प्रवीण भोळे
एखाद्या नाटकवाल्याचे निधन होते म्हणजे काय होते? त्याचा देह शांत होतो, त्याचे नाटक थांबते. नट असेल तर तो आता आपल्याला रंगमंचावर दिसणार नाही, लेखक असेल तर तो आता नवे नाटक लिहू शकणार नाही, दिग्दर्शक असेल तर त्याचे नवे नाटक मंचावर येणार नाही, इत्यादी इत्यादी. पण थिय्यामांसारखे नाट्यगुरू जातात, तेव्हा एवढेच फक्त घडत नाही. ते जातात तेव्हा एक प्रवाह थांबतो. प्रवाह रंगभूमीचा… नाटक-रंगभूमी ज्या असंख्य धाग्यांनी विणली गेली आहे, त्या धाग्यांच्या ताण्या-बाण्यांचा… नाटक-रंगभूमी तिच्या भवताली असलेल्या समाजावर जो परिणाम करत असते, त्या परिणामाचाही प्रवाह थांबतो. एखाद्या नाटकवाल्याच्या जाण्याने एवढे काही होऊ शकते? निश्चितच, विशेषत: तो नाटकवाला रतन थिय्याम असेल तर!
आपल्या देशात वेगवेगळ्या नाटकवाल्यांसाठी वेगवेगळे थिय्याम आहेत.
कोणासाठी ते नटांच्या शरीराकृतीतून धनुष्य-बाणापासून ते उत्तरप्रियदर्शीचा प्रेक्षकांकडे चाल करून येणारा अवाढव्य हत्ती साकारणारे, मंचावर नेत्रदीपक दृश्यात्मकता साकारणारे मायावी जादूगार आहेत.
कोणासाठी नटांच्या चित्ताकर्षक संरचना, कर्णमधुर संगीत आणि विलोभनीय प्रकाशयोजना या सगळ्यांचा सुयोग्य मेळ घालून रंगमंचावरचे क्षण केवळ साकारणारे नव्हे, तर ते साजरे करणारे विश्वकर्मा आहेत.
कोणासाठी ते कालिदासाच्या ऋतुसंहाराचे काव्य रंगमंचीय भाषेत अनुवादित करून प्रेक्षकांना त्याचा दृश्य-श्राव्य अनुभव देणारे किमयागार आहेत.
कोणासाठी मणिपूरचे ते सांस्कृतिक दूत आहेत.
कोणासाठी भारतीय रंगभूमीचा ते वैश्विक चेहरा आहेत.
कोणासाठी मणिपुरी जनतेच्या मनातल्या असंतोषाला नाटकातून वाचा फोडणारे ते विद्रोही रंगकर्मी आहेत.
कोणासाठी भारतीय रंगभूमीवरचे पाश्चिमात्य संस्कार दूर सारून नाटकाला आपल्या मुळांकडे परत नेणारे ते एक अस्सल भारतीय नाट्यदिग्दर्शक आहेत.
कोणासाठी दिल्लीतले राष्ट्रीय नाट्य विद्यालयातले प्रशिक्षण संपल्यानंतर भौतिक प्रलोभने नाकारून पुन्हा आपल्या डोंगराळ प्रदेशात जाऊन, तिथल्या तरुणांना गोळा करून, अनेक आपत्तींना तोंड देत, तिथल्या संकटांवर – मर्यादांवर मात करत, आजूबाजूचा हिंसाचार पचवत त्या तरुणांसाठी त्यांचे त्यांचे नाटक करण्याची संधी देणारे ते रंगभूमीवरचे क्रांतिवीर आहेत.
कोणासाठी- बांधकामाचा खर्च परवडत नाही म्हणून रडत न बसता, कोणाकडे भीक न मागता, आपल्या नटांसोबत स्वत: दगड-माती कालवून, हातात फावडं घेऊन आपले नाटकघर आपण स्वत: बांधणारे ते खरे रंगधर्मी आहेत.
कोणासाठी परदेशात जाऊनही, केवळ आपल्या देशबांधवांसाठी, आपली भाषा जाणणाऱ्या प्रेक्षकांसाठी नाटकांचे प्रयोग न करता, ब्रॉडवेच्या तिकीट खिडकीवर तिकिटे विकून व्यावसायिकरीत्या हाऊसफुल प्रयोग करणारे ते एक विलक्षण व्यावसायिक कलावंत आहेत.
तर भाबड्या स्वप्नाळू नवोदित नाटकवाल्यांसाठी यूट्यूब व्हिडीओत ‘ये देखो चांद’ म्हणत नाटक कसे ‘नसलेल्या गोष्टींचे माध्यम आहे’, हे शिकवणारे ते नाट्यशिक्षक आहेत. त्यांच्या जाण्याने वर्तमानकाळातली ही सगळी क्रियापदे आता भूतकाळात परिवर्तित झाली आहेत.
२० जानेवारी १९४८ रोजी कलासंस्कारांनी संस्कारित झालेल्या घरात त्यांचा जन्म झाला. बाळकडूच रंगमंचाचं! आई-वडील दोघेही रासलीला परंपरेतले. त्यामुळे लहानपणापासून गावोगावच्या फिरस्तीतून, देवादिकांची आख्याने ऐकत, ध्वनी-प्रकाशांचे खेळ खेळत त्यांच्यातला कलावंत फुलत गेला. त्यांचा जन्म कुठे झाला याबद्दलच्या नोंदींमध्ये मतभेद आहेत. कोणी म्हणतात, बंगालच्या दौऱ्यावर असताना तिथल्या नवद्वीपात त्यांचा जन्म झाला, तर कोणी म्हणतात, मणिपुरातच त्यांचा जन्म झाला. जन्मस्थळाविषयी वाद असले तरी थिय्यामांनी आपल्या कलापरंपरांची मणिपूरशी असलेली नाळ कधी तुटू दिली नाही.
लहानपणापासूनच त्यांना चित्रकलेची अतोनात आवड होती. तरुणपणी मात्र त्यांना लेखनाची ओढ लागली. विशी-बाविशीतच त्यांनी पाच-सहा कादंबऱ्या हातावेगळ्या केल्या होत्या. पण नाटकाच्या गारुडाने या सगळ्यांवर मात केली आणि तेविसाव्या वर्षी मणिपूर सोडून त्यांनी नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयात प्रशिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला. इथे त्यांना प्रशिक्षणाची नेमकी पद्धत कळली, जागतिक रंगपरंपरांशी परिचय झाला. मुख्य म्हणजे नाट्यशास्त्रापासून ते विविध प्रांतातल्या आपल्या संपन्न लोकरंगभूमीची ताकद त्यांच्या लक्षात आली आणि ते भारतीय नाट्यपरंपरेशी जोडले गेले. नाट्यप्रशिक्षण संपवून ते इम्फाळला परत गेले. आणि १९७६ मध्ये त्यांनी स्थानिक मणिपुरी तरुणांसोबत कोरस रेपर्टरी थिएटरची स्थापना केली. केवळ नाटकांच्या तालमी करून प्रयोग करणारी अशी ही नाट्यसंस्था नव्हती. थिय्यामांनी आपल्या नाट्यसंस्थेत, सामूहिक जीवनपद्धती, पर्यावरण रक्षण, स्वावलंबन या बाबी त्यांच्या नाट्यनिर्मिती प्रक्रियेत मिसळल्या. त्यांचे कलाकार, नाटकाच्या तालमी करता करता शेती करतात, कोंबड्या पाळतात, नाटकघराच्या स्वच्छतेपासून ते नाट्यतंत्रापर्यंत सगळी कामे आपली आपण करतात.
थिय्यामांच्या नाटकात अभिनय करणे म्हणजे नटांची एक प्रकारची शारीर-सांगीतिक साधनाच. थांग-ता या मणिपुरी युद्धकलेतला आवेश, वारी-लिबा, नटसंकीर्तन या लोकपरंपरांमधले कथनाचे विविध साचे, रासलीलेतला रसरशीतपणा आणि लाई-हरोबाच्या चक्राकार हालचालींनी भारीत झालेला रंगावकाश या सगळ्यांना पाश्चिमात्य अध्यापनशिस्तीची जोड… या सगळ्या घटकांमधून त्यांचे अभिनय-प्रशिक्षण सिद्ध होते. ही बहुपरंपरागत देहभाषा केवळ एक शैली होत नाही, ती मणिपूरच्या एतद्देशीय सांघिक स्मृतींची पुनर्स्थापना बनते, तत्कालीन राजकीय दडपणाला, मुस्कटदाबीला, आपल्या असंतोषाला देह-ध्वनीतून अभिव्यक्त करणारी अशी ती रंगभाषा ठरते.
आपल्या नाटकांमध्ये साकारत असलेल्या दृश्यरचनांमध्ये थिय्याम कमीतकमी साधनांचा वापर करून भव्यतेचा अनुभव निर्माण करतात. गडद अंधारातून जणू उसळी घेणाऱ्या उजेडाच्या प्रकाशरेषा, ध्वनींच्या लांब-लचक लहरी, बांबूंपासून तयार केलेल्या साध्या, पण ठसठशीत मंचवस्तू, मंडपीतून सळसळणाऱ्या कापडांवर उठणारे तरंग – या सगळ्या बाबींमधून हिंसेचे मौन, मृत्यूचा विलाप, शेतांवर पसरलेले रक्ताचे सावट, इत्यादींचा ते जिवंत अनुभव देतात. त्यांचे नट नाटकांमध्ये मैतेयी बोली बोलतात. पण वाक्यांपेक्षा हालचाली, ध्वनी, प्रकाश, वस्त्र आणि समूहस्वरातूनच त्यांचे नाटक अधिक बोलते. अधिक भिडते.
थिय्यामांच्या नाटकातून अवतरतात ते मिथकांचे समकालीन लागेबांधे. १९८४ च्या त्यांच्या चक्रव्यूह नाटकामध्ये अभिमन्यूची कोंडी मणिपूरच्या तरुणांच्या रक्ताळलेल्या राजकीय घुसमटीत रूपांतरित होते. चक्रव्यूहात अडकलेले निष्पाप शरीर संपूर्ण प्रदेशाच्या व्यथेसारखे वेदनादायी प्रतीक बनते. ‘उत्तरप्रियदर्शी’ ही कवी अज्ञेय यांची एक दीर्घकविता. तिच्या नाट्यरूपांतरात अशोकाच्या अंतर्मुखतेतून हिंसाचारोत्तर शांतीचे तत्त्वज्ञान उगवते. भासाच्या उरुभंगमधून युद्धाचा फोलपणा, मानवी नात्यांची भग्नता अधोरेखित होते. कालिदासाच्या ऋतूसंहारात प्रत्येक ऋतूंच्या आनंदोत्सव सोहळ्याचा भरजरी शालू साकारताना त्यासोबतच ते तिथल्या प्रादेशिक समस्यांच्या, अडचणींच्या काठपदराचेही दर्शन घडवतात. ‘नाइन हिल्स वन व्हॅली’ नाटकात मणिपुरात ओसंडून वाहणाऱ्या हिंसेला ते स्वप्न आणि विधींच्या प्रतिमांमधून मांडतात.
स्वातंत्र्योत्तर काळात वसाहतवादी जोखडातून मुक्त होण्यासाठी रंगभूमीच्या अवकाशात आपल्या मुळांकडे परत वळताना काही निर्णायक आवाज उभे राहिले – बी. व्ही. कारंथ, के. एन. पनिक्कर, हबीब तनवीर… रतन थिय्यामदेखील या अग्रगण्यांपैकी एक होते. भारतातल्या विशेषत: मणिपुरातल्याच पारंपरिक रंगभूमीचा, लोकपरंपरांचा त्यांनी अभ्यास केला, या परंपरांना आधुनिक रंगमंचावर पुनर्स्थापित केले. समकालीन प्रश्न त्यांनी अशा प्रकारे कालातीत परंपरांच्या माध्यमामधून मांडले. प्रादेशिक बोली, नृत्य, विधी, अभिनय-प्रशिक्षण यांना आधुनिक नाट्यजगतात प्रतिष्ठा दिली. आणि भारतीय रंगभूमीची नवी राष्ट्रीय रंगभाषा निर्माण केली.
त्यांच्या संवेदनशीलतेचे आणखी एक उदाहरण म्हणजे, २००१ मध्ये त्यांनी पद्माश्रीची केलेली पुरस्कारवापसी. नागा युद्धविरामानंतर निर्माण झालेली हिंसक परिस्थिती आणि केंद्राची उदासीनता यांच्या निषेधार्थ त्यांनी आपला सन्मान परत केला. ‘‘हा अवमान नाही, माझ्या व्यथित हृदयाने माझ्यावर केलेली सक्ती आहे,’’ असे त्यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले. कलाकाराच्या सार्वजनिक नैतिकतेचा हा धाडसी उच्चार त्यांच्या रंगभाषेइतकाच देशभर गर्जला, पोचला आणि उपेक्षित सप्तभगिनींमधल्या मणिपुरी जनतेच्या ठसठसणाऱ्या जखमेची वेदना आसेतुहिमाचल भारतीयांना इंद्रियगोचर झाली.
आज समाजमाध्यमांवरून, प्रसारमाध्यमांवरून होणाऱ्या खऱ्या-खोट्या भलावणींनी आमची इंद्रिये बोथट झाली आहेत. प्रलोभनांना चटावलेले संधिसाधू आंतरात्मे असोत वा अनामिक भयगंडाच्या सावटाखाली धास्तावलेली काळिजे असोत, कलावंत त्यांच्या कलेतून किंवा प्रत्यक्षही बोलेनासे झालेले आहेत. म्हणूनच थिय्यामांसारख्या एखाद्या नाटकवाल्याचे जाणे केवळ जाणे नसते. तो अंत असतो राजकीय रंगभूमी या संकल्पनेचा!
प्रवीण भोळे
(लेखक ललित कला केंद्राचे विभागप्रमुख आहेत.)
praveen@unipune.ac.in