‘लोकरंग’ मधील (८ जानेवारी) अंकात डॉक्टर शंतनू अभ्यंकर आणि डॉक्टर अरुण गद्रे या दोन डॉक्टरांचे डार्विनची थिअरी आणि नास्तिकता विरुद्ध आस्तिकता असे हिरिरीने वाद घालणारे लेख वाचले. करमणूक झाली. दोन्ही लेखांत पाश्चात्त्य वैज्ञानिक आणि नास्तिकता यांचे अनेक संदर्भ आहेत, म्हणून दोन- तीन थोर वैज्ञानिकांची याबाबतची मते पाहू या. न्यूटन आजही सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक मानला जातो. त्याचा ‘प्रिन्सिपिया’ हा १६८७ मध्ये प्रसिद्ध झालेला ग्रंथ सूर्यमालेतील ग्रहांच्या भ्रमणाचे गणित मांडून ते ग्रह विशिष्ट मार्गात ठरलेल्या वेगाने फिरत असतात, हे सांगतो. ते निरीक्षणांशी बरेच जुळते. कधी कधी एखादा ग्रह चुकारपणे मार्ग थोडा बदलतो, पण एकूण मोठय़ा कालावधीमध्ये हे भ्रमण नियमानुसार होते. त्यासाठी न्यूटन असे सुचवतो की, सृष्टी निर्माण करणारा परमेश्वर थोडा हस्तक्षेप करून ग्रहांचे भ्रमण सुधारत असावा. म्हणजे न्यूटन ईश्वरावर विश्वास ठेवत होता. मात्र त्याच्या कोणत्याही थियरीमध्ये ईश्वराच्या अस्तित्वाचा उपयोग नाहीये.

पुढे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला फ्रेंच गणिती व शास्त्रज्ञ लाप्लास याने ग्रहांच्या गणितात सुधारणा करून सिलेशियल मेकॅनिक्स हा ग्रंथ लिहिला, त्यात ग्रहांचे भ्रमण व त्याची कारणे अधिक चांगली दिली गेली. त्याने तो ग्रंथ नेपोलियनला सादर केला, त्यावेळी नेपोलियनने म्हटले, ‘‘तुमच्या ग्रंथात देवाचा कुठेच उल्लेख नाही असे समजले.’’  त्यावेळी लाप्लास उत्तरला, ‘‘त्या हायपोथिसिसची (गृहीतकाची) मला गरज लागली नाही.’’ कमीत कमी गृहीतकांवर आधारलेली थिअरी अधिक चांगली हे आपण मानतो. पुढे त्याच्या एका चरित्रकाराने मखलाशी केली की, लाप्लासने देवाचे अस्तित्व नाकारलेले नाही. पण त्याच्या थियरीत त्याचा उपयोग केलेला नाही. त्या काळात काही नास्तिक लोकांना पाखंडी ठरवून मृत्युदंड दिला गेला होता तेव्हा चरित्रकाराची मखलाशी योग्य म्हटली पाहिजे. लाप्लासने नेपोलियनला दिलेले उत्तर ऐकून दुसरा शास्त्रज्ञ लाग्रांज म्हणाला होता, ‘‘पण ते गृहीतक स्वीकारल्यामुळे आपले काम कितीतरी सोपे होते.’’

environment, elections, nations,
चारशे कोटी विसरभोळे?
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : वंचित नव्हे, मविआच भाजपची ‘बी टीम’?

डार्विनची सजीवांच्या उत्क्रांतीची थिअरी त्याने सज्जड पुरावे देऊन मांडली आहे. बा परिस्थितीचा परिणाम होऊन सजीवांमध्ये हळूहळू परिणाम होतो व नवीन प्रजाती तयार होतात. याची काही उदाहरणे त्याने दिली आहेत. त्याची पहिला सजीव कसा तयार झाला असावा याची थिअरी अजून स्वीकारली गेलेली नाही. ती  Conjecture किंवा तर्कच आहे. सजीवांच्या पृथ्वीवरील निर्मितीबद्दल आणखीही काही रोचक तर्क आहेत. जर पहिल्या एकपेशीय सजीवापासून उत्क्रांती होत आजचे विशाल आणि क्लिष्ट विश्व तयार झाले असेल, तर त्यासाठी बराच कालावधी लागला असेल. तशा थिअरीमधेही त्रुटी किंवा मोकळय़ा जागा  दिसतात. तरी बा परिस्थितीचा परिणाम होतो व सजीवांच्या नव्या प्रजाती बनतात, कधी कधी अगदी भराभर बनतात, याचा अनुभव अलीकडे कोविडच्या विषाणूमध्ये जे बदल झाले त्यातून आपण घेतला आहे. त्यामुळे उत्क्रांतीची थिअरी वैज्ञानिक असून ती शिकणे फायद्याचे आहे. 

डॉ. अरुण गद्रे लेखाच्या शेवटी म्हणतात, ‘निर्मिकाने (निर्मिकासाठी आदिशक्ती किंवा परमेश्वर हे शब्द वापरायला हरकत नसावी) केलेल्या निर्मितीने अचंबित, रोमांचित होऊन त्याच्या समोर नतमस्तक व्हावे.’ एवढंच जर साधायचं असेल तर त्यासाठी भारतात तरी एवढा प्रचार करायची जरुरी नाही. कारण भारतातले बहुसंख्य लोक- अगदी वैज्ञानिकसुद्धा- धार्मिक आहेत, या सृष्टीची निर्मिती कुणा परमेश्वराने केली आहे हे त्यांना मान्य आहे, त्या परमेश्वरासमोर ते नतमस्तकही होतात. पण तेवढय़ाने भागेल का? डार्विनवर प्रचंड आगपाखड करण्याचे कारण म्हणजे त्याच्या उत्क्रांतीच्या नियमावरून निघणारा, चिम्पान्झी आणि माणूस यांचे उत्क्रांतीमधील पूर्वज एकच असू शकतात हा निष्कर्ष. हा बायबल ग्रा मानणाऱ्या लोकांना अपमान वाटतो. कारण बायबलमध्ये सांगितले आहे की इतर सर्व सृष्टी तयार करून अखेर परमेश्वराने स्वत:च्या प्रारूपावरून सर्वोत्तम अशी मानवाची निर्मिती केली. भारतीयांना डार्विनच्या नियमाचा त्रास होत नाही. त्यांचा परमेश्वरच मुळी मत्स्य, कासव, रानडुक्कर, नरसिंह अशी हळूहळू उत्क्रांत होणारी रूपे घेऊन अवतरला आहे. ‘‘आमच्या पुराणातून आधुनिक विज्ञानाच्या खुणा मिळतात.’’ असा गर्व करणाऱ्या लोकांना इथे फायदा आहे.

आपण या सर्वातून काय बोध घ्यावा? परमेश्वराचे गृहीतक मानायचे की नाही हा वैयक्तिक निर्णय असावा. एखाद्या माणसाचे विज्ञानातील काम परमेश्वराचे गृहीतक न वापरता झाले असेल तर ते दर्जेदार आहे की नाही, याचा तो आस्तिक आहे की नास्तिक याच्याशी संबंध नसतो. एकूण नास्तिकांची संख्या खूप कमी आहे, भारतातले बहुसंख्य लोक परमेश्वरापुढे भक्तिभावाने नतमस्तक होतात तेव्हा डॉ. अरुण गद्रे यांना त्यासाठी प्रचार करण्याची गरज नाही.

– मंगला जयंत नारळीकर

lokrang@expressindia.com