उठा, उठा, दिवाळी आली..

‘‘उठा, उठा.. दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली..’ या मोती साबणाच्या मोहक जाहिरातीने गेला महिनाभर मला भुरळ घातली आहे.

‘‘उठा, उठा.. दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली..’ या मोती साबणाच्या मोहक जाहिरातीने गेला महिनाभर मला भुरळ घातली आहे.  तसं पाहायला गेलं तर ही एक अगदी सिधीसाधी, थेट जाहिरात आहे. उगीचच कुणी गौरांगना नाही की ओलेते स्नानदृश्य नाही.  एक भावुक वृद्ध, एक प्रेमळ पिता अन् एक अवखळ, निष्पाप मुलगा. चाळीच्या गॅलरीत टांगलेले कंदील.. आणि एकापाठोपाठ एक प्रकाशमान होणाऱ्या खोल्या. दरवाजावरची टकटक आणि त्या छोटय़ाने हातात पकडलेला मोती साबण. ही जाहिरात मला माझ्या बालपणात घेऊन गेली. खूप काही आठवले. दिवाळीची सुट्टी. सुट्टीतला गृहपाठ. (प्रोजेक्ट वर्क नव्हे!) पुण्याच्या अप्पा बळवंत चौकात लागलेले दिवाळी अंकांचे स्टॉल्स. अंक सायकलच्या कॅरिअरला लावून आईबरोबर निघालेली अस्मादिकांची वरात. मनपाच्या मोकळ्या जागेत लागलेले फटाक्यांचे स्टॉल्स. आईने जेवढी ‘अमाऊंट’ आखून दिलीये तेवढय़ाच अकरा रुपयांचे फटाके घेणारे आम्ही.. आणि निवडलेल्या फटाक्यांची किंमत पाच-दहा रुपयांनी जास्त झाल्यावर गुपचूप मागे जाऊन फटाकेवाल्याला ते सगळे फटाके पिशवीत भरण्याची खूण करणारे माझे पपा.. घरी आल्यावर त्या फटाक्यांचे चार दिवसांसाठी केलेले वाटे. प्रत्येक वाटय़ाचे पुन्हा सकाळ-संध्याकाळसाठी केलेले वर्गीकरण. घराच्या दारात चिकटवलेली लक्ष्मीची पावले. एक गोलाकार रांगोळीचा स्टिकर. धनत्रयोदशीला पपांच्या हातातील अंगठी मागून घेऊन त्याची केलेली साग्रसंगीत पूजा. अंगणात बांधलेल्या विटा-पोतेरे-मातीच्या किल्ल्यावर पेरलेल्या हिरव्या अळीवाची मखमल. किल्ल्याच्या सर्वात वरच्या माथ्यावर विराजमान झालेले महाराज.. आजूबाजूला पेरलेले मावळे.. हिरकणी बुरुजापाशी उभी असलेली हिरकणी.. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रस्त्यावरून जाणाऱ्या शेवल्रे, फियाट अशा मोटारींची मॉडेल्स.. ‘महाराजांच्या काळात मोटार कशी?’ असले ऐतिहासिक प्रश्न आम्हाला पडायचे नाहीत. आमच्या करमणूक भंडारातील यच्चयावत गोष्टींना किल्ल्याच्या आजूबाजूला प्रदर्शनीय स्थान मिळायचे.
..नरक चतुर्दशीच्या दिवशी पायाने फोडायचा तो चिरोटय़ाचा राक्षस.. दूध, तेल आदी उपचारांनी समृद्ध झालेले सुगंधी उटणे.. आणि सर्वावर मुकुटमणी म्हणजे गोल, वजनदार, नदीकिनाऱ्याच्या गोटय़ाप्रमाणे भासणारा गुळगुळीत, प्लॅस्टिकच्या वेष्टणातील मोती साबण. वर्षभर आमचे अंग घासणे लाल लाइफबॉयवर चाले. पण वाणसामानात ऑक्टोबर महिन्यात मोती साबण दिसला की आम्हाला दिवाळी जवळ आल्याची कुणकुण लागे.  पाऊस येण्याआधी ‘पेरते व्हा’ सांगणाऱ्या ‘पेर्त्यां’ पक्ष्यासारखा ‘मोती’ आम्हाला आगामी दिवाळीची सूचना देई. त्याचे प्लॅस्टिक कव्हर नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावरच निघे. पण त्यापूर्वी कमीत कमी आठवडाभर तरी मी तो गोल सुगंधी गोटा गालाला घासून पाही. मोती साबणाच्या प्लॅस्टिक आवरणालाही अभ्यासाच्या पुस्तकाच्या एखाद्या प्रकरणाचे मानाचे पान लाभत असे. ‘‘मोती पुरवून वापर.. झिजवायचा नाही..’’ ही आईची दटावणीही नित्याचीच होती. मोतीने आमची दिवाळी अन् आमचे बालपण खऱ्या अर्थाने सुगंधित केले. त्याचा दरवळ आज पाच दशकांनीही जशाच्या तसा शाबूत आहे. म्हणूनच साबणाची जातकुळी बदलली.. रंग, रूप, गंध बदलले. वडीच्या जागी द्रावण आले. फुलांच्या पाकळ्या आल्या. बदामाचे तुकडे आले. सोन्याची िरग साबणात दडल्याची आमिषे आली. परदेशस्थ साबणांचे पीक आले.. त्यातही फेसाळ आणि बुडबुडय़ांचे मिश्रण आले.  आमच्या बालपणी न्हाणीघर बाहेरच्या कोनाडय़ात असे. त्या न्हाणीघराची बाथरूम झाली. तिचा आकार घरातल्या खोलीएवढा मोठा झाला. टब आला. शॉवर आले. जाकुझीची मिजास आली. मिक्सर ही बाब फक्त स्वयंपाकघरात वापरायची गोष्ट न उरता आंघोळीच्या पाण्याचे तापमान ठरवू लागली. बाथरूममध्ये टेलिव्हिजन आणि टेलिफोन लागले. आणि-
‘‘कह दो के आ रहे है।
 साहब नहा रहें हैं॥’’
हा परवलीचा वाक्प्रचार रूढ झाला. आमची राहणी बदलली, तशी आमची न्हाणीही बदलली. बदलला नाही तो मोती.. त्याचे दिवाळीतील स्थान.. आणि त्याची परंपरा!
..आयुष्य हे असेच असते. कधीही बदलू नयेत अशी वाटणारी शाश्वत मूल्ये बदलतात. नाती बदलतात, गोती तुटतात. आयुष्य तुम्हाला कधी कोणत्या गोष्टीचे वचन देत नाही. नशीबही आणाभाका घेत नाही. पण तुमच्या आजूबाजूचे लोक घेतात. काही म्हणतात.. ‘मी तुला कधी सोडणार नाही.’ पण सोडतात. काही म्हणतात.. ‘शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करेन..’ पण ते उश्वास पूर्ण होण्यापुरतेही टिकत नाही. काहींच्या मते- तुम्ही अनमोल असता. पण वारा फिरताच तुम्ही कवडीमोल होता. आयुष्य अशाच सफेद असत्यांनी भरलेले असते. हे असत्य आहे, हे कळल्यावर तुम्ही त्याला कसे सामोरे जाता, यावर तुमच्या आयुष्याची खोली ठरते. लांबी-रुंदी परमेश्वराने आखलेली असतेच; खोली ठरवण्याची जबाबदारी फक्त तुमची असते. क्षणभर वाटते, ही खोटी वचने नसती तर आयुष्य अधिक बरे झाले असते.. सुंदर झाले असते. मला माहीत नाही- सुंदर झाले असते की नाही ते;  पण वेळोवेळी त्या बेगडी वचनांवर आपण विश्वास ठेवतो. म्हणूनच आयुष्य सुसह्य़ होते, हे खरेच. आपण आजकाल अशा तुकडय़ा तुकडय़ांवरच जगायला शिकतो. वर्ष सारे असेच जाते अन् दिवाळी येते. आणि दिवाळीची सूचना द्यायला येतो मोती साबण. जाहिरातीचे माध्यम बदलते.. वापरणारे बदलतात.. बदलत नाही ती मोतीची वडी. मोती माझ्या मनात दिवाळीचे शेकडो नंदादीप उजळवतो.. सारे घरदार सुगंधित करतो.. आणि क्षणोक्षणी बदलणाऱ्या या क्षणभंगुर आयुष्यात काही गोष्टी अक्षयी, न बदलणाऱ्या आहेत.. त्या हे आयुष्य जगण्यास योग्य बनवतात याची साक्ष देतो..
‘‘उठा, उठा दिवाळी आली,
मोती स्नानाची वेळ झाली..’’
डॉ. संजय ओक

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Moti soap advertisement utha utha diwali aali

ताज्या बातम्या