भारती ठाकूर यांनी नर्मदा परिक्रमेविषयी लिहिलेलं सुंदर पुस्तक वाचनात आलं आणि त्याचक्षणी माझ्या मनाने उचल खाल्ली आणि १२० दिवसांची नर्मदा परिक्रमा करण्याचा माझा बेत पक्का झाला. नर्मदा परिक्रमेत नर्मदा ओलांडायची नसल्याने बोटीने प्रवास करून मिठीतलाईपर्यंत जावे लागते. परिक्रमेत सदावर्त म्हणजे तांदुळ, डाळ, पीठ, मीठ, तिखट, भाजी असं मागून रांधायचं, खायचं आणि पुढं जायचं. शिजवलेलं जवळ काही ठेवायचं नाही. वाटेत काठावरच्या देवळात, धर्मशाळेत किंवा आश्रमात पथारी पसरून रात्र काढायची. प्राप्त परिस्थितीस सामोरं जात ही खडतर परिक्रमा करायची असते.
या माहितीच्या आधारे परिक्रमेच्या तयारीला लागले. ताटली, पेला, कमंडलू, काठी, बॅटरी, तोंड धुण्याचे सामान, मोबाइल, एटीएम कार्ड, स्लीपिंग बॅग, चादर, थोडासा खाऊ आणि परिक्रमावासींचा ड्रेसकोड असलेला सफेद ड्रेस असे सामान भरून पाठीवरची सॅक तयार झाली. तेल, साबण वज्र्य असल्यामुळे माझ्या केसांच्या जटा होऊ नयेत म्हणून चक्क बॉयकट केला. सोबतची औषधे म्हणजे फक्त व्हिक्स, आयोडेक्स, इ. आठवणीने ओळखपत्र घेतले.
१७ नोव्हेंबर २०१२ रोजी ठाण्याहून रात्री कुशीनगर एक्स्प्रेसने घरच्यांचा साश्रुनयनांनी निरोप घेत आम्ही खांडव्याकडे प्रस्थान ठेवले. सकाळी खांडव्याला उतरून बसने ओंकारेश्वरला पोचलो तेव्हा सहप्रवाशांची संख्या डझनावर गेली होती. गजाननमहाराजांच्या भक्तनिवासात शुचिर्भूत होऊन पोटपूजा केली. ओम् आकाराच्या डोंगराची १४ कि.मी.ची मांदाता परिक्रमा म्हणजे जणू पुढच्या ३००० कि. मी. परिक्रमेची चुणूकच! अतिशय उंचसखल अशा या मार्गावर गीतेचे अठरा अध्याय लिहिलेले आहेत. विधीवत कुमारिकापूजन करून, बाटलीत नर्मदेचे पाणी भरून घेऊन आम्ही परिक्रमेस शुभारंभ केला. ओंकारेश्वराला नर्मदेचं नाभीस्थान म्हणतात. शंकराचार्याना गुरू गोविंदवल्लभ पंतांकडून सर्व ज्ञान या ठिकाणी प्राप्त झाल्याने परिक्रमेची सुरुवात या पवित्र स्थानापासून करतात. काहीजण ही परिक्रमा तीन वर्षे तीन महिने तेरा दिवस या कालावधीत करतात. कुणी बसने पंधरा दिवसांत करतात. आमच्या ग्रुपने मात्र १२० दिवसांची परिक्रमा करण्याचा संकल्प सोडला होता.
सकाळी दिसायला लागल्यावर उठलो. वाफाळत्या चहाच्या आठवणींना मुरड घालून स्नानाला नर्मदातीरावर गेलो. गार पाण्याने स्नान करायचे आहे, हे मनाला बजावत पाण्यात डुबकी मारली. आणि काय आश्चर्य! नर्मदामैय्याच्या ऊबदार स्पर्शाने कावळ्याची आंघोळ न होता मनसोक्त आंघोळ झाली. तन-मनाला अगदी तरतरी आली. उदबत्ती, कापूर लावून नर्मदामैय्याची पूजा-आरती केली. ओटी भरून अष्टक म्हणून पदयात्रेला सुरवात केली. नर्मदामैय्याला उजव्या बाजूला ठेवून अखंड नामस्मरण करत, अथर्वशीर्ष म्हणत चालायला सुरवात केली. चालताना गप्पाष्टकांवर फुली मारली. मनावर संयम ठेवण्याचा धडा गिरवायला सुरवात केली. वाटेत कोणीही भेटले तरी ‘नर्मदे हर’ (नरमदहर) अशी सुरवात करत संवाद साधायची सवय अंगवळणी पाडून घेतली. सुरवातीला दहा-बारा कि.मी. चालायचं आणि मग हळूहळू अंतर वाढवायचं असा बेत होता. साधारण तीन-साडेतीन किमी चालून झाल्यावर पाठीवरच्या ओझ्याने पाठीला रग लागली. मग झाडाच्या सावलीत क्षणभर विश्रांती घेऊन, पाणीबिणी पिऊन परत मार्गस्थ झालो. दिवेलागण झाली की वाटेतल्या गावात, धर्मशाळेत, देवळात, एखाद्याच्या घरी- जिथे सोय होईल तिथे मुक्काम करायचा असं ठरवलं होतं. सुदैवाने लगेचच सोय झाली. ढोपरस्नान करून आरती, अष्टक, रामरक्षा, हनुमान चालिसा म्हणून होताच पोटाचा प्रश्नही सहजी सुटला आणि निद्रादेवीच्या आधीन झालो. पहिलाच दिवस असल्यामुळे पाय बोलायला लागले होते. बरोबर आणलेल्या तीळाच्या तेलाने मसाज करून त्यांचे थोडे लाड केले. कारण सकाळी सगळी मदार त्यांच्यावरच होती.
मोरटक्का, टोकसर, बकावा.. वेळापत्रकानुसार दिवस, गावं पालटत होती. एक क्षण असा आला की वाटलं, हे सगळं चालणं निर्थक आहे. कशाकरता एवढी पायपीट करायची? परंतु जसं गढुळ पाणी थोडा वेळ न हलवता ठेवलं तर गाळ तळाशी बसून पाणी स्वच्छ होतं, त्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा दोन्ही बाजूंनी विचार करण्याचा लहानपणापासून मनावर झालेला संस्कार कामी आला. ‘आपण नर्मदा परिक्रमा करायला म्हणजे चालायलाच आलो आहोत. चालता चालता या भूमातेच्या अंगलटीची सूक्ष्म वळणं नजरेने टिपायची आहेत. त्याचबरोबर नर्मदाकाठावरील जीवन, सामाजिक परिस्थिती, मानवी स्वभाव, निसर्ग यांचाही अनुभव घ्यायचा आहे..’ असं संस्कारानं मनाला बजावलं आणि खरोखरच ते शहाण्यासारखे शांत झालं! पुढच्या चार महिन्यांत- म्हणजे परिक्रमा संपेपर्यंत जराही घरची आठवण झाली नाही की मनाची प्रसन्नता ढळली नाही.
दिवसामागून दिवस जात असले तरी प्रत्येक दिवस वेगळा असे. परिक्रमा करणाऱ्या व्यक्तींबद्दल- त्यांना ‘मूर्ती’ म्हणत- गावकऱ्यांच्या मनात प्रचंड आदर दिसून येई. आमचे पाय धुतले जात. काही ना काही, कोणत्या ना कोणत्या रूपात प्रत्येकजण देतच असे. कोणी चहा, कोरा चहा, दूध देत. कोणी नाश्ता, फळं देत. कोणी जेवायला बोलवत. कोणी मुक्कामाचा आग्रह धरत. कोणी सदावर्त- म्हणजे डाळ, तांदुळ, मीठ, तिखट देत. मग लाकूडफाटा घेऊन चूल पेटवण्याचं दिव्य पार पाडावं लागे. एकदा पावसात लाकडं ओली झाली होती. मग पानं जाळून आमची ‘बिरबलाची खिचडी’ तयार झाली. कुणी स्वयंपाकाची भांडीही देत. एकदा असंच कणिक भिजवून ताटलीचा पोळपाट केला व झोपडीतल्या बाईकडे लाटणं मागितलं. तर म्हणते कशी- ‘पेल्याने लाट की!’ त्या दिवशीच्या पोळ्यांच्या उंचसखल नकाशांनी माझे बालपणाचे दिवस नव्याने भेटले. दमल्यामुळे डाळ, तांदूळ, भाज्या एकत्र करून ‘थ्री इन् वन’ खिचडीचा प्रयोग बऱ्याचदा रंगायचा. कधी नुसती वांगी भाजून खाल्ली जायची. तीही गोड लागायची. एखाद्या घरातून आग्रहाचं बोलावणं यायचं. पण त्या बाईची ‘अडचण’ असायची. मग थकलेल्या अवस्थेत आम्हालाच पदर खोचून कामाला लागावं लागे. कधी धर्मशाळेत, देवळात, घरात सोय होई. कधी चुरमुरे-शेव एकत्र करून भेळ खाऊन ढेकर द्यावा लागे. एकंदरीत नर्मदामैय्या आपल्याला उपाशी ठेवत नाही. आपली राहायची, जेवायची सोय होते. जे पानात पडेल ते गोड मानण्याची तयारी मात्र हवी. सकाळी आम्ही जेवतच नव्हतो. नाश्ता, फळं, ताक, सरबत घ्यायचो. त्यामुळे चालही चांगली व्हायची. नर्मदेच्या दक्षिण तटापेक्षा उत्तर तटावर गरिबी जास्त! तरीही आपल्या पोटाला चिमटा घेऊन भाविक परिक्रमावासींना काही ना काही देत. अन्नधान्यच नाही, तर पैसे, कपडे, पुस्तकेही देत. त्यांना थांबवावं लागे. जीवनदायी नर्मदेच्या प्रेमापोटी आदरातिथ्य करताना लोकांना इतका आनंद होत असे, की तो डोळ्यांवाटे झिरपत राही. ‘घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे’ हा संस्कार परिक्रमेतून घेत ओझं होऊ नये म्हणून वाटेत वाटत वाटतच प्रवास करावा लागे.
या परिक्रमेत अठरा जिल्हे व अनेक नद्यांचे संगम आमच्या पायाखालून गेले. शुद्ध, प्रदूषणमुक्त, मोकळी हवा. एका बाजूला नर्मदामैय्या, तर दुसऱ्या बाजूला गहू, तूर, ऊस, हरभरा, कापूस यांची हिरवी दौलत! जातानाची गव्हाची कोवळी हिरवी कणसे आमच्या परतीच्या प्रवासात पिवळी पडलेली. वाळत टाकलेले लाल मिरच्यांचे पट्टे देखणे; पण दुरूनच बघण्याजोगे! केळी, पपई, गुलाब, कुंदा यांची गोड, सुवासिक सोबत. सुपीक जमिनीत शेती करणाऱ्यांना नर्मदामैय्या अनंत हस्ते बहाल करून ‘सुजलाम् सुफलाम्’ बनवते. दगडाएवढय़ा गारांचा पाऊस, सोन्यासारखे ऊन आणि हुडहुडी भरवणारी थंडी ‘रंग माझा वेगळा’ दाखवून गेली. पिसारा फुलवत नाचणारे मोर, शहामृग, बदकं, पांढरेशुभ्र करकोचे वाटा अडवत होते. चपळ हरणांची लगबग बघताना रामायणातील सीतेचा हट्ट आठवला. साग, मोह, वड, आंबा, बाभुळ अशा वृक्षराजींनी समृद्ध अशी २१ कि.मी.ची चार जंगलं पार करताना काळजाचा ठोका चुकेलसं वाटलं होतं. पण नर्मदामैय्याच्या कृपेने तीन-चार पाऊलवाटा समोर आल्या की निर्णायक क्षणी कोणीतरी देवासारखे हजर व्हायचे आणि आम्ही योग्य रस्त्याला लागायचो. कधी पायाखालची वाट डांबरी असायची, कधी दगडगोटय़ांची. कधी भुसभुशीत.. पाय आत जाणारी. तर कधी चढ असलेली.. अरुंद, काटय़ाकुटय़ांची. कधी चिखलाची. भूमातेच्या या वैविध्यांशी जुळवून घेत आम्ही चालतच राहायचो.
या ‘जरा हटके’ पर्यटनात अनुभवांचं गाठोडं फुगत गेलं. मांडवगड उतरताना रस्ता कठीण होता. पाय घसरत होते. लाकूडफाटा गोळा करायला आलेल्या बारा-तेरा वर्षांच्या मुलांनी मदतीचा हात देऊ केला. चक्क स्वत:च्या पायावर पाय ठेवा असं सांगत आम्हाला लाजवलं. त्या मुलांचे वडील इथेच घसरून स्वर्गवासी झाले होते. त्यांच्या स्मृतीला आदरांजली म्हणून ही मुले परिक्रमा करणाऱ्यांच्या मदतीला धावून जातात. अगदी जिवावर उदार होऊन! हे कळताच काळजात हेलावलं. आम्ही मात्र आमची ओझी त्यांच्याकडे द्यायला का-कू केली. का? तर- फसवून पळून गेली तर! स्वत:चीच खूप लाज वाटली. दवाना गावी सहज एका कुत्र्याला बिस्कीट दिलं तर प्रकाशा गावापर्यंत शंभर कि.मी. त्याने आमची सोबत केली. एखाद्याची अर्धवट राहिलेली परिक्रमा अशा रीतीने पुरी होत असेल का? कुणीतरी अर्थ लावला! अमरकंटकला गोमुखी धारेच्या स्वरूपात नर्मदा प्रकट होत. ‘माई का बगीचा’ हा रमणीय प्रदेश बघताना आम्ही ‘काखेत कळसा नि गावाला (परदेशाला) वळसा’ का घालतो, हा प्रश्न सतावत राहिला. इथे नर्मदाजयंती साजरी केल्यास तिप्पट पुण्य पदरात पडते असे म्हणतात. कशावर काहीतरी ‘फ्री’ मिळण्याची आजकालची चटक अस्वस्थ करते. अर्थात नर्मदामैय्याच्या मनात असेल तसेच होते. आम्ही थाडपथ्यारला चंद्रमौळी झोपडीत कढाई करून, कन्यापूजन करून नर्मदाजयंती साजरी केली.
आमच्या बाराजणांच्या समूहाला मधे मधे गळती लागत गेली आणि आम्ही चौघेच शेवटपर्यंत राहिलो. घसरगुंडी, साष्टांग नमस्कार घालत पुढे जात राहिलो. नदीकिनाऱ्यावरील दलदलीतून बाभळीच्या झाडाला लपेटलेल्या वेलींतून जाताना मी धडपडले. गोखरू कपडय़ाला चिकटत होतं. बऱ्याच ठिकाणी खरचटलं. पायाचं नख अर्धवट निघून वरती आलं. पुढे नावेत चढताना खालच्या चिखलात पाय रूतत होता. नावेत पाऊल टाकायलाही जागा नव्हती. मागच्या माणसाने ढकलले आणि मी घाईगडबडीत पाण्यात पडता पडता वाचले. एका माणसाच्या अंगावर पडले. मुका मार चार दिवस पुरला. पायाचं नख आणि त्यावरची पट्टी दोन्हीही निघून गेलं. काटय़ाकुटय़ांतून, दगडधोंडय़ांतून चालताना बूटाला भोक पडलं. ते शिवणाऱ्याची चौकशी करत होते. भाषेचा अडसर असल्यामुळे समोरच्याला पटकन् कळले नाही. जेव्हा कळले, तेव्हा त्याने नवीन बूटच मला आणून दिला. ‘आंधळा मागतो एक डोळा अन् देव देतो दोन’ तशी माझी अवस्था झाली.
अगदी कळसाध्याय म्हणावा तसा आनंद झाला महेश्वरच्या वाटेवर भारती ठाकूरांना भेटून! नऊवारी साडीतल्या माझ्या सहप्रवासिनीला बघताच त्यांनी गाडी थांबवली. त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. अनगांवच्या अनाथ बालकाश्रमात मी मुलांना शिकवायला जाते, हे कळताच त्यांनी त्यांच्या आश्रमशाळेत येण्याचे आमंत्रण दिले. त्यांचे आमंत्रण, त्यांचा सहवास नाकारणे शक्य तरी होते का! अशीच भेट झाली दामोदर व वासुदेव चाफेकर यांच्या वंशजांची! चिखलदा गावी नर्मदामैय्याच्या मंदिरात दर्शन घेताना अंबेजोगाई देवीचा फोटो बघताच थोडं आश्चर्य वाटलं. संपूर्ण गाव मुस्लीम व इतरांनी व्यापलेलं असताना कोकणस्थांची देवी इथं कशी? देवळातल्या बाईंना नाव विचारताच त्यांनी ‘चाफेकर’ असे सांगितले. इतकंच नाही, तर धाकटे चाफेकर बंधू भरत मध्य प्रदेशात येऊन स्थायिक झाले होते. त्यांनी एका ब्राह्मण मुलाला दत्तक घेतले होते. त्यांचाच मुलगा व सून आम्हाला भेटले. खूप आनंद झाला. टिमरनी गावी किल्ल्यातील भुस्कुटे यांच्या घरी जाण्याचा योग आला. या भुस्कुटांच्या आजोबांनी नारायणराव पेशवे यांची ज्याने हत्या केली त्या सुमेरसिंग गारद्याची हत्या काळीतवा नदीकाठी केली. गारद्याचे ज्यांनी हात छाटले- म्हणजे भुज काटे ते भुस्कुटे! हा संदर्भ ऐकताना मजा वाटली.
२३ मार्च २०१३ ला ३००० कि.मी.ची नर्मदा परिक्रमा संपवून ओंकारेश्वरला परत आल्यावर विधीवत् पूजन करून परिक्रमेची सांगता केली. नदीची ओटी भरल्यावर साडी मगरीने ओढून नेली. नर्मदामैय्याच्या ‘त्या’ दर्शनाने अत्यानंद झाला. नर्मदामैय्याची कृपा, घरच्यांचा पाठिंबा आणि जबरदस्त इच्छाशक्ती याच्या जोरावर अवघड परिक्रमा पूर्ण झाली. वृत्तीची निवृत्ती, संयम, भरभरून देण्याची इच्छा, निष्कारण वाढवलेल्या गरजांची जाणीव, भौतिक सुखांच्या पलीकडील जगाची ओळख हे या परिक्रमेचं फलित!
संग्रहित लेख, दिनांक 30th Jun 2013 रोजी प्रकाशित
नर्मदे हरऽ हरऽऽ
भारती ठाकूर यांनी नर्मदा परिक्रमेविषयी लिहिलेलं सुंदर पुस्तक वाचनात आलं आणि त्याचक्षणी माझ्या मनाने उचल खाल्ली आणि १२० दिवसांची नर्मदा परिक्रमा करण्याचा माझा बेत पक्का झाला.

First published on: 30-06-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narmada parikrama