श्रीनिवास बाळकृष्ण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ए चाइल्ड ऑफ बुक्स’ हे पुस्तक मुलाच्या पुस्तकाचं आहे. नाही.. पुस्तकातल्या मुलाचे आहे, म्हणजे मुलांच्या पुस्तकातल्या मुलाचे आहे. त्या पुस्तकात अक्षरं आहेत, चित्रातही अक्षर आहेत, म्हणजे अक्षराची चित्रं आहेत. म्हणजे चित्रातल्या अक्षरांसोबत हाताने लिहिलेली अक्षरंही आहेतच आणि हातानी काढलेली चित्रं पण आहेत.. सॉरी थांब.. माझीच मन की बात मीच ऐकल्याने गडबड होतेय. मी पुढं थोडक्यात सांगतो, मग तुला नीट कळेल.

या पुस्तकात ‘पुस्तकातील’ एक लहान मुलगी, शब्द समुद्र पार करत, शब्दांचे उंच डोंगर सर करत आणखी एका लहान मुलाला पुस्तकांच्या विश्वात नेणार आहे. ही सफर परीकथांच्या राज्यातून होत कल्पनेच्या पर्वतावर, गाण्याच्या ढगांवर झोपता येऊ शकेल अशी साहसी, अनोखी आहे. पुस्तकाची गंमत कळायला पुस्तकातूनच पुस्तकाची गोष्ट सांगितली! कुणी? तर ऑलिव्हर जेफर्स या प्रसिद्ध चित्रलेखकाने. हा आपला खास मित्र केवळ पुस्तकेच नाही तर चित्रकला, कोलाज आणि शिल्पकलेमध्ये काम करणारा दृश्यकलाकार आहे. इतका मोठा चित्रकार असूनही पुस्तकात खूपच साधी चित्र काढतो.. तू वहीच्या मागच्या पानावर काढतो ना तशी; फक्त पेन्सिलने सहज डुडल केल्यासारखं.. रंगकामही नीट नाही, रंग लावताना चक्क बाहेरही लागतात. आळशीपणा इतका की प्रत्येक भागात रंग द्यायला कंटाळा करतो आणि त्यात भरीस भर म्हणून हे अक्षर बघा. अलमोस्ट कोंबडीचे पाय..

पुस्तकात तेही पेन्सिलने लिहिलंय. हा पुस्तकात चित्राला, अक्षराला फार महत्त्व का देत नसावा? विचारावं लागेल. ऑलिव्हरच्या सर्वच पुस्तकांत कुठल्याही चित्रपात्रापेक्षा फॉन्टपेक्षा मानवी मनातील भावना या हिरो असतात. तो वाचणाऱ्यापर्यंत नीट पोहचावा त्यासाठी कागदावर मोकळय़ा-रिकाम्या जागा राखून ठेवतो का? मुलांना म्हणजे फक्त बाळबोध विनोदीच द्यावं, गुंतागुंतीच्या भावना केवळ मोठय़ांसाठी ठेवाव्यात, असं त्याला वाटत नसावं. त्यामुळे त्याची पुस्तकं छोटय़ांना सहज कळली तरी मोठय़ांना समजायला खूपदा पाहावी लागतात. छोटय़ा छोटय़ा संकल्पना मांडणारी ही चित्रपुस्तके आजवर पन्नासपेक्षा जास्त भाषांमध्ये अनुवादित केली गेली आहेत आणि जगभरात १४ दशलक्ष प्रती विकल्या गेल्या आहेत.

मागे आपण पाहिलं की तुमच्यासाठीची चित्रपुस्तकं बनवताना लेखक, चित्रकार, संपादक, डिझायनर, अनुवादक, शिक्षण सल्लागार लागतात. तसेच आता आणखी एक भर म्हणजे या पुस्तकासाठी सॅम विंटसन हा आणखी एक अक्षरांचा चित्रकार (टायपोग्राफर) सहभागी आहे. आणि हा सहभागच या पुस्तकाचं मुख्य आकर्षण आहे. इथं अक्षरं बिंदू म्हणून येतात. अक्षरांचे शब्द रेषा बनून जातात. त्या रेषेचे अक्षरआकार बनतात. अक्षर एकमेकांवर येऊन गर्दी करत गडद बनतात तर लांब लांब जाऊन पुसट होतात. अशा आकाराला चित्रातले दुसरे आकार भिडतात. त्यातून जी मजा तयार होते ते म्हणजे हे पुस्तक. कधी समुद्र, कधी लाटा, कधी वारा, मोठा राक्षस ते छोटी रश्शी, अक्षरांचं असं काहीही बनतं. एका ठिकाणी तर पाच-सहा पुस्तकांना उभं धरून झाडाच्या खोडासारखा वापर केलाय. इथं फोटोग्राफर मदतीला आला असणार. हे फोटो डिजिटल कागदावर आणून त्याच्या बाजूला पेन्सिलने काढलेली चित्रं ठेवली असणार. असं कोलाज असणारी चित्रगंमत कथेनुसार पाहिलं की या कल्पनेमागचं कारणही कळतं. या सर्वच बाबतीत उत्तम डिझाइन झालेलं हे पुस्तक प्रत्यक्ष पाहण्यात मजा आहे. सॅमने चित्रासाठी जशी अक्षरं वापरली तसं आपण काय वापरू शकतो? डाळ, तांदूळ, शंखिशपले, साठवलेली नाणी, बोटांचे ठसे, टाचण्या. कागदावर एकासमोर एक दाणा चिटकवत रेषा आणि आकार दोन्ही बनेल. ऑलिव्हरसारखी सहज पेन्सिल रेषांची जोड देता येईल. त्या आकाराच्या बाजूला इतर चित्रं येतील. यासारखं कुठल्याही दोन मित्रांनी मिळून एक पुस्तक करायला काय हरकत आहे?

shriba29@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Potlibaba author shrinivas balkrishna the story of the book in the story ysh
First published on: 20-02-2022 at 00:02 IST