संजय मोने sanjaydmone21@gmail.com

छोटा पडदा जेव्हा सरकारी होता तेव्हा मुख्यत: गोंधळ आणि अत्यंत बेचव सादरीकरण या दोन भक्कम खांबांवर लोकांची करमणूक व्हायची. काही कार्यक्रम खरंच सुंदर असायचे; परंतु ढिसाळ संयोजन आणि सुमार दर्जाची तांत्रिकता यांनी त्यांचा सत्यानाश व्हायचा. त्यात  छायाचित्रकार किंवा निर्माते, दिग्दर्शक यांचा दोष नसायचा. एकंदरच उदासीनता असायची. शिवाय अत्यंत विचित्र आणि विनोदी नियमांनी त्यांचे हात बांधलेले असायचे..

मागच्या आठवडय़ात आपण छोटा पडदा आपल्याला शाप आहे की वरदान, यावर चर्चा केली. अशा छापाच्या चर्चा पूर्वी नाटय़-साहित्य संमेलनांत व्हायच्या आणि त्या चर्चा ऐकणाऱ्यांना शाप आणि बोलणाऱ्यांना त्याबद्दल मिळणारी नुकसानभरपाई किंवा मानधन लक्षात घेतलं तर त्यांच्यासाठी वरदान, असा निष्कर्ष काढावा लागायचा! हा छोटा पडदा जेव्हा सरकारी होता तेव्हा तर मुख्यत: गोंधळ आणि अत्यंत बेचव सादरीकरण या दोन भक्कम खांबांवर लोकांची करमणूक व्हायची. काही कार्यक्रम खरंच सुंदर असायचे; परंतु ढिसाळ संयोजन आणि सुमार दर्जाची तांत्रिकता यांनी त्यांचा सत्यानाश व्हायचा. त्यात  छायाचित्रकार किंवा निर्माते, दिग्दर्शक यांचा दोष नसायचा. एकंदरच उदासीनता असायची. शिवाय अत्यंत विचित्र आणि विनोदी नियमांनी त्यांचे हात बांधलेले असायचे. कार्यक्रमाच्या आधी सुविचाराच्या पाटय़ा दाखवून समाज सुधारतो असं कुणाला वाटलं असेल, देव जाणे! मात्र, आजकाल सर्रास आढळणाऱ्या आणि त्याबद्दल कसलीही खंत नसणाऱ्या व्याकरणाच्या चुका तरी नसायच्या. परंतु ऐन दुपारी ‘लवकर उठणाऱ्या माणसाला धनधान्य मिळतं’ हा सुविचार का दाखवायचे, देव जाणे! कार्यक्रमाच्या निवेदिका बोलता बोलता सफाईने हातवारे करून आसपास उडणाऱ्या माशा वारायच्या. आजकाल त्या माशा नाहीशा झाल्या आहेत की हल्लीच्या निवेदक वर्गाचे सौंदर्य पूर्वीच्या त्या दर्जाचे राहिले नसल्याने माश्यांना त्यांच्या आसपास उडण्यात रस राहिला नाही, ते कळायला मार्ग नाही. मात्र, माश्या वारायची ती लकब वापरून अनेक विनोदी नटांनी आपली एक अख्खी पिढी त्यावर जागून काढली.

आपण जर्मनीतून त्यांची वापरात नसणारी सगळी उपकरणं आणून वाजत गाजत दूरदर्शन सुरू केलं. का केलं असेल तसं? त्यापेक्षा पाच-दहा वर्ष थांबून स्वत:च्या देशात बनलेली उपकरणं वापरून आपण दूरदर्शन का सुरू केलं नाही? त्यानंतर काही वर्षांनी खासगी वाहिन्या आल्या, त्या कशा चकचकीत दिसत होत्या! पण सगळ्याचीच घाई, दुसरं काय? असो!

तर, त्या दूरदर्शनचे कार्यक्रम बहुतांशी दर्जेदार असले, तरी काही काही मात्र गंभीर विनोदी असायचे. म्हणजे सादरीकरण करायचं असायचं तो विषय गंभीर आणि प्रत्यक्षात दिसायचं ते विनोदी असायचं. त्या काळात सर्व तांत्रिकता जरी जर्मनीतून आयात केलेली असली, तरी पडद्यावर बरेच वेळा दिसणारी ‘व्यत्यय’ नावाची पाटी मात्र अस्सल देशी बनावटीची असायची. शिवाय भाषिक अस्मितेची लागण झाली नसल्याने ती फक्त मराठीत असायची. आज जर ‘व्यत्यय’ ही पाटी दाखवायची वेळ आली, तर ती पाटी मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी आणि सध्याच्या वाहत्या वाऱ्यांचा अंदाज घेऊन गुजराथी अशा तब्बल पाच भाषांत दाखवावी लागली असती! एक बरं आहे, की ‘व्यत्यय’ या शब्दात ‘न’ किंवा ‘ण’ येत नाहीत, नाही तर पुन्हा प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यांचा नवाच वाद पेटला असता. असो! (‘असो’ हा शब्द पूर्वी विषय संपवण्यासाठी वापरात यायचा; आता आपल्या विचारांना मांडण्याची आडकाठी येते म्हणून नाईलाज या अर्थाने तो वापरावा लागतो.)

त्या काळात जेव्हा वीज सगळीकडे नव्हती (तशी आजही बऱ्याच ठिकाणी ती वायर्स किंवा बटन्स यातून जाणवत असली, तरी तिचं अस्तित्व बरेच वेळा प्रत्यक्षात नसतं.) तेव्हा शेतकरी वर्गासाठी कार्यक्रम असायचा. आणि तो शहरात जास्त दिसायचा. थकूनभागून आलेला आणि अजून बरीच कामं बाकी आहेत या विचारात असलेला शेतकरी कधी तो कार्यक्रम पाहणार? परंतु ‘वरून’ आज्ञा आलेली असणार! आपला देश शेतीप्रधान आहे. तेव्हा शेतकऱ्यांचे मनोरंजन आणि ज्ञान झालेच पाहिजे. त्या कार्यक्रमात आम्हा शहरी प्रेक्षकांना ज्ञान काही मिळाले नाही, पण मनोरंजन मात्र भरपूर झाले. शिवाय अभिनय करताना काय करायचे नाही, याचा वस्तुपाठ मिळाला तो वेगळाच!

त्या काळात शास्त्रीय संगीत आणि एकंदर संगीत याबद्दल एक कार्यक्रम असायचा. फार अप्रतिम होता तो. अनेक थोर गायक-वादक यांच्या मुलाखती घेतल्या जायच्या. डॉ. सुहासिनी मुळगावकर त्याच्या सादरकर्त्यां होत्या. त्या काळी त्या-त्या विषयातील जाणकार व्यक्तीनेच तो-तो कार्यक्रम सादर करायची अनिष्ट प्रथा होती. आज ती प्रथा पार मोडून काढण्यात आली आहे. तर, सुहासिनीबाई संपूर्ण कार्यक्रम पाहणारे सगळे जाणकार नाहीत याचं भान ठेवून कार्यक्रम सोपा, तरीही संबधित व्यक्तीचा आब राखत सादर करायच्या. आज आपण पाहाल तर कुठलाही कार्यक्रम अवांतर असा कोलाहल कायम ठेवून सादर केला जातो. कारण त्या-त्या विषयाची माहिती गोळा करण्यापेक्षा चकचकाट कसा होईल, याकडे जास्त लक्ष पुरवलं जातं. तेव्हाही घोळ व्हायचे खूप. बातम्या देताना कुणाचीतरी बातमी आणि भलत्याच माणसाचा फोटो असंही व्हायचं. एकदा एका कार्यक्रमासाठी मी तिथे गेलो होतो. कार्यक्रम संस्कृत भाषेत होता. आम्हा सगळ्या कलाकारांची संस्कृतची शिदोरी ‘अहं’ या एकाच शब्दापुरती होती. (आताही बऱ्याच कलाकारांना ‘अहं’ आहे, पण तो वेगळ्या अर्थाने!) तिथे गेल्यावर सगळा घोळ लक्षात आला. शिवाय माझं तेव्हाचं वय आणि मी सादर करत असलेल्या पात्राचं वय यात सुमारे चाळीस वर्षांचा फरक होता. तरीही कार्यक्रम चित्रित झाला. कोणाला काहीही कळलं नाही.

विनोदी चुटक्यांचा एक कार्यक्रम असायचा दर रविवारी. त्यातले बरेचसे सगळ्यांनी ऐकलेले असायचे. परंतु त्याची लोकप्रियता आजही लोकांच्या ध्यानात आहे. आमचे मित्र आणि प्रख्यात कलाकार सुधीर जोशी यांनी एक ‘बाबी ब्रेकर’ नावाची एकांकिका सादर केली होती. त्यानंतर सुमारे तीस वर्षांनी त्यांची मुलाखत घेणाऱ्याने तुमची सगळ्यात आवडती भूमिका कोणती, असा प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला उत्तर देताना सुधीरनं सांगितलं, ‘‘कलाकाराची आवडती भूमिका तीच असते जी लोकांना आवडते. स्वत:ला आवडणारी पण लोकांना नावडणारी अशी कुठलीच भूमिका नसावी. कारण जेव्हा आपण लोकांसमोर येऊन काही सादर करतो तेव्हा आपण त्यांच्यासाठीच अभिनय करत असतो. त्यामुळे इतकी वर्ष अभिनय करून आजही मला लोक ‘बाबी ब्रेकर’ म्हणून ओळखतात. त्यामुळे तीच माझी आवडती भूमिका.’’ आजकाल इतकं हुशार उत्तर देणारे कलाकार राहिले नाहीत. असो!

१९७५ साली आणीबाणी घोषित केली गेली आणि सगळ्या सरकारी माध्यमांचा ताबा सत्ताधारी पक्षातल्या लोकांकडे आला. त्यांनी आपल्या प्रचारासाठी त्याचा मनमुराद वापर केला. तरीही त्यानंतर झालेल्या निवडणुकीत लोकांनी त्यांच्या मनोरंजनाच्या आड येणाऱ्या आणि नको त्या गोष्टी गळ्यात मारणाऱ्या सरकारला त्यांची जागा दाखवून दिली. क्रिकेटचे सामने दाखवले जायचे. त्यात कोण कोणाशी खेळतंय, इतकंच कळायचं. त्यातही एकदा फार मजेदार किस्सा घडला होता. ते संच असायचे ना टीव्हीचे, त्यात काहीतरी गडबड व्हायची. अशीच गडबड माझ्या मित्राच्या घरी झाली. सामना पाहायला त्याच्या वडिलांनी सुरुवात केली आणि म्हणाले, ‘‘हे बघ, दोन्ही संघ वेस्ट इंडिजचेच आहेत! असे सामने कधी सुरू झाले?’’ त्यांना मग त्या संचामध्ये सुधारणा करून दिल्यावर काही खेळाडू काळे आणि काही गोरे दिसू लागले तेव्हा कळलं, की सामना वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांत सुरू होता!

त्या काळात अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम सुरू असताना कुठल्यातरी फडतूस मंत्र्याने कुठेतरी केलेलं उद्घाटन दाखवण्यासाठी प्रक्षेपण खंडित केलं जायचं. या सगळ्या कार्यक्रमांचं निवेदन करायला त्या काळात स्मिता तळवलकर किंवा स्मिता पाटील असायच्या, इंग्रजीत लुकु संन्याल असायच्या. त्यामुळे आज ‘चला एकदाचं टाकू उरकून’ हा भाव जो निवेदकांच्या चेहऱ्यावर दिसतो तो नसायचा. भक्ती बर्वे-इनामदार ‘साप्ताहिकी’ नावाचा कार्यक्रम सादर करायच्या. भक्ती बर्वे-इनामदार.. मराठी नाटय़सृष्टीतली सर्वोत्तम कलाकार. फेसबुकवर गाजलेली नव्हे, तर खऱ्याखुऱ्या अर्थाने श्रेष्ठ! शिवाय प्रदीप भिडे होते. प्रा. अनंतराव भावे असायचे. ज्यांना बातम्या देताना आपण काय आणि कशाबद्दल बातम्या देतोय, याचं भान आणि ज्ञान होतं. कमलेश्वर साहित्यिक कार्यक्रम करायचे. ‘मित्राऽऽऽ’, ‘याऽऽऽ’ किंवा ‘वॉवऽऽऽ’ असं न म्हणताही ते फार सुंदर असायचे. त्या काळात मराठी बोलणारे मराठी बोलायचे आणि इतर भाषिक फक्त आपल्या मातृभाषेत बोलायचे. प्रश्नही त्याच भाषेत विचारले जायचे आणि उत्तरंही त्याच भाषेत दिली जायची. ‘माझा रोल इतका डिमांडिंग आणि चॅलेंजिंग आहे, की कान्ट टेल यू मोर’ अशी उत्तरं दिली जात नव्हती. जरी हे कलाविश्व कृत्रिम असलं, तरी तो कृत्रिमपणा वाटायचा नाही.

आजही हे सगळं बदलता येईल. मराठीतलं उत्तमोत्तम साहित्य या पडद्याद्वारे लोकांपर्यंत पोहचवता येईल. परंतु ते मुळात माहीत असणारा कोणीतरी पाहिजे. त्या काळातही दलित स्त्री-लेखकांच्या साहित्यावर आधारित मालिकेत ‘दया पवार’ या ‘लेखिके’चं नाव नसल्याबद्दल एका दूरदर्शन अधिकाऱ्याने आकाशपाताळ एक केलं होतं, असं त्या काळातले काही जण शपथेवर सांगायचे! एका हिंदी मालिकेसाठी नियुक्त केलेल्या तरुण मुलीने मुन्शी प्रेमचंद यांना मीटिंगसाठी पाचारण करायला सांगितलं होतं!

आता यावर अजून काय बोलणार?