डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या कादंबऱ्या केवळ कन्नड भाषेतच अडकून राहिल्या नाहीत तर भारताच्या सगळ्या भाषेत सहज पोहोचल्या. तत्त्वज्ञानाचा गाढ व्यासंग असलेल्या या लेखकाचे जाणे त्यामुळे सर्वांनाच आपल्या भाषेतील लेखक हिरावल्याची जाणीव करून देणारे ठरले. त्यांच्यातील लेखक आणि माणूस यांचे दर्शन घडवून देणारे टिपण…

न्नड भाषेत श्रेष्ठ प्रतिभेच्या वर्णनासाठी एक अनोखाच शब्द आहे- दैत्यप्रतिभा. दैत्य शब्दातली नकारात्मकता बाजूला ठेवून या शब्दातून दैत्याचे विस्मयकारक सामर्थ्य असलेली प्रतिभा असे सुचवले जाते. नुकतेच दिवंगत झालेले साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या विविध विषयांवरील चोवीस कादंबऱ्यांचा विपुल संभार पाहता त्यांच्यासाठी हा शब्द उचित ठरेल, असे वाटते. डॉ. उमा व विरुपाक्ष कुलकर्णी या दाम्पत्याने अनुवादाला समर्पित अशा निष्ठेने त्यांच्या महत्त्वाच्या बहुतांश कादंबऱ्या मराठीत आणल्या, म्हणून आपल्याला त्या वाचता आल्या.

या सर्व कादंबऱ्यांमध्ये भरघोस देशीपणा आहे आणि आपल्या मातीशी, परिसराशी, परंपरा, संस्कृती व जनजीवन यांच्याशी एकरूपता आहे. त्यांच्या समाजशास्त्र, मानसशास्त्र, भारतीय व पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, हिंदू धर्मशास्त्र, राज्यशास्त्र, संस्कृती यांच्या प्रगाढ अध्ययनाचे प्रतिबिंबही तिथे दिसते. त्यांची कादंबरी भारतीय संस्कृतीला कवटाळणारी वाटते. त्यामुळे आणि अनेक भाषांतील अनुवादांतून भारतभर पोचलेले लोकप्रिय लेखक असल्यामुळे प्रेमचंद, शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांच्याप्रमाणे भैरप्पा हेही आपल्या प्रादेशिक भाषेत लिहिणारे अखिल भारतीय लेखक ठरतात.

प्राचीन काळातील महाभारताकडे बुद्धिनिष्ठेने पाहणारी ‘पर्व’, त्यापुढच्या काळावरील ‘सार्थ’, मध्ययुगावरची ‘आवरण’ व वर्तमानकाळावरील ‘तंतू’ अशा कादंबऱ्या लिहून त्यांनी भारताचा व भारतीय संस्कृतीचा जणू कादंबरीमय इतिहास लिहिला. विवाह, विधवा विवाह, वंशविस्ताराची आदिम प्रेरणा यांचे पैलू त्यांनी ‘वंशवृक्ष’ या सखोल कादंबरीत दर्शवले. ती त्यांनी वयाच्या तिशीच्या आधी लिहिली. एका बाजूला कलावंताची श्रेष्ठ कला व दुसरीकडे त्याच्या व्यक्तिमत्त्वाची अनावरता, कलाकार व माणूस यांच्या संघर्षाचा प्रगल्भ अभ्यास ‘मंद्र’ कादंबरी दाखवते.

भारतातील गायीविषयीची श्रद्धाभक्ती व वर्तमानातला तिचा सांस्कृतिक संघर्ष पारखामध्ये दिसतो, तो चिनुआ अचेबे या नायजेरियन लेखकाच्या ‘थिंग्ज फॉल अपार्ट’सारख्या कादंबऱ्यांची आठवण देणारा आहे. इथली ग्राम-कृषीसंस्कृती, अंधश्रद्धा, अज्ञान, शेतकऱ्यांचे अथवा शेतकरी स्त्रीचे सामर्थ्य तसेच संघर्ष व स्त्रीच्या, एका आईच्या अपार व्यथेचे दाहक चित्रण ‘गृहभंग’मध्ये दिसते. ते पर्ल बकच्या नोबेलविजेत्या ‘द गुड अर्थ’ कादंबरीचे आणि तिच्यातल्या ओ लान या नायिकेच्या संघर्षाचे स्मरण देणारे, पण त्याहून अधिक हृद्या आहे.

‘जा ओलांडुनी’ या नावाने मराठीत आलेली त्यांची ‘दाटु’ कादंबरी ही दलितांच्या दूरवस्थेचा भूतकाळापासून आजच्या वर्तमानापर्यंतचा लेखाजोखा त्यातल्या कारुण्यासह मांडणारी दीर्घ व एखाद्या ग्रीक शोकांतिकेसारखी कादंबरी आहे. किंबहुना भैरप्पांच्या बहुतेक सर्वच कादंबऱ्या दीर्घ असतात, पण अजिबात कंटाळवाण्या होत नाहीत. उलट अॅरिस्टॉटलचे (Magnitude) सघन व्याप्ती व (Magnanimity) विशाल उदात्तता हे श्रेष्ठ कलाकृतीचे निकष त्यांना लावण्याचा मोह होतो. ‘माझे नाव भैरप्पा’ ही त्यांची स्वत:ची जीवनकथा. त्यांचे खडतर बालपण व किशोरवय आणि त्यातून मोठ्या प्रयत्नांनी मार्ग काढत मिळवलेले तत्त्वज्ञान विषयाचे उच्च शिक्षण व सुवर्णपदक यांची ही गाथा. पण त्यातही सोपी वाट चोखाळणे त्यांनी नाकारलेले दिसते.

तत्त्वज्ञान विषय निवडतानाचा संवाद त्यांनी दिला आहे. प्राचार्य म्हणाले, ‘‘Do you know that philosophy does not bake bread?’’ त्यावर त्यांनी उत्तर दिले, ‘‘If philosophy makes no bread, I will open a bakery and earn my bread’’ त्यांच्या पुढील अर्थगर्भ वाक्यातही आपल्या जीवनाच्या दुर्दैवी भागाकडे पाहण्याचा त्यांचा तत्त्वज्ञालाच साजून दिसणारा दृष्टिकोन दिसतो – ‘‘I always thought that I am an unfortunate person but now I think I am a fortunate writer.’’ त्यांच्या प्रबंधाचा विषय ‘सत्य व सौंदर्य’ हा असणे हेही सूचकच आहे. त्यांच्या सर्व कादंबऱ्यांचे विषय मूलभूत मानवी प्रवृत्तींना व प्रेरणांना स्पर्श करणारे आहेत आणि ते त्यांनी समर्थपणे हाताळले आहेत. हे सर्व पाहता त्यांचे साहित्य अभिजात वाटते.

केवळ त्यांचे अनुवाद व अनुवादक या विषयावर लेखांचे संपादन करताना विजया हरन यांचे ‘Giant Genius Bhyrappa and Mirrors of his Novels’ हे पुस्तक वाढत वाढत पाचशे शहात्तर पानांचे झाले, यातून त्यांची अफाट लोकप्रियता दिसून येते. प्रवाही व पकड घेणारी कथनशैली हा भैरप्पांच्या साहित्याचा मुख्य गुणधर्म आहे, त्यामुळे अनुवाद करताना कमी अडचणी येतात, असे त्यांच्या बहुसंख्य अनुवादकांनी नोंदवले आहे. हिंदी अनुवादक भालचंद्र जयशेट्टी यांनी लिहिले आहे की भैरप्पांचे निवेदन कन्नडचे कैदी नसते, ते इतर भाषांत सहजपणे पोचते.

भैरप्पांच्या मूळ लेखनाचे सत्त्व व सामर्थ्य एवढे मोठे असते की अनुवादाच्या प्रक्रियेत ते निसटून वा सांडून जात नसावे. यांतील बहुतांश अनुवादांना त्या त्या भाषेतले अनुवादाचे साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेत. उमा कुलकर्णींच्या ‘वंशवृक्ष’च्या अनुवादाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहेच व भैरप्पांच्या पंधरा कादंबऱ्यांच्या मराठी अनुवादांपैकी कित्येकांच्या अनेक आवृत्त्याही निघाल्या आहेत. कादंबरीतले तपशील चुकू नयेत, म्हणून ते नेहमीच काटेकोर काळजी घेत. त्यामुळेच पर्व लिहिण्यासाठी हिमालयातला व्यापक प्रवास किंवा तंतू कादंबरीच्या आधी अमेरिकेचे प्रवासावलोकन घडले.

कादंबरीलेखक म्हणून थोर असलेल्या डॉ. भैरप्पा यांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक वैशिष्ट्य साहित्यबाह्य असले तरी त्याची नोंद घेतलीच पाहिजे. त्यांच्या सर्वच्या सर्व अनुवादकांनी भैरप्पा यांच्याशी आलेल्या संपर्कांचे अनुभवसुद्धा आपापल्या लेखांत दिले आहेत. ते सर्व मनोज्ञ व लेखकाची उदारता दर्शवणारे आहेत. त्या सर्वांच्यामध्ये एका बाबतीत तर एकवाक्यताच दिसते. ती म्हणजे निरपवादपणे या सर्वांना त्यांच्या सुसंस्कृततेचा, स्वागतशीलतेचा व साधेपणाचा अनुभव आलेला आहे. संस्कृत भाषांतरकार डॉ. विश्वास एच. आर. यांना गंभीर अपघात झाला होता व ते आयसीयूमध्ये होते.

तेव्हा भैरप्पांनी स्वत:हून डॉ. विश्वास यांच्या पत्नींना फोन करून बँक खात्याचे तपशील विचारले व त्यात पैसे भरणार असल्याचे सांगितले. परंतु विश्वास यांच्या पत्नीने विनम्र नकार दिला आणि ‘फक्त आशीर्वाद हवेत,’ असे म्हटले. तरी ‘आशीर्वाद पुष्कळ आहेत, पण ते डॉक्टरकडे देता येत नाहीत, खर्च खूप असणार, तरी पैसे घ्याच,’ असे भैरप्पा म्हणाले, हा अनुभव डॉ. विश्वास यांनी नोंदवला आहे. विरुपाक्ष कुलकर्णींची शस्त्रक्रिया झाली तेव्हा उमा कुलकर्णींनाही भैरप्पांकडून असाच अनुभव आला होता. आपल्याला मिळालेल्या सरस्वती सन्मानाची रक्कम शासनाला परत करून तिचा विनियोग कानडी माध्यमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी करावा, अशी विनंती भैरप्पांनी केली होती.

शासनाने ते मान्य केले, पण शासन बदलल्यावर नवीन आलेल्या सरकारने त्या योजनेला कचऱ्याची टोपली दाखवली. भैरप्पांचा उदारपणा अव्यवहारी ठरला. पण त्यांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली नाही. यश व कीर्तीचे उंच शिखर गाठल्यानंतरसुद्धा सर्वांसाठी ही सहृदयता जपलेली असणे ही अपूर्वाईची गोष्ट आहे. कदाचित तत्त्वज्ञानाच्या गाढ व्यासंगाने भैरप्पांना ही वृत्तीची प्रशांत समधातता प्राप्त झाली असावी.

कादंबऱ्यांच्या श्रेष्ठतेमुळे त्या दिग्गज कलावंतांकडून विविध माध्यमांत नेल्या गेल्या. पुस्तकरूप भाषांतरांव्यतिरिक्त त्यांच्या चार कादंबऱ्यांची रेडिओवरील नाट्यरूपांतरे, आत्मचरित्राची डॉक्युमेंटरी व मुलाखती रेडिओ अर्काइव्ह्जमध्ये मिळू शकतात. करोनाकाळात वरदान ठरणारी त्यांच्या कादंबऱ्यांची ऑडिओ बुक्स आधी १९६२ पासूनच निघालेली आहेत आणि त्यांची संख्या चाळीसपेक्षा जास्त आहे. त्यांच्या आठ कादंबऱ्यांवर आधारित नाटके झाली आहेत.

‘मंद्र’ आणि ‘सार्थ’ या भैरप्पांचा संगीत व नृत्य या ललितकलांतला सखोल व्यासंग दर्शवणाऱ्या कादंबऱ्यांची नृत्यनाट्ये साहजिकपणे घडली, यात आश्चर्य नाही. त्यांच्या कादंबऱ्यांवरील सात चित्रपटांपैकी वंशवृक्ष (कानडी), तब्बलीये निनादे मगने (कानडी) व तब्बलीये निनादे मगने म्हणजेच हिंदीतील गोधूली या तीन चित्रपटांचे दिग्दर्शन मातब्बर कलावंत गिरीश कार्नाड यांनी केले. दुसरे दिग्गज गिरीश कासारवल्ली हे भैरप्पांच्या एका कादंबरीवरील कानडी चित्रपटाचे व गृहभंगवरील दूरदर्शन मालिकेचे दिग्दर्शक आहेत. ‘दाटु’ कादंबरीवरील हिंदी दूरदर्शन मालिकेचे दिग्दर्शन बासू चतर्जी यांनी केले आहे.

भैरप्पांच्या साहित्यातील सर्वच विचार सर्वांना पटतील, असे नाही. तसे तर कधी घडत नसतेच. अर्थात श्रेष्ठ कलाकृतीला याच्याशी कर्तव्य नसते. ती सत्याच्या सिंहासनावर विराजमान असते आणि चिरंतन राहते. शिवाय वाचकांनाही याच्याशी देणेघेणे नसते. ते वाचून आनंद घेत राहतात. त्यांच्या प्रतिसादामुळे या कादंबऱ्यांच्या अनेक आवृत्त्या निघत राहतात. भैरप्पांच्या कादंबऱ्यांची लोकप्रियता व अभिजातता यांचे हे फक्त कणाएवढे आंशिक दर्शन आहे.