‘लोकरंग’मधील (१२ ऑक्टोबर) ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ सदरात गिरीश कुबेर यांनी ‘आय एम ग्लॅड…’ हे मनोहर भिडे यांचे शब्दबद्ध केलेले स्नेहचित्र केवळ एका व्यक्तीचे शब्दचित्र नाही, तर ते एका सरत्या काळाच्या मूल्यांचे, एका तत्त्वनिष्ठ विचारधारेचे आणि एका हरवत चाललेल्या संस्कार-संपदेचे जणू आत्मचिंतन आहे. ते वाचत असताना केवळ एका यशस्वी बँक अधिकाऱ्याचा प्रवास उलगडत नाही, तर एका अशा कालखंडाचा पट डोळ्यासमोर उभा राहतो, जिथे अर्थकारणाला माणुसकीचे आणि राष्ट्रीय चारित्र्याचे भक्कम अधिष्ठान होते.
१९५८ सालचा तो काळ… नुकतेच ट्रीव्हच्या इम्पिरिअल बँकेचे ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये झालेले रूपांतरण हे केवळ एका नामफलकाचा बदल नव्हता; तर ते एका राष्ट्रीय आकांक्षांचे प्रतीक होते. बँकिंग हे तेव्हा केवळ नफ्या-तोट्याच्या आकड्यांपुरते संकुचित झालेले नव्हते; त्याला सामाजिक साहचर्याचा एक विशाल पीळ होता. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्याचे आर्थिक उन्नयन करणे, हे त्या राष्ट्रीयीकरणामागील उदात्त ध्येय होते. ती दृष्टी अद्याप गढुळलेली नव्हती. पैशाच्या चकचकाटाने ती दिपून गेली नव्हती. कोणत्याही विशिष्ट धर्माच्या चौकटीत न बसणारे, पण माणूस म्हणून जगण्यासाठी अत्यावश्यक असलेले संस्कार जपण्याची एक स्वाभाविक आस्था तेव्हाच्या समाजात जिवंत होती. भिडे त्याच मूल्यांच्या मुशीतून घडले.
त्यांचा प्रोबेशनरी ऑफिसर ते बँकेच्या सर्वोच्च स्थानी, म्हणजेच अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ( CMD) पदापर्यंतचा प्रवास, हा केवळ एका व्यक्तीच्या व्यावसायिक यशाचा आलेख नाही, तर तो एका सनातन तत्त्वाची प्रचीती देतो. शिखरावर पोहोचण्यासाठी दरीचा तळ अनुभवण्याची, किंबहुना अनुभवण्याची तयारी ठेवण्याची जी अटळ आवश्यकता असते तिचे ते मूर्तिमंत उदाहरण आहेत. वृक्षाने कितीही उंच वाढावे, तरी त्याची मुळे जमिनीतच घट्ट रुजलेली असावी लागतात याचे ते प्रतीक आहेत. आजच्या तरुण पिढीमध्ये हा निम्नस्तरावरील अनुभव घेण्याचा संयम आणि ती मानसिकता खचितच आढळत नाही. परंतु हा दोष केवळ त्यांचा नाही; हे अपयश आपले, म्हणजेच आधीच्या पिढ्यांचे आहे. ज्या संस्कारांचे सिंचन आम्ही करायला हवे होते त्यात आम्हीच कुठेतरी उणे पडलो. भिडे यांच्या सुरुवातीच्या वाक्यांमधील ‘बँकिंग इज नॉट ओन्ली अबाउट मनी, इट्स अबाउट ह्युमन्स…’ हे उद्गार म्हणजे याच संस्कार ऱ्हासावरील एक सात्त्विक संताप आहे. त्यांचा त्रागा वर्तमानातील व्यवस्थेशी जितका आहे, त्याहून अधिक तो आपण गमावलेल्या भूतकाळातील मूल्यांशी आहे, हेच त्यातून प्रकर्षाने जाणवते.
‘बँकिंग म्हणजे केवळ पैसा नाही तर ते माणसांबद्दल आहे,’ हे त्यांचे विधान म्हणजे आजच्या ‘फिनटेक’ आणि ‘अल्गोरिदम’ केंद्रित वित्तीय जगाच्या मूळ गाभ्यावर केलेला प्रहार आहे. पैसा हे साध्य नसून साधन आहे आणि त्या साधनाचा अंतिम उद्देश मानवी कल्याणातच सामावलेला आहे, हे तत्त्वज्ञान आजच्या कॉर्पोरेट जगात विस्मृतीत गेले आहे. त्यांचा परखडपणा कुठून येतो? तो येतो प्रामाणिकपणाच्या भक्कम पायातून. त्यांच्या गरजा ‘माफक’ होत्या आणि जीवनाकडून अपेक्षा रास्त होत्या. आपल्या हक्काच्या नसलेल्या पैशासाठी कोणाची लाचारी न पत्करण्याचा जो बाणा असतो, तोच त्यांना देशाच्या अर्थमंत्र्यांसमोरही निर्भीडपणे मते मांडण्याचे धैर्य देतो. हा संस्कार आज औषधालाही सापडत नाही, कारण आज ‘लाचारी’ला ‘व्यावहारिकता’ नावाचे गोंडस नाव दिले गेले आहे.
ऐंशीच्या दशकानंतर आलेल्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला गती दिली असेलही, पण त्याचबरोबर एका नव्या मूल्यऱ्हासालाही जन्म दिला. वेग… प्रचंड वेग, स्वैर आचरण आणि झटपट श्रीमंतीची एक अतृप्य पिपासा आजच्या तरुणाईत भिनली आहे. पैसा हेच प्रगतीचे अंतिम मापदंड बनल्यामुळे भ्रष्ट आचरणाची सामाजिक लज्जाच जणू लोप पावली आहे. ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी, तिचेच प्रदर्शन मांडले जात आहे. या अध:पतनाची अचूक जाणीव भिडे यांच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त होते. परंतु भिडे यांचे व्यक्तिमत्त्व केवळ भूतकाळात रमणारे नाही. वयाच्या या टप्प्यावरही समाजातील विपरीत घटनांशी दोन हात करण्याची त्यांची दुर्दम्य इच्छा आणि त्याच वेळी संगीत, साहित्य, व्यायामासारख्या गोष्टींतून जीवनाचा निखळ आनंद घेण्याची त्यांची वृत्ती, हा एक विलक्षण मिलाफ आहे. ती केवळ सकारात्मकता नाही; तर आजच्या धकाधकीच्या, निरर्थक आणि मृतवत जगात श्वास घेणाऱ्या प्रत्येकासाठी तो एक आदर्श वस्तुपाठ आहे. ‘I am glad, I am not young anymore’ हे त्यांचे अखेरचे वाक्य म्हणजे नैराश्य नाही, तर एका परिपूर्ण आणि तत्त्वनिष्ठ आयुष्य जगल्याच्या समाधानातून आलेली स्थितप्रज्ञता आहे. ज्या जगात मूल्येच हरवली आहेत, तिथे ‘तरुण’ नसण्याचा आनंद वाटणे, हेच कदाचित त्या मूल्यांशी एकरूप झाल्याचे सर्वोच्च लक्षण असावे.- बिपीन बाकळे
आम्ही भिडे साहेबांकडूनच शिकलो
‘लोकरंग’मधील (१२ ऑक्टोबर) ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ सदरात गिरीश कुबेर यांचा ‘आय एम ग्लॅड…’ हा लेख वाचला आणि १९७० ते २००० या काळात भारतीय स्टेट बँकेत कार्यरत असलेल्या आमच्या पिढीला मनोहर भिडे साहेबांचे आदरणीय रूप आठवले. बँकेत काम करताना समोरील खातेदाराचा चेहरा पाहून त्याला काय हवे आहे हे ओळखण्याचे कसब आम्ही भिडे साहेबांकडून शिकलो. आणि म्हणूनच बँकेतील यशस्वी कारकीर्द करून समाधानाने निवृत्त झालो. ‘बँकिंग इज नॉट अबाऊट ओन्ली मनी, इट्स अबाऊट ह्यूमन्स’ त्यांच्या काळातली विचारधारा आजच्या यांत्रिकीकरणाच्या युगात पार बदलली आणि ‘बँकिंग इज ओन्ली अबाऊट सर्व्हर अँड नॉट अबाऊट ह्यूमन्स’ असे म्हणण्याची वेळ आली. कंत्राटी कामगारांना खातेदारांशी काही घेणे देणे नसते, कारण त्यांच्या डोळ्यासमोर सतत असतो तो फक्त कॉम्प्युटर. ते दिवस कधीच मागे पडले जेव्हा खातेदार समोर येताच त्यांचे नाव घेऊन काम विचारले जात होते. इतकेच नव्हे तर खातेदार हा आपल्या कुटुंबाचा सदस्य आहे अशा समजुतीने विचारपूस केली जात असे. आज खातेदारांचे स्वागत बाहेर असलेला ‘एटीम’ चा दरवाजा करतो आणि आतला नोकरवर्ग दुसऱ्या दरवाजाने घरी जातो.- सूर्यकांत भोसले, मुलुंड
स्नेहशील व्यक्तिमत्त्व
‘लोकरंग’ (१४ सप्टेंबर) ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ मधील गिरीश कुबेर यांचा रामकृष्ण नायक यांच्यावरील ‘विलीन’ हा लेख वाचला. ‘द गोवा हिंदू असोसिएशन’ या १०६ वर्षांची देदीप्यमान परंपरा लाभलेल्या आणि साहित्य, कला, संस्कृती, नाट्य, शिक्षण, सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या संस्थेशी तन-मन-धनाने जोडले गेलेल्या आणि एकरूप झालेल्या रामकृष्ण नायक यांच्या स्नेहशील जीवनाचा चलच्चित्रपट अंतरंगाला स्पर्शून गेला. मोठी माणसे झोकून देऊन जीवनभर कार्यरत असतात आणि स्वत:बरोबर संस्थेलाही एका उंचीवर नेऊन ठेवतात याचे हे अनोखे उदाहरण आहे. ‘स्नेहमंदिरा’त रामकृष्ण नायक यांचे स्नेहशील व्यक्तिमत्त्व विलीन झाले आणि डोळे पाणावले !- डॉ. विकास इनामदार
वस्तुनिष्ठ लेख
‘लोकरंग’ (१४ सप्टेंबर) मधील ‘वाचकांच्या शोधात मासिके’ या अंतर्गत मराठी नियतकालिकांविषयीचे प्रफुल्ल शिलेदार यांचा ‘सांस्कृतिक घडामोडींची आभासी एक्सप्रेस’आणि शेखर देशमुख यांचा ‘लष्कराच्या नियतकालीन भाकऱ्या’ हे दोन्ही लेख आवडले. मुख्य म्हणजे दोन्ही लेखांत डावा-उजवा कोणताही अभिनिवेश नाही. भोवतालच्या परिस्थितीच्या निरीक्षणावर व्यवस्थित चिंतन करून समतोलपणे लिहिले गेले आहेत. अतिपरदेशी उदाहरणांनी सजवले नाहीत. असे लेखन आता दुर्मीळ होत चालले आहे. यात मातृभाषेबद्दल हळवे उत्कट प्रेम नाही. परदेश स्तुती आणि स्वभाषा निंदा असा बुद्धिवादी सूरही नाही. दोन्ही लेख अत्यंत वस्तुनिष्ठ लेख आहेत. नवा काळ, नव्या गरजा समजावून घेण्याचा प्रयत्न आहे. हे दोन्ही लेख वाचल्यावर असे वाटले, शास्त्रीय संगीत जसे मूठभर अभिजनांचे आहे, जोपासणे महागडे आहे, परिश्रमाचे आहे, ते बहुजनांचे नाहीच; तसेच मराठी भाषेचे नियतकालिक-पुस्तक जग व्याकरणासह सांभाळायचेच म्हटल्यास मूठभर अभिजनांचेच राहील काय? किंबहुना ‘सत्यकथा’ पंथ तसा झालेलाच होता का? मग भाषेचे पुस्तकाचे उद्दिष्ट विचारांचे प्रक्षेपण याचे काय होणार? व्हॉटस्-अॅप, फेसबुक ही विद्यापीठे लोकांच्या गरजांनुसार मार्गदर्शन करणारी होतील का? लोकसंगीताप्रमाणेच लोककथा इत्यादी आहेतच. ही आधुनिक अनौपचारिक विद्यापीठे- कम-चव्हाटे काळानुरूप गती घेत राहतील ?- विनया खडपेकर
