‘बॉम्बे आर्ट सोसायटी’, ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ आदी अनेक कलासंस्थांच्या अध्वर्यू आणि प्रसिद्ध चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर यांचं नुकतंच निधन झालं. त्यानिमित्ताने त्यांच्या एका सहप्रवाशी चित्रकर्तीने जागविलेल्या काही आठवणी..
एक तारखेला सकाळीच आमच्या एका मित्रांचा फोन आला की, चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर गेल्या. क्षणभर खरंच वाटेना. बातमी खरी होती, पण मन मात्र ती स्वीकारायला तयार नव्हतं. प्रफुल्लाचं या जगात नसणं ही कल्पनाच आम्हा कलावंतांना पटण्यासारखी नाही, कारण प्रफुल्ला म्हणजे कलाजगतातला सळसळणारं चैतन्य होतं. ते गेलं हे वाईट झालं.
आता यापुढे कलाविश्वातल्या कोणत्याही समारंभात त्या दिसणार नाहीत, कोणत्याही आर्ट गॅलरीत प्रदर्शनात त्या भेटणार नाहीत, बोलणार नाहीत, याचं फार वाईट वाटतं. त्यांच्या नसण्यानं खूप चुकल्यासारखं वाटत राहील.
खरंच! प्रफुल्ला म्हणजे कलाजगताची शान होती. कार्यक्रमात त्या असल्या की कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने शोभा यायची. एक भारदस्तपणा यायचा. निसर्गचित्रकार प्र. अ. धोंड गमतीने त्यांना ‘आंब्याचा टाळ’ म्हणायचे. ते अगदी खरं होतं. प्रफुल्लांचं व्यक्तिमत्त्व आंब्याच्या पानासारखं सदाहरित, मंगलमय, प्रसन्न असायचं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक निरागस मूल दडलेलं असायचं. त्यामुळे त्यांच्या वयाचं दडपण कधी कुणाला यायचं नाही. कलाजगतातले लहान-मोठे सर्वच त्यांना प्रेमानं ‘प्रफुल्ला’ म्हणूनच हाक मारायचे आणि त्यांनाही ते मनापासून आवडायचे.
प्रफुल्ला चित्रकार म्हणून तर मोठय़ा होत्याच, पण एक माणूस म्हणूनही मोठय़ा होत्या. कलावंतांसाठी, कलाजगतासाठी, समाजासाठी आपण काही केलं पाहिजे, ही तळमळ त्यांना सतत असायची. त्यांनी फक्त स्वत:चाच विचार कधी केला नाही. स्वत:साठी धडपड करणारे अनेक असतात, पण दुसऱ्यासाठी धडपडणारे खूप कमी असतात. अशांमध्ये वैश्विक प्रेम जागं झालेलं असतं. या काही दुर्मीळ व्यक्तींपैकी प्रफुल्ला एक होत्या. त्यांनी अनेक नवोदितांना वर आणलं. त्यांना प्रोत्साहन दिलं. त्यांचं कौतुक केलं. प्रसंगी आर्थिक मदतही केली. मराठी कलावंतांच्या गुणांचं चीज व्हावं, त्यांचे हक्क त्यांना मिळावेत, म्हणूनही त्यांनी खूप प्रयत्न केले. गोवा कला अकादमी, बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्टिस्ट सेंटर, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, जहांगीर आर्ट गॅलरी यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांमध्ये अखंड कार्यरत राहून त्यांनी कलाविश्वात सतत एक चैतन्य खेळतं ठेवलं. त्यांची उणीव आता सगळ्यांनाच भासणार आहे.
प्रफुल्लांनी जेवढं काम केलं, त्या प्रमाणात त्यांना विशेष काही मिळालं नाही. त्यांना काही मानसन्मान मिळायला हवे होते, पण त्या कधी प्रसिद्धीच्या, पैशाच्या मागे धावल्या नाहीत. त्यांना माणुसकी, आनंद, सौंदर्यकला आणि रसिकता यांचं खरं वेड होतं. ते त्यांनी फार छान जपलं. त्यांनी कधी कुणाचा मत्सर, द्वेष केला नाही. एखाद्याचं मोठेपण त्या दिलखुलासपणे मान्य करायच्या. कुणाला कधी कमी लेखायच्या नाहीत. अगदी नोकरचाकरांनाही माणुसकीने, प्रेमाने वागवायच्या. प्रदर्शनात कलावंताचे सामान्य नातेवाईक यायचे. तेव्हा त्यांच्याशी त्या आवर्जून बोलायच्या. आठवण ठेवायच्या. नंतर चौकशीही करायच्या. बऱ्याच वेळा असं दिसतं की, उच्चभ्रू, विद्याविभूषित श्रीमंत स्त्रियांमध्ये एक अहंभाव दिसतो, शिष्टपणा, दांभिकपणाही दिसतो; तो प्रफुल्लामध्ये कधीच दिसला नाही. त्या निगर्वी होत्या, मोकळ्या होत्या. त्यांचं जगणं खूप खरं असायचं. मनापासूनच असायचं आणि अगदी सहज असायचं. त्यामुळे त्या सदासर्वकाळ नावाप्रमाणे प्रफुल्लित दिसायच्या. त्यांची राहणी साधी, पण कलासक्त होती. सुंदर रंगाच्या खास रेशमी साडय़ा त्या नेसायच्या. त्यावर मोजकेच पण कलात्मक दागिने घालायच्या. हे सगळं फक्त त्यांना शोभून दिसायचं. शेवटपर्यंत त्यांनी ही आपली राहणी छान जपली. त्यांना जीवनाची सळसळ आवडायची. उदासपणा, निष्क्रियता, नकारात्मक विचारांपासून त्या दूर असायच्या. त्या सतत कार्यरत असायच्या. शरीरानं ८० वर्षांच्या असलेल्या प्रफुल्ला वृत्तीनं मात्र अगदी तरुण वाटायच्या. दुसऱ्याला काही ना काही देण्यात त्यांना आनंद वाटायचा. आम्हा चित्रकार मैत्रिणींना त्या कधी एखादी साडी नाही तर सुंदर बॅग भेट म्हणून द्यायच्या. मला त्यांचं फार अप्रूप वाटायचं.
चित्रकला, साहित्य, संगीत अशा सर्व कलाक्षेत्रांत त्यांची मित्रमंडळी होती. त्या मूळच्या गोव्याच्या असल्यामुळे कला आणि संस्कृतीची एक संपन्न पाश्र्वभूमी त्यांना लाभली होती. त्यांचं घराणं संगीताची सेवा करणारं होतं. सुप्रसिद्ध गायिका जोत्स्ना भोळे या त्यांच्या मावशी. ज्येष्ठ गायक पं. जितेंद्र अभिषेकी यांचे काही काळ त्यांच्या घरी वास्तव्य होते. गानसरस्वती किशोरी अमोणकर या त्यांच्या खास मैत्रीतल्या होत्या. या अशा अनेक बुजुर्गाच्या आठवणी त्यांच्याकडे होत्या. प्रफुल्ला त्या भरभरून सांगायच्या. थोडय़ाबहुत आठवणी त्यांनी लिहूनही काढल्या होत्या. त्याचं त्यांना पुस्तक काढायचं होतं, पण आजारपणामुळे ते राहून गेलं. ती एक खंत त्यांच्या मनात असावी. बॉम्बे आर्ट सोसायटीची स्वत:ची सुंदर वास्तू असावी, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. ती वास्तू आता पूर्ण होत आलेली आहे, पण ते पाहायला प्रफुल्ला असणार नाहीत, याचं दु:ख वाटतं. कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता प्रफुल्ला काम करायच्या. त्यात त्यांना आत्मिक आनंद मिळायचा. खरंच ही फार मोठी गोष्ट आहे.
प्रफुल्ला गोव्याच्या मातीत जन्माला आल्या. तिथला निसर्ग हेच त्यांचं स्फूर्तिस्थान होतं. त्याचे अनेकविध विभ्रम त्यांनी रंगरेषातून चित्रित केले. रंगसंगतीबाबत त्या विशेष संवेदनशील होत्या. संगीताची आवड आणि जाण असल्यामुळे त्यांच्या चित्रात एक सांगीतिक लय जिवंत झालेली असायची. एक चित्रकार म्हणून प्रफुल्ला यशस्वी कलावंत होत्या. अनेक मानसन्मान त्यांना प्राप्त झाले. अनेक देशांत त्यांची प्रदर्शने झाली. महत्त्वाच्या ठिकाणी त्यांची अनेक चित्रे संग्रहित आहेत.
डहाणूकरांसारख्या घरंदाज घराण्याच्या त्या सूनबाई होत्या. आणखी एक वैभव त्यांच्यापाशी होतं, ते म्हणजे निखळ मन आणि त्यातील निखळ रसिकता. मनाची ही श्रीमंती त्यांना फार महत्त्वाची वाटायची. त्या म्हणायच्या की, ‘नाही गं! हे बाहेरचं वैभव खरं नाही. ते इथेच सोडून जावं लागतं. आपल्याबरोबर येत ते आपलं संचित. म्हणून ते जपण्याचा प्रयत्न करायचा. जीवन खूप सुंदर आहे. ते भरभरून जगण्यासाठी आनंदी राहायचं. प्रसन्न  राहायचं.’ मला वाटतं प्रफुल्ला असंच जगल्या, म्हणून त्यांचं जीवन खऱ्या अर्थानं समृद्ध झालं.
कलावंताला मानसन्मान, पैसा किती मिळतो यावर त्याचा मोठेपणा ठरत नसतो. तर तो कसा जगला, किती उत्कटतेने जगला, आपल्या जगण्याशी किती प्रामाणिक राहिला. जीवनात रसत्व, जीवनातला आनंद, सौंदर्य किती एकरूप होऊन घेतलं यावर त्याचं मोठेपण अवलंबून असतं. प्रफुल्ला या अशा आत्मिक आनंद घेणाऱ्या कलावंतांपैकी एक होत्या. त्यांच्या पवित्र व निखळ आत्म्यास आम्हा कलारसिकांचा मन:पूर्वक सलाम..