|| समीर गायकवाड

पस्तिशी पार केलेला सुदामा रणरणत्या उन्हात चिचोलीच्या आठवडी बाजारात रेटून उभा होता. त्याच्या चेहऱ्यावरचे विजळलेल्या आंब्यासारखे वांगाचे डाग एकदम रापून निघाले होते. आत्ताच त्याच्या पायाला पेटके आलेले. अजून दिवस जायचाच होता. घामाच्या धारांनी तो हैराण नव्हता झाला; मात्र आपली बोहणीच झाली नाही याचा त्याच्या पोटात खड्डा पडला होता. सुदामा हा बुरुडाचा. बायको चांगुणासह त्यानं पिढीजात धंदा टिकवला होता. पाटलांच्या पिढय़ांनी त्यांना मळ्यात आश्रय दिलेला. अलीकडील काळात त्याची स्थिती बिकट झाली होती. कारण काळाने जशी कूस बदलली तशी जुन्या धाटणीच्या वस्तूंची निकड कमी होत गेली. धान्य पाखडायचंच कमी झालं, तसं सूप फक्त रुखवतातच दिसू लागलं. घरोघरी स्टेनलेस स्टीलची भांडी दिसू लागली, तशी टोपली, दुरडय़ा हद्दपार होऊ लागल्या. कमी पशातली टिकाऊ प्लास्टिकची चटई, बस्करे मिळू लागताच त्याचाही फटका बसला. सुदाम्याचं सगळंच गणित बिघडलं. त्यातल्या त्यात एक बरं होतं, ते म्हणजे त्याच्या घरात खाणारी तोंडं कमी होती. त्याच्या लग्नाला सात-आठ र्वष झाली तरी घरात पाळणा हललेला नव्हता. पंचविशी उलटल्यावर त्याला पोरगी झाली. छकुली तिचं नाव. तीच त्या दाम्पत्याचं सर्वस्व होतं.

छकुली अभ्यासात विलक्षण हुशार होती. वर्गातला अव्वल क्रमांक तिनं टिकवून ठेवला होता. छकुलीचं चौथीचं वर्ष आता सरायच्या बेतात आलं होतं. तिनं आजवर कधीच कशाचा हट्ट केला नव्हता, आपल्या गरीब जन्मदात्यांना खजील होऊ दिलं नव्हतं. तेदेखील छकुलीला जीवापाड जपत. पण मागच्या पाच-सहा महिन्यांपासून तिनं एका खेळण्याचा हट्ट धरला होता. शाळेतल्या इतर मुलांकडं बघितलेला खेळण्यांतला मोबाइल तिला हवा होता- ज्यावर आकडेमोड करणं शक्य होतं, गाणी ऐकणं शक्य होतं! तिच्या बालहट्टावर सुदाम्यानं काही दिवस वेळ मारून नेली; पण अलीकडे छकुली रोजच त्याला मोबाइलबद्दल विचारू लागली होती, तेव्हा आवंढा गिळण्याखेरीज तो काहीच करू शकत नव्हता. तिला हवा असलेला मोबाइल पाच-साडेपाचशे रुपयांना होता. तेवढे पसे आणायचे कुठून, हा त्याच्यासाठी यक्षप्रश्न होता.

जिला आपण साधी बाहुलीदेखील कधी दिली नाही, तिनं अभ्यासात इतकी हुशारी दाखवूनही आपण तिला समाधान देऊ शकत नाही याचं सुदाम्याला शल्य होतं. अखेर यावर मार्ग काढताना त्यानं आठवडी बाजारात आपलं कसब आजमावायचं ठरवलं. कोवळ्या बांबूपासून त्यानं बासऱ्या बनवल्या. छकुलीनं त्यावर हिरव्या-निळ्या रंगांत नाजूक नक्षी काढली. एका बासरीला गोकर्णाच्या फुलांची निळाई दिली. पहाटेच उठून चांगुणेनं भाकऱ्या थापून दिल्या. जुनेर धोतरानं बंदिस्त केलेला बासरीचा डोलारा शिरावर घेऊन, खांद्यावर टोपल्यांची झोळी अडकवून सुदामा बाजाराला निघताच निरोपासाठी चांगुणा, छकुली बांधापर्यंत आले होते. घराबाहेर बसून असणारी मोत्या-चिल्याची जोडी तर शेपूट हलवत गावाच्या वेशीपर्यंत आली होती. वाटेतली कुत्री त्यांच्या अंगावर धावून जाऊ लागली तसं सुदाम्यानं त्यांना माघारी पिटाळलं; नाहीतर ते कुठवर मागं आले असते याचा नेम नव्हता.

दोनेक तासानं सुदामा बाजारात पोचला. सावन्याच्या रुक्यामुळं त्याला जागा मात्र मोक्याची मिळाली. रुक्यानं गंजबाजारातलं सामान विकायला ठेवलेलं होतं. तिथंच लिंबाखाली सुदाम्यानं पथारी अंथरत डालगी, द्रोण, टोपल्या, सुपाचं गबाळ पसरून ठेवलं. बासरीचा डोलारा जमिनीवर ठेवला. पण तास-दोन तास झालं तरी त्याच्याकडं गिऱ्हाईक फिरकलं नाही. अखेर जमिनीवरचा बासरीचा डोलारा त्यानं मस्तकी घेतला. उन्हानं घामाच्या धारा लागल्या. िपडरीतले वायगोळे वर सरकू लागले. मस्तकाच्या नसा फुगू लागल्या. बऱ्याच वेळानं एक गिऱ्हाईक आलं. त्यानं सुदाम्याला बासरी वाजवून दाखवायला सांगितली, तेव्हा त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. आपल्याला बासरी बनवायला येते, पण वाजवता कुठं येते? याचा विचारच आपण केला नाही! आता बासरी वाजवून दाखवल्याशिवाय तिला विचारणार कोण? बासरीचं झेंगट उरावर घेण्याआधी याचा विचार कसा सुचला नाही?   .. शंभर विचार त्याच्या मनात येऊ लागले.

दुपार जीवावर येता उन्हं माथ्यावरून पुढं गेली. रुक्यानं भाकरीची गाठ सोडली, तिथंच थोडं सावलीच्या कुशीत शिरून तोंडाचा घाणा सुरू केला. पण सुदाम्याला भूक कसली ती लागलीच नव्हती. त्याच्या डोळ्यांपुढं एकसारखा छकुलीचा चेहरा तरळत होता. पोटात कालवत होतं. श्वासांचा वेग वाढला होता. डोईला रग लागल्यावर त्यानं बासरीचा डोलारा खाली ठेवताना त्याच्या डोळ्यांतनं दोन थेंब ओघळलेच! ते रुक्यानं बरोबर टिपले. ‘‘काय रे सुद्या, काय झालं? शिग खाली का मून ठेवला? आन् डोळ्यात पाणी का मून?’’ कावराबावरा झालेला सुदामा सावध झाला. कशीबशी त्यानं वेळ मारून नेली. त्याचे खांदे भरून आले होते. डोकं भिर्र झालं होतं. रुक्यानं खूप आग्रह केल्यावर चांगुणेनं दिलेल्या भाकरी सोडून त्याने त्यातले चार घास खाल्ले. अन्न पोटात जाताच तो थोडा तरतरीत झाला. ‘‘बासरी घ्या बासरी, सूप-द्रोण घ्या, टोपली-डालगी घ्या..’’ म्हणत नव्या जोमानं तो पुकारू लागला. हाकाऱ्यानं लोक येऊ लागले, पण नुस्तीच चौकशी करून जाऊ लागले. काही टोपल्या, द्रोण खपले. पण बासरीला कुणीच हात लावत नव्हतं. व्याकूळ होत तो मोठय़ानं पुकारू लागला, तसं आजूबाजूचे दुकानदार त्याच्यावर खेकसू लागले. त्यामुळं तो गप्प होताच रुक्यानं डोकं लढवलं. ‘‘सूप, द्रोण, टोपलीचं मी बघतो. तू बासरीची शिग माथ्यावर घेऊन बाजारातून फिर. मग तरी मालाला उचल येईल..’’ असा कानमंत्र दिला.

सुदाम्यालाही ते पटलं. बासरीचा डोलारा माथ्यावर घेऊन त्यानं बाजार पालथा घालायला सुरुवात केली. ‘‘बासरी घ्या बासरी’’ची हाकाटी करत तो फिरू लागला. चालून पायाचे कांडके पडायची वेळ आली तरी काही केल्या त्याची बासरी कुणी घेईना. काहींनी बासरी दाखवायला सांगताच डोक्यावरचं ओझं खाली-वर करावं लागलं, कुणी रंगाचे वाण विचारले, कुणी लांब बासरी मागितली, तर कुणी आखूड! नुसत्या उठाठेवीनं सुदामा रडवेला झाला. घामानं ओला झालेला सदरा त्याच्या अंगाला चिकटला. उन्हानं झुलसलेल्या डोळ्यांतून वाहणारं खारं पाणी घामात एकजीव होऊ लागलं. घामेजल्या पायातनं चप्पल निसटू लागली. तिच्यात ठोकलेले चुके तळव्याला रुतू लागले. त्याला स्वतच्या नाकत्रेपणाचा संताप येऊ लागला. काहीशा नाराजीनंच तो रुक्याकडं परतला.

दरम्यान विकलेले द्रोण, टोपल्यांचे पसे रुक्यानं सुदाम्याच्या हाती ठेवले. पाचच्या सुमारास रुक्यानं आवराआवर सुरू केली तसा सुदामा घाबरला. ‘‘दहा मिनिटं थांबतोस का गडय़ा? वाईच मी छकुलीच्या खेळण्याची चौकशी करून येतो. येत्या हप्त्यात जोडाजोड करायचा सांगावा देऊन येतो. तोवर मालावर लक्ष ठेवशील का?’’ एका दमात सुदामा बोलता झाला. रुक्यानं मान हलवताच तो कोपऱ्यावरला हापसा दंडवून गटागटा पाणी पिऊन पेठेच्या दिशेनं पळतच सुटला. पंधरा-वीस मिनिटांनी रडक्या तोंडानं तो परतला. रुक्यानं ओळखलं की मामला गंभीर आहे. त्याची गरज केवढय़ाची आहे, हे ऐकताच तोदेखील हताश झाला. कारण त्याच्या निम्म्यानं पसेही त्याच्याकडं नव्हते. तोवर उन्हं तिरपी झाली. आता जेमतेम एका तासात बाजार उठायचा वकत होईल, या कल्पनेनंच सुदाम्याला रडू कोसळलं. रुक्यानं त्याला जवळ घेतलं, पाठीवर थोपटलं, डोळे पुसले आणि आभाळाकडे हात करत म्हणाला, ‘‘सुद्या, आता सगळं त्याच्यावर सोड! किती रडणार आहेस! रडून काय मिळणार?’’ सामान बांधून रुक्या निघून गेला. विरळ होत चाललेल्या गर्दीतून तो दिसेनासा होईपर्यंत सुदामा त्या दिशेनं पाहत होता. तो लुप्त झाल्यानंतर अखेरचा प्रयत्न म्हणून त्यानं पुन्हा एकदा बासरीचा डोलारा मस्तकी घेतला. ‘‘बासरी घ्या बासरी’’ म्हणत जीवाच्या आकांतानं ओरडू लागला. काही क्षण असेच गेले. एवढय़ात शिडशिडीत बांध्याचा, तरतरीत चेहऱ्याचा, डोळ्यांत चकाकी असलेला एक सावळा तरुण कपाळावरची झुलपं मागं सरकवत त्याच्या पुढय़ात आला. त्यानं बासरी मागताच सुदाम्याला भरून आलं. हाताला आलेली निळी बासरी फुंक मारत, त्यावरची धूळ पुसून सुदाम्यानं त्याच्या हाती ठेवली. एक क्षण त्यानं सुदाम्याकडं गूढ, स्नेहाद्र्र नजरेनं पाहिलं आणि ती निळ्या रंगाची बासरी ओठी लावली..

(पूर्वार्ध)

sameerbapu@gmail.com