डॉ. सिसिलिया काव्र्हालो

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद ज्यांच्या समग्र आयुष्यावर गोंदलं गेलं आहे अशा पोलीस अधिकाऱ्याचं स्वानुभवकथन म्हणजे ‘वर्दीतल्या माणसाच्या नोंदी’! मूल्यनिष्ठेच्या आधारावर एखादी व्यक्ती किती भरभक्कमपणे उभी राहू शकते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे डॉ. सदानंद दाते यांनी नोंदवलेले आपले अनुभव आहेत. सत्य, शिव, सुंदराची आस आणि ध्यासाची कास धरणारा अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. संविधानाचा आब राखण्याची आपली शपथ तंतोतंत पाळणारे अधिकारी म्हणून सदानंद दाते यांना ‘पोलीस अधिकाऱ्यांच्या नभांगणातील तारा’ असे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी म्हटले आहे.

वर्दीवरील ‘स्टार्स’ झळकण्यासाठी मनोनिग्रहाने ऊर्जावंत होणे आवश्यक असते, आयुष्याच्या यज्ञात देहाच्या समिधा ‘स्वाहा’ कराव्या लागतात, तेव्हाच त्या ताऱ्याचे तेज झळाळत राहते. सध्याच्या काळात विविध स्तरांवर काळोख दाटलेला असताना ‘वर्दीतल्या माणसाच्या नोंदी’ हे पुस्तक सकारात्मक उष:कालाची नांदी ठरू शकते.पेपर टाकणाऱ्या पोऱ्यापासून पेपरमध्ये कर्तृत्वाच्या बातम्या झळकणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यापर्यंत.. दवाखान्यातील स्वागतकक्षातील आणि टेलिफोन ऑपरेटरच्या कामापासून ते कामा हॉस्पिटलवरील दहशतवादी हल्ल्यात डॉक्टर्स, नर्सेस, बालके आणि महिलांना वाचवणाऱ्या धीरोदात्त पोलीस अधिकाऱ्यापर्यंत, व्यवस्थापनशास्त्र आणि वाणिज्यविषयक अभ्यासापासून ते आर्थिक गुन्हेगारीवर संशोधन करून देशाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात नियोजनाचा महत्त्वाचा भाग बनण्यापर्यंत, सरळ रेषेवरील खराब हस्ताक्षरापासून ते आपल्या मार्गावरील वेडय़ावाकडय़ा वळणांवरून पुढे सरळ चालत राहून आपल्या कर्तृत्वाच्या आणि वर्तमानाच्या सशक्त हस्ताक्षराचा ठसा उमटविण्यापर्यंत, काटेकोर शिस्तीत टप्प्याटप्प्याने कार्य करणाऱ्या व्यक्तीपासून ते अचानक उद्भवलेल्या विपरीत परिस्थितीत शांतचित्ताने निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यापर्यंतच्या प्रदीर्घ प्रवासाच्या पाऊलखुणा वर्दीतल्या माणसाच्या नोंदीत उमटलेल्या आहेत. एकाच वेळी चित्तथरारक आणि विलक्षण विलोभनीय अशा घटना- प्रसंगांची गुंफण डॉ. सदानंद दाते यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखवते.

अवैध दारूविक्री, व्यसनाधीनांच्या जीवनात उद्भवलेले कौटुंबिक प्रश्न, नक्षलग्रस्त भागातील विलक्षण ताणतणावाची हाताळणी, पोलीस भरतीच्या वेळी झालेला वाद, झोपडपट्टीवासीयांचे हृदयद्रावक दर्शन, ताणतणावात वावरणाऱ्या पोलीस दलाविषयीची आत्मीयता, त्यांच्या विश्रांतीचे केलेले नियोजन, उत्सवी गर्दी, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय ख्यातीच्या व्यक्तींच्या भेटीच्या वेळी वा एखाद्या राजकीय नेत्याच्या अंत्यविधीसमयी करावयाचे नियोजन, २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात जिवावर उदार होऊन केलेले कार्य, ‘फोर्स वन’ची जडणघडण, प्रसार माध्यमांशी जुळवून घेताना उडालेले खटके, व्यवस्थेच्या अंतरंगात वावरताना, संघर्षांला सामोरे जाताना भाषा सौम्य, पण भूमिका ठाम ठेवून आपले तत्त्व आणि सत्त्व सांभाळत कर्तव्य बजावत राहताना ते आपला स्वत:चा अवकाश निर्माण करू शकले. न्याय्य आणि नैतिक निर्णय घेऊ शकले.

पोलीस दलाची कोठेही नामुष्की होऊ नये म्हणून जपणारे हे पोलीस अधिकारी कनिष्ठ पातळीवरील कर्मचाऱ्यांबद्दल आत्मीयता बाळगतात; शिवाय ती पोलीस दलाची ताकद असल्याचेही ते मानतात आणि त्यांच्याकडून नवे काही शिकण्याची स्वागतशील वृत्तीही ठेवतात. आपल्या अधिकाऱ्यांच्या आणि साध्या शिपायांच्याही क्षमतांचा योग्य ते आदर ते राखतात. त्यांची गुणवत्ता जाणून घेतात. आपल्या मार्गदर्शक पोलीस अधिकाऱ्यांविषयीची कृतज्ञता ते या कथनात व्यक्त करतातच; त्याचबरोबर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशीही ते नेहमीच सौहार्दाचे संबंध ठेवतात.लेखक स्वत: अज्ञेयवादी असतानादेखील रामायण-महाभारत यांतील उदाहरणे देत आपल्या विचारांना एक नवा आयाम देतात. विपश्यना, ध्यानधारणा शिकून ताणतणावाच्या वेळी आपले मानसिक संतुलन राखण्यासाठी त्याचा उपयोग करतात. विष्णुगुप्त, चाणक्य आणि शिवछत्रपतींच्या मावळ्यांचे संदर्भ, विनोबा भावे, महात्मा गांधी, ग्रीक तत्त्वज्ञ एपिटेक्टसच्या काळापासून चालत आलेले विचार त्यांना ऊर्जा पुरवतात. साहित्याच्या वाचनानेदेखील त्यांच्या मनाला उभारी मिळालेली दिसते. अंती आपली अंत:प्रेरणाच ते महत्त्वाची मानतात आणि ताणतणावाच्या कामातही आपली संवेदनशीलता, मनाची कोवळीक जिवंत ठेवतात, तेव्हा त्यांच्या स्वभावातील ऋजुता आणि विचार व वाणीतील ओजस आपले लक्ष वेधून घेते. शेवटी एक पोलीस अधिकारी म्हणून आणि माणूस म्हणून अशा दोन्ही पातळ्यांवर डॉ. सदानंद दाते यांचे महत्त्व या पुस्तकात जाणवत राहते.

पोलीस अधिकाऱ्याला आवश्यक अशी शत्रूचा माग काढणारी भेदक नजर जशी सदानंद दाते यांच्याकडे आहे, तशीच निसर्गसौंदर्य टिपण्याची नजरही त्यांना लाभलेली आहे. धावण्याचा सराव करताना आसपासची हिरवी झाडं, समुद्र, आकाशाचे बदलते रंग, पक्ष्यांचं गुंजन, सतत बदलणारं ऋतुचक्र या सगळ्याचा मन निववणारा, शांत करणारा परिणामही होत असल्याची नोंद ते करतात. अभावग्रस्तांच्या डोळ्यांतील अश्रू हेरणारी नजर जशी त्यांच्यापाशी आहे, त्याचप्रमाणे स्वत:ची बलस्थानं आणि कमतरता हेरण्यासाठी आपल्या अंतरंगात डोकावण्याची निरक्षीरविवेकाची नजरही त्यांच्याकडे आहे. आपल्या एकूणच अनुभवांकडे अत्यंत तटस्थपणे पाहत, कोणताही अभिनिवेश न आणता सहज, साध्या, सोप्या भाषेतल्या नोंदींचा हा पारदर्शी प्रवाह वर्दीतल्या माणसाच्या नोंदीत झुळझुळत राहिला आहे.

‘वर्दीतल्या माणसाच्या नोंदी’- सदानंद दाते, समकालीन प्रकाशन, पुणे, पृष्ठे- १४४,
मूल्य- २०० रुपये
drceciliacar@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police officer experience police commissioner julio ribeiro amy
First published on: 02-10-2022 at 00:03 IST