आचार्य अत्रे यांची १३ जून या दिवशी पन्नासावी पुण्यतिथी होती, तर १२ जून ही पुलंची पुण्यतिथी! त्यातून हे पुलंचे जन्मशताब्दी वर्ष! त्यानिमित्ताने.. पुलंनी अत्र्यांच्या गौरवार्थ केलेल्या एका भाषणातील काही विधानांवर आक्षेप घेण्यात आल्यावर पुलंनी त्यास दिलेले रोखठोक उत्तर! कुठल्या गोष्टींसाठी एखाद्या व्यक्तीला मोठे मानावे, हे कळायला आणि ते दुसऱ्यांना समजावून सांगायला एक वेगळीच दृष्टी लागते. तिचा वानवळा देणारे पु. ल. देशपांडे यांचे ते मार्मिक उत्तर..

प्रचंड कर्तृत्ववान, तरीही सतत वाद ओढवून घेणाऱ्या एखाद्या व्यक्तीचं मूल्यमापन कोणत्या निकषांवर करायचं असा प्रश्न स्वाभाविकपणेच कुणालाही पडेल. त्यातही आचार्य अत्रे यांच्यासारख्या विविध क्षेत्रांत उत्तुंग कर्तृत्व गाजवणाऱ्या सर्वसंचारी व्यक्तिमत्त्वाचं मूल्यांकन करणं ही तर अतिशयच अवघड गोष्ट. आचार्य अत्रे यांच्या ‘श्यामची आई’ चित्रपटास मिळालेल्या राष्ट्रपती पुरस्काराच्या कौतुक सोहोळ्यात पु. ल. देशपांडे यांनी अत्र्यांबद्दल केलेलं गुणगौरवपर भाषण काहींना अतिशयोक्त वाटलं. त्यावर आक्षेप घेतले गेले. त्या आक्षेपांना उत्तर देताना पु. लं.नी एखाद्या गुणदोषयुक्त महानुभावाचं कशा तऱ्हेनं मूल्यमापन करावं याचे जे तार्किक विवेचन केले आहे, ते निश्चितच विचार करण्यासारखं आहे. अशा व्यक्तिमत्त्वाच्या गुणदोषांची पूर्ण कल्पना असूनही त्याकडे क्षणिक दुर्लक्ष करून त्यांच्यातील गुणांचा गौरव करण्यात काहीएक चूक नाही हे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केलं आहे..

डिसेंबर १९५४ मध्ये आचार्य अत्रे यांना ‘श्यामची आई’ चित्रपटासाठी राष्ट्रपती सुवर्णपदक मिळाल्याच्या निमित्ताने त्यांचा भव्य सत्कार झाला. त्यावेळी पुलंच्या झालेल्या भाषणाचा वृत्तान्त ‘नवयुग’मध्ये छापून आला. तो वाचून काही ज्येष्ठ व्यक्तींनी पुलंवर टीका करणारे एक खरमरीत पत्र लिहिले :

‘अत्र्यांना प्रत्येक क्षेत्रात मी गुरुस्थानी मानीत आलो आहे..’ अर्थात तुला लेखक म्हणून अत्रे गुरुस्थानी वाटतात हे तुझं म्हणणं मान्य केलं तरी ‘त्यांचा आदर्श मी पुढे ठेवलेला आहे,’ हे तुझ्याच तोंडचे शब्द आहेत का? मला तो मजकूर वाचून धक्काच बसला. लेखक म्हणून त्यांना आदर्श मानण्याइतका तू स्वत: लहान नाहीस.

‘अत्र्यांनी महाराष्ट्राला खणखणीत बोलायला आणि सडेतोड लिहायला शिकवलं..’ हे किती अतिशयोक्त विधान आहे! एखाद्याचा गौरव करायचा जुलूम आपण कशाला पत्करावा, हा मलाच प्रश्न आहे!’ इत्यादी..

या टीकेला १७- १२- ५४ रोजी पुलंनी दिलेलं पत्रोत्तर..

‘तुमचे पत्र मिळाले. लगेच उत्तर लिहीत आहे. वास्तविक माझ्यामागे कामाचा बोजा इतका आहे, की अर्धवट रिपोर्टिगमुळे झालेल्या गैरसमजाच्या निराकरणाचे काम सावकाशीने केले तरी चालले असते. परंतु त्यात गैरसमज मिसळलेला. तेव्हा हा जो insincerity चा भाग त्यांना वाटला त्याचा खुलासा करतो.

हा रिपोर्ट एका शाळकरी पोराने लिहिला आहे. त्यातील काही वाक्ये संदर्भाला सोडून आहेत. उदा. : अत्र्यांना मी गुरुस्थानी मानतो.. हेच वाक्य घ्या. मुद्दा असा : अत्र्यांचा पटकथालेखक म्हणून गौरव. माझे वाक्य : ‘‘वास्तविक मी गौरव केल्यामुळे अत्र्यांना बरे वाटावे असा काही मी कोणी मोठा नाही. उलट, विनोदी पटकथा लिहिताना त्यांच्या ‘ब्रह्मचारी’च्या पटकथेचा आदर्श मी डोळ्यापुढे ठेवलेला. अशा परिस्थितीत त्यांना मी शाबासकी देणे म्हणजे गुरूला शिष्याने शाबासकी देण्यासारखे आहे. तीच गत विनोदी लिखाणाची. अत्र्यांच्या पद्य विडंबनावरून मला गद्य विडंबने स्फुरली. आणि त्यांच्यातील जाज्ज्वल्य रसिकतेचा आदर्श कोणीही ठेवावा असा आहे. उदाहरणार्थ.. परवा कुमार (गंधर्व) मुंबईला आला असताना अत्रे शूटिंग थांबवून त्याच्यामागे लागले. ‘जे रम्य बघुनिया मज वेड लागे’ अशा भावनेने जगात वागणारा हा गृहस्थ आहे. मग ते ‘रम्य’ त्यांना कुमारमध्ये आढळेल, बहिणाईत आढळेल, लक्ष्मीबाई टिळकांच्यात आढळेल, अगर विनोबांच्यात आढळेल.. अत्रे त्या वेळी वेडे होतात. आणि जे त्या वेळी त्यांच्या मनात अगदी वर उचंबळून येते ते बोलतात. म्हणूनच त्यांच्या आयुष्यात पुष्कळदा inconsistency आढळते. माटय़ांना शिव्या देणारे अत्रे माटय़ांचा ‘शैलीकार माटे’ म्हणून गौरव करतात. यात contradiction असेल; परंतु अप्रामाणिकपणा नाही. ‘हे’ अत्रे मला प्रिय आहेत. आता अत्रे मनाला भिडून गेलेली गोष्ट ताडकन् बोलून टाकतात. त्यावरून मी वामनरावांचा दृष्टान्त दिला. माझे वाक्य : ‘संयमशील विचार करायला महाराष्ट्राला वामनरावांनी शिकवले असे म्हणतात. तसे असल्यास मनात येईल ते उघड बोलून दाखवायला अत्र्यांनी शिकवले म्हणायला हरकत नाही.’ (या वाक्यात ‘गौरव’ आहे. गौरवात रंग किंचित भडक असतो.)

आपण त्यातूनही ज्या काही चांगल्या गोष्टी असतात त्यावरच अशा प्रसंगी भर देतो. मला असं वाटतं की, अत्र्यांचं मराठी ‘खास’ आहे.  ‘अत्र्यांना प्रत्येक बाबतीत मी गुरुस्थानी मानत आलो’  हे वाक्य फक्त त्यांच्या पटकथा अगर विनोदी विडंबने या उदाहरणांशिवाय रिपोर्टात आल्यामुळे घोटाळा झाला.

तुम्ही व्याख्यानाला असायला पाहिजे होता. मी अत्यंत balanced बोललो. माझा मुख्य मुद्दा democracy मध्ये हा माणूस निराळ्या पक्षाचा असूनही त्याला राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल सरकारचे अभिनंदन’ हा होता. दुसरा- अत्रे उत्तम मास्तर असल्याबद्दल होता. त्यामुळे- पैशाची परिस्थिती वाईट असूनही box office च्या दृष्टीने चुकीचे, परंतु लोकांना काही सांगता येईल असे विषय निवडण्याचे त्यांनी केलेले धाडस हा मुद्दा इथे होता. यात मी काय चुकलो? ‘श्यामची आई’ अगर ‘फुले’ हे विषय धंदेवाल्यांनी हातात धरले नसते. ‘फुलें’मधले संवाद मी वाचले. अप्रतिम आहेत. सेन्सॉरने ऑब्जेक्शन घेतले आहे, खिशात दिडकी नाही, श्रीमंत माळी समाजाने पैसे देऊ करून पैही दिली नाही, अशा अवस्थेत ‘करीन तर जोतिबांचेच चित्र करीन’ हा अत्र्यांचा निर्धार (मी त्या धंद्यात काही दिवस काढले आहेत. त्यामुळे) मी कच्चा मानीत नाही.

दुसरी गोष्ट.. अत्र्यांचा गौरव करायचा मला जुलूम वाटला नाही. मला त्यांच्याकडून अगर कोणाकडूनही आर्थिक वा अन्य अभ्युदयाची इच्छा नाही. अशा वेळी मला झालेला आनंद व्यक्त करायला मला मुळीच कमीपणा वाटायचे अगर कोणी काही म्हणेल याची भीती वाटायचे कारण नव्हते. धंद्यात असतो तर वशिलेबाजी झाली असती. एका मराठी चित्रपटाला बक्षीस मिळाल्यामुळे मराठी म्हणून कोणाही मराठय़ाला अभिमान वाटावा. बरे, ‘श्यामची आई’ हे पुस्तक आणि साने गुरुजी हे दोन्हीही माझे आवडते. तेव्हा हा आनंद आणि गौरव अगदी प्रामाणिक होता. मी कौतुक केले ते- तो विषय निवडला याबद्दल. तंत्र execution बद्दल मी एक अक्षर बोललो नाही. मी ‘श्यामच्या आई’ची पटकथा निराळी लिहिली असती. त्यामुळे मला अत्र्यांचे दिग्दर्शन अगर पटकथा असामान्य वाटली नाही. मला असामान्य वाटले ते हल्लीच्या नाचगाण्याच्या जमान्यात त्यांनी असला विषय घेण्याचे केलेले धैर्य! यालाही ताकद लागते. पाल्र्याला त्यांना फक्त ५१ रुपये भेट म्हणून दिले गेले, ही गोष्टदेखील लाखो रुपये दिल्यासारखी त्यांनी सर्वाना सांगितली. कारण इतर ठिकाणी नुसते हार पडले. आणि हे एकावन्न रुपये मिळाले म्हणून मुलीची फी भरण्याची चिंता मिटली, हे त्यांनी स्वत: मला सांगितले. अशा परिस्थितीत पुन्हा ‘फुले’ काढण्याचे धैर्य आहेच. बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडिकेटकडून पैसे मिळण्याची संधी धुडकावून त्यांची पापे बाहेर काढण्याचे काम चालू आहेच. मला अत्र्यांचेच काय, अनेकांचे अनेक drawbacks आहेत. परंतु चांगल्या बाजूचाच विचार गौरव समारंभात मी केला, हे मी अगदी योग्य केले असे मला वाटते. मी जे बोललो त्यातील एकही अक्षर खोटे नाही. I am not prepared to budge an inch from this stand I have taken.

शेवटी propriety म्हणून काही आहेच की नाही? अत्र्यांचे अवगुण मला समजा ठाऊक आहेत, म्हणून त्यांच्या आणि महाराष्ट्रीयांच्या आयुष्यातल्या अभिमानाच्या प्रसंगी त्यांचे तितकेच प्रकर्षांने आढळणारे गुण सांगायचे नाहीत, हा काय दिवाभीतपणा?

अशा गुणांचा उपयोग समाजाला होईल, त्यावर भर देऊन बोलणे अगर तेवढाच भाग चांगला मानणे, हे insincere आहे का?

माझा stand मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे. आता रात्रीचे दोन वाजले आहेत. मी संध्याकाळी काठेवाडी folk कार्यक्रम वेळात वेळ काढून पाहून १२ ला आलो आणि उत्तर लिहीत बसलो. उद्या पाचला उठून साडेसातला कॉलेजमध्ये हजर व्हायचे आहे. तेव्हा थांबतो.

– भाई