बेळगाव या सीमाभागातील मराठी भाषा ही कन्नड, चंदगडी, कोल्हापुरी, कोकणी अशा अनेक बोलींच्या संमिश्रणातून जन्माला आलेली आहे. तिला तिचा म्हणून एक गोडवा आहे. पुलंनी तिची खुमारी त्यांच्या ‘रावसाहेबां’मार्फत पूर्वीच आपल्यापर्यंत पोहोचवलीय..
‘‘बेळगावच्या लोण्याइतकीच बेळगावची हवाही आल्हाददायक आहे,’’ असे कधीकाळी इथे प्राध्यापकी केलेल्या पु. ल. देशपांडे यांनी लिहून ठेवले आहे. परंतु सीमाप्रश्नावरून गेली ५७ वष्रे ही हवा नेहमी तप्त राहिलेली आहे. एकेकाळी ‘वेणुग्राम’ असे नाव असलेल्या बेळगावमध्ये प्रवेश केला आणि इथले फलक वाचायला सुरुवात केली की आपणास मराठीत ‘बेळगाव’, कन्नडमध्ये ‘बेळगावी’ व इंग्रजीमध्ये ‘बेलगाम’ अशी तीन नावे पाहायला मिळतात. नवख्या माणसाच्या तोंडून आपसूक उद्गार बाहेर पडतात- ‘च्याईस एकाच गावाची तीन भाषांत तीन नावे? इथली लोकं मॅडबिड हाईत की काय?’ बेळगावची खरी व वेगळी ओळख इथूनच व्हायला लागते. सध्या जरी हा भाग कर्नाटकात असला, तरी इथली मराठी माणसे मनाने महाराष्ट्रातच आहेत. महाराष्ट्रात यायची आस ठेवूनच अनेक वष्रे त्यांची लढाई सुरू आहे.
पूर्वी मुंबई प्रांतात असलेला हा भाग भाषावार प्रांतरचनेत कर्नाटकात गेला. परंतु आजही सीमाभागातील मराठीभाषिकांनी आपली भाषा आणि संस्कृती जपून ठेवली आहे. बेळगावपासून अवघ्या १३ कि. मी.वर पश्चिमेकडे चंदगड जिल्ह्याची हद्द सुरू होते. त्यामुळे या भागातील भाषेवर चंदगडी बोलीचा प्रभाव दिसून येतो, तर दक्षिणेकडे ७० कि. मी.वर कोल्हापूरची हद्द सुरू होते. त्यामुळे त्या ठिकाणच्या बोलीवर कोल्हापुरी पगडा दिसून येतो. बेळगावपासून पूर्वेकडे पंत बाळेकुंद्री, मारिहाळपर्यंतच्या २० कि. मी.च्या भागात मराठी मायबोली दिसते. त्यापुढे कानडी भाग सुरू झाल्याने त्यावर कन्नडचा प्रभाव अधिक दिसतो, तर उत्तरेकडे खानापूर तालुक्याला लागून कारवार जिल्ह्याचा प्रारंभ होत असल्याने या भागातील बोलीवर कोकणीचा प्रभाव आढळतो.
सीमावादावरून नेहमी चच्रेत राहिलेल्या बेळगावला गोड कुंदा, मांडे, घरगुती लोणी, वासेच्या कुमुद तांदळाबरोबरच येथील साहित्यिकांनीही या नगरीला प्रसिद्धी मिळवून दिली आहे. या नगरीचे तसे खूप विशेष सांगता येतील. पण ‘बेळगावची भाषा’ या सर्व विशेषांवर मात करणारी आहे. इथे िहदू, मुस्लिम, ख्रिश्चन, कोंकणी अशा विविध संस्कृतींचा संगम झालेला आहे. त्यामुळे इथे मराठी, कन्नड, इंग्रजी, िहदी, कोकणी, उर्दू, ग्रामीण बोली या भाषांचाही संगम झालेला दिसतो.
पु. ल. देशपांडे यांनी बेळगावच्या कानडीमिश्रित मराठीला रावसाहेब ऊर्फ कृष्णराव हरीहर यांच्या माध्यमातून विनोदी बाज देऊन या पात्रासोबत बेळगावी बोलीलाही अमर केले आहे. ‘‘खास हो गाणं तुमचं ते! परंतु तुमचं तब्बलजी ते कुचकुचत वाजवतंय की! काय त्याला च्याऽ बीऽ पाजा की होऽ ते तबला जरा छप्पर उडिवणारं वाजवंऽ की रेऽ! हे तबला वाजिवतंय की मांडी खाजवतंय हेऽ!’’ अशा या रावसाहेबांच्या आघाती संवादांनी पहिल्या भेटीतच पुलंना आपलंसं केलं होतं. इथल्या मराठीला सणसणीत कानडी आघात आणि कानडीला इरसाल मराठीचा साज चढल्याचे जाणवते.
भीमराव गस्ती, नारायण अतिवाडकर या साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून संवादापुरता का होईना, ग्रामीण बोलीचा वापर केला आहे; तर बेळगाव शहरातल्या प्रमाणभाषेचा प्रभावी वापर ‘वनवास’, ‘शारदासंगीत’मधून प्रकाश नारायण संतांनी ‘लंपन’ व त्याच्या मित्रमंडळींच्या संवादांत खुमासदारपणे केलेला दिसतो. ‘अय्यो ! तिकडं बघ बे!’,  ‘छातीत पाकपुक व्हायलंय बा!’,  ‘हळू बोलून सोड् की बे. काय बोंबलायलास?’, ‘काय बे ए ह्यण्ण खाल्लास काय की?’ ही  किंवा- ‘‘काय लंपूसाहेब, ओठ बाहेर काढून बसून सोडलात आज, सक्काळी सक्काळी.. एकदम मज्जा ऐद नोडरी ऽऽ अभ्यास इल्ला एन इल्ला..’’ ही कन्नडमिश्रित वाक्ये लंपनच्या कंपूला केव्हा आपलंसं करतात, कळतच नाही.
बेळगावच्या २०-२२ कि. मी.च्या परिसरातील ग्रामीण भागातील बोली ऐकू लागलो की आपणास- ‘काय बे खट्टे (कुठे) गेल्यास?’, ‘काय बा तुझ्झं आराम हाई बघं,’ ‘कण्ण येत्यास बे? मानं येतो बगं,’ असे संवाद कानावर पडतील. या ‘बे’च्या पाढय़ामुळे आपण विदर्भ प्रांतात तर नाही ना, असा प्रश्न पडू शकतो. परंतु येथे आपल्या समवयस्क वा आपल्यापेक्षा छोटय़ांशी संवाद साधताना मुले ‘बे’चा वापर करतात. मोठय़ा माणसांशी बोलताना मात्र ‘काय गा कव्वा येत्यास?’ किंवा ‘तण्ण येतो म्हटल्यास आजून का येऊस नाहीस?’ असा ‘गा’ हा प्रत्यय लावला जातो. तो आदरार्थी शब्द म्हणून वापरला जातो. दोन बायका  किंवा पुरुष व स्त्री यांच्यातील संवादात आपुलकीने  ‘गे’ हा प्रत्यय येतो. ‘अजून तयार होऊस नाहीस गे. मग लगनास कव्हा जाणार? अक्षता पडल्यावर काय जिवूस जाणार गे?’ ‘ल’ किंवा ‘लई’ हा शब्दही वापरला जातो. ‘लई भारी दिसोले बे तुझी पँट! कोठनं आणल्यास..’.
जाऊलाय, खाऊलाय, पिऊलाय, नाचूलाय, भुकूलाय, हार्ऊलाय, झोपूलाय तसेच मरूलाव, करूलाव, येऊलाव, फिरूल्यास, उतरूल्यास, बसोल्यास.. इ. शब्द हे पुिल्लगीवाचक आहेत. स्त्रियांसाठी हेच शब्द ‘जाऊलीस, खाऊलीस, पिऊलीस, नाचूलीस, मरूलीस, करूलीस’ असे वापरले जातात. उदा. ‘इथोन तिथोन काय नाचूलीस गे! गप्प बस की एका जागेस..’ किंवा पूर्वेकडील भागात गेलो तर- ‘पावणं कसं आल्याशी? आतं राहत्याशी नव्हे दोन-चार दिसं?’ असं बोलतात. या परिसरातील स्त्रिया, मुली बोलताना पुिल्लगीवाचक शब्द वापरतात., जसे- ‘मी जेवण करतो (करतेऐवजी), मी गावाला जातो (जातेऐवजी), मी राहतो (राहते)’.
कानडी प्रभावामुळे शब्दांवर आघात केले जातात. जसे- ‘या इलेक्शनात कायच कळ्ळणाय झालाय बघं. माझं काय त्यास पट्टणाय (पटत नाही), त्यो काय मागं हट्टणाय (हटत नाही). त्यो आतं राहण्णाय (राहत नाही) आणि निवडोन बी येण्णाय (येत नाही) बगं.’
इथल्या पदार्थानाही आपली अशी खास नावे आढळतात. ‘काकडी’ येथे ‘वाळकू’ बनते. ‘गड्डे ’ म्हणजे ‘बटाटे’ किंवा ‘नवलकोल’. ‘रताळ्या’ला ‘चिण्णं’ म्हणतात, तर ‘टॉमेटो’ला ‘कामाटे’ किंवा ‘गोबाणी’ म्हणतात. ओल्या मिरच्यांना ‘वल्ल्या मिरच्या’ किंवा ‘मिरशेंगा’ म्हणतात. तिखटला ‘तिख्खं’, गुळाला ‘ग्वाड’ वा ‘गॉड’ म्हणतात. आजही खेडेगावात लग्नसमारंभात खीर करून त्यावर दूध, तूप घालून वर गोड बुंदी घालतात. या मिश्रणाला ‘काँक्रीट’ म्हणतात. एखाद्याला लग्नात ‘काय खाऊन आलास बा?’ असं विचारलं तर तो म्हणेल, ‘च्याईस लगनात एवढी गर्दी होती सांगो. त्यात आणि जेवण बघितलो तर काँक्रीट!’
इथल्या शिव्याही खास कर्नाटकी टच् असलेल्या दिसतात. एखादी मुलगी खूप फिरणारी असेल तर दुसरी बाई तिचं असं स्वागत करेल.. ‘काय गे! भटकभवानी! कुठे गाव उंडगोस (फिरायला) गेल्लीस!’ कोल्हापुरात वावरताना ‘रांडीच्या’ ही शिवी ठेवणीतली नव्हे, तर रोजच्या व्यवहारातील वाटून जाते तसंच इथे पुरुष मंडळींच्या तोंडात ‘च्याईस, च्यायला, आयला, हिच्या भणं किंवा भणीस (बहिणीस), व्हनेनं मारतो बघंऽ (चप्पलेनं मारतो), ये हुंब’ यापकी एक तरी शिवी असणारच.
इथल्या कन्नडवर मराठीचा प्रभाव आहे, तर मराठीवर कन्नडचा. अनेक कन्नड शब्द आता मराठीत रूढ झाले आहेत. नात्यागोत्याचे अनेक शब्द मराठीत कन्नडमधूनच आलेले आहेत. आई, ताई, अण्णा, अप्पा, काका असे शब्द मुळातले कन्नड आहेत, परंतु हे शब्द मराठीने जशास तसे स्वीकारलेले नाहीत. त्यात आपलं वेगळेपण जपलं आहे. कन्नडमध्ये आई म्हणजे आजी, तर मराठीत माता. कन्नडमध्ये ताई म्हणजे माता, तर मराठीत बहीण या अर्थाने आपण तो शब्द घेतला आहे. थोरल्या भावाला कन्नडमध्ये ‘अण्णा’, तर वडिलांना ‘अप्पा’ असे म्हणतात. तर आपल्याकडे घरगुती संबोधनासाठी ‘अण्णा’, ‘अप्पा’ या संबोधनांचा सर्रास वापर होतो. उदा. मोठय़ा भावाला  ‘थोरला अप्पा’ असे म्हणतात. याशिवाय मोठय़ा बहिणीस ‘आऊ’ म्हणतात. काकाला ‘तात्या’ म्हणतात. नणंदेला व्हंजी वा वन्सं, मावशीच्या नवऱ्याला ‘मावशाप्पा’, वहिनीला व्हनाक, तर पोराला प्वॉर असे संबोधले जाते.
कन्नडमध्ये गुंडा म्हणजे गुंड असाही अर्थ होतो. इथे मात्र लहान मुलं भांडताना ‘गुंडय़ांनं (दगडानं) मारतो बघं!’ असे म्हणतात. ‘चोरीचा आळ’मधील आळ आणि बेळगावातील ‘आळ’ (‘मजूर’ या अर्थाने) वेगळा आहे. येथील शेतकरी ‘आळ घेऊन शेती करूलोय,’ असं म्हणतो तेव्हा ‘मजूर लावून शेती करून घेत आहे,’ असा त्याचा अर्थ होतो. जगप्रसिद्ध निकॉन कंपनी सगळ्यांना माहीत आहे. परंतु बेळगावात एखाद्याने ‘निकोन काय करीत हुत्यास बे?’ असं म्हटलं तर ‘लपूनछपून काय करीत होतास?’ असा त्याचा अर्थ होतो. ‘मदान मारणे म्हणजे विजयी होणे’ हा मराठीतील रूढ वाक्प्रचार आहे. परंतु एखाद्याच्या घरी आपण गेलो आणि तेथे सांगण्यात आले की, संबंधित व्यक्ती ‘मदानास गेलाय,’ तर बाहेर येऊन त्याला शोधण्याचा चुकूनसुद्धा प्रयत्न करू नका. कारण ती व्यक्ती मदानावर लढाई करण्यासाठी किंवा खेळण्यासाठी गेलेली नसेल, तर शौचासाठी गेलेली असेल. त्याचप्रमाणे परसाकडं लागणं म्हणजे संडासला लागणं, इरागतीस जाणं म्हणजे लघवीला जाणं, वारीकडे गेलाय म्हणजे डोंगराकडे गेलाय, माटीस गेलाय (अंत्यसंस्काराला गेलाय).. असे शब्दप्रयोग रूढ आहेत. एखादा आपल्या बायको-मुलांसह कार्यक्रमास गेला असेल तर त्याला विचारलं जाईल- ‘काय गा, सगळं बारदानंच घेऊन येल्याशी की!’
पण आपण बेळगावहून जसे उत्तरेकडे खानापूर तालुक्याकडे जाऊ लागतो तसे या भाषेत आपणास काही बदल जाणवतात. कारवार जिल्हय़ाला लागून हा तालुका असल्यामुळे इथल्या भाषेवर एका बाजूने थोडा कोकणीचा व दुसऱ्या बाजूने कन्नडचाही प्रभाव जाणवतो. त्यामुळेच असेल कदाचित, इथे पुरुष असो वा स्त्री- दोघांनाही ‘येल्लीस, गेल्लीस, बसलीस’ अशी स्त्रीिलगवाचक क्रियापदे वापरली जातात. ‘कही गेल्लीस (कुठे गेलेलास / गेलेलीस), तही बसल्लीस (तेथे बसलेलास/बसलेलीस), तिया ज्यवलीसऽ (तुझे जेवण झाले), कासं येल्लीस (कशासाठी आलास / आलीस), दिवच्याल (द्यायचं की नाही)’ अशी भाषा आढळते. कानडीत हुच्च म्हणजे खुळा. बेळगाव परिसरात या अर्थाने हा शब्द वापरला जातो. परंतु इथे मात्र तो ‘हुऽच म्हणून’ (पाहिजे म्हणून) वापरला जातो. अंडय़ाच्या ऑम्लेटला ‘कवटाची पोळी’ म्हणतात, तर मटणाला ‘मटणी’ म्हणतात. कोंबडय़ाला ‘कोंबा’, तर बीअरला ‘थंडाई’ म्हणतात. आमटीला ‘निस्तं’ म्हणतात. कोकणीत मात्र बारीक माशांच्या आमटीला ‘निस्तं’ म्हणतात. एखाद्याला दत्तक घेतलेले असेल तर त्याला ‘पोटऽऽची’ म्हणतात.
बेळगावात अलीकडच्या काळात मराठी शाळांची संख्या सातत्याने घटते आहे, तर इंग्रजी शाळांची संख्या वाढते आहे. सरकारी कार्यालयांतूनही कानडीकरण झाल्याने आज शाळा-कॉलेजांत शिकत असलेल्या युवकांच्या मराठीत कन्नड, इंग्रजी, िहदी शब्द बेमालूमपणे मिसळलेले दिसतात. हे शब्दही ते इतक्या सराईतपणे वापरतात, की सर्वसामान्यांना त्यांच्या वेगळेपणाची जाणीवही होत नाही. बरेच जण मराठी बोलताना इंग्रजी शब्दांचा भरमसाट वापर करतात. या शब्दांचा वापर करायला मराठीत त्यांना शब्द नाहीत असे नाही; परंतु समोरची व्यक्ती ही भिन्नभाषिक असू शकते, त्यामुळे आपण इंग्रजी, कन्नड, िहदी शब्द वापरले नाहीत तर आपले बोलणे तिला कळणार नाही म्हणून भाषेची ही मोडतोड होत आहे. यातून अनेक मजेशीर वाक्ये तयार होत असतात. उदा. सरकारी प्रौढ शाळा (सरकारी माध्यमिक शाळा), एकसाथ नाडगीत शुरू कर (एकसाथ राज्यगीत म्हणणं सुरू करा), जात्यातीत जनता दल (निधर्मी जनता दल) इत्यादी. वाढत्या नागरिकीकरणामुळे सीमाभागातील बोली गावांपुरतीच मर्यादित होत चालली आहे. आणि तिचाही टक्का दिवसेंदिवस घसरत चालला आहे.