‘मीरा कोसंबी : एक अजब रसायन’ हा नीलिमा रड्डी- मीनाक्षी पवार यांचा लेख वाचला. त्यांनी मीराच्या अजब व्यक्तिमत्त्वाचा आत्मीयतेने शोध घेतला आहे. मीरा कोसंबींना ज्ञानपिपासू घराण्याची परंपरा लाभली होती. त्यांचे आजोबा धर्मानंद कोसंबी व वडील डी. डी. कोसंबींनी आपल्या ज्ञानसाधनेने महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेत मोलाची भर घातली आहे. त्यांचाच वारसा मीरा चालवीत होती. त्यांच्या अचानक मृत्यूमुळे ज्ञानाचा एक दिवा कायमचा मालवला आहे. ही महाराष्ट्राची,
किंबहुना देशाची मोठी हानी आहे.
डिसेंबर २०१४ मध्ये एक दिवस मला अचानक मीराचा फोन आला- ‘मी मीरा कोसंबी बोलतेय.’ हे शब्द ऐकून क्षणभर माझा माझ्या कानांवरच विश्वास बसला नाही. त्या म्हणाल्या, ‘पंडिता रमाबाईंवरील माझे इंग्रजी पुस्तक एका प्रकाशन संस्थेतर्फे प्रसिद्ध होत आहे. प्रकाशक परदेशस्थ असल्याने कॉपी- राइटसंबंधी ते फार दक्ष आहेत. केडगाव येथील पंडिता रमाबाई मुक्ती मिशनबरोबर माझे स्नेहाचे संबंध आहेत. त्यांच्याकडून मी पंडिता रमाबाईंचे काही दुर्मीळ फोटो मिळवले आहेत. परंतु आता ते प्रसिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडून अधिकार मिळणे अवघड झाले आहे. याकामी तुम्ही मला मदत करू शकाल का?’ ‘माझ्या परीने मी प्रयत्न करीन,’ असे आश्वासन मी त्यांना दिले. ‘फादर, तुम्ही पुण्यात याल तेव्हा अवश्य घरी चहाला या,’ असे निमंत्रण त्यांनी दिले. त्यांचा पत्ता दिला. एका विदुषीशी आपली भेट होणार या विचारानेच मी मोहरून गेलो. परंतु गेल्या महिन्यात त्यांचे अचानक देहावसान झाले आणि ही भेट झालीच नाही. मीराचे कर्तृत्व व ज्ञानपिपासा पाहून त्यांना सरकारने पद्म पुरस्काराने सन्मानित करायला हवे असे वाटते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोवळा तो झाला कवण धर्म!
‘बाई संभाळ कोंदण’ हा दासू वैद्य यांचा लेख अप्रतिम होता. स्त्रीची ऋतुप्राप्ती हा विषय आजही निषिद्ध मानला जातो. तो कवीने कवितांच्या आधारे लेखात उलगडून दाखवला आहे. त्यात ‘जाळभाज, कावळा शिवणे, ऋतुप्राप्त होणे’ यांसारखे शब्द कुठेही अश्लीलता न आणता अर्थासहित मांडले आहेत. आदिमानवाने भीतीपोटी ऋतुप्राप्तीची केलेली कल्पना, त्यातून निर्माण  झालेले समज-गैरसमज, रक्तस्रावाबद्दलची गूढता, भीती, ‘विटाळ’ शब्दाची निर्मिती, ‘भस्त्र’ म्हणजे अपत्यांना जन्म देणारी पिशवी म्हणजेच स्त्री.. अशा अभ्यासपूर्ण माहितीआधारे लिखाण केल्याबद्दल अभिनंदन!
मी निवृत्त प्राध्यापिका असून अनेक ठिकाणी विविध विषयांवर बोलत असते. एकदा एका महिला मंडळात संत कवयित्री सोयराबाई (संत चोखामेळा यांची पत्नी) यांच्या ‘विटाळ’ शब्दावरील अभंगावर बोलत असताना ‘हा शब्द देह व जातीचा अस्पर्श’ या अर्थी असून असे अभंग म्हणण्याचे टाळलेत तर बरे, असा सल्ला मला दिला गेला. हा अभंग असा होता-
देहासी विटाळ म्हणती सकळ  
आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध
देहीचा विटाळ देहींच जन्मला
सोवळा तो झाला कवण धर्म  
विटाळावाचोनि उत्पत्तीचे स्थान
कोण देह निर्माण नाही जगी
म्हणुनी पांडुरंगा वानितसे थोरी
विटाळ देहांतरी वसतसे
देहाचा विटाळ देहींच निर्धारी
म्हणतसे महारी चोखियाची..
समाजात काही स्तरांत स्त्रियांमध्ये आजही याविषयी गूढता, लाज कायम आहे. हा लेख वाचून या स्त्रियांना याबद्दलची खरी माहिती मिळेल.
– डॉ. ज्योत्स्ना देशपांडे

मराठीतील सर्व पडसाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meera kosambi
First published on: 22-03-2015 at 01:35 IST