अंजली मालकर
शास्त्रीय गायन क्षेत्रातील असामान्य प्रतिभेचे कलाकार पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ज्योत्स्ना प्रकाशनतर्फे ‘कुमार स्वर एक गंधर्व कथा’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. कुमारवयीन मुलांना डोळ्यासमोर ठेवून ज्येष्ठ लेखिका माधुरी पुरंदरे यांनी या पुस्तकातून कुमार गंधर्वाचे थोडक्यात जीवन चरित्र सांगितले आहे. पुस्तकातील चित्रे नामवंत चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांची आहेत. श्रवण, रंग आणि शब्द असा अनोखा त्रिवेणी संगम या पुस्तकाच्या ठायी झाला आहे असे मला वाटते. एखाद्या अवलिया कलाकाराच्या आयुष्याचा प्रवास त्याच्याभोवतीची वलये बाजूला काढून विशिष्ट वयोगटातील रसिकांसाठी शब्दबद्ध करणे अतिशय कठीण असते. त्याच्यातील असामान्य प्रतिभेचे दैवतीकरण समाजात रूढ असताना ते बाजूला सारून तर्काधिष्ठित गोष्ट लिहिण्याचे सामथ्र्य माधुरी पुरंदरेंच्या लेखणीतून दिसून येते. कुमारांचे गायनासंबंधीचे विचार, जगण्याचे तत्त्वज्ञान सांगताना त्यांच्यातील संवेदनशील कलाकार पाहायला मिळतो. शिवाय काही संगीतविषयक पारिभाषिक माहिती जसे- तीन/ चार स्वरात बांधलेल्या लोकधुना, द्रुत, विलंबित ख्याल सोप्या पद्धतीने वाचकांसमोर आल्या आहेत. कुमारांच्या एवढय़ा भव्य कारकीर्दीतून नेमके प्रसंग आणि त्यावरच्या त्यांनी केलेल्या बंदिशी लेखनातून मांडताना माधुरीताईंनी कथेतील अप्रतिम प्रवाहीपणा जपला आहे. गायक कलाकाराचे चरित्र लिहिताना लागणारी तटस्थता आणि प्रेम, दोन्ही भाव त्यांच्या शब्दांमधून व्यक्त होतात. त्यांच्या अचूक शब्दांना पुढे चाल दिली ती चंद्रमोहन यांच्या संवेदनशील चित्रांनी. एका उत्तुंग गायकाचा जीवनक्रम सांगताना त्याचे भाव विश्व, गायन विचार, केवळ शब्द आणि क्यूआर कोडमधील ध्वनिफितीतूनच नाही तर रंगांच्या भाषेतून सांगण्याचा सुंदर प्रयोग या पुस्तकाच्या माध्यमातून झालेला दिसून येतो. शब्दांच्या पलीकडे जाऊन कुमार भेटतात ते चित्रकलेच्या बहुआयामी कोंदणातून! कलाकाराचे चरित्र हे बहुतकरून कलाव्यवहारानेच जास्तीत जास्त व्यापलेले असते. त्यातून संपर्कात येणारी माणसे, घटना त्याच्या कलाकृतीची प्रेरके असतात.
कुमारांच्याबाबतीत सांगायचे तर स्वर, लय, शब्द हीच त्यांची प्रेरके होती. ती धारण करणारा तंबोरा हेच त्यांचे अधिष्ठान होते. या प्रेरकांच्याबरोबर सुरू झालेला कुमारजींचा जीवन प्रवास चितारताना मूर्त माध्यमाला स्वराच्या अमूर्ताकडे नेणे आवश्यक होते. संगीत आस्वादाचे शिक्षण चंद्रमोहन यांनी घेतलेले असल्यामुळे त्यांची याबाबत विचारदृष्टी स्पष्ट असल्याचे त्यांनी मुखपृष्ठावर पानभर दोन तंबोरे काढले आहेत यावरून कळते. दोन्ही तंबोऱ्यांच्या तारा एकमेकांसमोर आहेत. त्यांच्यातील एकत्व इतके बेमालूम आहे की त्यांच्या वेगवेगळ्या तारा एकत्रच भासतात. तंबोऱ्यांचे रंग गेरू आणि शेणमातीचे आहेत, म्हणजेच त्यातील नादाने सृष्टीशी अनुसंधान साधले आहे. कुमारांचे संपूर्ण आयुष्य ज्याने व्यापले होते अशा जोडी तंबोऱ्याच्या तळाशी त्यांची गायनात तल्लीन झालेली प्रतिमा रेखाटली आहे. तंबोऱ्याच्या तारांच्या जागेवर पांढऱ्या रंगाची कमी जास्त जाडीची पांढरी रेघ काढताना तिच्या शेवटाशी पांढरट झब्बा कुर्ता आणि जाकिटातील कुमार काढले आहेत. तंबोरा झंकारत असल्यामुळे तारांची पांढरी रेघ कमी जास्त जाडीची झाली आहे. तंबोऱ्याच्या सुरात एकरूप झालेल्या कुमारांना जणू त्यामुळे तंबोऱ्याचे शुभ्रत्व प्राप्त झाले आहे. त्यांचे लक्ष जमिनीकडे असून डावा हात तिरका होऊन आकाशाकडे गेला आहे. जसे काही तंबोऱ्याच्या मूलकमलावर आसनस्थ होऊन आयुष्यात पडलेल्या उलटय़ा फाशातील स्वर काबूत आणण्याची विजिगीषू महत्त्वाकांक्षा त्यांच्या शरीराकृतीतून प्रकट होते आहे. भारतीय संगीतातील स्वर हे गोलाकार आहेत. ब्रह्मदेवाच्या नाभीतून उमललेल्या कमळासारखे सप्तकातील सातही स्वर एकमेकातून उमलतात. गाताना त्यांची शृंखलाच तयार होत असते. तंबोऱ्याच्या वरच्या, उजव्या आणि डाव्या भागात विविध रंगांची अशी प्रसृत झालेली स्वरवलये या धारणेची आठवण करून देतात. कुमार आणि तंबोरा यांचे अद्वैत आणि त्यातून बनलेला माहोल याची जिवंत चौकट म्हणजे हे मुखपृष्ठ होय. मुखपृष्ठावरील मथळ्याची अक्षरेसुद्धा या माहौलमध्ये विरघळून जातात. शब्द कसेही उलटसुलट फिरवले तरी त्यातून कथारूपाला साजेसाच अर्थ निर्माण होतो, हे देखील या पुस्तकाचे वैशिष्टय़च म्हणता येईल. जसे पहिल्या आलापावरूनच गायकाचा दर्जा लक्षात येतो, त्याचप्रकारे मुखपृष्ठानेच रसिकांची पहिली वाहवाह घेतली आहे.
चंद्रमोहन कुलकर्णी यांनी शब्दांची भावात्मक उंची वाढवण्यासाठी चित्रकलेतील इलस्ट्रेशन, श्ॉडो आर्ट, जलरंग, कॅलिग्राफी, पोट्र्रेट, स्केच अशा अनेक तंत्ररीती मुक्तपणे वापरल्या आहेत. कुमारांनी देखील शास्त्रीय गायन प्रस्तुतीत परंपरेने ठरवलेले ठरावीक गानक्रिया न वापरता भावदर्शनाच्या कक्षा खुल्या केल्या होत्या. कुमारांची प्रतिमा लक्षवेधी करताना पांढऱ्या रंगाचा अप्रतिम वापर त्यांनी पुस्तकात केला आहे. गायनाची नादमयता चित्रातून व्यक्त होताना, इथे त्यांची अक्षरेदेखील गोलाईयुक्त होतात. निसर्गाच्या प्रतीकांचा वापर त्यांच्या भावस्थितीला व्यक्त करताना चंद्रमोहन यांनी वेगळ्या अर्थाने प्रतीक रेखाटनाची जुनी परंपरा या पुस्तकात चित्रबद्ध केली आहे. या पुस्तकातील लहान कुमार दोन तंबोऱ्यांमध्ये गातानाचे चित्र तर या नायकाचे साररूप असल्याचे मला जाणवले. शुभ्र झब्बा पायजमा घातलेली, ताठ बसलेल्या छोटय़ा आकृतीतून आत्मविश्वास ओसंडून वाहत आहे, दोन चमकदार डोळ्यातून गायनाविषयी प्रेम आणि आनंद आणि दोन्ही बाजूला असलेले त्याच्यापेक्षा दुप्पट उंचीचे तंबोरे गायनाची भव्यता, तंबोऱ्यावरची नक्षी आणि गायनातून निर्माण होणाऱ्या स्वरनक्षीचा सुरेख संवाद त्यांच्या वलयांकित रेषा निर्माण करतात. चित्रासाठी वापरलेले नैसर्गिक रंग चित्राची प्रगल्भता वाढवतात. चित्राच्या बाजूला मोठय़ा अक्षरात हाताने लिहिलेले रंगीत काव्य मुलाच्या मनातील निरागसता आणि सौंदर्यदृष्टी व्यक्त करतात. ही फ्रेमच अतिशय विलोभनीय झाली आहे. तंबोऱ्यांच्या खोळी, त्यांची ठेवण्याची स्थिती, ‘कुमार गंधर्व’ ही पदवी मिळाल्यावर चेहऱ्यावरील आनंद आणि निरागसता, गुरूच्या मनातील प्रेमभाव, सगळीच चित्रे अगदी मनापासून चितारली गेली आहेत. त्यातील बारकावे मुळातून बघण्यासारखे आहेत.
‘कुमार स्वर एक गंधर्व कथा’, – माधुरी पुरंदरे, चित्रे- चंद्रमोहन कुलकर्णी,
ज्योत्स्ना प्रकाशन,
पाने- ७२, किंमत- ३०० रुपये.