|| मकरंद देशपांडे

‘चित्रा’चे सुंदर प्रयोग सुरू झाल्यानंतर एक दिवस माझा लेखक मित्र राजसुपे म्हणाला की, ‘‘Mr. Deshpande, you did a play in English language and that also Tagorels English.’’ अचानक मी भानावर आलो. कारण माझं शिक्षण हे मराठी माध्यमातलं; पण नाटकं लिहिली ती हिंदीत; आणि आता इंग्रजीत लिहिलेल्या काव्यबद्ध नाटकाची भाषा समजून, त्यातल्या काव्याला मी रंगमंचावर आणलं! म्हणजे एक गोष्ट साफ झाली की, नाटकाला भाषा ही ‘नाटक’ या माध्यमाचीच असते. आणि भाषेला फक्त शब्दांनी भरू नये, तर संवादाची माळ शब्दांनी गुंफून त्यात काही शब्दांनंतर रुद्राक्षाप्रमाणे एखादा विचारही गुंफावा. पण  रुद्राक्ष एकमुखी की पंचमुखी, यावरच चर्चा करून वेळ का दवडावा?

टागोरांच्या ‘चित्रा’ने जेवढा प्रभाव नट, तंत्रज्ञ आणि प्रेक्षकांवर केला, तेवढाच प्रभाव माझ्यातल्या लेखकावर केला आणि मी दीड वर्षांच्या लिखाणाच्या सुट्टीनंतर पुन्हा कामावर रुजू झालो.

गणेशजन्मावर नाटक लिहावंसं वाटलं. गणेशजन्माची कथा प्रत्येक वाचकाला माहीत असेलच. महादेवाने गणेशाचा शिरच्छेद केल्यावर माता पार्वती टाहो फोडते. म्हणून मग  महादेव गणेशाला पुन्हा जीवित करण्यासाठी शिवगणांना उत्तर दिशेकडे शीर आणण्यास पाठवतात. एक नाटककार म्हणून मी नंदीबरोबर उत्तर दिशेला गेलो आणि नंदीला आधी भेटला ऐरावत. लेखक म्हणून मला असं वाटलं, की नंदी आणि ऐरावत एकमेकांना ओळखत असावेत. कारण नंदी महादेवाचे, तर ऐरावत इंद्राचे वाहन. तेव्हा त्या दोघांच्या भेटीत नेमकं काय घडलं असेल?

उत्तर दिशेहून नंदी ऐरावताचे शीर घेऊन आला अशी एक कथा सांगण्यात येते. याचा अर्थ ऐरावत आणि नंदीचे युद्ध झाले. त्यात नंदी महादेवाच्या बळाने लढला म्हणून ऐरावत मारला गेला. पण माझ्यातल्या लेखकाला काही प्रश्न पडले. ऐरावताला धक्का नाही बसला? की जो नंदी एरवी आपल्याशी क्रीडा करायचा तो आज आपल्याला मारायला का आलाय? तो आपला मित्र आहे ना? त्यानं माझा विश्वासघात का केला? या प्रश्नांची उत्तरं शोधत मी ‘ऐरावत’ हे नाटक लिहिलं. त्यातली प्रमुख पात्रं होती.. नंदी आणि ऐरावत.

नाटकाची सुरुवात अगदी १९९८-९९ या काळातली. जुहूच्या शंकराच्या मंदिराबाहेरच्या रस्त्यावरून रावत आणि गेंदा हे दोघे गणपतीच्या मोदकांसाठी लागणारा पिठाचा डबा डोक्यावर घेऊन चाललेले असतात. पण रस्त्यावर गणपतीच्या आरत्या बॉलीवूड गाण्यांच्या चालीवर कॅसेट प्लेअरवर मोठय़ा आवाजात लावलेल्या असतात. त्याच्यावर नाचत चालताना रावतच्या डोक्यावरून पीठ सांडतं. ते त्याच्या डोक्यावरून अख्ख्या शरीरावर पसरतं. गेंदा माईकडे रावतची तक्रार करतो आणि मोदकाचं पीठ त्यानं सांडल्यामुळे त्याला शिक्षा व्हावी अशी मागणी करतो.  माई रावतला पाहते तर तो पिठानं पूर्ण माखलेला असतो. शिक्षा म्हणून माई त्याला एका हाताने कान पकडून दुसरा हात त्यातून सोंडेसारखा बाहेर काढायला सांगते. रावत जेव्हा तसे करतो तेव्हा माई म्हणते, ‘‘रावत, तुम ऐरावत दिख रहे हो, जाओ मंदिर की परिक्रमा करो.’’ ‘रावत बन गया ऐरावत’ असं म्हणत गेंदा त्याच्या मागे मागे जातो. जेव्हा रावत नंदीसमोरून जाणार असतो तेव्हा गेंदा त्याला म्हणतो, ‘‘ऐरावत, नंदी शिवजी के गण है, उनको नमस्कार करो.’’ ऐरावत वाकून नंदीला नमस्कार करतो तेव्हा नंदी ओरडतो आणि आपल्या मित्राला आपणच फसवून मारलं याबद्दल स्वत:लाच दोष देऊ लागतो. मूर्तीतला नंदी जिवंत झालेला पाहून गेंदा बेशुद्ध होतो. रावतला ताप भरतो.

माई गणेशजन्माची कथा दर चतुर्थीला देवळात सांगत असते. यावेळेस ती गणेशजन्माची कथा नंदीला सांगते. कलियुगातली सगळी संकटं दूर करण्यासाठी देव हवा होता म्हणून सगळी विघ्नं दूर करण्यासाठी विघ्नहर्त्यांला आधी आपलं शीर गमवावं लागलं. तेव्हा ऐरावताने स्वत:हून आपलं शीर अर्पण केलं. नंदीच्या मनातला अपराधभाव नष्ट केला गेला. रावत व गेंदा यांना आशीर्वाद देऊन नंदी पुन्हा मूर्तीरूपात बसला.

अतिशय बालक समजुतीनं लिहिलेलं मोठय़ांसाठीचं हे नाटक. कारण पुराणशास्त्रांतील गोष्टींना उगाचच तर्क लावू नये. त्यांत अर्थ शोधण्याऐवजी त्याचा नवरसांतील ‘अद्भुत’ या रसात अनुभव घ्यावा. कारण त्यातल्या कल्पना या आपल्या प्रतिभाशक्तीच्या खूप वर आहेत.

या नाटकाच्या तालमी सुरू केल्या तेव्हा मला पृथ्वी थिएटरच्या जिन्यावर पंडित सत्यदेव दुबे भेटले आणि त्यांनी विचारलं की, ‘मी ऐकलंय की तू गणेशजन्मावर नाटक करतोयस?’ मी ‘हो’ म्हणालो. तर मला म्हणाले की, ‘मी आत्ता पुण्याला जातोय, पण तुझ्या शोच्या दिवशी परतणार आहे. फक्त तू मला आठवण म्हणून पेज  कर.’ तेव्हा त्यांच्याकडे ‘पेजर’ होता. मी शोच्या दिवशी त्यांना पेज करायला विसरलो. पण दुबेजी शो पाहायला आले होते.

रंगमंचावर मोठ्ठा काळा कपडा पसरवला होता. अख्ख्या स्टेजनं काळ्या कपडय़ांचं पांघरूण ओढलं होतं आणि तेच कापड अगदी विंगेजवळ जाऊन भिंत होऊन उभं होतं. दोन्ही विंगेत बॅकस्टेजवाल्यांनी ती भिंत पकडली होती. प्रेक्षकांना बॅकस्टेजवाले दिसत नव्हते. विंगेतून दोन क्रॉस लाइट्सनी रस्ता उभा केला. त्यात गेंदा आणि रावत नाचताना दिसले. जसा पिठाचा डबा पडला, तशी कपडय़ाची भिंतही पडली. ते दोघे झाकले गेले आणि ब्लॅकआऊट झाला. मग पुढच्या भागात टॉप लाइट आला. त्यात काळं स्टेज दिसलं आणि मध्यभागी त्या स्टेजला उंचवटा दिसला. जणू काही तो नंदी आहे. माई जेव्हा म्हणते, ‘रावत, तू ऐरावत दिख रहा है..’ तेव्हा ऐरावत बनून रावत नंदीची परिक्रमा करतो. अचानक तो नंदी कपडय़ाखालून जोरात ओरडतो आणि स्टेजवरचा सगळा काळा कपडा खेचून उभा राहतो. या प्रसंगाने खऱ्या अर्थी प्रत्यक्ष नंदी प्रेक्षकांसमोर उभा राहिला आणि त्यामुळे प्रेक्षकांना धक्का बसला.

असंच एक अद्भुत रसातलं दृश्य.. जेव्हा नंदी ऐरावताला आपलं दु:ख सांगतो, की ऐरावताचं शीर आणल्यावर आकाशातून सर्व देवांनी त्याची स्तुती केली तेव्हा त्याला एकाकी वाटलं होतं. हे दृश्य दाखवताना पृथ्वी थिएटरमध्ये फक्त एवढाच प्रकाश ठेवला होता की नंदी खरंच अवकाशात उभा आहे असा भास प्रेक्षकांना झाला होता. नंदीला एका पातळ काळ्या प्लेटवर उभं केलं आणि ती प्लेट जवळजवळ झाकली आणि त्याच्या खालीही लाइट्स लावले. ती प्लेट तीन फूट उंचीवर होती. म्हणून असं वाटलं की नंदी अधांतरी आहे.

शो संपल्यावर दुबेजी पृथ्वीच्या आवारात गप्पा मारत बसले. माझी टीम हळूहळू त्यांच्या आजूबाजूला येऊन बसली. दुबेजी म्हणाले, ‘‘मं पंद्रह साल से गणेशजन्म पर नाटक करना चाह रहा हूँ और तुमने कर भी दिया!’’ गप्पा रंगल्या. रात्रीचा दीड वाजून गेला. ग्रुपमधल्या एका मुलाला काय झालं माहिती नाही. अचानक त्यानं दुबेजींना विचारलं, ‘सर, बातचीत, गप्पा वगरह सब ठीक हैं, पर इतना बताइए कि आपको नाटक पसंद आया के नहीं?’ दुबेजींनी चिडून त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, ‘‘अबे, मं नाटक देखने के बाद मकरंद के साथ दो घंटे बठा हूँ, इसका मतलब कुछ तो होगा ना!’’

टागोरांच्या ‘चित्रा’मुळे मी ‘ऐरावत’ लिहिलं आणि ‘ऐरावत’मुळे पुढच्या प्रवासासाठी मला गणपतीकृपेने दुबेजींच्या रूपाने एक नाटय़मित्र, नाटय़प्रेक्षक आणि आपलासा वाटणारा प्रचंड बुद्धिमान (नाटकासंबंधी) नाटय़गुरू लाभला.

त्याकाळी मी पृथ्वी थिएटरमध्ये- थिएटरच्या आवारात १२-१५ तास असायचो. दुबेजींमुळे आता त्या तासांना विचारांचा संदर्भ जोडला गेला. सगळ्यात मला आवडायचं जेव्हा दुबेजी पृथ्वीला यायचे आणि कॅफेमध्ये मी बसलोय हे पाहून आनंदून जायचे आणि बरोबर असलेल्या कुणा माणसाला म्हणायचे की- ‘‘अभी तुम जाओ, अभी मकरंद है यहां.’’

मग चहा-कॉफीवर गप्पा. पण त्या गप्पांत तीव्रता होती. दुबेजींकडे फारच चांगला सेन्स ऑफमर होता. एकदा मी आणि दुबेजी बोलत होतो. माझ्या बाजूला संजय नावाचा एक नट बसला होता. दुबेजी माझ्याशी बोलताना त्याच्याकडे मधे मधे पाहत होते तेव्हा संजय मानेनं होकार देत होता. अचानक दुबेजी थांबले आणि त्याला म्हणाले, ‘‘तुम क्यों मुंडी हिला रहे हो? तुम्हारा अ‍ॅप्रुव्हल नहीं चाहिए. दो लोग अगर बात कर रहे और तिसरा वहां बठा है, तो बात करते हुए उसे देखना पडता हैं.’’ संजय घाबरला.  संजयचा तो घाबरलेला चेहरा पाहून तेव्हाही मी हसलो होतो आणि आत्ता लिहितानाही हसू येतंय. आणि दुबेजींच्या बोलण्यातलं तथ्य आजही पटतंय.

जय गणेश! जय दुबेजी!

जय ऐरावत! जय नाटक!

mvd248@gmail.com