‘मार्मिक’चे कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत हे चतुरस्त्र लेखक आहेत. वैज्ञानिक विषयांपासून राजकीय विषयांपर्यंत आणि गुन्हेगारीपासून सामाजिक प्रश्नांपर्यंत अनेकविध विषयांवर त्यांनी लेखन केले आहे. प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास लाभलेला असल्याने त्यांच्यावर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, विशेषत: परखड लेखनाचा प्रभाव पडला. प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रोत्साहनामुळेच ते लिहायला लागले. त्याची सुरुवात अर्थातच ‘मार्मिक’ या व्यंग्यचित्र साप्ताहिकापासून झाली. त्यात ‘टोच्या’ हे सदर सावंत यांनी १९६८ ते १९७२ असे चार वर्षे लिहिले. राजकीय-सामाजिक विषय व व्यक्ती यांच्याविषयी शिवसेना स्टाईलने लिहिलेल्या त्या सदराच्या पुस्तक-मालिकेचा हा पहिला भाग. यातील लेख उपहासगर्भ आणि उपरोधिक आहेत. यात एकंदर २६ लेख असून त्यात तुलनेने राजकीय विषयावरील लेख जास्त आहेत. ४०-४५ वर्षांपूर्वीचे हे लेखन आहे. त्यामुळे आज हे लेख वाचताना बदलत्या राजकीय परिस्थितीचा संदर्भ ध्यानात घ्यावा लागतो. पण तत्कालीन राजकीय-सामाजिक विषयांची कल्पना आणि त्यावरील सावंत यांचे परखड भाष्य, यांचा मेळ जमल्याने हे पुस्तक वाचनीय झाले आहे. अर्थात हे सावंत यांचे अगदी सुरुवातीचे लेखन असल्याने यात काही प्रमाणात नवथरपणा आहे, तसा फारसा सफाईदारपणाही नाही, हे लक्षात घेऊन पुस्तक वाचायला हवे.
 ‘मार्मिक’चा टोच्या – पंढरीनाथ सावंत, युक्ता पब्लिकेशन, मुंबई,  पृष्ठे – ९८, मूल्य – १०० रुपये.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व दखल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marmikcha tochya
First published on: 09-03-2014 at 07:05 IST