|| समीर गायकवाड

भल्या सकाळीच शेतातली सगळी आवराआवर करून आलेला नारायण आज मेव्हणा गिरीधरकडं साठ कोस दूर आला होता. नारायणची बायको कौसल्या आणि गिरीधरची पत्नी गिरीजाबाई यांचं कधी पटलं नव्हतं. त्या रागापायी तिनं आता गिरीजाबाईच्या बहिणीच्या लग्नाला यायचं टाळत नारायणला पुढं केलेलं. त्यानं तिला समजावून पाहिलं, पण ती बधली नाही.

गेले कित्येक महिने उन्हात होरपळल्यानंतर आज पावसाची चिन्हे दिसत होती. पण लग्नाला जाणं भाग होतं. त्याच्याकडून निघताना झालेल्या गडबडीत कृष्णा गाय रानाच्या मधोमध असलेल्या आंब्याच्या झाडाखाली बांधून ठेवली गेली. तिला पुन्हा गोठय़ात आणून बांधायचा कौसल्येला द्यायचा निरोपही राहून गेला. लग्नघरी येऊनही त्याचं चित्त लग्नमांडवात नव्हतं. कारण आभाळ गच्च दाटून आलं होतं. तिथं सुरू असलेल्या लगीनघाईत त्याची भूमिका केवळ बघ्याची झाली होती. केव्हा एकदा सगळे सोपस्कार आटोपतील असं त्याला झालं होतं. जेवणावळी सुरू झाल्या तेव्हा त्याची इच्छा नसूनही इतरांसोबत चार घास खावे लागले होते. काहीतरी निमित्त करून तिथून सटकावं असा विचारही त्याच्या मनात तरळू लागला. पण नवरी वाटेला लावल्याबिगर आपण पोबारा केला तर पाहुण्यांना वाईट वाटेल. शिवाय कौसल्येला ही गोष्ट कळली तर ती मनाला लावून घेईल अशी आशंकाही होती. गावाकडं जायची ओढ जितकी तीव्र होत होती, तितकी प्रतीक्षा वाढत होती. पाव्हण्यांची लगबग, करवल्यांची दंगामस्ती, पोराटोरांचा कालवा, वाजंत्र्यांची पीरपीर, नवरा-नवरीची तगमग, वरमाईचा तोरा, जेवणाचा ठसका, मांडववाऱ्याचा जोर, हौशा-गवशांच्या गप्पा, रुखवताचा रुबाब, वरबापाचा मान, आत्याबाईचा रुसवाफुगवा हे सारं एकेक करत शिगेला पोहोचत गेलं.

तिथून निघण्यास नारायण आता पुरता आतुर झाला होता. त्याचं सगळं लक्ष आभाळाकडं होतं. आणि त्याची शंका खरी ठरली. रुखवताची आवराआवरी सुरू व्हायला आणि पावसाची पहिली सर यायला एकच गाठ पडली. हळूहळू पावसाचा जोर वाढत चालला. लग्न सुखरूप लागल्यानंतर पावसानं हजेरी लावल्यानं सगळ्यांच्या चेहऱ्यावर तृप्तता झळकू लागली. कारण पावसाची प्रतीक्षा सर्वानाच होती. अगदी नारायणासदेखील. मात्र, तो एकटाच तिथं चिंतातुर वाटत होता.

आता आणखी काही वेळ तिथं थांबणं नारायणसाठी खूपच अवघड झालं होतं. आता निघायलाच हवं असं मनाशी ठरवत त्यानं आसपास नजर फिरवली. कोण कुठे उभं आहे, कोण कुणाशी बोलतंय, आपल्याकडं कुणाचं लक्ष आहे का, याचा त्यानं अंदाज घेतला. आता तो निघणार, इतक्यात गिरीधर आणि गिरीजाबाई त्याच्या पुढय़ात येऊन उभे राहिले. त्याचे हात हातात घेत गिरीधर म्हणाला, ‘‘दाजी, कुठं निघालाव? वाईच थांबा की! कौसल्येचं आणि तुमचं मानपान द्यायचं राहिलंय. तेव्हढं नेलंच पाहिजे, नाहीतर आमच्यावर ओझं होईल!’’ नारायणला थांबणं भाग पडलं.

थोडय़ाच वेळात त्याला आहेर करून झाला. नवरी वाटंला लावण्याच्या हालचाली सुरू झाल्यावर मात्र नारायणला राहवलं नाही. त्यानं हिय्या करून गिरीधरला कृष्णेची हकिकत सांगितली. गिरीजाच्या आई-वडिलांना भेटून तो तडक मांडवाबाहेर निघाला. ‘दाजी, पाऊस थांबेपर्यंत तरी थांबा..’ असं गिरीधरनं विनवूनही त्यानं ऐकलं नाही. भर पावसात तो एसटी स्टॅण्डच्या दिशेने निघाला. मिळेल त्या वाहनानं गावाकडं गेलंच पाहिजे, हा एकच ध्यास त्याच्या मनात होता.

एव्हाना दाट भरून आलेलं आभाळ आणखीनच गडद झालं होतं. बराच वेळ थांबूनही एकही एसटी आली नाही की कुठलं जीपडंदेखील आलं नाही. शेवटी तो तिथून बाहेर पडला. गावाकडं जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेनं चालू लागला. आता पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. गावातही असाच पाऊस असंल आणि कृष्णेला झाडाखालून काढलं नसंल तर काय अनर्थ ओढवेल याची त्याला भीती वाटत होती. अखेर बऱ्याच पायपिटीनंतर एकदाचा तो रायाच्या तिकटीपाशी येऊन थांबला. त्याचं गाऱ्हाणं नियंत्यानं ऐकलं. फटफट आवाज करणारी एक टमटम आली. त्यात बसून तो निघाला. गाडी मिळाल्याचं समाधान फार वेळ टिकलं नाही. कारण ती टमटम गलांडेवाडीपर्यंतच जाणार होती. अध्र्या तासात ते तिथं पोहोचले. तिथं पुन्हा गाडीची वाट बघणं आलं. पुन्हा दुसऱ्या टमटमनं तो सारुळ्यापर्यंत आला. तिथून त्याला थेट गावापर्यंत जाणारी जीप भेटली. मग मात्र तो आश्वस्त झाला. पण चिंता काही कमी झाली नव्हती. कारण सगळ्या रस्त्यानं इथून तिथून जोराचा पाऊस होता.

गावात पोहोचेपर्यंत अंधारानं वेशीवर माथा टेकला होता. गावातही मुसळधार पाऊस सुरूच होता. आता घरी जाण्यापेक्षा थेट शेतात गेलेलं बरं असा विचार करून त्यानं थेट शेताचा रस्ता धरला. इतका पाऊस पडूनही वाटंनं म्हणावा तसा चिखल, ऱ्याडरबडी झाला नव्हता. कारण मातीच तितकी धगाटली होती. चालताना पाय मात्र घसरत होते. अधूनमधून चमकणाऱ्या विजा, सुंसुं आवाज करत वाहणारा सोसाटय़ाचा वारा आणि त्याच्या तालावर हलणारी झाडं, अधूनमधून येणारा गुरांच्या हंबरण्याचा आवाज यामुळे वातावरण गूढ होत चाललं होतं. नारायणला कशाचीच तमा नव्हती. त्याचं सगळं लक्ष कृष्णेकडं लागून राहिलं होतं. शेताच्या मधोमध असलेल्या झाडावर वीज पडण्याचा धोका अधिक होता- जो कृष्णेच्या जीवावर बेतला असता. भर पावसात पायपीट करून थकवा येऊनही नारायणची पावलं वेगानं पडत होती. शेत जसजसं जवळ येऊ लागलं तसतसे त्याचे श्वास वाढू लागले. वाटेत जाधवाच्या वस्तीवर रंगू जाधवांनी त्याला हाळी दिली होती, पण तो थांबला नव्हता. सदाशिव मान्यांच्या पोरानं घराबाहेर येत त्याला अडवून पाहिलं, पण नारायणानं त्याच्याकडं लक्ष दिलं नाही. तो आपला झपाझप चालत राहिला. त्याला कधी एकदा कोरक्याचा बांध लागतो असं झालेलं. कारण तो बांध ओलांडला की शेत नजरंस पडायचं.

अखेर कोरक्याचा बांध लागला. त्याला हायसं वाटलं. मात्र, त्याचा आनंद फार टिकला नाही. कानठळ्या बसवणारा आवाज आला आणि काळजात कळ यावी तशी आकाशात वीज कडाडली. प्रचंड आवाजापाठोपाठ डोळे दिपवणारा प्रकाश पडला. नारायणच्या शेताच्या दिशेने आगीचा लोळ झेपावला. दिग्मूढ झालेला नारायण पाहतच राहिला. जणू त्याच्या अंगातलं बळ एकाएकी नाहीसं झालं. पुढच्याच क्षणी तो भानावर आला. सगळं बळ एकवटून धावत निघाला. धावताना धोंडय़ात पाय अडखळून खाली कोसळला. अंग चिखलात बरबटून गेलं. उठून पुन्हा धावू लागताच पावसाचा जोर एकाएकी प्रचंड वाढला. समोरचं दिसेनासं झालं. रोजच्या सवयीची वाट असल्यानं तो अंदाजानं पावलं टाकत निघाला. वस्ती जवळ आली तसा त्याचा हुरूप वाढला. धावतच त्यानं कृष्णेला हाळी दिली. पण प्रतिसाद आला नाही. भीतीने त्याच्या अंगावर शहारे आले. भरपावसातही कानामागून घामाचा थेंब ओघळला. क्षणाचाही विलंब न लावता ढेकळांचा चिखल तुडवत तो कृष्णेच्या दिशेनं दौडत निघाला. त्याचा तोल जात असला तरी लक्ष्य टप्प्यात होतं. आता जेमतेम काही फर्लाग अंतर उरलं होतं. त्याच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. कृष्णेचा आवाज कसला म्हणून कानी पडत नव्हता. एरव्ही त्याची चाहूल लागली की ताडकन् उठून उभी राहणारी, मोठय़ानं हंबरडा फोडणारी कृष्णा आज काहीच प्रतिसाद देत नव्हती. दुरून कुठून तरी वीज पडल्यानं झाडाच्या जळण्याचा वास ओलेत्या आसमंतात धुमसत होता. नारायण आता पुरता कावराबावरा झाला होता. काही ढांगांत आता तो कृष्णेजवळ पोहोचणार होता. त्याचं सगळं ध्यान कृष्णेच्या चाहुलीकडं होतं. तेवढय़ात कृष्णेच्या हंबरण्याचा आवाज आला आणि त्याच्या अक्षरश: जीवात जीव आला.

काही क्षणात तो तिच्यापाशी पोहोचला. तिनं अंग थरथरवलं. तिच्या अंगावर आंब्याची मोठी फांदी पडली होती. सगळी ताकद एकवटून तिनं ती बाजूला केली आणि एका दमात ताडकन् उभी राहिली. नारायण तिच्यावर अक्षरश: झेपावलाच. तिच्या पाठीवरून आता त्याचा हात फिरत होता. मान वेळावून आपल्या काटेरी जिभेनं ती त्याचं अंग चाटत होती. दोघांच्या डोळ्यातल्या पावसाला आता वाट मिळाली होती. त्यांचं रडणं पाहून पावसानं हात आखडता घेतला. पाऊस थांबला. काही वेळ ते दोघं तसेच नि:शब्द होत एकमेकाला अनुभवत होते. आकाश निरभ्र होत गेलं. काळवंडल्या ढगात लुकलुकत्या चांदण्या दिसू लागल्या. त्यांचं हसू पानाफुलावर पाझरू लागलं. तटतटलेल्या कृष्णेला पान्हा फुटला. तिच्या दुग्धधारा मातीवर कोसळू लागल्या. मातीला पांढरा मुलामा चढू लागला. मातीच्या कुशीतला अंकुर खऱ्या अर्थानं तृप्त झाला..

sameerbapu@gmail.com