‘लोकरंग’ पुरवणीत (१६ ऑक्टोबर) ‘वाचू आनंदे.. नवे नवे’ याअंतर्गत प्रसिद्ध झालेल्या संकलनामुळे वाचनालयांना या यादीतील कोणती पुस्तके आपल्याकडे नाहीत ते कळेल आणि त्यांची खरेदी करण्याची घाई केली जाईल. वाचक या पुस्तकांचा आपापल्या वाचनालयात शोध घेतील आणि त्यासाठी मागणी नोंदवतील. काही उत्साही मंडळी यातील पुस्तके खरेदी करण्याचा निदान विचार तरी करतील अशी आशा इतर कोणी नाही, तरी प्रकाशकांनी बाळगायला हरकत नाही. गुगलवर शोध घेऊन या पुस्तकांवर आलेले लेख वाचून काही जण आपण ती वाचली असल्याचे दाखवण्याची चतुराईदेखील दाखवतील. आता यापैकी काय काय होते याचा नेमका वेध घेणे अवघड आहे, हे कबूल करायलाच हवे. पण एक गोष्ट निश्चित, की इतर सर्व विषयांप्रमाणे काही काळाने वाचन संस्कृतीबाबतची बोंब पुन्हा आसमंतात ऐकू येईल, हे मात्र नक्की!- गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर (पश्चिम)
वाचनप्रेमींसाठी दालन खुले
‘वाचू आनंदे.. नवे नवे’अंतर्गत अनेक मान्यवरांनी वाचलेल्या पाच नव्या पुस्तकांची यादी सादर करून आम्हा वाचनप्रेमींसाठी ‘लोकरंग’ने एक दालनच खुले केले आहे. सध्याची तरुण पिढी मोबाईलमध्ये एवढी गुरफटून गेली आहे की घरात रोज येणारे वर्तमानपत्र ती उघडूनही बघत नाही. एक मात्र खरे की, अजूनही नव्या लेखकांकडून नवे नवे साहित्य निर्माण होत आहे ही दिलासा देणारी बाब आहे. कारण वाचन संस्कृतीचे जतन होणे सामाजिक सुधारणांसाठी, सुसंस्कृत नागरिक तयार होण्यासाठी आवश्यक आहे. खरं पाहता शाळा-कॉलेजांनी याकरता पुढाकार घ्यायला हवा. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून विविध उपक्रम राबविले पाहिजेत. आणि त्यांनी हे ठरवले तर त्यांना सहज शक्यही आहे. – प्रमोद कुंदाजी कडू, नवीन पनवेल</strong>
उपयुक्त यादी
‘वाचू आनंदे.. नवे नवे’ अंतर्गत मान्यवर वाचकांनी आपल्या आवडत्या पहिल्या पाच पुस्तकांची यादी दिली आहे. ती सर्वच वाचकांना उपयोगी पडणारी आहे. अनेक नव्या पुस्तकांचा उल्लेख त्यात आहे. तसेच विषयांची विविधताही त्यातून लक्षात येते. – सुहास रघुनाथ पंडित, सांगली</strong>
य. गो. जोशींचे प्रेरक साहित्यविश्व
‘एका जोडप्याची सत्वकहाणी’ (लोकरंग, १६ ऑक्टोबर) हा प्रा. विजय तापस यांनी य. गो. जोशी या जुन्या पिढीतील प्रसिद्ध लेखकाने लिहिलेल्या ‘संगीत भोळा शंकर’ या नाटकाचा परिचय आवडला. य. गो. जोशी यांनी सत्वशील, सात्विक स्वरूपाचे लिखाण केले. त्यांच्या पुस्तकांत सद्भावना, माणुसकीची जोपासना, कुटुंबातील सामंजस्य यांचे मनाला प्रसन्न करणारे चित्रण असे. ‘श्रीशिवलीलामृत’ ग्रंथातील चिलया बाळाची कहाणी या नाटकात आहे. आजच्या आधुनिक काळातही त्यांचे साहित्य वाचताना मन भावुक होते. त्याकाळी तर ही पुस्तके वाचकांना आवडली होतीच. त्यावर चित्रपट निघाले व तेही गाजले. कौटुंबिक विश्वात व एकंदर जगातही चांगल्या भावना, चांगली वैचारिकता वाढावी अशा प्रकारचे लिखाण आजदेखील आवश्यक आहे. आताच्या तंत्रज्ञानाच्या व माणुसकी हरवण्याच्या काळात त्यांनी लिहिलेली पुस्तके मनाला शांती व वेगळा आनंद देतात. आता पूर्वीचा काळ व वातावरण परत येणे शक्य नाही, पण त्या काळातील साहित्यविश्वात तरी सुखद फेरफटका या वाचनाने शक्य होतो. – प्रफुल्लचंद्र काळे, नाशिक
नवीन संग्रहालयांना आधुनिकतेचा रंग हवा
‘लोकरंग’ पुरवणीत (२ ऑक्टोबर) डॉ. तेजस गर्गे यांचा ‘राज्य वस्तुसंग्रहालय : काळाची गरज’ हा लेख वाचला. तसे बघता मध्य प्रदेशच्या जंगलात चित्ते सोडून किंवा जागतिक विक्रम मोडणारे पुतळे उभारूनही कोणतीच कमतरता भरून निघालेली नाही. सांस्कृतिक ठेवा जतन करावा लागतो- भविष्यातील पिढीला आपल्या उगमाची ओळख करून देण्यासाठी! हा ठेवा कुठेतरी पडीक जागेत काळाआड जाऊन नष्ट होण्यापेक्षा संचयित केलेला बरा. स्वत:ची लाखमोलाची कला वा संग्रह लोकसेवेसाठी दान देणाऱ्या मोठय़ा मनाच्या लोकांचे बाकी विशेष वाटते. लोककल्याणासाठी स्वत:चे आयुष्य वेचणाऱ्या अशा लोकांच्या आठवणी व विचार संग्रहालयात जतन करून ठेवणे हे त्यांना मानवंदना देण्यासारखेच आहे. इतिहासाचे कितीही कौतुक केले तरी आधुनिकतेची कास सोडता येत नाही. म्हणून या नवीन संग्रहालयांना थोडा आधुनिकतेचाही रंग असावा Virtual tour, online streaming, digital articles इत्यादीने जास्तीत जास्त जनसमुदाय त्याकडे कसा आकर्षिला जाईल याकडे लक्ष दिले पाहिजे. – अमित पाटील, ठाणे</strong>