नरेंद्र भिडे – narendra@narendrabhide.com

पन्नासच्या दशकामध्ये अत्यंत लोभसवाणी आणि सुरेल अशी एक जोडी मराठी रसिकांच्या भाग्यात लिहिलेली होती. ती म्हणजे गदिमा आणि बाबूजी यांची. मुख्यत्वेकरून चित्रपट संगीत आणि थोडेफार भावसंगीत या क्षेत्रांमध्ये या जोडीने मर्दुमकी गाजवली आणि रसिकांनीही त्यांना भरभरून दाद दिली. पण त्याचबरोबर अजून एका जोडीचा जन्म झाला होता. पी. सावळाराम आणि वसंत प्रभू! अर्थात यांच्यात कुठली स्पर्धा होती असं नाही, पण तरीही थोडीशी तुलना होतेच. आणि लक्षात येतं की, गदिमा हे यात थोडेसे वरचढ ठरले होते. परंतु खरी तोडीस तोड स्पर्धा होती ती बाबूजी आणि वसंत प्रभू यांची! आणि निदान मला तरी असं वाटतं की, वसंत प्रभू बाबूजींच्या तुलनेत थोडेसुद्धा कमी किंवा उणे वाटले नाहीत.

swargandharva sudhir phadke biopic
Video : अजरामर गीतरामायण ते बाबुजींचा खडतर प्रवास! ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात आहेत एकूण २७ गाणी
all the best marathi natak preview loksatta ravindra pathare
नाटयरंग : ‘ऑल दि बेस्ट’ – गजब ‘त्यांची’ अदा!
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
subodh bhave Sangeet Manapmaan movie first poster out
Video: सुबोध भावेने ‘संगीत मानापमान’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर केलं शेअर, म्हणाला, “मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार…”

वसंत प्रभू यांची कुठलीही चाल ‘गोड’ या सदरातच मोडते. त्यांनी चित्रपट संगीतात बरीच मुशाफिरी केली; आणि भावसंगीतातसुद्धा! परंतु अत्यंत मधुर चाली आणि त्या सर्व गाण्यांना लाभलेला लताजी आणि आशाजी यांचा सूर हे त्यांचं प्रमुख वैशिष्टय़ होतं. त्यांच्या गाण्यांची यादी नजरेखालून घातली तरी सहज लक्षात येतं की, त्यांनी नव्वद टक्के  गाणी ही स्त्री-आवाजासाठीच केलेली आहेत. आणि त्यातलीही नव्वद टक्के  लताजी आणि आशाजी यांनीच गायलेली आहेत. वसंत प्रभू यांच्या गाण्यांची संख्या खूप आहे. आणि तरीसुद्धा असं नक्कीच म्हणता येईल की त्यांना मिळालेलं यश हे इतर कुठल्याही मराठी संगीतकारापेक्षा खूप जास्त आहे. तसं बघायला गेलं तर वसंत प्रभू यांची गाणी जास्तकरून ‘भावगीत’ या सदरात मोडतात; जरी ती चित्रपटांत असली तरीसुद्धा! लावण्या, लोकगीते, समरगीते आणि अशा इतर प्रकारांच्या मागे वसंत प्रभू फारसे गेलेले दिसत नाहीत. त्या अर्थाने बघायला गेलं तर बाबूजींनी विविध प्रकारची गाणी आपल्याला दिली, तशी वैविध्यपूर्ण गाणी वसंत प्रभूंकडे नाहीत. परंतु जी गाणी आहेत, ती अक्षरश: लाजवाब आहेत. त्यांतला गोडवा हा आजवरच्या मराठी गाण्यांमध्ये कोठेही जाणवत नाही, हे अगदी ठामपणे म्हणता येईल. निदान माझं तरी असं मत आहे.

काही काही गीतकार आणि संगीतकार यांच्या जोडय़ा का जमल्या नाहीत, ही जाणीव बऱ्याचदा मनाला रुखरुख लावून जाते. गदिमा आणि वसंत प्रभू यांच्यात एकही सामायिक गाणं नसावं याचं वाईट वाटतं. परंतु त्यामुळे वसंत प्रभू यांची प्रतिभा कुठेही झाकोळली गेली आहे असं मात्र वाटत नाही. पी. सावळाराम यांच्याबरोबर वसंत प्रभू यांचं सूत जमलं आणि त्यांनी असंख्य अजरामर गाणी दिली. त्यांनी एकत्र केलेले चित्रपट तसे फार नाहीत. ‘शिकलेली बायको’, ‘कन्यादान’, ‘पुत्र व्हावा ऐसा’ आणि ‘बायकोचा भाऊ’ अशी मोजकीच नावं घेता येतील. परंतु त्यातील गाणी मात्र अतिशय गोड आहेत. त्यापैकी बाळासाहेब मंगेशकर यांनी गायलेल्या ‘मानसीचा चित्रकार तो’ या गाण्याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्या काळात विशिष्ट स्वराकृतींचा प्रभाव सर्वच गाण्यांवर दिसून येतो. आणि बहुतेक संगीतकार त्यातून सुटले नाहीत. परंतु हे गाणं मात्र त्या विशिष्ट स्वराकृतींपासून लांब राहिलेले आहे. म्हणजे कव्हर करण्याकरता जी गाणी आजच्या युवा संगीतकारांना साद घालतात, त्या पद्धतीचं हे गाणं आहे. वसंत प्रभू यांच्या इतर गाण्यांपेक्षा हे गाणं निश्चितच वेगळं वाटतं.. जास्त आधुनिक वाटतं. कदाचित बाळासाहेबांनी म्हटल्यामुळे ते तसं झालं असावं. याच ‘कन्यादान’ चित्रपटामध्ये ‘लेक लाडकी या घरची’ आणि ‘तू असता तर’ ही दोन अप्रतिम गाणी आपल्याला ऐकायला मिळतात.

तसं बघायला गेलं तर लताजी इतर संगीतकारांकडेही मराठीमध्ये भरपूर गाणी गायल्या आहेत, परंतु वसंत प्रभूंकडे जी गाणी त्या गायल्या, तसा आवाज त्यांच्या इतर गाण्यांत आपल्याला आढळून येत नाही. अतिशय नितळ, निर्मळ आणि निकोप आवाज या गाण्यांना लाभलेला आहे. मग ते चित्रपटगीत असो किंवा भावगीत! वसंत प्रभू आणि लता मंगेशकर ही जोडी त्यांच्या खास अत्यंत सुमधुर गाण्यांकरता सदैव स्मरणात राहील. तीच गोष्ट आशाजी यांच्या बाबतीतसुद्धा नक्कीच आपल्याला जाणवते. वसंत प्रभू यांच्या अनेक गाण्यांना लताजी आणि आशाजी यांचा अत्यंत कोवळा, सुरेल आणि वाहता गळा लाभला, हे त्या गाण्यांचं आणि पर्यायानं आपल्यासारख्या रसिकांचं भाग्यच!

वसंत प्रभू यांची गाणी ऐकली की एक गोष्ट पटकन् जाणवते. ते विषयाला लगेचच हात घालतात. एक छोटासा सुरुवातीचा वाद्यवृंदाचा तुकडा.. तोही बऱ्याचदा जलदगती पद्धतीचा- आणि त्यानंतर थेट गाण्याला हात! वेळकाढूपणा कुठेही नाही. त्यामुळे त्यांची गाणी अत्यंत उठावदार होतात. त्यांच्या गाण्यांच्या चालीसुद्धा अत्यंत नक्षीकामयुक्त! मुरक्या, ताना आणि बारीक बारीक खोडय़ा काढल्यासारख्या हरकती त्यांच्या गाण्यांमध्ये भरपूर दिसतात. उदाहरणच द्यायचं झालं तर ‘शिकलेली बायको’ या चित्रपटातील ‘प्रेमा काय देऊ तुला’ हे गाणं ऐका! ‘प्रेमा’ या शब्दाच्या शेवटी पंचमावरून षड्जावर येणारी अत्यंत सुरेल तान आणि लगेच त्याला जोडून ‘काय’ या शब्दावर घेतलेली दुसरी तान.. असा प्रकार मराठी गाण्यांमध्ये फार क्वचित दिसतो. आणि यात आपण फार तानबाजीयुक्त काही ऐकतोय असा अजिबात संशयसुद्धा येत नाही. अत्यंत सहज आणि अभिनिवेशहीन असा सगळा प्रकार! तोच प्रकार आपल्याला ‘पुत्र व्हावा ऐसा’ या चित्रपटात ‘जेथे सागरा धरणी मिळते’ या गाण्याच्या अंतऱ्यात ऐकू येतो. तो अख्खा अंतरा म्हणजे एक त्यामानानं संथ लयीतील तानच आहे. डोंगरातून वाहत येणारी नदी सागराला जाऊन मिळते, या निसर्गाच्या किमयेचं स्वररूप म्हणजे हा अंतरा आहे. ‘चाफा बोलेना’ या गाण्यातसुद्धा ‘काही केल्या फुलेना’ या शब्दांवर सुंदर तान घेऊन वसंत प्रभू आपल्याला ध्रुवपदाकडे नेतात. वसंत प्रभू हे उत्तम कथ्थक नृत्य शिकलेले होते अशी माहिती मिळते. त्याचा प्रभाव कुठंतरी या सर्व गाण्यांवर जाणवतो. परंतु नृत्यातील क्लिष्ट गणितं, तिहाया आणि अवघड तुकडे हे त्यांच्या गाण्यात कुठंही जास्त आढळत नाहीत. बहुधा मेलडीमध्ये या गोष्टी लुडबुड करतील असं वाटल्यामुळे त्यांनी त्या जाणीवपूर्वक टाळल्या असाव्यात अशी शक्यता आहे.

परंतु चित्रपट संगीतापेक्षाही वसंत प्रभू जास्त रमले ते भावगीतांत! पी. सावळाराम यांच्याबरोबर ‘कल्पवृक्ष कन्येसाठी’, ‘गंगा जमुना’, ‘धागा धागा’, ‘सप्तपदी मी’, ‘हसले ग बाई हसले’, ‘हृदयी जागा तू अनुरागा’ आणि ‘पंढरीनाथा झडकरी आता’सारखी अजरामर भाव-भक्तीगीतं त्यांनी निर्माण केली. बहुधा ‘गीत रामायणा’ची प्रेरणा घेऊन ‘रघुनंदन आले आले’, ‘रामा हृदयी राम नाही’ आणि ‘रघुपती राघव गजरी गजरी’सारखी गाणीही त्यांनी खूप केली, परंतु ‘गीत रामायणा’ची उंची ती गाणी गाठू शकली नाहीत. परंतु इतर भक्तीगीतं मात्र वसंत प्रभूंनी इतकी सुंदर रचलेली आहेत, की त्यांतल्या गोडपणाचा असर अजूनही किंचितही कमी झालेला नाही. ‘ये ग ये ग विठाबाई’सारख्या जनाबाईच्या ओव्या, ‘राधा कृष्णावरी भाळली’सारखी गवळण, ‘उठा उठा सकल जन’सारखी अतिशय तरल भूपाळी आणि ‘विठ्ठला समचरण’ हा अभंग यांचा उल्लेख करायलाच हवा. तशी या गाण्यांची यादी इतकी मोठी आहे की सर्व गाण्यांचा उल्लेख करणं हे एका लेखात शक्य नाही.

परंतु पी. सावळाराम आणि थोडय़ाफार प्रमाणात रमेश आणावकर सोडून वसंत प्रभूंनी अत्यंत अजरामर काम कुठलं केलं असेल तर ते म्हणजे भा. रा. तांबे यांच्या कवितांना संगीतबद्ध करण्याचं! ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’, ‘कळा ज्या लागल्या जीवा’, ‘ते दूध तुझ्या त्या घटातले’, ‘नववधू प्रिया मी बावरते’ आणि ‘निजल्या तान्ह्यवरी’ यांसारखी गाणी म्हणजे मराठी भावगीतांतील उत्तुंग पर्वतच आहेत. त्यातही ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’ हे गाणं एक खूप वेगळंपण घेऊन येतं. खरं तर हे एक मृत्यूगीत आहे. आपण हे जग सोडून गेल्यानंतर ज्यांना आपण आपलं मानलं, तेच सर्व स्वकीय हळूहळू कसे परिस्थितीला सामोरे जात जगायला लागतील आणि आपल्याला विसरतील याचं विषादपूर्ण वर्णन करणारं हे गाणं. परंतु प्रभू या गाण्याकरता मल्हार रागाची योजना करतात. मल्हार हा सृजनाचा राग आहे. आत्तापर्यंत आपण मल्हारमध्ये ऐकलेली गाणी ही वर्षांऋतूचं वर्णन करणारी व निसर्गाचं गुणगान गाणारी आनंदी, उत्फुल्ल गाणी आहेत, परंतु ‘जन पळभर’सारख्या गाण्यात मल्हार वापरणं हे खूप आव्हानात्मक काम होतं. मुळात ते सुचणंच फार अवघड आहे. परंतु प्रभू ते लीलया करतात. या गाण्याला मराठी संगीताच्या इतिहासात अत्यंत मानाचं स्थान आहे. दुसरं अत्यंत वैशिष्टय़पूर्ण गाणं आहे.. ‘गंगा जमुना डोळ्यात उभ्या का?’ या गाण्याचा ‘सा’ कुठला आहे, तेच नीट कळत नाही. म्हणजे सुरुवातीला जो ‘सा’ वाटतो तो अंतरामध्ये ‘रे’ वाटतो आणि परत ध्रुवपदाकडे येताना आपण मूळ स्वरावर येतो. हिंदी चित्रपट संगीतातील ‘यहुदी’ या चित्रपटात ‘ये मेरा दीवानापन है’सारखं गाणं याच पद्धतीचं आहे. मात्र त्यातील सहजताही अफाट आहे. असा चमत्कार या गाण्यात घडला आहे हे ऐकणाऱ्याला कळतसुद्धा नाही. अशा बऱ्याच गमतीजमती आपल्याला वसंत प्रभू यांच्या गाण्यांमध्ये आढळतात. भा. रा. तांबे यांच्याप्रमाणेच कुसुमाग्रज यांचं ‘अनामवीरा’ आणि ‘जीर्ण पाचोळा पडे तो उदास’, तसंच माधव जुलियन यांचं ‘प्रेमस्वरूप आई’ ही अप्रतिम गाणीही प्रभूंनीच रचली आहेत आणि ती कायम मनाच्या कप्प्यात राहतील.

ही सर्व गाणी ऐकताना एकच गोष्ट जाणवते, ती म्हणजे या गाण्यांतला गोडवा. कितीही संगीताचा अभ्यासक असला तरीसुद्धा ‘वसंत प्रभूंची गाणी खूप गोड आहेत’ या ढोबळ विधानापलीकडे दुसरं कुठलंही विधान त्याला सुचू शकत नाही. प्रभूंनी लावण्या फार केल्या नाहीत. गोंधळ, पोवाडे, पाश्चात्त्य गाणी असे कुठलेही प्रकार हाताळले नाहीत. त्यांनी फक्त छान छान, गोड गोड गाणी दिली. परंतु त्यामुळे त्यांचं महत्त्व काही कमी होत नाही. वैविध्य असणं म्हणजे चांगलं असणं अशा गैरसमजुतीच्या काळात आपण जगत आहोत. कुठल्याही संगीतकाराच्या भात्यात सगळे बाण असलेच पाहिजेत असा काही नियम नाही. आपली संगीतकला म्हणजे विविध वस्तूंचं प्रदर्शन- विक्रीकरिता मांडणारा मॉल नाही, हे कायम ध्यानात घेतलं पाहिजे. चार गोष्टी कमी मिळाल्या तरी चालतील, पण जे असेल ते अस्सल असेल, अतुलनीय असेल आणि स्वत:च्या उपजत व स्वयंभू गुणांनी समृद्ध व परिपूर्ण असेल, ते जास्त महत्त्वाचं. वसंत प्रभूंची गाणी ही अशी आहेत.. बावनकशी सोन्यासारखी! आणि हेच वसंत प्रभूंकडून आपल्याला शिकण्यासारखं आहे.