नसरीननं ही ‘अमूर्तचित्रं’ कोणत्या जाणिवेतून केली असावीत? हे समजण्यासाठी मार्गदर्शक म्हणून नसरीन यांनी टिपलेल्या फोटोंचा उपयोग होऊ शकतो. ही जाणीव शुद्ध अवकाशाचीच होती, हे लक्षात येतं. तो दृश्यातून दृश्याकडेच झालेला प्रवास होता…

नसरीन मोहम्मदी या थोर अमूर्त-चित्रकार होत्या. त्यांच्या थोरवीवर कला-इतिहासानं कधीच शिक्कामोर्तब केलेलं आहे. मात्र, वयाच्या अवघ्या ५३ व्या वर्षी (१४ मे १९९० रोजी) झालेल्या मृत्यूनंतरच त्यांना त्यांचं स्थान मिळालं, हेही खरं आहे.

पण मृत्यू म्हणजे काय? जाणीव आणि चैतन्य, क्षमता यांनी शरीराशी संबंध सोडणं… इतकंच ना? मग, ते तर नसरीन यांना कधीच साधलेलं होतं! फक्त जरा निराळ्या प्रकारे – म्हणजे शरीराची क्षमता किती यावर आपली जाणीव आणि चैतन्य यांना अवलंबून ठेवायचं नाही, अशा प्रकारे त्यांनी हे साध्य केलं होतं. ते कसं, हे समजून घेण्याआधी नसरीन मोहम्मदीच एवढ्या का मोठ्या (किंवा थोर) हे तर पाहाल की नाही?

सुखवस्तू कुटुंबात जन्मलेल्या नसरीन वयाच्या सातव्या-आठव्या वर्षीच -म्हणजे फाळणीच्या तीन वर्षं आधीच- आईवडिलांसह कराचीहून मुंबईला आल्या. चित्रकलेचं शिक्षण त्यांनी लंडनमध्ये घेतलं आणि मग पॅरिसमध्ये मुद्राचित्रणात प्रावीण्य मिळवलं. मुंबईत १९६०च्या सुमाराला त्या परतल्या आणि लिथोग्राफी (शिळा-मुद्राचित्र) या तंत्रातल्या त्यांच्या कलाकृतींचं एक प्रदर्शनही बाल छाबडा यांच्या ‘गॅलरी फिफ्टीनाईन’मध्ये भरलं. या कलादालनाजवळच तेव्हा ‘भुलाभाई इन्स्टिट्यूट’ होती. चित्र, नृत्य, संगीत, नाट्य अशा कलाप्रकारांतले अनेक महत्त्वाचे कलावंत तिथं घडत होते. इथं नसरीन यांनीही काही काळ स्टुडिओ घेतला, तेव्हा गायतोंडेही (थोर अमूर्तचित्रकार वासुदेव सं. गायतोंडे) तिथं होते. कलावंतानं त्याच्या काळाचा, त्या काळातल्या घडामोडींचा, माणसांचा आणि जीवनव्यवहाराचा… कशाचाच दबाव न बाळगता नि:संगपणे अनंत अवकाशाचा विचार करावा, असा एक मतप्रवाह त्या वेळी (अमेरिकेच्या प्रभावामुळे? – कदाचित!) बळावू लागला होता. त्या मार्गावरचे गायतोंडे हे नसरीन यांच्या आधीचे प्रवासी. पण या दोघाही ‘अवकाश’यात्रींच्या प्रवासात काही साम्यस्थळं दिसतात. रंगछटांची रचना करण्याच्याही पलीकडे, त्या केवलाकारांना ‘अमूर्त’ अध्यात्माची बैठक देणाऱ्या झेन, सूफी आदी पंथांकडे ओढा दिसतो.

इथवर सारं ठीक, पण मुंबई सोडून नसरीन बडोद्याला गेल्या. तिथल्या ‘महाराजा सयाजीराव विद्यापीठा’च्या कलाविभागात शिकवू लागल्या. नसरीन यांचे वडील पुरोगामी विचारांचे. भाऊ- चित्रकार अल्ताफ- हा तर कम्युनिस्ट विचारांचाच. मुलगी म्हणून परावलंबीच असलं पाहिजे, असे काही जाच-काच नसरीन यांना नव्हते. मुंबईत जेराम पटेल यांच्याशी झालेली मैत्री बडोद्यातही टिकवायची म्हणून नसरीन यांनी नोकरी धरली. त्या तिथं शिकवू लागल्या तेव्हा केजी सुब्रमणियन, गुलाम शेख हेही शिकवत होते आणि १९६४ पासून भूपेन खक्कर हेही बडोदेकर झाले होते. या तिघांपैकी शेख सोडून दोघेजण ‘नॅरेटिव्ह स्कूल’चे पाईक. पण याच बडोद्यात ज्योत्स्ना भट, नीलिमा शेख अशा दृश्यकलावंतही होत्या- त्याही आपापल्या निराळ्या वाटा शोधत होत्या. नसरीन यांची वाट आणखीच निराळी. एव्हाना त्यांनी रंगछटांचीही साथ सोडली. अवकाश रेेषांनी जितका विभाजित होतो, तितका रंगछटांनी होत नाही हे ओळखलं. मग शाईचा किंवा एखाद्याच काळसर छटेचा वापर आपण फक्त अवकाशाचा गडदपणा आपल्याला हवा तसा साधण्यासाठी करायचा, हेही नसरीन यांनी ठरवलं. हे महत्त्वाचे कलात्म निर्णय (आर्टिस्टिक डिसीजन्स) आहेत, त्यामागे मोठा विचार आहे, असं काही वाटतच नसावं त्या काळातल्या बडोद्याच्या इतर चित्रकारांना. कारण बडोद्यात साधारण १९७५-७६ सालापर्यंत, म्हणजे घोषित आणीबाणीच्या काळापर्यंत, ‘नॅरेटिव्ह’ शैलीनं चांगलंच बस्तान बसवलं होतं. नसरीन वगळता, जेराम पटेल हेच बडोद्यातले एकमेव अमूर्त-चित्रकार म्हणावेत असे. ते चित्र ‘काढत’ नसत… लाकडाच्या थरांवर जाळानं (‘ब्लोटॉर्चिंग’च्या तंत्रानं) जेराम पटेल काम करायचे.

हे जेराम पटेल साथीला असताना, नसरीन यांना ‘जन्माचा जोडीदार’ मिळाला तोही बडोद्यातच- हा होता आजन्म पाठ न सोडणारा विकार- ‘हंटिंग्टन्स डिसीझ’!

या आनुवंशिक विकारात हल्ला होतो मेंदूवरच. त्यामुळे शरीरावरचा ताबा सुटत जातो. थरथर वाढते. मान हलत राहते, बोलणं कठीण होतं, ‘आपण स्वत:ला सांभाळायचंय’ अशी जाणीव तर असते; पण तसं करता येतंच असं नाही, म्हणून चिडचिड वाढते. हे सारं नसरीन यांनी सहन केलं. सुरुवातीच्या काळात या विकारामुळे जर एखादी रेषा हवी तशी आली नाही, शाईचा ओघ जरा बिघडला, तर तो पुसून टाकायचा आणि पुसण्यातून आलेली जी काही छटा आहे तिच्यासकट नवा अवकाश पुन्हा नव्यानं उभारायचा, असं चालायचं नसरीन यांचं. पण तेही हळूहळू शक्य होईना झालं. मग आर्किटेक्ट लोकांकडे असतो तसा ड्रॉइंग बोर्ड, दोन्ही बाजूला पट्ट्या, मध्ये गुण्या आणि अन्य साधनं वापरण्याची सोय, रेष सरळच यावी यासाठी पेन्सिल अथवा ‘रोटरिंग’चं बारीक रेष उमटवणारं पेन बांधण्याची सोय… असं करत नसरीन अमूर्त अवकाशनिर्मिती करत राहिल्या.

तो विकार बळावायच्या आधी आणि नंतरही, चित्रकाम करतानाची नसरीन यांची बैठक ही जणू काहीतरी आध्यात्मिक कृती करतो आहोत अशी असायची, हे गीता कपूर आणि रूबिना करोडे यांनी स्वानुभवातून, तर इतरांनी प्रत्यक्षदर्शींना विचारून वगैरे लिहिलं आहे. गीता कपूर यांनी नमाज- सूफी एकत्व अशाही शब्दप्रतिमा त्यांच्या वर्णनासाठी वापरल्या आहेत तर रूबिना करोडे यांनी ‘योग’ ही शब्दप्रतिमा योजली आहे. ‘योग’ मधला मूळ धातू ‘युज’- (‘यु’ ऱ्हस्वच, आणि ‘ज’चा उच्चार ‘जास्त’मधल्या ज-सारखा) – म्हणजे एकतानता- याची आठवण वाचकांना करून दिलेली आहे. या साऱ्या शब्दप्रतिमा अनुभवाधिष्ठित आहेत हे खरं. पण त्यांचा प्रत्यय आपल्याला- म्हणजे कपूर किंवा करोडे यांच्यासारखं, नसरीन यांना प्रत्यक्ष न बघितलेल्यांनाही आज येऊ शकतो, तो नसरीन यांच्या चित्रांमधूनच.

हा चित्रानुभव घेण्यासाठी आपणही एकात्म व्हावं लागतं. एकंदरीत अमूर्तचित्रांची ती अटच असते म्हणा, त्यामुळे नसरीनचीही चित्रं पाहताना फक्त एका प्रतलावरच्या काही रेषा असं पाहायचं नसतंच. त्याच्या पलीकडलं पाहायचं. त्यासाठी आपण स्वत:च्या दृश्यजाणिवा अगदी पणालाच लावायच्या. असं केलं तर म्हणजे दृश्यजाणिवा ढवळून काढल्या तर, ढवळण्याच्या कृतीमुळे जसा गाळही वर येतो तशा दृश्य-बाह्य जाणिवाही येतात आपल्यापर्यंत तरंगत… त्यामुळे ‘समांतर रेषा- त्या हळूहळू तिरक्या होत गेलेल्या आहेत आणि खालच्या भागातल्या रेषांमध्ये जास्त अंतर असलं तरी वरच्या भागात ते कमी-कमी होत जातंय’ असं काही पाहताना आपल्यातल्या कुणाला समुद्राच्या लाटा आठवतील, कुणाला विलंबित पासून द्रुतलयीपर्यंतचा प्रवास आठवेल तर कुणाला- डोंगर चढताना टाकलेल्या धापासुद्धा आठवतील! पण हा गाळ निवळू दिला तर पुढे आणखी काहीतरी, जे दिसतंय त्याच्या पलीकडलं जाणवतं. हा समुद्र नाही, डोंगर नाही, ही खयालगायकी नाही… मग हे जे आहे ते काय? अगदी शब्दच वापरायचे तरी ‘क्रम/ अतिक्रम’, ‘लय/ विलय’ अशा परस्परविरोधी संकल्पना आठवतात, पण मग त्याच्याही पुढे काय? ‘मला जाणीव आहे’ याची जाणीव?

पण मग नसरीननं हे कोणत्या जाणिवेतून केलं?

यासाठी मार्गदर्शक म्हणून नसरीन यांनी टिपलेल्या फोटोंचा उपयोग होऊ शकतो. ही जाणीव शुद्ध अवकाशाचीच होती, हे लक्षात येतं. तो दृश्यातून दृश्याकडेच झालेला प्रवास होता. त्यासाठी परक्या किंवा बाह्य संवेदनांची गरज नव्हती. याखेरीज नसरीन यांच्या दैनंदिनीतल्या नोंदी आहेत… त्यात कवितांसारखा बराच मजकूर आहे. पण खरं सांगायचं तर त्याला कवितेचं किंवा लिखाणाचंही स्वतंत्र अस्तित्व नाही. तेही केवळ एक मधलं साधन आहे. त्यापेक्षा फोटो बरे… त्यातून नसरीन यांची दृश्यसंवेदना चटकन पोहोचते- पाहाणाऱ्यापर्यंत.

नसरीन यांनी शरीराच्या पार जाऊन हे सारं केलं, यातल्या शरीरापार जाण्याच्या ऊर्मीमागे आध्यात्मिक संदर्भ आहे का? म्हणजे लल्लेश्वरी किंवा जनाबाई किंवा अक्कमहादेवी यांच्या आध्यात्मिक ऊर्मीमुळे त्यांना शरीरजाणीव विसरता आली, तसा? असेलही. गीता कपूर यांनी तसं सूचित केलं आहे.
पण चित्रं काढणं, कलाकृती करणं ही शारीरिकच क्रिया आहे, त्याचं काय?

‘शरीरम् आद्यां खलु धर्मसाधनम्’ असं कालिदास ‘कुमारसंभवम्’च्या पाचव्या सर्गात म्हणतो (तप करणाऱ्या पार्वतीची तपस्या किती कृतनिश्चयी आहे, याची चाचपणी करण्यासाठी शिवानंच ब्रह्मचारी बटूचं रूप घेतलं आणि ‘काम आणि अर्थ यांना त्यागून तू धर्मासाठी तप करते आहेस, पण त्याही तपाचं साधन शरीरच असल्यामुळे त्याकडे लक्ष द्यायला हवं ना?’ अशा प्रश्नानं सुरुवात करून, पुढच्या दीर्घ युक्तिवादातून तिची कसोटी पाहिली, असं कथानक कालिदासानं रचलं आहे)… हे संस्कृत वचन पुढल्या काळात ‘शरीरमाद्यां खलु सर्वार्थ साधनम्’ असं प्रचलित झालं. ते खरं, पण प्रोस्थेटिक अवयवापासून ‘एआय’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता यांनी शरीराच्या मर्यादा ओलांडता येतात असा काळ ना कालिदासानं पाहिला होता; ना नसरीन मोहम्मदी यांनी.

पण शरीराच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करण्यासाठी नसरीन यांनी जिवंतपणी काहीएक तंत्र वापरलं होतं, हे नक्की. शरीराच्या पार गेलं तर व्याधीही नसतील, ही जाणीव जर आध्यात्मिक असेल तर तसं, पण त्याआधीच काहीतरी पलीकडचं नसरीन पाहात होत्या!