‘संघ परिवार : एक मायाजाल’ या माझ्या लेखावरील प्रतिक्रिया वाचल्या. सन १८८५ ते २०२५ या १४० वर्षांच्या कालखंडाची ‘थेंबांची रांगोळी’ संदर्भ आणि पुरावा न जोडता सादर केल्यामुळे प्रतिक्रियांच्या स्वरूपाचा अंदाज होता. निवडक मुद्दय़ांवर अधिकची माहिती अल्प शब्दांमध्ये सादर करतो आहे –

१) पारतंत्र्यात ब्रिटिशांपासून आणि स्वातंत्र्यकाळात ‘सेमेटिक कल्चर’च्या नेहरू-(इंदिरा) गांधी सत्तापिपासू घराण्यापासून संघाला धोका असल्यामुळे संघ परिवाराचा अधिकृत व सत्य इतिहास प्रसिद्ध झालेला नाही. वाजपेयी-मोदी सत्तापर्वात ‘सरकारी सत्य’ २१ व्या शतकात प्रथमच संघनेत्यांच्या हाती आले आहे.

२) १९३७ पर्यंत काँग्रेस, हिंदूसभा आणि रा. स्व. संघ यांचे संबंध सुमधुर होते. १९३७ नंतरही संघ-काँग्रेस संबंध सुमधुर होते, पण नंतर सावरकर आणि हिंदुमहासभा यांचे काँग्रेस-संघाशी संघर्ष प्रारंभ झाले. १९५० पर्यंत काँग्रेस संघटनेवर सरदार पटेलांची पकड मजबूत होती. पण समाज-साम्राज्यवादी रशिया आणि साम्यवाद्यांमुळे पंडित नेहरूंची लोकप्रियता गगनाला भिडली होती. १ सप्टेंबर १९४६ नंतर म. गांधी यांचा भारत सरकारवरील आणि पटेल-नेहरूंवरील प्रभाव संपला होता. प्यारेलाल यांच्या भाषेत सांगायचे तर, ‘नेहरूंच्या मेंटॉरची जागा महात्मा गांधींकडून लेडी व लॉर्ड माऊंटबॅटन दाम्पत्याकडे सरकली होती.’

३) स्वा. सावरकर यांच्या ‘हिंदुत्व’ या पुस्तकातील पृष्ठे १२५-१२६ वरील काही सलग वाक्ये सादर करतो. स्वातंत्र्यवीर लिहितात – ‘कोणत्याही राष्ट्राला पूर्ण स्थैर्य व ऐक्यता यावयास इतर गोष्टींबरोबर मुख्यत: तेथील राहणाऱ्या लोकांची त्या राष्ट्रावर भक्ती असली पाहिजे. त्यांच्या वाडवडिलांची जी पितृभू, तीच त्यांची पुण्यभू असली पाहिजे. त्यांच्या देवांचा, देवदुतांचा, द्रष्टय़ांचा व धर्मप्रणेत्यांचा निवास त्याच भूमीत असला पाहिजे. त्यांच्या इतिहासाच्या घटनांचे जे क्षेत्र, तेच त्यांच्या पुराणाच्या घटनांचेही क्षेत्र असले पाहिजे.’

४) डॉ. मुंजे, स्वा. सावरकर, डॉ. परांजपे यांचे संपूर्ण सहकार्य घेत डॉ. हेडगेवारांनी संघ द्रुतगतीने वाढवला-रुजवला. वैचारिक साम्य-भेद सर्वानीच लक्षात घेतले पाहिजेत. हेडगेवार अ‍ॅण्टी-मुस्लीम नव्हते. डॉक्टर सतत म्हणत, ‘‘रशियाचा रशियन, अमेरिकेचा अमेरिकन, जर्मनीचा जर्मन, फ्रान्सचा फ्रेंच, ब्रिटनचा ब्रिटिश, तसेच हिंदुस्थानचा हिंदू!’’ हिंदुमहासभा व ‘हिंदुत्व’ ग्रंथ भारतातील मुसलमान, ख्रिश्चन, पारशी, ज्यू आदींना हिंदू समजत नाही. त्यामुळेच त्यांना राष्ट्रीय मानत नाही. एक कटू सत्य सांगतो- डॉक्टरांचा मार्ग समष्टीच्या यशाचा होता, तर स्वातंत्र्यवीरांचा मार्ग वैयक्तिक हौतात्म्याचा होता.

५) ‘‘बंगालला प्रचारक म्हणून न जाता किशोरावस्थेतील तुझे स्वप्न पूर्ण करण्याकरिता तू आयसीएस हो. तू आयसीएस झालास तर उद्या संघाच्या कामाला येशील,’’ असे बाळासाहेब देवरसांना डॉ. हेडगेवार म्हणाले. देवरस म्हणाले, ‘‘मी संघाला निवडले आहे. मला इथेच राहू द्या. समजा, तुमच्या आदेशामुळे मी संघ सोडून आयसीएस झालो, तर उद्या तुमचे-संघाचे ऐकेनच याची हमी देऊ  शकत नाही.’’ मृत्युपूर्वी डॉ. हेडगेवार गोळवलकरांना देवरसांच्या उपस्थितीत म्हणाले, ‘‘अखिल भारतीय मजबूत संघटन उभे होईपर्यंत काहीही करू नका. माझा वारस बाळ देवरस आहे. त्याला पूर्ण घडवण्याची जबाबदारी मी तुमच्यावर टाकत आहे.’’

संघबंदीच्या काळात संघाच्या मुख्यालयातील शाखेत (मोहिते शाखा) तरुण स्वयंसेवकांना देवरस म्हणालेत, ‘‘डोण्ट वरी! वन डे आय विल बी प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया.’’ शाखेचे कार्यवाह होते भय्याजी आमटे आणि मुख्य शिक्षक होते नारायणराव बैतुले. हा प्रसंग माझ्यासकट शेकडो व्यक्तींना बैतुले यांनी सांगितला आहे. नागपूरच्या जिज्ञासू वृत्तीच्या संघ कार्यकर्त्यांना प्रारंभापासून ‘फर्स्ट हॅण्ड डाटा’ अनेकानेक प्रचारकांकडून ऐकायला मिळतो आणि बहुसंख्य वेळा तो ‘कन्फर्म’ही करता येतो. मी स्वत: गत १९ वर्षांपासून संघसृष्टीची माहिती माध्यमे आणि विविध लेखकांना पुरवत आहे. विश्वासार्हता टिकवल्यानेच हे शक्य झाले आहे.

६) २० जानेवारी १९४८ रोजी म. गांधींवर बॉम्ब फेकून त्यांची हत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. नथुराम गोडसे, आपटे व इतर पळून गेले, पण मदनलाल पहावा तिथेच पकडला गेला. त्याने गोडसे-आपटे यांची माहिती पोलिसांना तात्काळ दिली. त्या पूर्वीही हत्येचे प्रयत्न झाले होते. नेहरू सरकारच्या व ब्रिटिश प्रशासनाच्या पोलिसांना गोडसे-आपटे पूर्ण माहितीचे होते. पण महात्मा गांधींना वाचवण्याचे प्रयत्न झाले नाहीत.

२९/३० जानेवारी १९४८ ला म. गांधींनी काँग्रेस विसर्जित करून ‘लोकसेवक संघ’ काढला. लिखित हस्ताक्षरयुक्त ठराव काँग्रेसच्या दप्तरात सकाळीच नोंदवला. एआयसीसी फाइल नं. १५७८ हा पुरावा बघा. ‘हरिजन’च्या १५ फेब्रुवारी १९४८ च्या अंकात वाचा. ‘म. गांधी : द लास्ट फेज’ आणि प्यारेलाल यांचे अनेक खंड बघा. नेहरूंना काँग्रेसचे विसर्जन आणि लोकसेवक संघाचा जन्म मान्य नव्हता. ३० जानेवारीच्या संध्याकाळी गांधींची हत्या होऊ  दिली गेली. गांधी हत्या न्यायालयीन खटल्यातील रशियाचा उल्लेख मुळातूनच वाचला पाहिजे.

७) मिठाचा सत्याग्रह समुद्रकिनारी झाला. विदर्भात समुद्र नसल्यामुळे काँग्रेसवाल्यांनी जंगल सत्याग्रह केला. ना. ह. पालकर लिखित ‘डॉ. हेडगेवार’ ग्रंथात पृष्ठ क्र. २०१ ते २२६ मध्ये माहिती उपलब्ध आहे.

८) डॉ. हेडगेवारांचे महाविद्यालयीन शिक्षण कोलकात्यात झाले होते. डॉक्टरांचे नेताजी बोस यांच्याबरोबर प्रारंभापासूनच संबंध होते. एप्रिल १९४१ मध्ये नेताजी गाजावाजा करून जर्मनीत गेले नव्हते. गुप्त मित्रांमार्फत नेताजी-हेडगेवार संवाद घडलेत. पालकरांच्या ‘डॉ. हेडगेवार’ या ग्रंथात पृष्ठ क्र. १८५, ३२५, ३४८, ३५३, ३५४, ३६६, ३९५, ३९६ वर तपशील उपलब्ध आहे.

९) सर्वच व्यक्ती व संस्थांच्या वाटचालीत विरोधाभास आढळतो. सम्यकपणे अभ्यास करणे ज्ञानयुगात अत्यावश्यक आहे. झापड लावून बघितल्यास सत्य समजणे कठीण होते. महात्मा गांधींचे ‘लास्ट विल अ‍ॅण्ड टेस्टामेंट’ आणि संसदीय लोकशाहीविषयीच्या मतांना नीट समजून घेणे अगत्याचे आहे. या दोन्ही बाबींच्या हत्या ज्यांनी केल्या त्यांना महात्म्याचे राजकीय वारसदार म्हणणे सर्वथा चुकीचे आहे.

१०) ‘२००४ मध्ये सोनिया गांधींना पंतप्रधानपदापासून दूर ठेवण्यात प्रा. राजेंद्र सिंह यांचा हात होता’ या विधानातील ‘२००४ मध्ये’ हे शब्द माझे नाहीत. ‘गोरी चमडी’ या शब्दांनी १०,००० स्वयंसेवकांच्या संघ शिबिरात प्रा. राजेंद्र सिंह यांनी १९९८ साली सोनिया गांधींवर शाब्दिक हल्ला केला होता. त्याला व्ही. पी. सिंग, चंद्रशेखर आदींनी खुलेपणाने साथ दिली. शरद पवार, मुलायम सिंहांनी या विधानाला उचलून धरले. सोनियाजींचे पंतप्रधानकीचे स्वप्न भंगले.

११) गुरुजी जन्मशताब्दीच्या निमित्ताने प्रसिद्ध झालेल्या खंडांमध्ये रंगा हरी लिखित ग्रंथामध्ये नवइतिहास समोर आलेला आहे. त्यात गांधीहत्या प्रकरणावर नवप्रकाशझोत आढळेल. तुषार गांधींचे ‘लेट्स किल गांधी!’ अनेक नवगोष्टी सादर करते. ते कृपया डोळसपणे वाचावे.

– दिलीप देवधर, नागपूर</p>

हिंदुत्वविचार : रा. स्व. संघ आणि स्वा. सावरकर

‘लोकरंग’मधील (११ नोव्हेंबर) ‘संघ परिवार : एक मायाजाल’ या लेखात दिलीप देवधर यांनी ‘स्वा. सावरकरांची ‘हिंदू’ संकल्पना हेडगेवारांनी मनोमन नाकारली, हेडगेवार – गोळवलकर – देवरस यांनी संघाला आणि सावरकरांच्या हिंदुमहासभेला सदैव दूर ठेवले’ अशी विधाने केली आहेत.

नारायण हरी पालकर यांनी परिश्रमपूर्वक लिहिलेले डॉ. हेडगेवार यांचे चरित्र (१९६१) अधिकृत समजले जाते. त्यास गोळवलकरांची प्रस्तावना आहे. त्या चरित्राचे सावरकरांनी कौतुक केले होते. सावरकरलिखित ‘हिंदुत्व’ ग्रंथाचे हस्तलिखित रत्नागिरी कारागृहातून नागपूरच्या विश्वनाथ केळकर विधिज्ञ यांच्याकडे आले आणि त्यांनीच ते प्रसिद्ध केले. केळकर सावरकरांचे नातलग, ‘अभिनव भारत’चे सदस्य आणि हेडगेवारांचे जीवलग मित्र होते. ते हस्तलिखित प्रथम वाचणाऱ्यांत हेडगेवार होते, असे पालकर लिहितात. ‘डॉक्टरांना तो ग्रंथ अतिशय आवडला आणि त्यांनी त्या काळात व त्यानंतरही त्या पुस्तकाचा सर्वत्र प्रसार सुरू केला’ असे पालकर लिहितात.

‘सावरकरांच्या ग्रंथातील ‘हिंदू’ कल्पना ‘रिलिजिअस’ शैलीने मांडली गेली, डॉ. हेडगेवारांची ‘हिंदू’ कल्पना सभ्यतेची होती’ हे देवधरांचे विधान अर्थहीन आहे. ‘हिंदुत्व’ गं्रथाच्या प्रारंभीच सावरकर ‘हिंदुत्व हिंदू धर्माहून निराळे आहे’ हे सूत्र विस्ताराने मांडतात. हेडगेवारांनी ‘हिंदू’ शब्दाची कुठेही तात्त्विक चर्चा केलेली नाही, त्यांच्या भाषणांतून ती त्रोटकपणे प्रकट होताना दिसते.

हेडगेवार संपादित ‘स्वातंत्र्य’ दैनिकाच्या एकमेव उपलब्ध अंकाच्या मुखपृष्ठावर ‘एकोज् फ्रॉम अंदमान्स’ आणि शेवटच्या पृष्ठावर ‘हिंदुत्व’ या पुस्तकांची प्रकटने आढळतात, असेही पालकरांनी लिहिले आहे. संघस्थापनेपूर्वी हेडगेवारांनी रत्नागिरीत स्थलबद्ध असलेल्या सावरकरांची भेट घेतली होती. दोन दिवस चाललेल्या या भेटीत हेडगेवारांनी संकल्पित संघटनेची कल्पना दिली आणि सावरकरांचा त्यावरील अभिप्रायही समजून घेतला, असे पालकर लिहितात. संघस्थापनेनंतर हेडगेवार पुन्हा सावरकरभेटीला रत्नागिरीला आले तेव्हा डॉ. म. ग. शिंदे यांच्या घरी उतरले होते. तिथे झालेल्या सावरकर-हेडगेवार भेटीची आठवण शिंदे यांचे चिरंजीव वि. म. शिंदे यांनी लिहून ठेवली आहे. (‘आठवणींची बकुळ फुले’, नवचैतन्य प्रकाशन, पृष्ठ क्र. ५१) ही चळवळ नागपूर प्रांतापुरती मर्यादित न ठेवता देशभर त्याची व्याप्ती वाढवा, तरच त्याचा उपयोग होईल असा अभिप्राय सावरकरांनी हेडगेवारांना दिला होता. सावरकर रत्नागिरी जिल्ह्य़ाबाहेर जाऊ शकत नाहीत, म्हणून त्यांचे प्रतिनिधी या नात्याने हेडगेवारांनी डॉ. शिंदे यांना नागपूरला बोलावून संघ स्वयंसेवकांकडून त्यांना मानवंदना दिली होती. सावरकरांनी स्थापित केलेल्या पतितपावन मंदिरातच रत्नागिरीतील पहिल्या संघशाखेची स्थापना झाली होती.

रत्नागिरीतून सावरकर बंधमुक्त झाल्यावर त्यांचे आणि हेडगेवारांचे संघवाढीसाठी एकत्रित दौरे होणे, सावरकरांनी संघशाखांना, शिबिरांना आणि प्रशिक्षण वर्गाना भेटी देऊन मार्गदर्शन करणे नित्याचेच झाले. महाराष्ट्रातील पहिल्या पिढीचे जवळजवळ सर्व प्रमुख संघ-पदाधिकारी हे मुळात सावरकरांचे अनुयायी होते. १९२३ मध्ये ‘नागपूर हिंदुसभे’ची स्थापना झाली तेव्हा हेडगेवार तिचे पहिले कार्यवाह आणि प्रचारक मंडळ सदस्य झाले. हेडगेवार अखेपर्यंत नागपूर हिंदुसभेचे उपाध्यक्ष होते. हेडगेवार आणि गोळवलकर दोघेही सावरकरांना अगदी सार्वजनिक ठिकाणीसुद्धा साष्टांग दंडवत घालत.

अनेक हिंदुसभा नेत्यांना संघाने हिंदुसभेचे स्वयंसेवक दल म्हणून काम करावे असे वाटत असे. अशा नेत्यांमध्ये सावरकर-बंधू नव्हते हे नमूद केले पाहिजे. संघाची पाठराखण करण्यात बाबाराव सावरकर पुढे असत. हेडगेवारांच्या निधनानंतर सावरकरांनी गोळवलकरांना १३ जुलै १९४० रोजी सांत्वनपर पत्र लिहिले. ‘संघाच्या बाबतीत हेडगेवारांचा शब्द अंतिम असे, त्यांच्या विवेकबुद्धीवर आपल्याला पूर्ण विश्वास होता,’ असे त्यात सावरकर लिहितात. सैनिकीकरणाबाबत सावरकरांच्या भूमिकेचे गोळवलकरांना आकलन झाले नाही, हे मान्य केले पाहिजे. पुढे जनसंघ स्थापनेमुळे संघ आणि हिंदूसभा यांच्यात दुरावा वाढला हेही मान्य; पण सावरकर आणि गोळवलकरांच्या हिंदुत्व-विचारात कुठे भेद दिसत नाही. सावरकरांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त १५ मे १९६३ रोजी मुंबईत दिलेल्या भाषणात गोळवलकर म्हणाले, ‘‘सावरकरांच्या ‘हिंदुत्व’ या महान ग्रंथात विशुद्ध राष्ट्रवादाची तत्त्वे शास्त्रशुद्ध पद्धतीने विशद केलेली मला आढळली. माझ्या दृष्टीने तो एक पाठय़ग्रंथ आहे, शास्त्रग्रंथ आहे.’’ (‘स्वातंत्र्यवीर सावरकर’- धनंजय कीर, मराठी अनुवाद, पृष्ठ क्र. ५६१ – ५६२).

सावरकर जन्मशताब्दी वर्षांत सुधीर फडके यांचे जबलपूरला संघ स्वयंसेवकांसमोर बौद्धिक झाले. ‘सावरकर संघाचे कुलदैवत आहे’ हे त्यांचे वाक्य काही स्वयंसेवकांना खटकले. तेव्हा बाळासाहेब देवरसांनी ‘सुधीर काहीच चूक बोललेला नाही’ असा निर्वाळा दिला (‘मी पाहिलेले बाळासाहेब’- दीपक मुंजे, सांस्कृतिक वार्तापत्र, २०१५, पृष्ठ क्र. २७७)

डॉ. हेडगेवार हे हिंदुसभेचे शेवटपर्यंतचे पदाधिकारी होते; पण एके काळी गोळवलकर हिंदुसभेत सक्रिय होते हे फार थोडय़ा लोकांना ठाऊक आहे. सावरकर हिंदुमहासभेचे अध्यक्ष असलेल्या बहुतेक सर्व अधिवेशनांमध्ये संघ स्वयंसेवक गणवेशात व्यवस्थेमध्ये अथवा मिरवणुकीत सहभागी होत असत; किंबहुना १९४९ साली कोलकात्यात झालेल्या आणि सावरकर अध्यक्ष नसलेल्या हिंदुमहासभेच्या अधिवेशनाची व्यवस्था एकनाथजी रानडे यांनी सांभाळली होती. गांधीहत्येनंतर हिंदुमहासभा क्षीण झाली आणि पुढे जनसंघाची स्थापना झाली. त्यामुळे संघ – हिंदुसभा संबंध एका अर्थी राहिले नाहीत. काही ज्येष्ठ संघ स्वयंसेवकांचे सांगणे अमान्य करून देवरस विक्रम सावरकरांच्या नागपूर येथील षष्टय़ब्दीपूर्ती कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले होते. हेडगेवार – गोळवलकर – देवरस यांचा विचार सावरकरांच्या विचारापेक्षा भिन्न होता यास कोणताही पुरावा नाही. याउलट, तिघांवर सावरकरांच्या विचारांचा प्रभाव होता यास भरपूर पुरावे आहेत.

– डॉ. श्रीरंग गोडबोले