पाश्चात्य संगीत आवडणारे आणि त्यांचा अभ्यास असणारे संगीतरसिक आपल्याकडे तसे अल्पसंख्यच. म्हणूनच पाश्चात्य संगीतप्रकार व त्यांचे कर्तधर्ते यांचा रसीला परिचय करून देणारे हे पाक्षिक सदर..
रॉक हे अवघड बाण्याचं गाणं आहे! आज एम.टी.व्ही. पासून अनेक चॅनल्सवर रॉक बँड्सचं गाणं वाजत असतं. लोकलमध्ये उभी असणारी कॉलेजमधील पोरं स्वत:च्याच नादात कानाला हेडफोन डकवून ‘मेटल रॉक’ ऐकत असतात. कॉलेजच्या गॅदरिंगसाठी दुसऱ्या कशापेक्षाही रॉक बँडला मागणी असते. ‘रॉक ऑन’ आणि ‘रॉकस्टार’ हे चित्रपट तर आपल्यापैकी बऱ्याचजणांनी बघितलेले असतात. किमानपक्षी त्यातली गाणी पाहिली-ऐकलेली असतात. पण म्हणून रॉक आपल्याला कळलं आहे, आपलंसं झालेलं आहे असं नाही. ते अगदी वेगळंच प्रकरण आहे. मुळात रॉक हे फक्त गाणं नव्हेच; ती एक संस्कृतीही आहे. पांढरपेशा जगण्याहून पुष्कळच दूरस्थ असलेली. तुम्ही कधी मोठय़ा रॉक कॉन्सर्टला गेला आहात? तिथे आपण प्रवेश करतो त्याक्षणीच अंगात वीज संचारते. व्यासपीठावर कड्कड् वाजणारी ती गतिमान इलेक्ट्रिक गिटार, अंगाचा थरकाप होईल इतक्या ठाशीवपणे वाजणारे ते ड्रम्स, जोरकसपणे गाणारे, कधी किंचाळणारे ते गायक, मधेच चित्कारणारा तो श्रोतृगण, रक्ताची सडे सांडणारी ती रॉकगीतांची शिवराळ भाषा, प्रेक्षकांमध्ये देशानुरूप कधी चोरून, तर कधी खुलेपणानं चाललेलं अमली पदार्थाचं सेवन, जल्लोष आणि किंकाळ्या, कानठळ्या बसवणारा आवाज.. आणि या साऱ्या गोंगाटापलीकडेही माणसाला पुन्हा एकदा तरुण करून सोडण्याची रॉकसंगीताची ती अमोघ शक्ती!
पण म्हणूनच रॉकचा आनंद घ्यायचा तर आपल्याला आपल्या धारणाच बदलाव्या लागतात. आपणा भारतीयांच्या लेखी संगीत हे श्रवणसुख देणारं असतं. तसं ते असावं अशी आपली अपेक्षा असते. रॉक हे सुरुवातीला ऐकताना या साच्यात बसत नाही. आपल्यात आणि रॉकमध्ये एक अदृश्य अडसर राहतोच. तो अडसर काही फक्त मध्यमवयीन लोकांनाच जाणवतो असं नाही. माझा एक विशीतला मित्र आहे. तो चांगलं शास्त्रीय संगीत गातो आणि खुलेपणानं बाकीचे संगीतप्रकारही चवीनं ऐकतो. रॉकविषयी बोलताना मात्र तो म्हणाला, ‘‘..पण आशुदादा, रॉक हे कानाला केवढा त्रास देतं रे! बहुधा आमच्यातले बरेच ते पीअर प्रेशरमुळेच ऐकतात.’’ तेव्हा उत्स्फूर्तपणे मी म्हटलं,  ”Rock is not there to please you!” आणि खरोखरच रॉक हे इतकं तप्त गाणं आहे, की ते तुम्हाला दिलासा देत नाही, विसावा देत नाही. ते सुखावत नाही तुम्हाला. पण ते तुम्हाला हलवतं, जागं करतं. तुमच्या खोटय़ा झुली ते ओढून फेकतं. नग्न सत्यासारखं ते तुम्हाला तुमच्या पुढय़ात उभं करतं!
हो, मी उगाच तुम्हाला कधीतरी येता-जाता रॉक ऐकून बघा असं म्हणणार नाही. ते फार गोड गाणं आहे असं तर मुळीच म्हणणार नाही. रॉक आहे ठणठणाटाचं शक्तिशाली गाणं. रॉक आहे खास मर्दानी, रगेल गाणं. रॉक आहेच मुळी भकास आणि विषयासक्त! रॉक आहे कामुक, मादक गाणं. पण रॉक हे सजग गाणंही आहे. मात्र, ते स्टुडिओत तयार होणारं गाणं नव्हेच. प्रेक्षकांशी संवाद साधत मैफिलीत फुलणारं ते गाणं आहे. आणि अशा रॉकच्या मांडवाखाली आपण पुढचे काही आठवडे राहणार आहोत. रॉकच्या ओबडधोबड, बिनगोडव्याच्या, बिनसलोख्याच्या जगात आपल्याला जायचं आहे.
अर्थात १९५० च्या आसपास ‘रॉक अँड रोल’ या नावानं जे काही उदयाला आलं ते मात्र पुष्कळच निरागस होतं. बंडखोरीचा हलका हात त्यामागे होता.. नव्हता असं नाही. काळ्या गुलामांचे ‘ब्लूज’चे सूर त्याच्या पाठीशी होते. ‘कंट्री’ संगीताचे, गॉस्पेलचे सूर त्यात मिसळलेले होते. पण मुळात ‘रॉक अँड रोल’ होतं ते खटय़ाळ गाणं. एल्व्हीस प्रेस्ले आणि ‘रॉक अँड रोल’ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. किती देखणा होता तो! आणि काय सहज, खर्जामधला आवाज त्याच्याजवळ होता. अमेरिकेमधल्या ‘टीन’ मंडळींना तो लगोलग भावला. आजही यू-टय़ूबवर त्याचे व्हिडीओ पाहताना त्याच्या स्वप्नील डोळ्यांचं, मिश्कील चेहऱ्याचं, प्रमाणबद्ध शरीराचं आणि मर्दानी आवाजाचं गारूड फग्र्युसन किंवा रूपारेलमधल्या एखाद्या मुलीवर पडू शकतं. अवघं बेचाळीस वर्षांचं त्याचं आयुष्य; पण त्यामधलं वर्ष न् वर्ष त्यानं झळाळून टाकलं. यश त्याच्या मागे वाहत आलं. रमा त्याची दासी बनली. त्यानं अमेरिकन गाणं थोडं धीट केलं. त्याच्या गाण्यावर वडीलधाऱ्या मंडळींचा फारसा आक्षेप नसे. पण तो कमरेचे झटके ज्या सूचकतेने गाता गाता द्यायचा, ते (तेव्हाच्या) अमेरिकेसाठी भलतंच ‘बोल्ड’ होतं. बिकिनीधारक ललनेच्या मिठीतला एल्व्हीस मागे वळून अजून चार (मिठीउत्सुक?) बिकिनी-ललनांकडे पाहतो आहे.. खटय़ाळपणे- हे माझं कल्पनाचित्र नव्हे. ते त्याच्या ‘गर्ल्स गर्ल्स गर्ल्स’ संगीतिकेचं कव्हर आहे! ओहायोमधल्या डीजे अ‍ॅलन फ्रिडनं पहिल्यांदा ‘रॉक अ‍ॅंड रोल’ संज्ञा वापरली म्हणून तिथे रॉक जन्मलं असं म्हणतात. पण संगीताचा जन्म हा अशा एका कलाकाराकरवी, एका गावी, एका वेळी होत नसतो. सामाजिक अभिसरण, राजकीय परिस्थिती, अर्थकारण हे सारं त्यामागे असतं. तो काळ होता अमेरिकेच्या युद्धोत्तर सुबतेचा. ऐश्वर्यामध्ये वाढलेल्या ‘टीनेजर्स’ मंडळींचा. नव्या फॅशन्स, नवे कपडे, नव्या केशभूषा आणि मग नवं गाणं- ‘रॉक अँड रोल.’ नाचता येईल असं, सहज गाता येईल असं. ‘कॅचर इन द राय’मधला होल्डेन आणि त्याची बहीण फिबी घरी पालक नसताना तिच्या खोलीत रेकॉर्ड लावून नाचतात; ते गाणं नक्की ‘रॉक अँड रोल’ असणार!
पण काळ जरासा पुढे सरकला आणि साठीच्या आसपास अमेरिकेमधली तरुणाई अस्वस्थ झाली. वरकरणी लोकशाहीचा टेंभा मिरवणारी अमेरिका जगभर चालवत होती ती दडपशाही, हुकूमशाही. (गिरीश कुबेर यांच्या तेलाच्या त्रिस्थळी यात्रेत त्याचे उल्लेख हरघडी सापडतील.) तर अशा अमेरिकेतले संवेदनशील तरुण ‘रॉक अँड रोल’चं बोट धरून ‘रॉक’कडे वळले. लोकगीतं साध्या गोड गिटारवर गाणाऱ्या बॉब डीलननं हा-हा म्हणता इलेक्ट्रिक गिटारची साथ धरली आणि तो म्हणू लागला-
Come you masters of war
You that build all the guns…
युद्धाच्या जनकांनो, च्यायला या समोर!
तुम्हीच.. बंदुका तयार करणाऱ्यांनो
तुम्हीच.. बॉम्बगोळे बनवणाऱ्यांनो
तुम्हीच.. जे आता लपलात भिंतीआड
तुम्हीच.. जे लपला आहात खणांआड
तुम्हाला एवढंच सांगू दे मला की,
मुखवटय़ाआड आहे तुमचा चेहरा काळाभोर
युद्धाच्या जनकांनो, च्यायला या समोर!’’
ते गाणं तांत्रिकदृष्टय़ा होतं लोकसंगीत आणि रॉकच्या अधलंमधलं. पण त्यामधला त्वेष, असहायता, संताप हे आजच्या रॉकइतकं; ‘रॉकिंग’ आहे. नव्हे, त्याहून अधिक अर्थपूर्ण आहे. रॉक हे असं जळत्या निखाऱ्यासमान आहे आणि आजची पोरं शिरा आवडला तरी आईला सांगतात- ‘‘रॉकिंग!’’  त्या संज्ञेमागचं एवढं रामायण त्यांना कसं कळावं?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onसंगीतMusic
मराठीतील सर्व लयपश्चिमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rock and roll
First published on: 26-01-2014 at 01:01 IST