ott platforms responsible for rising crimes zws 70 | Loksatta

सुतावरून नरक..

अलीकडच्या काळामध्ये इंटरनेट आणि त्यानंतर आलेल्या ‘ओटीटी’ फलाटांमुळे माहिती आणि मनोरंजनाचा स्फोटच झाला.

सुतावरून नरक..
(संग्रहित छायाचित्र)

डॉ. हृषीकेश रांगणेकर

‘मन मनास उमगत नाही,

आधार कसा शोधावा!

स्वप्नातील पदर धुक्याचा

हातास कसा लागावा?’

सुधीर मोघ्यांच्या या तरल ओळी ‘मनाला काहीच स्पर्शू शकत नाही’ असे म्हणता म्हणता स्वत:च स्पर्शून जातात! गेल्या काही दशकांत विविध विचारधारा आपापल्या परीने मनाचा धांडोळा घेताना, थांग लावताना दिसतात. आयुर्वेदामधला ‘प्रकृती’ हा शब्द तसा बऱ्यापैकी रुळला आहे. माझी वाताची, माझी पित्ताची, माझी कफ-पित्ताची प्रकृती आहे अशी विधाने कानावर पडत असतात. ही ‘शारीर’ प्रकृती जशी असते तशा ‘मानस’ प्रकृतीही वेगळय़ा वर्णिलेल्या आहेत. सत्त्व (शुद्धता, ज्ञानाशी संबंधित), रज (क्रोध, कृतिप्रवणता) आणि तम (जडता, आळस, अज्ञानमयता) हे मानसिक पैलू / प्रकार / धारणा आहेत. त्या्नुसार सात्विक, राजसिक आणि तामसिक प्रकृती असतात. याखेरीज शारीर प्रकृतीवर बेतलेल्या मानस प्रकृतीही असतात. (शारीर प्रकृतींचा प्रभाव मनावर पडत राहतोच.)

प्रकृतीचेही ढोबळमानाने दोन प्रकार. पैकी पहिला म्हणजे अशी प्रकृती- जी जन्मत:च आपल्याला मिळते आणि मृत्यूपर्यंत तशीच असते. ही ‘स्थायी’ प्रकृती बदलत नाही; आणि दुसऱ्या प्रकारची प्रकृती- जी वय, ऋतू, देश (रुक्ष प्रदेश, दलदलीचा प्रदेश, इ.) यानुसार एकाच मनुष्यातदेखील बदलती

(dynamic) असते. म्हणजे लहान मुलांमध्ये कफाचे (नाका-छातीतला कफ नाही) प्राधान्य असते, तर उतार वयात वाताचे. तर या स्थायी आणि अस्थायी प्रकृतीची तुलना आपल्याला वाढीच्या ‘नेचर व्हर्सेस नर्चर’ या प्रसिद्ध सिद्धांताशी करता येईल. ‘नेचर’ म्हणजे एखादा मनुष्य जन्माला आल्यावर त्याची मनोशारीरिक वाढ ज्या पद्धतीने होईल ती तशीच होत राहील, त्याला विशिष्ट वयात होणारे आनुवंशिक रोग त्या त्या वयात होणारच; तर ‘नर्चर’ म्हणजे त्या मनुष्याला बाहेरून मिळणाऱ्या गोष्टी, जसे की त्याचे पोषण आणि त्याच्या अवतीभवती असणाऱ्या गोष्टींचा त्याच्यावर पडणारा प्रभाव. नेचर आणि नर्चर, दोघांच्याही आपापल्या मर्यादा असतात. म्हणजेच उदाहरणादाखल आपण आंब्याचे झाड घेतले तर आंब्याच्या रोपाला ते रोप मोठे झाल्यावर मोहोर येऊन पुढे कैऱ्या येणार हे नक्की. हे नैसर्गिक आहे (नेचर), पण त्या रोपाची पुढे होणारी वाढ, त्याला येणाऱ्या कैऱ्यांची संख्या, त्यांचा आकार, त्याच्यावर पडणारी कीड या गोष्टी ‘बा’ घटकांवर अवलंबून असतात (नर्चर). त्या रोपाला नीट खतपाणी मिळाले, त्याची नीट निगा घेतली गेली तर येणारे फळ हे उत्तम दर्जाचे असेल (नर्चर). पण पायरीच्या रोपाला केशर आंबा येणार नाही (नेचर). या दृष्टीने बघू जाता एखादे मूल जन्मल्यावर त्याची स्थायी प्रकृती सात्त्विक असेल आणि त्याला घरातून, आजूबाजूच्या परिसरातून मिळणारे संस्कारही सात्त्विक स्वरूपाचे असतील तर त्याचा कल, मानस प्रकृती बव्हंशी सात्त्विक असणार. स्थायी प्रकृती सात्त्विक असेल आणि घरातून, आजूबाजूच्या परिसरातून मिळणारे संस्कार राजसिक किंवा तामसी असतील तर त्याचा कल सात्त्विक आणि इतर रज-तमाचे मिश्रण या स्वरूपाचा असेल. एखाद्याचे नाव घेतल्यावर त्याचा जो स्वभाव आपल्या मनात येतो ती त्याची (किमान आपल्यापुरती असेलेली) प्रकृती! तो भावनिक असेल, कोरडा असेल, दयाळू असेल, शिस्तीचा असेल, सरळमार्गी असेल, कपटी असेल, मैत्रीपूर्ण असेल, विनोदी असेल, गंभीर असेल, जबाबदारीने वागणारा असेल वगैरे वगैरे. यातील दोन किंवा अधिक पैलूही बऱ्याचदा एका माणसामध्ये दिसतात किंवा लागलीच डोळय़ांसमोर येतात. एखाद्या माणसाला जवळून ओळखणाऱ्या आठ दहा, वीस-पंचवीस माणसांच्या मनातील प्रतिमेचा ल.सा.वि. किंवा छेदणाऱ्या वर्तुळांचा सामायिक भाग म्हणजे त्या माणसाची मानसिक प्रकृती असा अंदाज लावता येईल. स्वत:चे खरे रूप कोणासमोरही उघड न करता लीलया वावरता येऊ शकणारे लोकही असतातच. आपण त्यांना जरा बाजूला ठेवूयात.

अमुक एक मनुष्य अमुक एका परिस्थितीत कसा वागला/ बोलला असता याचे आडाखे आपण जेव्हा बांधतो तेव्हा आपण त्याला, त्याच्या मानसिक प्रकृतीला बऱ्यापैकी ओळखले असते. हे आडाखे नेहमी शंभर टक्के बरोबर येतील असे नाही. हे असे असूनही, ‘मनाचा थांग लागत नाही / मन मनास उमगत नाही’ असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा बऱ्याचदा आपल्या स्वत:लाही आपण स्वत:च एखाद्या प्रसंगी तसे का वागलो याचा उलगडा झालेला नसतो. त्यामुळे अशा तुलनेने दुर्मीळ परिस्थिती, अवस्था यांना बाजूला टाकून सत्तर-पंच्याहत्तर टक्क्यांबाबत आपण बोलत आहोत. एखादा मनुष्य प्राधान्याने ‘सात्त्विक’ आहे, तरीदेखील कधी तो राजसिक/ तामसिक वागू शकतो. काहीसे ‘सध्या पावसाळा चालू आहे पण आज पाऊस पडला नाहीये’ सारखे.

आदिमानव काळापासून मानव (किंवा खरे तर आदिमानव) स्वत:च्या मनोरंजनाचे मार्ग धुंडाळत आलाय. गुहेतली प्राचीन चित्रे, शिल्प हेच दाखवतात. आपल्या हयातीतच एक काळ होता की जेव्हा रेडियो हे एकच मनोरंजनाचे मोठे साधन होते. हळूहळू टीव्ही वाडय़ावस्त्यांवर शिरला आणि काही वर्षांमध्ये घरोघरी टीव्ही आला. दूरदर्शन हे एकच चॅनल कित्येक दशके कित्येक पिढय़ांचे मनोरंजन करत होते. जेव्हा इतर चॅनल्सचा शिरकाव टीव्हीवर झाला तेव्हा माहिती मिळवण्याचे आणि मनोरंजनाचे अनेक पर्याय उपलब्ध झाले. रेडियो आणि टीव्ही येण्याच्या आधीच्या काळातही नाटक, कीर्तन, भारूड, लावण्या आणि इतर अनेक लोककलांमधून समाजामध्ये माहितीची, ज्ञानाची देवाणघेवाण आणि मनोरंजन होत असे. जागतिकीकरणानंतर आणि आपल्याच देशातील नव्हे, तर इतर देशातील टीव्ही चॅनेल्स आपल्याला उपलब्ध झाले आणि आपल्या भोवतालची समज पूर्वीच्या तुलनेत कैकपटीने वाढली. अलीकडच्या काळामध्ये इंटरनेट आणि त्यानंतर आलेल्या ‘ओटीटी’ फलाटांमुळे माहिती आणि मनोरंजनाचा स्फोटच झाला. कोविड आणि लॉकडाऊन काळामध्ये मोठय़ा प्रमाणावर ‘ओटीटी’ वापरण्याची सुरुवात बऱ्याच जणांकडून झाली आणि अर्थात ती कोविडनंतरही पुढे वेगात पसरत राहिली, रोजच्या जगण्याचा भाग बनून गेली. सध्याच्या स्मार्ट टीव्ही संचात आपसूक ( ‘बाय-डिफॉल्टच’)  हे  ‘ओटीटी’ फलाट असतात.

आता आपण ताज्या विषयाकडे येऊ. श्रद्धा वालकर हिचा केलेला खून आणि नंतर विल्हेवाट लावण्यासाठी थंड डोक्याने तिच्या शवाचे केलेले ३५ तुकडे, ते ठेवण्यासाठी आणलेला फ्रिज, आणि कित्येक महिन्यांमध्ये तुकडय़ा तुकडय़ांनी शवाची लावलेली वासलात. हे सगळे कुणी केले, तर तिच्याबरोबर ‘लिव्ह-इन’मध्ये रहात असलेल्या तिच्या प्रियकर आफताबने. ‘डेक्स्टर’ या  सीरिजमधून प्रेताची विल्हेवाट लावायची कल्पना उचलली असे तो म्हणाल्याचे वाचनात आले.

खुनाचे तात्कालिक कारण काय होते, त्या वेळी नक्की काय घडले होते हे शंभर टक्के सत्य स्वरूपात बाहेर यायची शक्यता शून्य आहे. कारण, तिची बाजू कधीच समोर येणार नाही. असे असले तरीही, आफताबने यापूर्वीही तिला मारहाण केल्याचे आणि मृत्यूपूर्वी ती काही काळ प्रचंड तणावाखाली असल्याचे समोर येत आहे. मॉडर्न काळातली स्वत:च्या पायावर उभी असलेली तरुणी अशा मारझोड करणाऱ्या, हिंसक प्रवृत्तीच्या मनुष्याबरोबर, स्वत:च्या जिवाला धोका आहे याची जाणीव होऊनही का बाहेर पडली नाही, हा स्वतंत्र आणि वेगळय़ा लेखाचा विषय आहे.

आफताबने खून हा थंड डोक्याने, आराखडा रचून केला. भांडण होऊन संतापाच्या भरात केला, हे नुकतेच त्याने दिलेल्या जबाबातून समोर आले आहे. शिवाय त्याने शवाची विल्हेवाटही थंड डोक्याने केली. आता खून केल्यानंतर ‘आपल्या प्रेयसीच्या शरीराचे तुकडे करून, फ्रिज विकत आणून ते त्यात ठेवून, ते तुकडे रात्री दोन नंतर दूर जाऊन फेकून देण्याचा अमानवी थंडपणा येण्यात ‘ओटीटी’चे योगदान आहे का आणि असल्यास किती’ हा प्रश्न आहे.

विविध कलाप्रकारातून तत्कालीन समाज उजागर केला जातो. एका अर्थी समाजाला आरसा दाखवायचे काम प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष तऱ्हेने कला करीत असते. पाशवी/ नैसर्गिक प्रेरणांपासून कला माणसाला उन्नत करण्याचे काम करीत असते. जीवनाचा वेगळा अर्थ, वेगळा पैलू कलेमार्फत माणसाला प्राप्त होतो. ही एक बाजू झाली. याचा व्यत्यास तितकाच खरा आहे का? तर याचे उत्तर बव्हंशी नकारात्मक येते.

म्हणजे असे की, सिनेमातून समाजात फॅशन रुजू शकते, चालण्या-बोलण्याच्या ढबी रुजू शकतात परंतु त्याचबरोबर ‘ओटीटी’च्या सीरियल्स पाहून समाजात ‘सीरियल किलर्स’ निपजतात हे सुतावरून नरक गाठणे होईल. सर्वसाधारण मनुष्य ‘समाजाला काय मान्य आहे?’, ‘काय चालू शकेल?’चा विचार करूनच व्यवहार ठरवतो, कलेतून तितकेच उचलतो. आवडता कलाकार सिनेमात अमुक स्टाइलने सिगारेट पितो म्हणून तशी सिगारेट पिणारे लोक आहेतच; किंवा जगभरच्या सिनेमात दिसणारे, विदेशी सिरीजमध्ये दिसणारे ‘सोशल ड्रिंकिंग’ आता आपल्याकडेही ‘चलता है’ म्हणत सामान्य झालेले आपण पाहत आहोत. आणि हे असे बदल टाळता येण्याजोगे नाहीत. चांगल्या-वाईट संस्कृती/ चाली-रितींचे आदानप्रदान ओटीटी, सोशल मीडिया यामुळे होणे हे कुणाला आवडो न आवडो, पण अनिवार्य आहे. पण याची व्याप्ती ही जास्तीतजास्त ‘नर्चर’च्या व्याप्तीइतकी आहे. कुठलीही सीरिज, सिनेमा किंवा कला ही अवश्यंभावी / स्थायी प्रकृतीत लुडबुड करू शकणार नाही.

‘सीरियल किलर्स’ हे बहुतकरून टोकाच्या मानसिक आजारांचे बळी असतात. सिनेमाच्या भाषेत (किंवा मनोरोगाच्या पुस्तकात) ‘सायकोपॅथ’ हा शब्द वापरला जातो. काही मालिकांमधून अशा ‘सीरियल किलर्स’च्या अंतरंगाचा मागोवा घेतला आहे. अवाजवी आबाळ झालेले बालपण (ट्रबल्ड चाइल्डहूड) हे अनेक अशा केसेसमधे आढळून येते. सबब, बहुतांश क्राइम सिरियल्स या ‘क्राइम पोर्न’ नसतात, किंबहुना नंतर त्या खुन्यांचेही भले झाले नाही असे सांगणाऱ्याही असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या मालिका पाहून माणसाच्या विचार आणि माहितीच्या विस्ताराचा परीघ वाढायला मदतच होईल, आणि तो परीघ गुन्हे क्षेत्रात जाण्याची शक्यताही वरील कारणांमुळे धूसर. अन्यथा हिचकॉकच्या जगभरात पसरलेल्या लाखो फॅन्सपैकी काही हजार तरी गुन्हेगारी क्षेत्रात आलेले दिसले असते.

हे सगळे असे असले तरीदेखील, एक ‘वर्ड ऑफ कॉशन’ आहेच. विशिष्ट वयानंतरच (१८ वर्षे), समाजाचे, आजूबाजूच्या परिस्थितीचे नीट भान आल्यावरच, विवेकबुद्धी शाबूत असल्यावरच अशा गोष्टींना, टेक्नॉलॉजीला प्रवेश असावा. धोक्याच्या ठिकाणी सेल्फी घेण्याने, ब्लू व्हेलसारखे खेळ खेळल्याने अनेक कोवळय़ा मुलांनी प्राण गमावलेले आपण पाहिले आहेत! तर याबाबतही ‘मध्यममार्गी’, किंवा आजच्या भाषेत ‘मापात’ राहणे इष्ट.

(लेखक मानसरोगतज्ज्ञ आणि संशोधक आहेत)

dr.rangnekar@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 01:10 IST
Next Story
अभिजात : फ्रान्स्वा जिलो : शंभरी पार केल्यानंतर..