गोळा करण्याचा नस्ता छंद

एक माणूस अचानक एकदा येऊन मला भिडला.

|| संजय मोने

एक माणूस अचानक एकदा येऊन मला भिडला. उत्तम रसम वडा संपवून पुढच्या तट्टे इडलीची ऑर्डर द्यायच्या व्यापात मी पूर्णपणे गुंतलो होतो.

‘‘नमस्कार! मी अण्णासाहेब पोलकमवार.’’

खरं तर स्वत:च स्वत:ला ‘साहेब’ म्हणवून घेणारी माणसं मला आवडत नाहीत. पण भुकेमुळे आणि विशेषत: कर्नाटकी भुकेमुळे मी व्याकूळ झालो होतो.

‘‘बोला! काय काम आहे?’’

‘‘आपण कलाकार आहात ना! आपल्याला ओळखतो मी. मी आपली कामं पाहिली आहेत. काय नाव आपलं?’’ अण्णा उद्गारले. हो! मी कशाला उगाच त्याला ‘अण्णासाहेब’ म्हणू? त्यात त्याने ओळखतो असं म्हणून, वर नाव माहीत नाही असं सांगून मला जमिनीवर आणून सोडलंच होतं.

‘‘काम सांगा हो!’’ जरा रागच आला होता मला.

‘‘मला अडकित्ते जमवायचा छंद आहे. सहाशे आहेत माझ्याकडे. नाना फडणवीसांचा अडकित्ताही आहे.’’ बरं झालं, हा नंतर जन्माला आला. नाही तर नानांना सुपारी खायच्या वेळी अडचण आली असती. कारण त्यांचा अडकित्ता याच्याकडे!

‘‘मी काय करू?’’ माझा आपला योग्य प्रश्न.

‘‘पुस्तक लिहा माझ्या या छंदावर.’’ आज्ञावजा अण्णाची विनंती.

‘‘त्यापेक्षा जरा काही चांगल्या कामात वेळ घालवा..’’ असं म्हणून मी त्याला वाटेला लावला. हा काय छंद आहे? दुसरं काही नाही याच्या आयुष्यात? का असले उद्योग करतात माणसं? प्राणी करतात का असं काही?

माणूस आणि जनावर किंवा मनुष्य आणि इतर प्राणी यांच्यात काय फरक आहे? पटकन् तुम्ही म्हणाल, की मानव सोडल्यास इतरांना हसता येत नाही. पण आपण जसे हसतो- म्हणजे खदाखदा ते मंजूळ स्मित- अगदी तसेच प्राणी हसत नसतील. त्यांचा हसताना चेहरा वेगळा होत असेल. आपल्याला तो माहीत नसेल कदाचित. आपल्या आजूबाजूलाही न हसायची कला साध्य केलेले खत्रूड चेहरे असतातच की! कुत्रा आनंदात असला की शेपटी हलवतो असं म्हणतात. परंतु या माणसांना शेपटीही नसते. त्यामुळे ती आनंदून गेली आहेत किंवा खूश झाली आहेत, हे कळायला मार्ग नसतो. सणासुदीचा उत्तम मेजवानीचा बेत असला तरी त्यांच्या चेहऱ्यावर कडबा खाल्ल्याचे भाव असतात. तेव्हा केवळ हसता येत नाही, हा एकमेव फरक मानव आणि प्राणी यांत असतो, असं ठामपणे नाही म्हणता येणार.

मग नेमका फरक काय असतो? तर प्राण्यांना गोष्टी गोळा करण्याची सवय नसते. अन्न नाही. वस्त्रांचा तर प्रश्नच नाही. घरही ते त्यांना हवं तेव्हा बांधतात. किंवा दरवर्षी बांधतात. रेरा आणि स्टॅम्प डय़ुटी, जी. एस. टी. ही भानगड नसल्याने त्यांना ते परवडतेही! शिवाय ‘मांगल्य’, ‘पर्णकुटी’ किंवा ‘श्रमसिद्धता’ असली नावं शोधून, ती घरांना देऊन स्वत:च्या मेंदूला आणि इतरांना त्रास द्यायचा खटाटोपही त्यांना नसतो. ‘कुत्रा गरीब आहे. मालकापासून मात्र सावध राहा..’ अशा पाटय़ाही त्यांच्या घरावर नसतात!

माणसं मात्र हा सगळा व्याप ओढवून घेतात. घरं बांधतात आणि त्या घरात वस्तू जमवायला सुरुवात करतात. बहुतेक घरांत अशा शेकडो गोष्टी असतात. आमच्या एका मित्राने घरी दोन काठय़ा आणून ठेवल्या होत्या. कशासाठी? कधी ढोल वाजवावा लागला तर काठय़ांवाचून अडायला नको म्हणून! एका मोठय़ा बहुराष्ट्रीय कंपनीत खूप वरच्या हुद्दय़ावर आहे तो. ऑफिसात त्याचा चहा बनवायला आणि त्याला दुपारचे जेवण टेबलावर वाढायला दोन वेगळे नोकर आहेत. असा हा माणूस आपल्याला पोटासाठी कधीतरी ढोल वाजवावा लागेल, ही महत्त्वाकांक्षा उराशी बाळगून का बसत असेल? बरेच र्वष त्या काठय़ा पडून होत्या. शेवटी त्याच्या बायकोच्या भावाने त्या पोखरून त्यातून बासरी निर्माण करायचा बेत आखला. ती बासरी तयार झाली. म्हणजे बाहेरून दिसायला ती हुबेहूब बासरी होती, पण आतून सूर काही उमटत नव्हते. एका प्रख्यात बासरीवादकाला नेऊन त्याने ती दाखवली. ते गृहस्थ जरा- हिंदीत म्हणतात तसे- ‘गरम मिज़ाज’वाले होते. त्यांनी त्याच बासरीने त्या भावाची पाठ सडकून काढली. तेव्हा त्याच्या तोंडून जे सूर निघाले त्यांचा आवाका ऐकून ते बासरीनवाजही भयचकित झाले होते. आपल्या घरातही बऱ्याच वेळा काही वस्तू ‘का असतील या?’ हा प्रश्न सोबत घेऊन पडलेल्या असतात. हा वस्तू जमा करण्याचा सोस कोणीही थांबवू शकत नाही.

माझ्या ओळखीचे एक गृहस्थ आहेत. त्यांना घडय़ाळं जमवायचा छंद आहे. चांगली दोन-अडीचशे घडय़ाळं आहेत त्यांच्याकडे. का? माहीत नाही. प्रत्येक घडय़ाळ चालू आहे (‘चालू’ हा शब्द घडय़ाळांच्या नीतिमत्तेबाबत नाहीये!). मी त्यांना दोन-तीनदा भेटायला बोलावलं तर प्रत्येक वेळी पंधरा-वीस मिनिटं ते उशिराच आले. उपयोग काय त्या घडय़ाळांचा? त्यातली काही घडय़ाळं म्हणे आताच्या काळात लाखांना विकली जातील. पण त्यांनी एकही विकलेले नाही. जर कधी माझ्यावर आर्थिक आपत्ती ओढवली तर असू देत, असं त्यांनी सांगितलं. मात्र, आपल्यावर आपत्ती ओढवेल असा विचार करून जर कोणी हा असा छंद जोपासत असेल तर ते योग्य आहे का?

जुन्या गाण्यांच्या तबकडय़ा काही जणांकडे होत्या. आणि एखादं गाणं ऐकावंसं वाटलं तर त्यासाठी त्यांची मिनतवारी करायला लागायची. अशा काही लोकांनी त्या काळात फार माज करून दाखवला. आता? आता हवं ते गाणं मिळतं ऐकायला. हवं तेव्हा! नाटकांची तिकिटं जमवणारे काही लोक आहेत. कशासाठी? यासाठी वेळ घालवावा असं का वाटतं त्यांना? अशा वस्तू गोळा करणाऱ्यांना ‘कलेक्टर’ म्हणतात. असा छंद बाळगणारे बहुतेक मध्यम आय गटात मोडतात. अशा वस्तू गोळा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा काम करून चार पैसे जास्त मिळवले तर बरं नाही का? यांच्या घरातले बऱ्याचदा या छंदापायी कावलेले असतात. पण तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत असतात. काही श्रीमंत माणसांच्या घरी भिंतींवर अनेक चित्रं लटकवलेली असतात. ती काय किमतीला घेतली आहेत, इतकंच बहुतेकांना माहीत असतं. लाखो-करोडो रुपये किंमत मोजून ती घरात लटकत असतात. टॉम कीटिंग नावाचा एक अप्रसिद्ध कलाकार होता. त्याच्यावर अस्सल पेंटिंग्जची नक्कल केल्याच्या आरोपावरून खटला भरला होता. त्यात साक्ष देताना तो म्हणाला की, ‘‘आज जगभर मी नक्कल केलेली सुमारे अडीच हजार पेंटिंग्ज अस्सल म्हणून लोकांनी विकत घेतली आहेत.’’ त्यानंतर त्याला एका आर्ट गॅलरीने अशी पेंटिंग्ज ओळखायच्याच नोकरीवर ठेवलं.

इतिहासकालीन वस्तू जमा करण्याचा छंदही बाळगणारे खूप आहेत. कुणाची तरी पगडी, कुणाची तरी कटय़ार, कुणाची पानाची डबी, निरनिराळी पत्रं.. असं बरंच काही ते जमवत असतात. त्याला ते जुने आहे यापेक्षा दुसरे कुठलेही गुण चिकटवता येणार नाहीत. अशा मोठमोठय़ा महापुरुषांच्या वस्तू गोळा करण्यापेक्षा त्यांचं ऐतिहासिक महत्त्व इतरांना का नाही सांगत ते? मोहेंजोदारो आणि हरप्पा इथली संस्कृती किती पुढारलेली होती, याचे तपशील किंवा अवशेष गोळा करण्यापेक्षा त्या काळात कालवे आणि मलनि:सारणाची जशी व्यवस्था होती ती आज आधुनिक साधनसामुग्री असताना आणि विज्ञानाने अफाट प्रगती केलेली असतानाही आपण आपल्याकडे अजून आणू शकत नाही, याबद्दल अभ्यास केला पाहिजे. महाराजांच्या राज्याभिषेकाला कोण होतं आणि कोणी विरोध केला, याची माहिती गोळा करण्यापेक्षा स्वराज्य निर्माण करण्यामागे त्यांची तळमळ नेमकी काय होती, ते सांगणं महत्त्वाचं आहे. आप्तस्वकीय वगैरे न बघता अपराध्यांना त्यांनी किती कठोर शासन केलं ते जाणून घेतलं पाहिजे. आज राज्यकर्ते आणि आपण सगळेच गुन्हेगारांवर पांघरूण घालण्यात पुढे असतो. काय उपयोग आहे त्या गोळा केलेल्या माहितीचा? महाराज जितके कठोर राज्यकर्ते होते, आज तितके कोणी आहेत का? आग्य्राला मोगलांच्या कैदेत असताना इथे राज्य सुरळीत चालू होतं, कुठलीही बंडाळी त्या काळात झाली नाही.. अशा आशयाची पत्रं जमवणारे भरपूर आहेत. आज राज्यकर्ते कैदेत सोडाच; दुसऱ्या कुठल्या कामासाठी राज्याबाहेर गेले तरी त्यांना इथे काही होईल का, अशी धाकधूक वाटत असते. मोगल गादीवर बसायचं असेल तर कटकारस्थानं करून, उरलेल्या वारसांचा बीमोड करूनच बसावं लागायचं. आज तेच आहे की सगळीकडे! नाव महाराजांचं आणि विचार-आचार मोगलांचे- हीच आजची राज्यरीत आहे.

हे असं सगळं गोळा करण्याचा छंद असणाऱ्या माणसांबद्दल माझ्या मनात काही वैर नाही; परंतु असा छंद बाळगणारे बहुतेक जण शिक्षित आहेत. निदान साक्षर आहेत. पण त्यांच्याखेरीज असे बरेच जण आहेत, की जे सामान्य आहेत. कुठला तरी छंद बाळगावा अशी त्यांची आर्थिक किंवा बौद्धिक ऐपत नाही. पण तरी काहीतरी गोळा करणं हा मानवी जीवनाचा स्थायीभाव त्यांना चुकलेला नाही. म्हणून मग त्यांच्या डोक्यात कोणीतरी काहीतरी भयंकर भावना, विचार भरवायला लागतात. माणसं ते विचार गोळा करायला लागतात. पुढे मेंदूत गोळा केल्या गेलेल्या माहितीला धर्म, जातपात, ईश्वर, उच्च-नीच असे रंग दिले जातात. आणि एक दिवस त्यातल्या कुणाच्या तरी मेंदूचा स्फोट होतो आणि आपल्या सगळ्यात श्रेष्ठ समजल्या गेलेल्या जीवजातीला काळिमा फासला जाईल असं काहीतरी भीषण कृत्य घडतं आणि मानवजात पशूच्या पातळीवर येते. बऱ्याच वेळा आजूबाजूला घडणारा हिंसाचार हा माणसाने गोळा केलेल्या चुकीच्या विचारांतूनच निर्माण होतो. आर्य चाणक्यांचे एक वचन आहे.. राहू दे! आधी मेंदूत जमा केली गेलेली जुनी घाण बाहेर काढू या. वचनबिचन नंतर..

sanjaydmone21@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मी जिप्सी.. बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta lokrang marathi articles

ताज्या बातम्या