|| डॉ. आशुतोष जावडेकर
‘‘बाबा, मी आय-कार्ड मिळाल्याखेरीज शाळेत जाणार नाहीये! खूप रागावतात टिचर. मी इथे सोफ्यावर ठेवलेलं कार्ड तूच हलवलं असणार. तू काल रात्री हॉलमध्ये उशिरा टीव्ही बघत बसलेलास. मी बघितलेलं तुला रात्री टॉयलेटसाठी उठलेलो तेव्हा!’’
तेजसच्या पोराने शाळेला जायला दहा मिनिटे बाकी असताना लांबलचक अल्टिमेटम दिला. तेजसची बायको सकाळीच सगळ्यांसाठी पोहे करून ऑफिसला गेलेली. आणि तेजसची आज रजा असल्याने आणि मुलाचे व्हॅनकाका येणार नसल्याने त्याने मुलाला शाळेत सोडायचं आणि मग अरिनसोबत फिरायला जायचं असा प्लॅन केलेला. आता हा पोरगा घरीच थांबला तर काय करा, या धाकाने तेजसने निमूटपणे आय-कार्ड शोधायला सुरुवात केलेली.
काल रात्री ऑफिसमधून काही विशेष कारण नसताना बॉसची बोलणी खाऊन तो उशिरा घरी आलेला. तोवर सगळे झोपले होते. मग त्याने मस्त कॉफी बनवली आणि सोफ्यावर कानाला हेडफोन लावून नेटफ्लिक्सवरची बीच डेस्टिनेशनची मालिका बघितली होती. ती मालिका घरात सगळे असताना हॉलमधल्या टीव्हीवर तरी नक्कीच बघता येत नसे. ते परदेशी समुद्रकिनारे आणि त्याला साजेशा विलायती मॉडेल पोरी बघत बघत तो सोफ्यावरच झोपलेला. (आणि तरी स्वप्नात त्याचा बॉसच आलेला!) तेव्हा झोपताना सोफ्याच्या इथे काहीतरी हाताला लागलेलं त्याने ढकलून दिलेलं- हे त्याला आत्ता आठवलं. तेच आय- कार्ड असणार! तेजसच्या मनात आलं- ‘काय नाटकं आहेत साला! अमुक तमुक नाव, इयत्ता इतकी इतकी, ही शाळा, हा पत्ता, हे पालकांचे फोन क्रमांक. का घालायचं हे रोज आय-कार्ड ? ट्रिपला वगरे जाताना ठीक आहे. पण रोजच्या रोज मुलं येऊनही शिक्षकांना ही बेसिक माहिती ठाऊक नसेल तर शाळा बंद करा.’ आणि मग या स्वतच्याच विचारावर तो हसला. तितक्यात पोराला सोफ्याच्या दोन कुशन्सच्या मधोमध बरोबर त्याचं आयडी सापडलं आणि बापाकडे एक करुण दृष्टिक्षेप टाकत तो म्हणाला, ‘‘चल आता. सोड पटकन् मला.’’ तेजसला पोराच्या अॅटिटय़ूडवर एक लेक्चर द्यावंसं वाटलं, पण एव्हाना उशीर झालेला. आणि शाळेत जाण्याआधी त्याला मुलाचा मूड खराब करायचा नव्हता. पोराशी एक भांडण पेंडिंग ठेवत त्याने त्याला शाळेत सोडलं आणि थेट अरिनकडे गेला.
अरिनला गाडीत घालून त्याने थेट गाडी गावाबाहेरच वळवली. आकाशात ढग होते. उकडत मात्र होतंच. ‘‘कुठे नेतोयस मला तेजसदा?’’ अरिनने आश्चर्याने विचारलं. त्याला वाटलेलं- की जायचं असेल जवळच्या कॅफेत.
तेजस उत्तरला, ‘‘काय एवढय़ा अपॉइंटमेंट आहेत? चल मुकाट.’’
‘‘अरे, माझ्या नाहीयेत. पण तुझ्या गळ्यातलं तुझं कंपनीचं कार्ड बघून मला वाटलं- तुलाच पुढे ऑफिसमध्ये जायचंय.’’ तेजसने पाहिलं तर खरंच गळ्यात कार्ड होतं. पोराचं ‘आय-कार्ड.. आय-कार्ड’ सुरू होतं तेव्हा नेहमीच्या सवयीने तेजसनेही गळ्यात त्याचं कंपनी-कार्ड घातलेलं.
‘‘या कंपनीच्या..!’’ असं म्हणत तेजसने दोन दणकट शिव्या हाणल्या आणि ते गळ्यातलं कार्ड काढून त्वेषाने मागच्या सीटवर फेकून दिलं. अरिन एकूण त्याचा मूड जोखत गप्पच बसला. त्याने माहीला मात्र व्हॉट्सअॅपवर हे सगळं लगेच कळवलं. माहीने लिहिलं, ‘‘अरे, मूड नसेल त्याचा. तू शांत राहा थोडा वेळ.’’
‘‘गाणी लावू या?’’ काहीसं घाबरत अरिनने विचारलं. ‘‘लाव की कुठलीही प्ले-लिस्ट!’’ तेजस गुरगुरला. अरिनला लावायचं होतं अरिजित सिंगचं गाणं; पण चुकून मिका सिंगचं ‘िढक-चिका हे हे’ असे उदात्त, काव्यात्म शब्द असलेलं गाणं लागलं! तेजसने मान वळवत एकदा असं काही रोखून बघितलं की अरिनने गाणंच थांबवलं. नेहमी काही तो असं पडतं घेत नसे, पण तेजसदा हा त्याच्या प्रेमाचा माणूस होता. आणि प्रेम असलं की समजुतीने घेणं आलंच.
एव्हाना त्यांची गाडी गाव सोडून हायवेला थोडा वेळ चालून आता आतल्या छोटय़ा रस्त्यावर वळली होती. या रस्त्याला वाहनांची गर्दी नव्हती. दोन-तीन मोजकी गावं मध्ये लागली आणि मग एका उंच डोंगराच्या कडेला तेजसने गाडी थांबवली आणि म्हणाला, ‘‘चल, इथे बेस्ट चहा मिळतो- या कडेच्या टपरीत. आम्ही ट्रेकिंग करायला ऑफिसमधले लोक यायचो तेव्हा इथेच चहा घ्यायचो.’’
आता ढग अगदी खाली, जवळ आले होते आणि हलका पाऊस पडू लागला होता. अरिन उतरला. त्याने हात- पाय मोकळे केले जरा. आणि मग त्या टपरीच्या दिशेने तरातरा निघालेल्या तेजसच्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं, ‘‘तेजसदा, थांब रे, आधी मला काय झालंय ते सांग!’’
तेजसला एकदम त्या स्पर्शातली माया जाणवली आणि त्याला आतून बरं वाटलं. त्याने गाडीकडे परत जात खिडकीतून डोकं आत घालत त्याचं आय-कार्ड बाहेर काढलं, उंचावून धरलं आणि म्हणाला, ‘‘अऱ्या, कधी कुठल्या आय-कार्डला तू बांधील राहू नकोस! माझी सगळी ओळखच या कार्डपुरती होत चाललीय रे. सतत काम, डेडलाइन.. आणि तरीही आमच्या सरांची रागवारागवी.’’
अरिनने ते कार्ड हातात घेतलं. शांतपणे वाचलं. त्याला लक्षात आलं, की आज भूमिका पालटून त्याला तेजसचा दादा व्हायला लागणार! दोघे पुरुष मग काही बोलले नाहीत. अरिनने चहा घेतला. तेजसने सिगारेट शिलगावली.
‘‘बोलू?’’ अरिनने विचारलं. तेजसने मानेनं खूण केली तसा अरिन श्वास घेऊन म्हणाला, ‘‘कोण म्हणतं तू या कार्डपुरता आहेस? मी पाहिलंय तो तेजसदा प्रेमळ बाबा आहे. जबाबदार नवरा आहे. जबऱ्या दोस्त आहे. उत्साही चाळीशीचा तरुण आहे. तो उत्तम लिसनर आहे गाण्याचा. चांगला बॅट्समन आहे. ट्रॅव्हलर नाहीये तो माझ्यासारखा; पण ट्रॅव्हल सीरिजचा तो फॅन आहे. तो काही फक्त या कंपनीचा एम्प्लॉयी नाहीये! हे कार्ड रिडंडंट आहे!’’
तेजसला छान वाटलं. तो म्हणाला, ‘‘तो शेवटचा इंग्रजी शब्द तुझ्या पाल्र्यात ठेव. पण बाकी कळलं मला.’’ मग त्याने अरिनला एकदम गच्च मिठीत घेतलं आणि सावकाश सोडलं. अरिनचे कॉलेजचे मित्र-मत्रिणी सारखेच त्याला आणि एकमेकांना मिठय़ा मारायचे. पण हे चाळिशीचे घोडे त्याबाबतही विनोदी आणि वेल- रिडंडंट होते असं त्या सगळ्यांचं मत होतं. आणि म्हणून अरिनला विशेष वाटलं आत्ता.
तितक्यात माहीचा थेट व्हिडीओ फोन व्हॉट्सअॅपवर आला. ‘‘काय करत आहात? मला मिस करत आहात ना दोघे?’’
‘‘फार डोंगराच्या टोकाला जाऊ नका. त्या मागच्या झाडाचा माझ्यासाठी एक चांगला फोटो काढा. सेल्फी त्या टपरीशेजारी काढा..’’ अशा अनेक सूचना तिने पहिल्या तीन मिनिटांत दिल्या आणि मग म्हणाली, ‘‘काय गप्पा सुरू आहेत?’’
‘‘आय-कार्ड!’’ दोघेही एकदम उत्तरले. माही हसली. अरिन तेजसला चालता चालता नंतर म्हणाला, ‘‘न दिसणारं इन्व्हिजिबल कार्ड असतंच पण आपल्या गळ्यात. नाव काय, आडनाव काय, ओपन का रिझर्वेशन, पसे किती, कुठे राहतो- पार्ला का मलबार हिल, घरात कोण कोण, कुठलं कॉलेज- झेवियर्स का रुईया.. हे सगळं म्हणजे न दिसणारं आपलं आयडेंटिटी कार्डच.. ते या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरातून ऑलरेडी भरलेलं असतंच! त्यात हे अजून एक कंपनीचं कार्ड!’’
आणि मग अरिनने त्या कार्डला मधलं बोट दाखवलं तसा तेजस जोरदार हसला! मस्त मोकळं वाटलं त्याला. माहीचा तितक्यात मेसेज आला : ‘‘आय-कार्ड म्हणजे ओळख! अनेक आय-कार्डस हवीत. आणि ती मिरवताही यायला हवीत.’’ आणि मग तिने तिच्या लाडक्या व्हर्जििनया वूल्फचं एक वाक्य लिहिलेलं सोबत.
‘आय अॅम मेड अँड रीमेड कंटिन्युअसली..’
अरिनने तेजसचा हात पकडून म्हटलं, ‘‘तेजसदा, आय प्रॉमिस. मी माझी आय-काडर्ं बदलत राहीन. फार बोअर होईल नाही तर आयुष्य!’’
आणि मग ग्रुपवर तेजसने त्याला आवडणाऱ्या कल्याणच्या राजीव जोशींच्या एका कवितेतली ओळ आठवून लिहायला घेतली :
‘सारं जग एव्हरेस्ट बनत चाललंय
मीही त्यातलाच एक शेर्पा!’
ही ओळख तरी चिरस्थायी होती का?
पाऊस आलाच तोवर जोरात. तेजस आणि अरिन गाडीकडे न पळता डोंगराच्या कडेला भिजत थांबले. त्या निळ्या-हिरव्या आसमंतात ते दोन शेर्पा विलक्षण एकतानतेने शांतपणे एकमेकांशेजारी उभे होते.
ashudentist@gmail.com