आज नव्या शैक्षणिक धोरणाच्या पहिलीपासून मातृभाषा, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषा शिकवाव्यात ही शिफारस वादग्रस्त बनली आहे. सध्या पहिलीपासूनच मातृभाषेच्या जोडीला इंग्रजी शिकवले जाते. परंतु याला विशेष विरोध झालेला नाही, कारण इंग्रजी हीच ज्ञानभाषा हे सर्वमान्य झाले आहे. इंग्रजीचे वर्चस्व मुकाट्याने मानण्याची सुरुवात लॉर्ड मेकॉलेच्या शिफारसीवर आधारित १८३५ च्या भारतातल्या शिक्षणपद्धतीबद्दलच्या कायद्यातून झाली. मेकॉलेच्या मते, एका चांगल्या युरोपीय ग्रंथालयातील एक कपाटदेखील संपूर्ण भारतीय आणि अरबी साहित्यापेक्षा श्रेष्ठ होते. त्याचा आग्रह होता की भारतीय शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असावे, आणि अशा शिकलेल्या भारतीयांनी रंगाने सावळे, पण संस्कृतीने, विचाराने इंग्रज असे राणीचे आज्ञाधारक सेवक बनून कारकून किंवा खालच्या पातळीवरचे प्रशासक म्हणून काम करावे.

आपण काहीही गृहीत धरो, पण इंग्रजीची आधुनिक ज्ञान विज्ञानावर खरोखरच मक्तेदारी आहे का? १४ व्या शतकात युरोपात नवचैतन्य बहरले आणि आधुनिक विज्ञानाचे मूळ रोवले गेले. तोवर चीन विज्ञान, तंत्रज्ञानात जगात अग्रेसर होता. चीनमधेच होकायंत्र, बंदुकीची दारू, अग्निबाण, कागद व छपाई ही महत्त्वाची तंत्रे विकसित झाली. म्हैसूरचा टिपू चीनच्या संपर्कात होता आणि त्याने आपल्या सैन्यासाठी अग्निबाण आणवले होते. १७८०च्या युद्धात टिपूने अग्निबाण वापरून इंग्रजांचा धुव्वा उडवला. परंतु तोवर युरोप विज्ञान तंत्रज्ञानात खूपच पुढे गेला होता. युद्धानंतर इंग्रजांनी न फुटलेले अग्निबाण इंग्लंडला नेऊन तिथल्या शस्त्रास्त्राच्या कारखान्यात अभ्यास करून त्यांचा प्रतिकार करण्याची तंत्रे विकसित केली. त्यामुळे पुढच्या १७९०च्या युद्धात इंग्रजांनी टिपूला हरवले. टिपू हरला, तरीही मराठ्यांचा प्रतिकार १८१८ पर्यंत चालू राहिला. पण टिपूला आणि मराठ्यांनाही इंग्रजांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान आधारित सामर्थ्याचे रहस्य उलगडले नव्हते. इंग्रजांबरोबरच्या युद्धात सापडलेली होकायंत्रे आणि दुर्बिणी नाना फडणवीसाने त्याच्या घरात केवळ कुतूहलाच्या वस्तू म्हणून ठेवल्या होत्या. त्यांचा उपयोग काय हे समजावून घ्यायचे त्याला सुचलेच नव्हते. लोकहितवादी देशमुखांनी आपल्या ‘शतपत्रां’त म्हटल्याप्रमाणे, पेशवे ज्याला ज्ञान मानून दक्षिणा देत होते त्या वेदपठणाचा काहीही व्यावहारिक उपयोग नव्हता. उलट इंग्रजांपाशी व्यावहारिक उपयोगाचे ज्ञान होते आणि त्यामुळे भारतीयांनी इंग्रज ज्ञानसंपन्न आहेत आणि त्यांची भाषा ज्ञानभाषा आहे हे मानले आणि आजवर शालेय, महाविद्यालयीन व पदव्युत्तर शिक्षणात तसेच विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्व व्यवहारात, एवढेच नव्हे तर शासन व न्याय व्यवहारात व उद्यामांत इंग्रजी अग्रस्थानी ठेवली आहे. इतर युरोपीय देशांमध्ये इंग्रजीला असे अग्रस्थान बिलकुलच दिले गेलेले नाही. शिवाय चीन, जपान, दक्षिण कोरियामध्येसुद्धा त्यांच्या स्वकीय भाषाच ज्ञानभाषा म्हणून विकसित केलेल्या आहेत.

मी शाळेमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत भाषा शिकण्यात भरपूर वेळ घालवला. विचारावेसे वाटते की, जास्त खोलात गणित किंवा विज्ञान शिकण्यात हा वेळ वापरणे शहाणपणाचे ठरले असते का? मी कोरियातील सोल विद्यापीठात भाषणे दिली आहेत, विद्यार्थ्यांशी आणि प्राध्यापकांशी तपशीलवार चर्चा केली आहे. त्यांचे इंजिनीअरिंग महाविद्यालय कशा पद्धतीने चालवतात आणि विज्ञान तंत्रज्ञानात संशोधन कसे चालते ते पाहिले आहे. कोरियाई भाषा बोलणाऱ्यांची संख्या मराठी बोलणाऱ्या लोकांहून कमीच आहे. तो देश १९५४ च्या युद्धात पूर्ण उद्ध्वस्त झाला होता. परंतु त्यानंतर सर्वांसाठी उत्तम दर्जाचे शिक्षण आणि आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित करून त्यांनी आपली भरभराट करून घेतली.

कोरियातल्या बाजारपेठेत कुठलेही भारतीय उत्पादन दिसत नाही. पण आपली बाजारपेठ त्यांच्या गाड्यांनी, मोबाइल फोनांनी, रेफ्रिजरेटर आणि धुण्याच्या यंत्रांनी गजबजलेली आहे. कोरियातल्या युवांची महत्त्वाकांक्षा कोरियातच उत्तम उच्च शिक्षण प्राप्त करणे आणि तिथल्या उद्याोगधंद्यात चांगल्या नोकऱ्या मिळवणे किंवा नवे उद्याोग स्थापन करणे या आहेत. ते कोणीही अमेरिकेची स्वप्ने पाहात नाहीत. विज्ञान तंत्रज्ञानाशी संबंधित सर्व उत्तमोत्तम साहित्य कोरियाई भाषेतील अनुवादांद्वारे उपलब्ध आहे आणि ते इंग्रजी शिकण्यात जास्त वेळ घालवत नाहीत. सोल विद्यापीठाचे विद्यार्थी प्रयत्नपूर्वक माझी इंग्रजी भाषणे समजावून घेत होते, परंतु नंतर त्यांच्याशी बोलताना ते केवळ मोबाइल फोनचा वापर करत तिथल्या तिथे अनुवाद करून समजावून घेत होते आणि मग मला कोरियाईमधील उत्तरांचे इंग्रजी अनुवाद ऐकवत होते.

युरोपियांनी पंधराव्या शतकानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीत जी झेप घेतली त्यातूनच आजचे माहिती संचार तंत्रज्ञान विकसित झाले आहे. याचा वापर जगात अधिकाधिक वाढवणे हेच हे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या उद्यामांचे ध्येय आहे. यातूनच गूगलने नोटबुक एलएम हे अॅप निर्माण केले आहे. एप्रिल २०२५ च्या शेवटच्या आठवड्यात या अॅपद्वारे सर्व भारतीय भाषा- हिंदी, कोंकणी, मल्याळम्, मराठी, मैथिली, बंगाली, पंजाबी, गुजराती, ओडिया, तामिळ, तेलुगू, कन्नड, नेपाळी उपलब्ध झाल्या आहेत.

आपल्या शासकीय मराठीत दुराग्रहाने केवळ संस्कृत भाषेशी निगडित शब्द वापरतात आणि इंग्रजी वाक्यरचनेची हेंगाडी नक्कल करतात. उदाहरणार्थ, शासकीय मराठीत परवानगी हा सर्वपरिचित शब्द न वापरता त्याजागी अनुज्ञेय असा बुचकळ्यात पाडणारा शब्द वापरतात. पण आज वेबवर मराठीसहित सर्व भाषांचे भरपूर साहित्य उपलब्ध आहे- वेगवेगळे लेख व पुस्तके, ब्लॉग, टीव्हीवरील मालिका आणि चित्रपटांतील संवाद व गाणी. या सगळ्याला आत्मसात करून गूगल नोटबुक एलएम साधे, सोपे उत्तम दर्जाचे मराठी वापरते. याच्या जोडीला पॉडकास्टचे प्रभावी माध्यम विकसित केले आहे. अगदी नैसर्गिक अशा स्त्री-पुरुष संवादातून अगदी अवघड शास्त्रीय निबंधसुद्धा समजावून सांगितला जातो. त्यासाठी गूगलने आज मराठीत उपलब्ध आहे त्याहून उच्च प्रतीची शास्त्रीय परिभाषा विकसित केली आहे.

हेही वाचा

आज या माध्यमातून जगातील सर्व भाषांतील उत्तमोत्तम विज्ञान आणि तंत्रज्ञानातील साहित्य, एवढेच नाही तर मूळ चिनीमधले आपल्या कौटिलीय अर्थशास्त्रासारखे ताओ ते चिंग, स्पॅनिशमधले डॉन किहोते, अभिजात तमिळमधले शिलप्पादिकारम असे दर्जेदार साहित्य आपल्याला मराठी भाषेत सहज उपलब्ध झाले आहे. म्हणजे आता आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपुढचा इंग्रजीच्या तुटपुंजा ज्ञानाचा अडसर नाहीसा झाला आहे आणि त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण उपलब्ध करणे सहजशक्य झाले आहे. चीनचे एक महत्त्वाचे बलस्थान म्हणजे उत्तम शिक्षण मिळालेले नागरिक. आपणही आपल्या सर्व थारावराच्या मुला-मुलींना असे शिक्षण देऊन खऱ्याखुऱ्या विकसित भारताकडे पावले टाकू शकू. तेव्हा या आधुनिक सुविधांचा नीट विचार करत आपण शैक्षणिक धोरण पुन्हा नव्याने आखले पाहिजे आणि भारतभर सर्वांच्या मातृभाषांतून चांगले शिक्षण देण्याची व्यवस्था अमलात आणली पाहिजे.

आणखी महत्त्वाचे म्हणजे तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीतून कोणतीही भाषा ऐकली तरी ती आपल्याकडे आपल्या मातृभाषेतून पोहोचेल आणि आपले बोलणे इतरांना स्वत:च्याच भाषांच्यात ऐकता येईल अशी सुविधा एक-दोन वर्षांत उपलब्ध होईल. मग निव्वळ मराठी जाणणारी मंडळी जगभर बिनधास्त हिंडू शकतील!

madhav.gadgil@gmail.com