‘लोकरंग’मधील (१८ जुलै)‘संभाषण आणि सुसंवाद’ हा डॉ. संजय ओक यांचा एका वेगळ्याच विषयाला हात घालणारा लेख  वाचला. वैद्यकीय व्यवसायात सुसंवादाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे या लेखाचे प्रयोजन होय. साध्या अथवा दुर्धर आजारांत डॉक्टरांच्या भावनिक आधाराने आणि सहृदय संभाषणाने रुग्ण अर्धाअधिक बरा होतो हा सर्वांचाच अनुभव आहे. वैद्यकीय व्यवसाय अथवा इतर कोणताही व्यवसाय असो; सुसंवाद हे त्यातील यशाचे गमक ठरते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मला रुईया महाविद्यालयाचे तत्कालीन गुरुतुल्य प्राध्यापक कविवर्य वसंत बापट यांची मराठी आणि प्रा. महाशब्दे यांची संस्कृत विषयाची ओघवती संभाषणयुक्त लेक्चर्स आठवतात. त्यावेळच्या त्या ज्ञानपर्वणीचा आजही विसर पडलेला नाही. त्याकाळी इतर लेक्चर्सना दांडी मारणारे विद्यार्थीही या दोघांच्या लेक्चरला मात्र आवर्जून हजेरी लावायचे, ही गोष्ट बरेच काही सांगून जाते. कॉर्पोरेट जगतात वरिष्ठांपासून ते अगदी कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत सुसंवाद हे उद्योगाच्या भरभराटीचे द्योतक मानले जाते. साहित्य आणि वक्तृत्वाविष्कारात प्रा. शिवाजीराव भोसले आणि पु. ल. देशपांडे यांची प्रवाही भाषणे ही संभाषण कौशल्याची मापदंड मानली जातात. एवढेच कशाला, पती-पत्नीच्या नात्यात सुसंवादानेच संसार बहरतो याबद्दल कुणाचेच दुमत नसावे. डॉ. ओक यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमात संभाषण कौश्यल्याचे पाठ नसल्याची जी खंत व्यक्त केली आहे ती यथायोग्यच वाटते. खरं तर सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांत संभाषण कौशल्य हा विषय ब्रिज कोर्सच्या स्वरूपात असायला हवा. याचे कारण कोणत्याही व्यवसायात हाडामांसाच्या जिवंत माणसांबरोबरच व्यवहार होत असतात; निर्जीव वस्तूंबरोबर नव्हे. उद्योगधंद्यांच्या भरभराटीसाठी संभाषण कौशल्याबरोबरच परस्परसंबंध, नेतृत्व अशा इतरही सोशल स्किल्स आत्मसात करण्याशिवाय तरणोपाय नाही हे प्रकर्षाने जाणवते. तेव्हा आपल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांत संभाषण कौशल्य हा विषय अंतर्भूत करण्याचा विचार शिक्षण क्षेत्रातील मंडळींनी निश्चितपणे करायला हवा. – अरविंद बेलवलकर, अंधेरी, मुंबई</strong>

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Repercussions poll opinion reader akp
First published on: 22-08-2021 at 00:02 IST