शेखर देशमुख
लष्कराच्या भाकऱ्या भाजणे, या वाक्प्रचाराचे सकारात्मक-नकारात्मक ध्वन्यार्थ प्रत्येकासाठी भिन्न असले तरी एक अर्थ जवळपास सुस्पष्ट आहे, तो म्हणजे अशी एक कृती स्वेच्छेने करत राहणे आणि सरतेशेवटी प्रभाव-परिणाम आणि मिळकतीची गोळाबेरीज शून्यच राहणे. गोळाबेरीज शून्य ही अवस्था सध्या मराठीच्या प्रांतात साप्ताहिक, पाक्षिक आणि मासिक स्वरूपाने निघणाऱ्या छापील स्वरूपातल्या नियतकालिकांच्या वाट्याला येताना दिसतेय. किंबहुना, अनेकांसाठी साप्ताहिक वा मासिक स्वरूपाने एखादे नियतकालिक ऑनलाइन-ऑफलाइन चालवणे, ही लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचा, म्हणजेच गोळाबेरीज शून्य असणारा व्यवहार ठरताना दिसतोय. पण तरीही काही नियतकालिके हिमतीने प्रकाशित होताहेत, काही कशीबशी तग धरून आहेत. काही छापील आवृत्तीला टाळे ठोकून डिजिटल माध्यमात नशीब आजमावू पाहत आहेत.
संकुचित असेल व्यापक असेल, डावा असेल उजवा असेल, मधला किंवा इझमपलीकडे जाऊन विषयकेंद्री असेल, कुठल्या तरी एका विचाराचे बोट धरून नियतकालिके आताच्या घडीला प्रकाशित होताहेत. ही स्थिती बरी म्हणावी की केविलवाणी? वाचकांमध्ये संकुचित, व्यापक, डावा, उजवा, मधला अशी वर्गवारी शिल्लक आहे, की त्यांच्या विचारांचे सपाटीकरण झाल्याने सगळ्याच नियतकालिककर्त्यांपुढची वाचक केंद्री आव्हाने एकसारखीच आहेत? ही परिस्थिती आजची आहे की ‘सत्यकथा’, ‘माणूस’, ‘अनुष्ठुभ’, ‘आलोचना’, ‘अभिरुची’, ‘समाजप्रबोधक पत्रिका’, ‘सुधारक’ अशांच्या बऱ्या-बहराच्या पर्वातही ही स्थिती होती? म्हणजे, सर्वसामान्य वाचक आणि नियतकालिककर्त्यांचे वैचारिक सूर तेव्हाही पुरेसे जुळले नव्हते? नियतकालिकांचे कर्ते ताकदीचे होते, पण वाचक हा कच्चा लिंबू होता? पण तेव्हा निदान सर्वसामान्य वाचकांची बुद्ध्यांक पातळी भुईसपाट तरी झालेली नव्हती, आता त्याचेही सपाटीकरण झालेले दिसते.
सर्वसामान्य वर्गातल्या वाचकांचे कच्चा लिंबूपणही कायम आहे, हा अधिकचा भार. खरे पाहता नियतकालिके चालवणे हा सत्यकथा काळातही आतबट्ट्याचाच व्यवहार होता. पण साहित्य, समाज, संस्कृती, परंपरा या प्रांतात नव्या नव्या वाटा धुंडाळण्याची एका वर्गात तीव्र आस होती. त्यातून नियतकालिक-अनियतकालिक आणि १९५५ ते १९७५ या काळात बंडखोरीची पताका घेऊन मैदानात उतरलेल्या ‘शब्द’, ‘अथर्व’, ‘आत्ता’, ‘भारुड’, ‘फक्त’, ‘वाचा’, असो, ‘अबकडई’ आदी लघु नियतकालिकांच्या छोट्याशा विश्वात स्वत:ची अशी एक संपादकीय मूल्य व्यवस्था आकारास आलेली होती.
आलेल्या व मागवलेल्या साहित्याला पैलू पाडणारे निष्णात लोक या संपादकीय मूल्य व्यवस्थेचे कर्तेधर्ते होते. त्यांचे जगाविषयीचे भान पुरेसे विस्तारले होते, साहित्यविषयक समीक्षेची, सौंदर्यशास्त्राची, व्याकरणशास्त्राची, भाषाशास्त्राची उत्तम जाण होती. संपादन ही प्रक्रिया सर्जनाला अवकाश मिळवून देणारी कला आहे, केवळ दैनंदिन उपचार नव्हेत, याचे पक्के भानही होते. त्यामुळे त्या काळाच्या नियतकालिकांमध्ये आशय-विषयाला उंची आणि खोली मिळवून देणाऱ्या सर्जनासह समकालीन विश्वाचे व्यापक ठसेही उमटत होते. याचाच परिणाम म्हणून खोलात जाऊन एखाद्या विषयाची उकल होत होती. समीक्षेच्या चिकित्सापद्धतीला आंतरशाखीय ज्ञानाची जोड मिळत होती. कवितेच्या रचनाबंधाचे नवे प्रयोग होत होते. ज्याला सकस म्हणता येईल, अशा साहित्याची त्यातून निर्मिती होत राहिली. या प्रक्रियेतून जसे मोठ्या प्रमाणात लेखक घडत गेले, काही प्रमाणात वाचकही घडले. पण हे प्रमाण नियतकालिकांच्या भवितव्याला आधार देण्याइतपत कधीच बळकट झाले नाही.
हे खरे की, तेव्हा काही प्रमाणात वर्तमानपत्रे आणि मोठ्या प्रमाणात विविधस्पर्शी नियतकालिके ज्ञानाच्या प्रमुख स्राोतांपैकी एक होती. आता ज्ञानाचे स्राोत विस्तारलेत. जगाचे भान विस्तारलेले, विविध ज्ञानशाखांत प्रावीण्य राखून असलेले कर्ते आजही आहेत, पण इथे माहिती-ज्ञानाची सत्यता आणि दर्जा सांभाळणारी, भाषा, व्याकरण, मुद्रितशोधन यांवर बारीक नजर असलेली संपादकीय मूल्य व्यवस्था म्हणावी तशी टिकलेली नाही. आमच्या म्हणण्यात भाव जाणा, व्याकरण कसले पाहता असे म्हणणाऱ्या एका बंडखोर वर्गाने ती धुडकावलीसुद्धा आहे. म्हणजे, प्रस्थापित वर्तमानपत्रीय व्यवस्था आणि नियतकालिकांच्या पातळीवर मूल्य व्यवस्थेचा ऱ्हास आणि ज्ञानाच्या नव्या स्राोतांकडे ती जवळजवळ नाहीच, अशी ही दुहेरी आघात करणारी सध्याची स्थिती आहे…
डोक्यात नव्याने मासिक सुरू करण्याची योजना शिजत होती. त्याच दरम्यान एका ज्येष्ठ संपादक मित्राशी बोलणे सुरूच होते. आता खरोखरच नियतकालिकांचे दिवस राहिलेत का? नियतकालिकाचा वाचक तरी शिल्लक राहिलाय का? अशा मुद्द्यावरून विषय पुढे सरकत असताना त्याने ‘माणूस’कार श्री. ग. माजगावकरांच्या संदर्भाने घडलेला प्रसंग सांगितला. वर्गणीदारांच्या घटत्या संख्येमुळे नियतकालिकांपुढे उभे राहिलेले आर्थिक प्रश्न सुटावेत या उद्देशाने जेव्हा ते एका मोठ्या पदावरच्या देणगीदाराला भेटले; तेव्हा त्या देणगीदाराने त्यांचे सगळे म्हणणे ऐकून घेत सल्ला दिला. म्हणाला, याचा अर्थ नियतकालिकाची समाजाला गरज उरलेली नाही, अशावेळी थांबणे इष्ट!
हा प्रसंग घडला तेव्हा, ‘अभिरुची’, ‘सत्यकथा’, ‘छंद’, ‘आलोचना’, ‘ललित’, ‘मसाप पत्रिका’, ‘प्रतिष्ठान’, ‘हंस’, ‘अनुष्टुभ’, ‘कवितारती’, ‘पंचधारा’ अशा नियतकालिकांनी स्वत:ची नाममुद्रा उमटवलेली होती. स्वत:चं असं एक वाचक वर्तुळही आकारास आणलं होतं. ‘सत्यकथा’ हे १९३३ ते १९८२ या काळात, ‘अभिरुची’ १९४३ ते १५५३ व १९६६ ते ७६ या दोन कालखंडात आणि ‘छंद’ हे नियतकालिक १९५४ ते १९६० या काळात आपलं अस्तित्व राखून होतं. इकडे, ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘लोकसत्ता‘ अशा काही आघाडीच्या वर्तमानपत्रांनी आपापला वाचक घडवायला सुरुवात केली होती. ‘सत्यकथा’ काय, ‘माणूस’ काय साहित्य, कला, समाज, संस्कृती, समीक्षा या अंगांनी बरेच काही घडतही होते. मात्र, कोट्यवधी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात दर्जेदार साहित्य वाचणारा वाचक अपेक्षे इतक्या संख्येने पुढे येत नव्हता, हे तेव्हाचे जळजळीत वास्तव होते.
एकीकडे ‘सत्याकथा’ हे तेव्हा मराठी वाचकाभिरुची घडवत होतं, श्री. पु. भागवत, राम पटवर्धन त्या अभिरुचीला आकार देणारे शिल्पकार गणले जात होते. तेव्हासुद्धा पाच-सात कोटींच्या महाराष्ट्रात सत्यकथेच्या प्रती जेमतेम वर्गणीदारांमध्ये खपत होत्या. हीच परिस्थिती थोड्याफार फरकाने इतरही नियतकालिकांची होती. म्हणजे जेव्हा वाचक-लेखक घडण्याची प्रक्रिया जोर धरून होती असे आपण म्हणतो, तेव्हासुद्धा नियतकालिकांच्या खपाचा आकडा दोन-पाच हजारांच्या पलीकडे जात नव्हता.
याचा अर्थ, तेव्हासुद्धा वाचक जडणघडणीची प्रक्रिया मर्यादित स्वरूपानेच होती. याचा दुसरा अर्थ एकीकडे प्रकाशक, संपादक, लेखक, कवी, समीक्षक घडत होते, पण वाचक घडत नव्हते. मागे एका लेखात श्याम मनोहरांनी आपण लेखक घडवले, पण कादंबरीचे धड वाचक घडवले नाहीत, हे कटू वास्तव मांडले होते. मग जेव्हा विविधांगांनी वर्तमान पत्र, ग्रंथ प्रकाशन, नियतकालिकाच्या जगात घडामोडी घडत होत्या, प्रयोग होत होते, तेव्हासुद्धा ताकदीचा वाचक रिसिव्हिंग एंडला नव्हताच म्हणायचा.
९०च्या दशकानंतर तर सगळ्या क्षेत्रातल्या मूल्य व्यवस्थांना हादरे बसण्यास सुरुवात झाली होती. त्याचा परिणाम हळूहळू वर्तमानपत्रीय जग आणि कालांतराने प्रस्थापित ग्रंथ प्रकाशन व्यवसाय आणि नियतकालिकांवरही होऊ लागला होता. वर्तमानपत्रामुळे वाचकाच्या एक-दोन पिढ्या घडल्या न घडल्या तोच झपाट्याने कोसळत गेलेल्या मूल्य चौकटींमुळे वरवर जाणवत नसले तरीही वर्तमानपत्र, ग्रंथप्रकाशन आणि नियतकालिकांच्या जगातही हादरे बसायला सुरुवात झालेली होती. बाजारशक्ती वाचकांची आवड-निवड ठरवू लागली होती. ‘ॲडव्हटोरियल’च्या मार्गाने जाहिराती देता देता जाहिरातदार वर्तमानपत्रांचे आर्थिकस्तंभ बनू लागले होते.
आता पान पान जाहिराती त्यासुद्धा मालकीच्या, बिनमालकीच्या, दैनंदिन वृत्तपत्र जगतात नियम ठरू लागल्यात आणि बातम्या, लेख, टिपणे हे अपवाद. थोडक्यात, घसरणीचा वेग प्रचंड वाढलाय. मुख्य प्रवाहातल्या प्रसिद्धी माध्यमांतली नीतिमूल्ये कालबाह्य होऊन सजग वाचक नव्हे, तर अतिसंवेदनशील प्रेक्षक घडवले जात आहेत.
वाचकांच्या रुचीचे सपाटीकरण करणाऱ्या यंत्रणा तंत्रज्ञानावर स्वार होऊन आपले ईप्सित साध्य करताना दिसताहेत. दुसरीकडे, काही अपवाद वगळता नियतकालिकाच्या जगातली संपादकीय मूल्य व्यवस्थासुद्धा नाइलाजास्तव आउटसोर्सिंगचा मार्ग धरताना दिसते आहे. त्यामुळे शुद्धलेखनाच्या, व्याकरणाच्या, संपादनाच्या, मुद्रितशोधनाच्या चुका ही सर्वसामान्य (आणि सर्वमान्यसुद्धा?) बाब झाली आहे. वर्तमानपत्रात काय नियतकालिकात काय ‘दिलगिरी’ची सौजन्य प्रथा बंद पडल्यात जमा आहे. आज चुका करणारे काही बोलत नाहीत, चुका स्वीकारणारेही चालायचेच म्हणून गप्प होऊन राहतात, असा हा मामला होऊन गेला आहे. हा दुहेरी आघात होत असताना दर आठवड्याला, पंधरवड्याला, महिन्याला आर्थिक आधाराविना नियतकालिके चालवणे हा आतबट्ट्याचा व्यवहार ठरणे क्रमप्राप्त आहे.
एकूणच नियकालिकांच्या रूपाने लष्कराच्या भाकऱ्या कोणासाठी, कशासाठी भाजल्या जातायत? हा प्रश्न पडावा अशा स्थितीतही ‘अनुभव’, ‘मायमावशी’, ‘मिळून साऱ्याजणी’, ‘अंतर्नाद’, ‘युगवाणी’, ‘पुरोगामी जनगर्जना’, ‘पालकनीति’, ‘वयम्’, ‘कुल्फी’, ‘समतावादी मुक्तसंवाद पत्रिका’, ‘परिवर्तनाचा वाटसरू’ आदी विषय आणि वाचककेंद्री नियतकालिके प्रकाशित होताना दिसताहेत. याचे एक कारण शहरी भागातला, उच्चभ्रू, तथाकथित अभिरुचीसंपन्न वर्गातला, अंगी क्षमता असल्याचा संशय असलेला वाचक एक्झिट घेऊन बाहेर पडला असला, तरीही निमशहरी ग्रामीण, दुर्गम, अतिदुर्गम भागांमध्ये अजूनही शिक्षितांची पहिली पिढी पुढे येण्याची प्रक्रिया अजून सुरूच आहे.
जोडीला निमशहरी भागातला ‘नाही रे’ वर्गातला, पण थोडंफार शिकलेला, आपल्या अभिव्यक्तीला दुजोरा मिळण्याच्या अपेक्षेत असलेला आणि अर्थातच साहित्य समाज, संस्कृती, विज्ञान यांविषयी जाणकार असलेला आणि वर्तमान पत्रापलीकडे जाऊन विषयाच्या सखोल विवेचन, विश्लेषणाची अपेक्षा ठेवून असलेला अशा दोन-तीन वर्गातल्या; पण संख्येने तुरळक असलेल्या वाचकांच्या भरवशावर सध्याच्या नियतकालिकांचा डोलारा उभा आहे. या नियतकालिकांत प्रसिद्ध होणारे लिखाण एकेकाळच्या ‘सत्यकथा‘, ‘माणूस’मध्ये प्रकाशित झालेल्या लिखाणाच्या तुलनेत कुठे बसणारे आहे? लेखनसाहित्यावर संपादकीय संस्कार करणारा वर्ग किती ताकदीचा आहे, अलीकडच्या वीसेक वर्षांच्या कालखंडात किती टीकाकार, समीक्षक, किती दर्जेदार लेखक, कवी या नियतकालिकांनी घडवले- प्रसवले आहेत, हे एक वेगळेच चिकित्सेचे, संशोधनाचे मुद्दे आहेत.
हिंदीत सध्या सायकल, प्लुटोसारख्या दर्जेदार नियतकालिकांची बहार असल्याचे चित्र आहे. तिकडे अमेरिकेत न्यूयॉर्कर, अटलांटा, पॅरिस रिव्ह्यू ऑफ बुक्स, इकडे युरोपात ग्रँटा, लंडन रिव्ह्यू ऑफ बुक्स अशी दीर्घ नि सघन लेखन प्रसवण्याची परंपरा कायम आहे. मुळात कोणतेही नियतकालिक समाजाची खरेच गरज म्हणून जन्माला येते का? आणि समाजाची गरज संपली म्हणून बंद होते का? वास्तव हे सांगते की, समाजाची गरज असो वा नसो आपापल्या वर्तुळांपुरती नियतकालिके जन्माला येत राहतात. आपापल्या क्षमता-दमसासानुसार चालत राहतात, बहुतांशी ती नियतकालिक कर्त्यांच्या अभिव्यक्तीची गरज होऊन बसतात. विचार डावा असो, उजवा असो वा कुंपणावरचा. आम्ही एका विशिष्ट विचारांचा चष्मा घातला आहे. त्या चष्म्यातून दिसणारे कल्पनेतले वा वास्तव जग आम्हाला पुढे आणायचे आहे, अशा उद्देशाने सत्यकथा काळातही नियतकालिके प्रकाशित होत राहिली आहेत. वर्तमान तरी त्याला अपवाद कसा असेल?
वर उल्लेख केल्याप्रमाणे, ग्रामीण भागातली शिक्षित पहिली पिढी, शोषितांमधून येणाऱ्या वाचकांची चर्चा-चिकित्सेची आस असलेली पिढी आणि नव्या स्वरुपाच्या (फर्स्ट हॅण्ड की री सायकल झालेल्या ज्ञानाचे?) माहिती-ज्ञानासाठी आसुसलेले मोजके लोक हे सध्या प्रकाशित होणाऱ्या नियतकालिकांचे आधार आहेत. पण आजच्या या विशेषत: पहिल्या दोन वर्गातल्या आधारस्तंभांकडे वाचक म्हणून घडण्याचा संयम आहे का? वाचनातून चिंतन-मननाचा अवकाश तयार होतोय का, तेवढी फुरसत, एकाग्रता असलेले वाचक शिल्लक आहेत का आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने वाचक प्रेक्षकांचा बुद्ध्यांक गोठवणारी प्रस्थापित व्यवस्था तशी संधी या वाचकांना मिळवून देईल का? अशा काही कळीच्या प्रश्नांमुळे संभ्रमित बनलेल्या काळात नियतकालिक चालवण्याचा खटाटोप करत राहणे, आज नाही, आणखी २५-५० वर्षांनी संदर्भसाहित्य म्हणून दखल घेतली जाईल, या आशेने कष्ट घेत राहणे, एवढेच सध्या नियतकालिक कर्त्यांच्या जगात उरले आहे. म्हटले तर हीसुद्धा एक आशावादी गोष्टच आहे. काही वर्षांपूर्वी बदलापूरच्या ग्रंथसखा संदर्भग्रंथालयात सत्यकथेचे पुरातन अंक चाळताना, एखादे संचित शिल्प न्याहाळत असल्याचा भास होत होता. उद्या कदाचित नव्या पिढीतला कोणी संदर्भ आणि साहित्यमूल्यांनी श्रीमंत अशा आजच्या नियतकालिकांकडे अशाच नजरेने बघेल, हे स्वप्नसुद्धा या घटकेला आशावादीच आहे.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार, अनुवादक आणि ‘समतावादी मुक्त सवांद पत्रिका’ मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत.)
deshmukhshekhar101@gmail.com