प्रसिद्ध गजलकार आणि गीतकार सुरेश भट यांच्या निधनाला येत्या १४ मार्च रोजी ११ वर्षे पूर्ण होतील. त्यानिमित्ताने त्यांच्या गजल आणि गीत लेखनावर टाकलेला प्रकाश..
गजलसम्राट सुरेश भटांचा जन्म १५ एप्रिल १९३२ साली अमरावतीला झाला. त्यांनी दर्जेदार मराठी गजला लिहिल्या हे सर्वश्रुत आहे. मराठी प्रतिमा, प्रतीके वापरून गजलेला अस्सल मराठी बाज दिला. तिला लोकप्रियताच नव्हे तर प्रतिष्ठाही मिळवून दिली. त्यांच्या गजलेची प्रेरणा घेऊन अनेक तरुण कवी गज़्‍ाल-लेखनाकडे वळले. आज महाराष्ट्रात अंदाजे दोनशेच्या वर भटानुयायी गजला लिहिताहेत. मर्ढेकरांनंतर सुरेश भटसुद्धा संप्रदाय प्रवर्तक ठरले.
भटांनी सामाजिक स्पंदनाच्या, आध्यात्मिक आशयाच्या, मधुराभक्तीच्या नितांतसुंदर कविताही लिहिल्या. पद, गवळण, भूपाळी आदी पारंपरिक रचनांमधून त्यांनी नवीन प्राण भरला.
भटांच्या आशयसंपन्न गजला, गीते त्यांच्याच मुखातून ‘तरन्नूम’मध्ये ऐकणे हा विलक्षण अनुभव होता. पेटी नाही, तबला नाही, इतर कुठल्याही वाद्याची साथ नाही. भटांच्या हातात फक्त माइक आणि समोर असलेले हजारो श्रोते. केवळ आपल्या प्रतिभा सामर्थ्यांने श्रोत्यांना खिळवून ठेवण्याचे काम भटांनी केले. त्यांना संगीताचीही जाण असल्याने त्यांच्या रचनांना ते स्वत:च चाली लावून ‘तरन्नूम’मध्ये सादर करीत असत.
साध्यासोप्या परंतु अत्यंत प्रत्ययकारी शब्दांतून त्यांनी गज़्‍ालचे, गीताचे शिल्प घडवले. त्यांची कविता सर्वसामान्य माणसांसाठीच होती. समाज आणि कवी यामधले अंतर त्यांना मिटवायचे होते. त्यांच्या कवितेची बांधीलकी सामान्य माणसांशीच होती.
आपल्या ‘एल्गार’ संग्रहात ते म्हणतात ‘‘जोपर्यंत मानवजात ह्य़ा पृथ्वीतलावर शिल्लक आहे तोपर्यंत लय, ताल आणि सूर शिल्लक राहतील आणि म्हणूनच वृत्तबद्ध गेय कविता कधीही कालबाह्य़ होणार नाही. जे काव्य मूलभूत मानवी मूल्यांशी इमान राखते, जे मानवाच्या सुखदु:खांविषयी, त्याच्या स्वप्नांविषयी, त्याला हव्या असलेल्या न्यायासाठी उत्कटपणे व परिणामकारकपणे बोलते ते काव्य कधीही कालबाह्य़ होत नाही.’’
याचाच अर्थ असा की, भटांचा स्वत:च्या लेखणीवर जबरदस्त विश्वास होता. आपल्या आशयघन रचनांमधून त्यांनी सर्वसामान्य जीवन-जाणिवांचा पट विस्तारत नेला. विश्वात्मकतेशी संवाद साधण्याची सौंदर्यात्म हातोटी त्यांना साधलेली होती.
चांगल्या कवीला माणसांची नस पकडता आली पाहिजे. रसिकांना कवितेच्या मांडीवर खेळवता आले पाहिजे. कविता म्हणजे जीवन दर्शन असते, जीवन भाष्य असते ते; यावर त्यांचा दांडगा विश्वास होता.
शब्दांची निवड हे भटांचं बलस्थान होतं, म्हणूनच त्यांची कविता रसिकांच्या काळजाला थेट भिडायची. सर्वत्र स्वत:चीच आरती ओवाळून घेणाऱ्यांची त्यांना चीड यायची. सांकेतिक कल्पनांच्या तयार फुटपट्टय़ा लावून कवितेचं मोजमाप करणाऱ्या समीक्षकांचे कवितेशी फारसे सख्य नसते हेही ते जाणून होते.
आपल्या वागण्या-बोलण्याविषयी, खाण्या-पिण्याविषयी लोक वाट्टेल ते बोलतात. मागे टवाळीही करतात हे माहीत असूनही भट बदलले नाहीत. आपल्याच मस्तीत एका कलंदरासारखे जगत राहिले. भट कुणालाही न कळणारे अजब रसायन होते. तरीही शब्दांच्या पाठीवर जीवन जाणिवांचे ओझे देणारा, प्राजक्ताच्या देठाने प्रेमकाव्ये लिहिणारा, सूर्यकिरणांची लेखणी बनवून प्रस्थापित समाज व्यवस्थेला हादरे देणारा हा भन्नाट कवी रसिकजनांना विलक्षण आवडायचा हे मात्र खरे.
मराठी भाषेच्या वैभवाचा सुरेश भटांना रास्त अभिमान होता.
साय मी खातो मराठीच्या दुधाची
मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला?
असं म्हणणारे भट
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
अशी मायमराठीची थोरवी गात-तिचा रक्तरंग आपल्याही रंगात मिसळून टाकतात.
समीक्षा, समीक्षक, अभिजन यांना फारसे महत्त्व न देता भट समाजातल्या सर्वसामान्य माणसांनाच अधिक महत्त्व देत. जे उन्हात अनवाणी चालतात, जगण्याच्या गुहेत दु:खाशी दोन हात करतात तेच लोक कवीच्या भाग्याचा फैसला करतात. सामान्य जनता हेच कवितेचे अंतिम न्यायालय आहे असे  मानत.
लतादीदींनी, आशाताईंनी त्यांचे शब्द घराघरात पोचवले. प्रतिभावान संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकरांनी भटांच्या शब्दात दडलेले स्वरांचे अस्तर शोधून काढले. त्यांच्या कविता लोकप्रिय करण्यात मंगेशकर भावंडांचाही फार मोठा वाटा आहे. त्यांच्यामुळे कवितेत दडलेले अव्यक्त संगीत व्यक्त झाले. तंत्रशुद्धता, वाङ्मयीन गुणवत्ता, प्रासादिकता आदी काव्यगुणांनी त्यांची गाणी गाजत राहिली. लोकाभिमुख झाली.
मधुराभक्तीमध्ये भक्ताने स्वत:ला राधा कल्पून, कृष्णाला प्रियकर मानून त्याची भक्ती करायची असते. परमेश्वराला प्रियकर नव्हे, तर प्रेयसी मानून, स्वत:ला त्याचा प्रियकर माना असे सुफी संत म्हणायचे. परंतु मधुराभक्ती त्यापेक्षा भिन्न आहे. भटांनी राधाभावांचे मनोहारी विभ्रम आपल्या काव्यातून फार सुंदर रीतीने अभिव्यक्त केले आहेत.
हा गज़्‍ालसम्राट उत्कृष्ट गीतकारही होता. खरे तर भटांना नुसते गज़्‍ालसम्राट मानून आपणच त्यांच्यातल्या गीतकारावर अन्याय केला आहे. गज़्‍ाल हे सुरेश भटांचे व्यसन होते. त्यांची कमजोरी होती. गज़्‍ालच्या हट्टाग्रहापायी त्यांनी स्वत:ही आपल्यातल्या गीतकारावर अन्याय केला असे मला वाटते. त्यांनी अधिक गीते लिहायला हवी होती, परंतु त्यांच्या गज़्‍ालेने त्यांच्याच सकस, कलदार गीतांची वाट अडवली.
‘मेंदीच्या पानावर’, ‘उष:काल होता होता’, ‘सूर मागू तुला मी कसा?’, ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी’, ‘मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल’, ‘सजण दारी उभा काय आता करू?’, ‘मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो’, ‘चल उठ रे मुकुंदा’ अशी कितीतरी सुरेख गीते भटांनी लिहिली. प्रतिभावान संगीतकारांमुळे गायक, गायिकांमुळे सर्वसामान्यांच्या अधरांवर ती दरवळत राहिली. त्यातली काही गीते तर समाजाभिमुख प्रवृत्तींना आव्हान देणारी ठरली.
शब्दांची द्विरुक्ती केल्यामुळे भटांच्या गीतातले नादमाधुर्य वाढते. अर्थघनता दृगोच्चर होते. त्यांच्या गीतातली बाह्य़लय नादमयी तर अंतर्लय अर्थस्फोटक असते. गीत वजनानुसारी लघुगुरू क्रमानुसार निदरेष छंदात लिहिल्यामुळे त्यांची गीते संगीतकारांना, गायक, गायिकांना प्रेरणा देतात. शब्द आणि सूर हातात हात घालून गुणगुणत चालल्याचा भास होतो. बोलका भावाशय स्वरलालित्याकडे घेऊन जातो. गीते ऐकताना रसिकाला आगळ्यावेगळ्या आनंदाची अनुभूती येते.    सुरेश भटांच्या अशा सुंदर गीतांनी रसिकांना भरभरून आनंद दिला. कुणाला भूतकाळात सहर्ष डोकावून येण्याची संधी दिली. कुणाला जगण्याचे बळ दिले, कुणाला दैनंदिन प्रापंचिक विवंचनेतून चार घटका बाहेर पडण्याची प्रेरणा दिली. कधी अंतर्मुख केले तर कधी विचारप्रवृत्त केले. कधी मनोरंजन केले तर कधी प्रबोधन केले. कुणाला परमेश्वराच्या मंदिराच्या पायरीजवळ नेले तर कुणाची ईश्वरावरील भक्ती वृिद्धगत केली.
साहित्य, संगीत, तत्त्वज्ञान माणसाचे बोट धरून त्याला नवनव्या वाटा दाखवीत असते. संवादाची क्षमता गाण्याएवढी क्वचितच लोकाभिमुख असते, म्हणूनच आनंद व गाणे यांचा ऋणानुबंध दीर्घकाळ चाललेला असतो. प्रत्येकाचा गाण्याचा अनुभव वेगवेगळा असू शकतो. तसा तो येण्यातच गाण्याचे काळीज असते.