‘लोकरंग’मधील (१८ जुलै)‘संभाषण आणि सुसंवाद’ हा डॉ. संजय ओक यांचा एका वेगळ्याच विषयाला हात घालणारा लेख  वाचला. वैद्यकीय व्यवसायात सुसंवादाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे या लेखाचे प्रयोजन होय. साध्या अथवा दुर्धर आजारांत डॉक्टरांच्या भावनिक आधाराने आणि सहृदय संभाषणाने रुग्ण अर्धाअधिक बरा होतो हा सर्वाचाच अनुभव आहे. वैद्यकीय व्यवसाय अथवा इतर कोणताही व्यवसाय असो; सुसंवाद हे त्यातील यशाचे गमक ठरते.

मला रुईया महाविद्यालयाचे तत्कालीन गुरुतुल्य प्राध्यापक कविवर्य वसंत बापट यांची मराठी आणि प्रा. महाशब्दे यांची संस्कृत विषयाची ओघवती संभाषणयुक्त लेक्चर्स आठवतात. त्यावेळच्या त्या ज्ञानपर्वणीचा आजही विसर पडलेला नाही. त्याकाळी इतर लेक्चर्सना दांडी मारणारे विद्यार्थीही या दोघांच्या लेक्चरला मात्र आवर्जून हजेरी लावायचे, ही गोष्ट बरेच काही सांगून जाते. कॉर्पोरेट जगतात वरिष्ठांपासून ते अगदी कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत सुसंवाद हे उद्योगाच्या भरभराटीचे द्योतक मानले जाते. साहित्य आणि वक्तृत्वाविष्कारात प्रा. शिवाजीराव भोसले आणि पु. ल. देशपांडे यांची प्रवाही भाषणे ही संभाषण कौशल्याची मापदंड मानली जातात. एवढेच कशाला, पती-पत्नीच्या नात्यात सुसंवादानेच संसार बहरतो याबद्दल कुणाचेच दुमत नसावे. डॉ. ओक यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमात संभाषण कौश्यल्याचे पाठ नसल्याची जी खंत व्यक्त केली आहे ती यथायोग्यच वाटते. खरं तर सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांत संभाषण कौशल्य हा विषय ब्रिज कोर्सच्या स्वरूपात असायला हवा. याचे कारण कोणत्याही व्यवसायात हाडामांसाच्या जिवंत माणसांबरोबरच व्यवहार होत असतात; निर्जीव वस्तूंबरोबर नव्हे. उद्योगधंद्यांच्या भरभराटीसाठी संभाषण कौशल्याबरोबरच परस्परसंबंध, नेतृत्व अशा इतरही सोशल स्किल्स आत्मसात करण्याशिवाय तरणोपाय नाही हे प्रकर्षांने जाणवते. तेव्हा आपल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांत संभाषण कौशल्य हा विषय अंतर्भूत करण्याचा विचार शिक्षण क्षेत्रातील मंडळींनी निश्चितपणे करायला हवा.

– अरविंद बेलवलकर, अंधेरी, मुंबई</strong>

वैचारिक लेखांनी परिपूर्ण

‘लोकरंग’ पुरवणीतील विविध विषयांवरील  लेख त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी लिहिलेले असतात. ते वाचताना देशहिताचा विचार त्यांतून स्पष्टपणे दिसतो. सद्य:स्थितीत करोनाने जगभरात हाहाकार माजवलेला असताना देशात अनेक  प्रश्न निर्माण झालेले आहेत . त्यावर व्यावहारिक व देशातील परिस्थितीची जाणीव ठेवून लिखाण केलेले जाणवते. त्याबद्दल अनेक धन्यवाद! युवापिढीवर व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, सोशल मीडियाचा मोठा प्रभाव असून त्यावरील पोस्टस् या कोणाची तरी बाजू घेऊन लिहिलेल्या असतात. त्यामुळे विषयाच्या विविध बाजू समजून घेण्यासाठी चांगले वृत्तपत्र वाचणे अत्यावश्यक ठरते.

– प्रफुल्लचंद्र काळे, सातपूर, नाशिक