विटाळ विध्वंसन!

यावेळचे मानकरी आहेत- गोपाळबाबा वलंगकर!

अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- गोपाळबाबा वलंगकर!

मागील लेखात आपण मोरो विनायक शिंगणे आणि बाळकृष्ण बापू आचार्य यांच्या ‘मुंबईचा वृत्तांत’विषयी जाणून घेतले. लेखकद्वयांचे हे पुस्तक १८८९ साली प्रकाशित झाले. त्याच वर्षीच्या ऑगस्टमध्ये मराठीत आणखी एक महत्त्वाचे पुस्तक (खरे तर पुस्तिकाच) प्रसिद्ध झाले. ते पुस्तक म्हणजे ‘विटाळ विध्वंसन’ अन् त्याचे लेखक आहेत गोपाळबाबा वलंगकर. या पुस्तकाविषयी आणि त्यातील लेखनाविषयी जाणून घेण्याआधी वलंगकरांविषयी जाणून घेणे गरजेचे आहे.

वलंगकर हे दलित चळवळीच्या प्रारंभकाळातील प्रमुख नेते व विचारक. एकोणिसाव्या शतकाची शेवटची दोन दशके हा वलंगकरांच्या कर्तृत्वाचा काळ. १८४० साली महाडमधील रावढूळ गावी जन्मलेले गोपाळबुवा कृष्णा वलंगकर लष्करातून हवालदार या पदावरून १८८६ साली निवृत्त झाले. त्यानंतर ते दापोलीला वास्तव्यास आले. या काळात ते महात्मा फुले यांच्या विचारांनी प्रभावित झाले. म. फुलेंशी त्यांचा चांगला संवादही होता. दापोलीत त्यांनी आपल्या चळवळीस सुरुवात केली. सत्यशोधकी विचारांचा प्रभाव आणि हिंदू धर्मशास्त्र व पुराणे यांचे वाचन यांमुळे वलंगकरांची विचारदृष्टी तयार झाली होती. सवर्ण हिंदू हे आर्य व अस्पृश्य वर्ग हा अनार्य अशी त्यांची मांडणी होती. कीर्तनांमधून ते आर्य हिंदू अस्पृश्य वर्गावर करीत असलेल्या अन्यायाचा परामर्श घेत. त्यासाठी ते धर्मग्रंथ, पुराणे यांतील उदाहरणे देत अस्पृश्य वर्गाचे प्रबोधन करत असत. जातिभेद व अस्पृश्यता ही परमेश्वराची निर्मिती आहे, ही मांडणी चुकीची व लबाडीची आहे हे वलंगकरांनी जाणले होते. ते मांडण्यासाठीच त्यांनी १८८८ मध्ये एक पुस्तिका लिहिली, जी १८८९ मध्ये ‘विटाळ विध्वंसन’ या नावाने प्रसिद्ध झाली. या पुस्तकाच्या सुरुवातीला ते लिहितात,

‘‘..श्रीमंत प्रौढप्रतापी संस्थानिक व सरदार रा. रा. वेदशास्त्रसंपन्न शास्त्री व विद्वान मंडळी रा. रा. ब्रह्मसमाज व प्रार्थनासमाज यांचे प्रमुख मंडळी, वैराग्यशील ईश्वरभक्तपरायण साधु-संत-महंत व इतर विद्वान व पवित्र हिंदु मंडळी ह्य़ांस कोकणस्थ अपवित्र महार मंडळी व तिचे प्रमुख विनयपूर्वक विनंती करतात की, आम्ही लोक तुमचे हिंदुस्थानवासी देशबांधव असता आजपर्यंत आपण सर्व हिंदु आमचा जो द्वेष तिरस्कार करीत गेला व जात आहो, तो ईश्वरनिर्मित शास्त्राचा जुलूम समजून आपणांस एक ब्र न बोलता आपल्या जगिक, सांसारिक व पारमार्थिक सुखाकडे दृष्टी न देता निमूटपणे सहन करीत गेलो व जात आहा, सर्व गोष्टीस मुकून आपणांस पशुपेक्षाही नीच करून घेतले. अठरा विश्वे दारिद्र्य आपल्या घरी भरले. आपल्या सर्व संततीला मोताद करून घेण्याच्या स्थितीस येऊन मुकाट राहिलो तरी आपला अधिकाधिक जुलूम होऊ लागला..’’

हे सांगून वलंगकरांनी पुढे लिहिले आहे-

‘‘..हल्ली जगातील व्यवहारात चालत आलेल्या लोकांच्या रीतीवरून आम्हास वाटते की, वरील (आपणांस पवित्र म्हणवून घेणाऱ्या) लोकांनी आमचा द्वेष व तिरस्कार जो केला आहे व करीत आहेत, तो ईश्वरनिर्मित शास्त्राचा जुलमाचा नियम नसता जाती धर्मरूप शास्त्राचा मत्सरामुळे व जात्याभिमानामुळे विनाकारण जुलूम मात्र होत आहे. कारण हिंदु धर्माच्या सर्व जातीला एक शास्त्र म्हणून नाही. नाना शास्त्रे व नाना पुराणे, नाना मते, नाना पंथ जातींच्या अनेकत्वामुळे झाली आहेत. त्या सर्वात जाती धर्म हे महाशास्त्र होऊन बसले आहे. हिंदू लोक सहा शास्त्रे व अठरा पुराणे ही एकीकडे गुंडाळून ठेवतील पण जाती नियमरूप शास्त्र त्यांच्या डोळ्यापुढे सर्वदा उघडे असते व त्याचा अंमल त्यांजवर निरंतर चालत आहे. रावणाचे राज्य गेले, रामाचे, कृष्णाचे, पांडवांचे, यवनांचे व पेशव्यांचे मराठी राज्य गेले, आणि सर्व एक ब्रह्म जाणणाऱ्या इंग्रज सरकारचे राज्य (जुलमी राजसत्ता देवास न आवडून ती फार दिवस न टिक्  देता लवकर नष्ट करून) उदयास आणले. पण जातीचे राज्य अद्यापी चालतच आहे. व त्याचा जुलूम मोगलाई जुलूमापेक्षा इतर कोणताही जातीच्या लोकांवर नसता कोकणातील महारांवर फार कडक रीतीने अंमल करीत आहे, कारण त्यापासून आमचे फारच नुकसान होत असून आम्ही सर्वस्वास मुकले जात आहोत.’’

यापुढच्या भागात वलंगकर कोकणातील महार समाजाला आठ तऱ्हेच्या निरनिराळ्या जुलमांमुळे कसे सर्वस्वास मुकावे लागत आहे, हे सांगतात. त्यातील हा काही भाग पाहा-

‘‘आम्ही आपल्या ह्य़ा अफाट हिंदू धर्मसिंधूत संस्कृत ज्ञानाविषयी अज्ञानी असल्याने चांगले पोहता न येऊन महाराष्ट्रसभेच्या उपसागरात किनाऱ्यासच गटांगळ्या खाता खाता जी थोडी बहुत शास्त्रातील व पुराणांतील सत्य वाक्ये हाती लागली त्यावरून व जगात चालत असलेल्या रीतीवरून आम्हास वाटते की वरील लोक आमचा जो तिरस्कार व द्वेष करीत गेले व जात आहेत तो सृष्टीनियमाविरुद्ध, बुद्धीविरुद्ध, नीतीविरुद्ध व सद्धर्माविरुद्ध आहे.. आणि काही काही सृष्टीविरुद्ध, बुद्धीविरुद्ध, नीतीविरुद्ध, सद्धर्माविरुद्ध लोकांचे चालीचे प्रश्न आहेत, ते वाचून आमच्या अज्ञानी व मत्सरी हिंदूंस जातीअभिमानामुळे क्रोध येईल; तर त्यापाशी आमची ही विनंती आहे की आम्ही ह्य़ा तुमच्या द्वेषाने पिसाळलेल्या श्वानाप्रमाणे झालो आहोत. म्हणून आपणास अशा कठोर वचनाचा चावा घेतला आहे. कारण न घेतो तर आपण आमच्या ह्य़ा अपवित्रतेच्या दु:खास पवित्ररूप औषध देणार नाही. जर भुंकत गेलो असतो तर आपण जातीधर्मरूप शास्त्राच्या सोडग्याने ताडण करून आम्हास पळविले असते. याकरता आपण सर्व पवित्र असणाऱ्या हिंदूंनी काही एक क्रोध मनात न आणता व पक्षपात, जात्याभिमान किंवा मत्सर न करता परमेश्वराला स्मरून खरा न्याय मिळविण्याविषयी देवांनी जसे क्षीरब्धीला मंथन करून चौदा रत्ने बाहेर काढली त्याप्रमाणे आपण सर्व पवित्र असणाऱ्या हिंदुधर्मसिंधूचे मंथन करून खरी वाग्रत्ने निवाडा करून छायास्पर्शाविषयी महार कोणत्या दोषास पात्र आहेत ते ठरवून त्यांस हिंदूधर्मशास्त्र संमत आहे किंवा हे लोक अगदीच पात्र नाहीत ते ठरवावे. कारण विचारांती पाहता पृथ्वीच्या ह्य़ा टोकापासून त्या टोकापर्यंत राहणाऱ्या कोणत्याही धर्माच्या (सर्व भक्षक, मेलेले अथवा जिवंत प्राणी) मनुष्यास ह्य़ा हिंदुस्थानात मोकळ्या मनाने फिरण्यास व सर्व व्यवहार करण्यास कोणत्याही गोष्टीची अडचण नाही. पण आम्ही हिंदुस्थानवाशी असून आम्हावर आमच्या देशबांधवांचा असा जुलूम होत आहे की पूर्वीची गुलामगिरी बरी होती, असे म्हटले तरी चालेल. पण सध्याची स्थिती त्याहीपेक्षा वाईट असून धड मनुष्य ना धड पशू अशी झाली आहे.’’

पुस्तकाच्या पुढील भागात वलंगकर ‘हिंदुधर्मसिंधू’ची चिकित्सा करून सव्वीस प्रश्न सवर्ण हिंदूंसमोर ठेवतात. त्यानंतर ते लिहितात-

‘‘बरे! उंच वर्णाचे लोक इतर जातीपेक्षा आपणास पवित्र समजून आमचा तिरस्कार करतात तर करतातच, पण इतरधर्मी लोकांस किंवा शूद्रादी अगदी लहान जातीच्या लोकांस देखील त्याप्रमाणे करण्यास उत्तेजन देतात. म्हणजे ह्य़ा कोकणस्थांत वा कोकणात महार, चांभार व मांग ह्य़ाशिवाय सर्व जाती ब्राह्मणाप्रमाणे पवित्र असून, छायास्पर्शाचा वीट मानतात. तर हा नीतीविरुद्धचा बुद्धीविचार सद्धर्माविरुद्ध व सृष्टीविरुद्ध जुलूम आहे यात संशय आहे काय?..

आमची विनंती आहे की महाराच्या छायेने सर्व कोकणस्थ पवित्र हिंदूंचे डोके-पोट दुखत असेल अथवा शरीर पोळून त्यावर फोड येत असतील किंवा महाज्वर होत असेल व स्पर्शाने पटापटा मरून नरकात जात असल्यास आमच्या पत्राचा विचार न करता ते परत पाठवावे किंवा फाडून टाकून आम्हास कळवावे की असे खरोखर होते. म्हणजे आम्ही सर्व कोकणस्थ महार हा प्रांत सोडून जेथे हिंदूंचा वाराही लागणार नाही अशा देशात जाऊन राहण्याविषयी सरकारास अर्ज देऊ. पण आपणा सर्व जातीच्या हिंदूंस असे दु:ख देणार नाही.’’

पुस्तकाच्या शेवटच्या भागाता वलंगकरांनी कोकणातील महार समाजाच्या दु:स्थितीचे वर्णन केले आहे. धारदार आणि तार्किक मांडणी असणारे वलंगकर यांचे हे पुस्तक दलित चळवळीच्या प्रबोधनसाधनांमधील ऐतिहासिक व महत्त्वाची संहिता आहे.

या पुस्तकानंतर पुढच्याच वर्षी वलंगकरांनी ‘अनार्य दोष परिहार मंडळी’ स्थापन करून अस्पृश्योद्धाराच्या आपल्या चळवळीला आकार दिला. १८५७ च्या बंडानंतर इंग्रज सरकारने लष्करातील महार रेजिमेंटमधील भरती टप्प्याटप्प्याने कमी करत आणत १८९० च्या सुमारास ती पूर्णपणे थांबवली होती. तेव्हा ही भरती पुन्हा चालू करावी, यासाठी सरकारला सह्य़ांचे विनंतीपत्र पाठवण्यासाठी वलंगकरांनी पुढाकार घेतला होता. मात्र पुरेशा सह्य़ांअभावी ते निवेदन सरकारला पाठवले गेले नाही, तरी याप्रकरणी वलंगकरांनी केलेले प्रयत्न महत्त्वाचे होते. याशिवाय ‘विटाळ विध्वंसक’ या नावाचे नियतकालिकही त्यांनी काही काळ चालवले होते. ‘सुधारक’ व ‘दिनबंधु’मध्येही त्यांनी काही लेखन केल्याचे सांगितले जाते. शिवाय १८९४ मध्ये त्यांचे ‘हिंदू धर्म दर्पण’ हे पुस्तक प्रसिद्ध झाल्याचा संदर्भ काही ठिकाणी आला आहे. १८९५ सालच्या सामाजिक परिषदेमध्ये वलंगकरांनी भावना हेलावून सोडणारे भाषण केल्याचा दाखला धनंजय कीरलिखित फुले चरित्रात आला आहे. त्यांच्या या सर्व कार्याचा गौरव डॉ. आंबेडकरांनीही केला आहे.

‘विटाळ विध्वंसन’ ही पुस्तिका व प्रा. सी. एच. निकुंभे यांनी वलंगकरांवर लिहिलेली छोटेखानी चरित्रपर पुस्तिका सुगावा प्रकाशनाने प्रकाशित केली आहे. हे साहित्य आपण आवर्जून वाचावे.

– संकलन: प्रसाद हावळे

prasad.havale@expressindia.com

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मराठी वळण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Articles in marathi on gopalbaba valangkar

ताज्या बातम्या