अतुल देऊळगावकर यांनी (‘लोकरंग’- २ ऑगस्ट) पावसाच्या अचूक अंदाजाअभावी (म्हणजे एकूणच भारतीय हवामान खाते वर्तवीत असलेल्या तकलादू अंदाजाविषयी) भारतीय शेतकऱ्यांची जी परवड होत आहे, त्याविषयी ज्या पोटतिडकीने लिहिलं आहे ते एका महत्त्वाच्या, पण दुर्लक्षित विषयाला वाचा फोडणारं आहे यात शंकाच नाही.
जगदीश शुक्ला यांचं ‘हवामानाचं स्वरूप कोलाहलीय असलं तरी अनुमानक्षमता वाढवणं शक्य आहे, हे आम्ही दाखवून दिलं आहे,’ हे विधान त्यांच्या संशोधनाचं फलित आहे, हे खरंच. ‘गेल्या २० वर्षांत जगभरातील हवामान संशोधनात कमालीची सुधारणा झाली आहे. त्याचा मागमूसही भारतात जाणवत नाही,’ हे लेखकाचं निरीक्षण त्यांच्या अभ्यासातून आलं आहे, हेही तेवढंच खरं! पण सामान्य माणसाच्या बुद्धीला हवामान अंदाज अचूकपणे वर्तविला जाण्याच्या शक्यतेविषयी एक शंका येत असते. ती ही, की विश्वाच्या अनंत पसाऱ्यात टीचभरसुद्धा आकार नसलेल्या पृथ्वीच्या वातावरणावर कुठून कुठून, कसे कसे आणि कशा-कशाचे परिणाम होत असतील, याचे तंतोतंत अंदाज वर्तवणं मानवाच्या मर्यादित साधनसामग्रीला शक्य आहे का? तसं असतं तर पृथ्वीच्या पाठीवरील अनेक देशांत वादळं, भूकंप, ज्वालामुखी, पूर, ढगफुटी वगैरे ज्या नैसर्गिक आपत्ती ओढवत असतात, त्याचं प्रत्येक वेळी पूर्वानुमान करून संभाव्य जीवितहानी, वित्तहानी टाळता येणं शक्य नाही का?
लेखक म्हणतो की, सिंगापूर, जपान, युरोप, अमेरिकेत पावसाची अंदाजलेली वेळ पाहून छत्री सोबत घेतली जाते. तापमान किती असेल व वाऱ्याच्या वेगामुळे ते किती भासेल, हे ऐकून त्यादृष्टीने तयारी केली जाते. सामान्य परिस्थितीत एका मर्यादेपर्यंत हे ठीकच. परंतु प्रत्येक वेळी वा नेहमीच त्यांचे अंदाज तंतोतंत खरे ठरतात असे नाही. बहुतेक वेळा ‘उडाला तर कावळा..’ अशीच परिस्थिती तिथेही असावी. ‘हवामानाच्या अंदाजाचं वर्तमान’ हा विषय एवढा जुना आहे की, जेरॉम के. जेरॉम नावाचा इंग्रज लेखक आपल्या ‘थ्री इन ए बोट’ या विनोदी पुस्तकात त्याच्या वेळच्या लंडनमधील हवामान वेधशाळा वर्तवीत असलेल्या ‘अचूक’ अंदाजाविषयी उपरोधिकपणे लिहितो- ‘‘क do think that, of all the silly, irritating tomfoolishness by which we are plagued, this ‘weather forecast’ fraud is about the most aggravating. It ‘forecasts’ precisely what happened yesterday or the day before, and precisely the opposite of what is going to happen today.ll
– प्रफुल्ल पाटील, डोंबिवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व पडसाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers reaction on lokrang articles
First published on: 23-08-2015 at 01:01 IST