटसुलट चर्चाही आपण ऐकत असतो. कधी मधी त्या संदर्भातली आंदोलनेही कानावर येत असतात. मात्र स्वातंत्र्यपूर्व काळात टोलविरोधी आंदोलन झाल्याचे आपण ऐकले आहे का? गोरगरीब शेतकऱ्याला आपला शेतमाल बाजारात विकायचा असेल तर त्याच्यावर अमळनेर म्युनिसिपालटीने १९३७ -३८ या आर्थिक वर्षापासून लादलेल्या अन्याय्य टोलच्या विरोधात पहिलं आंदोलन साने गुरुजींनीच उभारलं होतं. त्यावेळी, अमळनेरच्या हद्दीत शेतीमाल घेऊन येणाऱ्या बैलगाड्यांवर म्युनिसिपालटीने टोल आकारणी सुरू केली होती. ही टोल आकारणी अत्यंत विषम स्वरूपाची होती. कारण स्वयंचलित मोटारी आणि रबरी टायर असलेल्या बैलगाड्यांना यातून सूट दिलेली होती; पण लाकडी चाके असलेल्या बैल गाड्यांवर मात्र हा टोल आकारला जात होता. खरे तर यापोटी प्रांतिक सरकार म्युनिसिपालटीला अनुदान देत होते. असे असूनही तूट भरून काढण्याच्या नावाखाली म्युनिसिपालटी बैलगाड्यांवर टोल आकारणी करीत होती. पूर्व खान्देशातील शेतकरी त्यामुळे नाराज होते. मात्र त्यांच्या नाराजीची दखल फारशा गांभीर्याने घेतली जात नव्हती. साने गुरुजींनी अगदी सुरुवातीपासून याविरुद्ध आवाज उठवला आणि रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांना संघटित करायलाही सुरुवात केली. त्यांच्याबरोबर त्यांचे विद्यार्थीही होते. १६ मे १९३८ रोजी अमळनेर शहरातील आठ नाक्यांपैकी तीन नाक्यांबाहेर बैलगाड्या अडवण्यात आल्या. २०० – ३०० बैलगाड्या शहराच्या हद्दीबाहेर उभ्या राहिल्या. पुढे प्रांतिक सरकारच्या मध्यस्थीने मधला मार्ग काढण्यात यश मिळाले आणि हा लढा यशस्वीपणे संपला.
शेतकऱ्यांवरील अन्य सर्व प्रकारच्या अन्यायांविरुद्ध साने गुरुजींनी नेहमीच प्राधान्याने लक्ष घातले. त्यांचे ‘‘आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान; शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण! किसान मजूर उठतील, लढण्या कंबर कसतील, एकजुटीची मशाल घेऊन पेटवतील हे रान!’’ हे गीत चळवळीतील कार्यकर्ते आजही गात असतात.
कामगार लढ्यातही प्राणपणाने अग्रभागी
दलित मागासवर्गीयांचे सामाजिक प्रश्न, शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्न याबरोबरच साने गुरुजी श्रमिकांच्या- कामगार कष्टकऱ्यांच्या लढ्यातही अग्रभागी राहिले. उत्पादन वाढीमुळे रोजगार निर्माण होतो. देशाचा विकास होतो. मात्र यासाठी कारखान्यांमधून राबणाऱ्या कामगारांच्या मुखी जर सुखाचा घास लागत नसेल तर अशा विकासाला काय अर्थ, हा गुरुजींनी त्या काळात विचारलेला प्रश्न आजही कामगार चळवळ विचारत असते. १९३८ च्या सप्टेंबर – ऑक्टोबरात गुरुजींनी हाती घेतलेले एक प्रकरण कामगारांच्या संघटित होण्याच्या अधिकाराशी निगडित होते. या लढ्याचा तात्कालिक स्थानिक संदर्भ हा धुळ्यातील न्यू प्रताप मिलमधील कामगार कपात, संप आणि टाळेबंदीचा होता, तर व्यापक संदर्भ हा मुंबई प्रांतिक सरकारने आणलेल्या मालक-मजूर तंटा विधेयक हा होता. महिना उलटून गेला तरी टाळेबंदी उठत नव्हती. कामगारांचे आंदोलन तीव्र करण्यासाठी बोलावलेल्या सभेत बोलताना गुरुजींनी अचानक तीन दिवसांत सन्मान्य तोडगा निघाला नाही तर तापी नदीत जलसमाधी घेण्याची घोषणा केली. त्याबरोबर चक्रे वेगाने फिरली. खान्देशातील विविध ठिकाणांहून शेतकरी, कामगार, विद्यार्थी धुळ्यात येऊ लागले. सेनापती बापट गुरुजींसोबत जलसमाधी घेण्याच्या इराद्याने धुळ्यात दाखल झाले. मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घातले, त्यामुळे गुरुजींनी उपोषण जारी ठेवत जल समाधीचा निर्णय पुढे ढकलला. नंतर दोन दिवसांत तडजोड होऊन गिरणी मालकांनी टाळेबंदी मागे घेतली.
स्वातंत्र्य लढ्यातील जाज्वल्य कामगिरी
केवळ शेतकरी, शेतमजूर आणि कारखान्यातील कामगार यांच्याच प्रश्नांवर नव्हे, तर साने गुरुजी स्वातंत्र्यप्राप्तीच्या लढ्यातही कंबर कसून आघाडीवर होते. स्वातंत्र्य लढ्यातील सहभागामुळे आपल्या अवघ्या ५० – ५१ वर्षांच्या आयुष्यातील सुमारे २५ – २६ वर्षांच्या सामाजिक-राजकीय सक्रियतेत गुरुजी सुमारे ६-७ वर्षे इंग्रजांच्या तुरुंगातच होते. तुरुंगवासात गुरुजींना जसा अनन्वित अत्याचाराचा सामना करावा लागला तसा विनोबाजी, मधु लिमये यांसारख्या दिग्गजांचा सहवासही लाभला. अनेक उत्तमोत्तम इंग्रजी पुस्तके गुरुजींनी तुरुंगात नुसती वाचूनच नाही काढली तर त्यातली अनेक अनुवादित केली. अनेक कथा, कविता, कादंबऱ्या, वैचारिक लेखनही गुरुजींनी तुरुंगातून केले. या संदर्भात डॉ. चैत्रा रेडकर यांच्या ‘साने गुरुजी व्यक्ती आणि विचार’ या ग्रंथातील हा उतारा स्वयंस्पष्ट आहे.
‘‘ऑगस्ट १९३२ मध्ये धुळे तुरुंगातील काही राजकीय कैद्यांची रवानगी नाशिकच्या तुरुंगात करण्यात आली. त्यात साने गुरुजींचाही समावेश होता. नाशिकच्या तुरुंगातील जेलर रोच याने राजकीय कैद्यांवर अनेक अपमानास्पद बंधने लादली होती. त्यापैकी एक सक्ती म्हणजे संध्याकाळी कैद्यांच्या गिनतीच्या वेळी प्रत्येकाने पायावर हात ठेवून गुडघ्यात मान घालून उकिडवे बसायला हवे. साने गुरुजींनी याला विरोध केल्यामुळे त्यांना दंडाने मारहाण करण्यात आली. फितुरीचा आरोप ठेवून इतर कैद्यांपासून अलग कोंडण्यात आले. हातापायांत साखळदंड व बेड्या ठोकण्यात आल्या. मनोधैर्य खचावे यासाठी त्यांना हर प्रकारे त्रास देण्यात आला. साने गुरुजींचे मनोधैर्य काही खचले नाही; उलट ‘श्यामची आई’ या त्यांच्या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखन त्यांनी या तुरुंगवासात केले. किंबहुना इतर तुरुंगवासांच्या तुलनेत त्यांचे सर्वाधिक लिखाण येथेच झाले.’’
१४-१५ महिन्यांच्या तुरुंगवासानंतर ऑक्टोबर १९३३ मध्ये नाशिक तुरुंगातून सुटल्यावर ते पालगड, वर्धा असे फिरून अमळनेरला परतले. गांधीजींनी जुलै १९३३ मध्ये वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ सुरू केली. साने गुरुजींनी त्यानुसार २६ जानेवारी १९३४ रोजी वैयक्तिक सत्याग्रह केला. त्यांना चाळीसगाव येथे अटक होऊन चार महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली व धुळे तुरुंगात ठेवण्यात आले. तिथे त्यांनी दोन अनुवादित ग्रंथांची निर्मिती केली. १९४२ भारत छोडो आंदोलनात संपूर्ण देशातील तरुण पेटून उठला होता. १९४२ च्या अंतापर्यंत एकूण सुमारे ६६ हजार लोकांना अटक झाली होती. साने गुरुजींना १८ एप्रिल १९४३ ला मुंबईत अटक झाली. एकूण २१ महिन्यांच्या या तुरुंगवासात गुरुजींनी ४ चरित्रे ‘इस्लामी संस्कृती’ व ‘चिनी संस्कृती’ हे माहितीपर ग्रंथ, गोड निबंध भाग १ ते ३ आदी ग्रंथांची निर्मिती केली.
तरुणांसाठी दिला कृती कार्यक्रम
स्वातंत्र्यलढ्यात भारतातील सर्व जाती धर्माच्या लोकांचा सहभाग होता. या लढ्याने स्वतंत्र भारत देश हा कुणा एका धर्माचा न राहता सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी सम – न्यायाने असेल, याचाही पाया याच स्वातंत्र्य लढ्यात रचला गेला. देशाने धर्माधिष्ठित राष्ट्रवादाचा स्वीकार न करता स्वातंत्र्यलढ्याने जोपासलेली आणि वृद्धिंगत केलेली सर्वसमावेशक राष्ट्रवादाची जोपासना केली. या सगळ्यात कृतिशील आणि विचारक स्वातंत्र्यसेनानी साने गुरुजींचे मोठे योगदान राहिले आहे. स्वातंत्र्य चळवळ, राष्ट्रवाद- धर्म जातीय सलोखा आणि शेतकरी व कामगारांची पिळवणूक आणि त्यातून वाढणारी विषमता या साऱ्यावर अत्यंत मार्मिक विश्लेषण आणि त्या आधारे धडाकेबाज कृती कार्यक्रम हे साने गुरुजींचे वैशिष्ट्य त्यांनी लिहिलेल्या ‘सोन्या मारुती’ या ग्रंथातील उताऱ्यात पाहायला मिळते.
‘‘तुम्ही तरुणांनी, अभ्यास – मंडळे काढा, रात्रंदिवस श्रम करून भरपूर विचार मिळवा. निश्चित विचार जवळ करा आणि ते विचार गावोगावी पेरीत चला. बहुजन समाजाच्या मनोभूमी तापलेल्या आहेत. आता विचारांचा पाऊस पडू दे.’’
तरुणांना आवाहन करताना गुरुजी समाजातील विविध घटकांच्या हालअपेष्टा आणि अन्यायाकडे लक्ष वेधतात आणि त्याबाबत सक्रिय होण्याचे आवाहन करतात. ते सांगतात, ‘‘ उठा सारे तरुण. ज्याला ज्याला हृदय व बुद्धी म्हणून काही असेल त्याने त्याने उठले पाहिजे आणि भांडले पाहिजे. पिळले जाणारे शेतकरी, भरडले जाणारे मजूर, मारले जाणारे हरिजन (दलित) यांना कोण मुक्त करणार? स्त्रियांचे अपार अश्रु कोण पुसणार? मुलांची मारली जाणारी मने कोण वाचविणार? नरकासारखे तुरुंग कोण सुधारणार? रूढी कोण पुरणार?’’
गुरुजींनी शंभरहून अधिक पुस्तके लिहिली. यात कथा, कविता, गीते, कादंबऱ्या, नाटके, चरित्रे, वैचारिक लेखन असे विपुल आणि वैविध्यपूर्ण साहित्य प्रकार गुरुजींनी हाताळले. या सर्व साहित्यात गुरुजींना भिडणारा राष्ट्रहिताचा, समतेचा आणि न्यायाचा विचार वाचकास तळमळीने सांगणे, पटवून देणे आणि त्यासाठीच्या रचनात्मक संघर्षशील कृतीसाठी लोकांना तयार करणे, हेच गुरुजींचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे जाणवते. ‘श्यामची आई’ हे या अनेक पुस्तकांपैकी एक, मात्र एकमात्र नाही!
‘साने गुरुजी १२५ अभियान’ वर्षात साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट, साधना साप्ताहिक, राष्ट्र सेवा दल, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय व अन्य समविचारी ७० – ७५ संस्था संघटना व चळवळींनी एकत्र येत निर्धार केला आहे की, देशभरात कोमल आणि मातृहृदयी साने गुरुजींसोबतच सामाजिक – आर्थिक – राजकीय विषमता आणि अन्याय अत्याचाराविरुद्ध एल्गार पुकारणाऱ्या सेनानी साने गुरुजींची प्रतिमा जनमानसात दृढपणे रुजवू! त्यांच्या क्रांतिकारी विचार आणि आचारातून प्रेरणा घेत, देशाचे समतावादी संविधान आणि त्यातील लोकशाही – स्वातंत्र्य – बंधुता आणि धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांचा प्रचार – प्रसार व जतन – संवर्धन करू! संविधानवादी समंजस भारतीय नागरिक घडवण्याचे काम संयुक्तरीत्या प्राधान्याने उभे करू!
sansahil@gmail.com
(लेखक साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे पूर्व अध्यक्ष आणि जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयाचे राष्ट्रीय समन्वयक आहेत.)