रेखाचित्र : अन्वर हुसेन
सुभाष अवचट Subhash.awchat@gmail.com
जरा अलीकडे, जरा पलीकडे बघितलं की जाणवतं- श्वासांच्या खिडक्या उघडझाप करत आहेत. समुद्रकिनाऱ्यावर शांत बसलो तर एकमेकांना धडका मारीत लाटा माझ्या पायाभोवती चकरा मारत परततात.. पुन्हा पुन्हा येतात. वाऱ्यानं केस सैरभैर होतात. या लाटा, तो वारा अस्वस्थ का मी? हा खेळ सदैव सुरू आहे. माझ्यात अस्वस्थतेच्या मंत्रपुष्पांजलीची ही वेळ असते. बालपणातल्या जुन्या फोटोंच्या अल्बममधली पानं उलटसुलट होत राहतात. बाभळीच्या काटय़ावर थांबलेल्या पावसाच्या थेंबासारखी असते ती. देवळाच्या कळसापाशी रंग उडालेल्या ध्वजासारखी ती दिवस-रात्र फडफडत असते. यात्रेतल्या शेंबडय़ा पोराच्या हातातल्या भिरभिऱ्यासारखी ती चुरगळलेली असते. शेवटच्या पॅसेंजर ट्रेनच्या खिडकीतून काळोखात धावणाऱ्या दृश्यांच्या सोबतीनं गावाकडं निघालेली.. अचानक काळोख्या बोगद्यात थांबते ती. तिचा भरवसा नाही. ऋतूप्रमाणे ती रंग बदलते. ती जवळ चिकटून असूनही दिसत नाही. तिला वयही नाही. मंदिर जुनं होतं, शरीर थकतं, तरीही हिचा जीर्णोद्धार होत नाही. तिचे निर्माल्यही होत नाही. अचानक पानांच्या सळसळीतून, चंद्रकिरणांच्या जाळीमधून ती अंगणात येते. तापलेल्या माळरानावर अचानक येणाऱ्या धुळीच्या वावटळीत गोल गिरक्या घेत ती क्षणात आहे-नाही होते. मी खरं सांगतो, सकाळी सकाळी मी बाल्कनीत जेव्हा उभा राहतो आणि खाली पाहतो तेव्हा एकाच दिशेने बॅकपॅक घेऊन चालणारे अनेक स्त्री-पुरुष मी पाहतो. माझ्या पाठी सारा स्टुडिओ अस्वस्थतेने भरलेला असतो. कोरे कॅनव्हास, रंग स्तब्ध वाट पाहत असतात. संध्याकाळी मी पुन्हा उभा राहतो, तेव्हाही उलट दिशेने परत जाणारी तीच बॅकपॅकमधली अनेक माणसं मी जेव्हा पाहतो तेव्हा एके दिवशी अचानक मला कळलं की त्यांच्याबरोबर त्यांच्या बॅगेत हीच अस्वस्थता गुपचूप चालत असते. बबल पेपर्समध्ये गुंडाळून प्रदर्शनासाठी निघालेल्या माझ्या पेंटिंगबरोबर हीच टेम्पोमध्ये उभी असते. आत्ताच वादळ येऊन गेलं. समोरच्या अरुणच्या टपरीवर एक झाड कोसळतं की काय? ते वाकायचं, परत उभं राहायचं. तेथेही कासावीशी झाली होती. त्या मोडक्या टपरीत मांजरीने घातलेली चार पिल्लं मी पाहिली होती. बरं झालं, ते रस्त्यावर धाडकन् पडलं. टपरीला धक्का लागला नाही. या अस्वस्थतेनं क्षणभर का होईना, वादळाने सुस्कारा सोडला असावा. मला असं का होतं? का वाटतं? मला कधी कळलं नाही. साऱ्यांना तसंच वाटत असावं असं मला वाटायचं.
नथू आमचा शेतकरी. त्याचा मुलगा तानाजी. तो माझा मित्र होता. शेतात गुरं चरायला नेली की मी त्याच्याबरोबर असे. पण त्यालाही काही कळत नसावं. आम्ही झाडांवर चढत चिंचा खायचो. दुसऱ्यांच्या शेतात ढोरं घुसवायचो. त्याचा मालक ओरडत आला की आम्ही त्याला दगडगोटे फेकून बेजार करायचो. गाई-म्हशींना नावानं हाका मारीत संध्याकाळी हाकलत गोठय़ाला आणायचो. काहीच भानगड नव्हती. सारं सुरळीत चाललं असताना आमच्या वाडय़ातली कुणी एक बाई अंगणात मी पायरीवर बसलेलो असताना माझ्या डोक्याला तेल थापीत होती. ती म्हणाली, ‘‘तू ना अस्वस्थ अश्वत्थामा आहेस. जरा शांत हो!’’ मोठा होईपर्यंत ‘अश्वत्थामा’ कोण आहे याचा मला अर्थ कळला नाही. पण आळीतल्या फाटक्या चड्डीतल्या सवंगडय़ांना मी सांगायचो, ‘ये यडय़ा, मी अश्वत्थामा आहे!’ ते ऐकल्यावर गाढवेच्या बंडय़ा चड्डी सावरीत मला म्हणायचा, ‘हो! पण मला मारू नकोस.’
मी अश्वत्थामा नावावर खूश होतो. पण बालपण सरलं. विहिरीतल्या उडय़ा, वडाच्या पारंब्यांचे झोके, करवंदं, आंबे, कीर्तनं, गारांचा पाऊस, श्रावणातली वाटली डाळ, नऊवारी साडीतल्या आमच्या घरी येणाऱ्या सवाष्णी, अबोली, तेरडे आणि पावसाने भिजलेल्या पाऊलवाटेवरचे माझे बालपणीचे दिवस टोलनाक्यावर पावती फाडून हातात ठेवावी तसे चुरगळून कधी गेले ते मला समजले नाही. पण गावातल्या धुळीच्या वाटा सोडून मी या शहरांच्या डांबरी सडकांवर चालत राहिलो- तेही जगभर! तेव्हाही मला जाणीव नव्हती, की ही अस्वस्थ सावली माझा पाठलाग करीत आहे. आणि मला त्याची काहीही हरकत नव्हती, कारण हा पाठलाग होतो आहे याचीच कल्पना नव्हती.
अनेक प्रसंगांत वयाप्रमाणे ती माझा पाठलाग करीत होती हे मला समजलंच नाही.
‘त्या पलीकडे जाऊन कोण कोणास ओळखतो?
ज्यांनी ओळखले ते सन्मित्र झाले.
हे मी म्हणत नाही. ती अस्वस्थता म्हणते.’
किती साली मला आठवत नाही. अहमदनगरला मी एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. माझे मित्र सुधाकर निसळ आणि सदाशिव अमरापूरकरांनी हा कार्यक्रम ठेवला होता. दाभोळकर नावाच्या चित्रकाराच्या गणपतीच्या चित्रांच्या प्रदर्शनाची सांगता होती. पटांगणातील या कार्यक्रमाला भरपूर गर्दी झालेली होती. सुरुवातीची भाषणं सुरू होती. माझं लक्ष स्टेजच्या कोपऱ्यापाशी उभ्या असलेल्या एका पोस्टमनकडे गेलं. तो मराठी नाटकात दिसलेला- कृश, दयनीय चेहरा, खाकी ड्रेस, टोपी, नाकावर घसरलेला जुना चष्मा असाच होता. मला वाटलं, तो माझ्याकडेच पाहतो आहे. मी इतरत्र पाहत, भाषणं ऐकत दुर्लक्ष केलं. तरीही मध्येच मला वाटे, तो माझ्याकडे पाहतो आहे. मग मला विचित्र वाटू लागलं. पोस्टमनचा माझा काय संबंध होता? तो माझ्याकडे पाहताना त्याच्या डोळ्यांतला तो भाव पाहून मी अस्वस्थ झालो. माझं भाषण संपलं. भोवती गर्दी झाली. माझा हात पकडत सुधाकर मला गाडीकडे घेऊन चालला होता. एवढय़ात माझं लक्ष पुन्हा त्या पोस्टमनकडे गेलं. मी सुधाकरला ‘दोन मिनिटं थांब’ सांगून त्या पोस्टमनकडे गेलो व म्हणालो, ‘तुमचे काही काम आहे का?’ तो अगतिकपणे थोडासा हसला आणि त्याच्या थैलीतून पिवळ्या पोस्टकार्डाचा छोटा गठ्ठा बाहेर काढला. एव्हाना भोवती गर्दी झाली हाती. सुधाकर, सदाशिवही माझ्या खांद्यावर हात ठेवून उभे होते. या पत्रांचा माझा काय संबंध होता? त्याने माझ्या हातात एक पोस्टकार्ड दिलं. त्यावर भलताच पत्ता होता. त्याच्या शेजारी छोटय़ा मोकळ्या जागेत पेनने केलेलं रेखाटन होतं. ‘साहेब, ही सगळी रिटर्न करड आहेत. हे चित्र माझ्या मुलाचं आहे..’ पोस्टमननं मला सांगितलं. तसा त्याच्या पाठीमागे लपलेला लुकडा मुलगा समोर आला. मी सर्व पोस्टकार्डावरील स्केचेस बघताना अस्वस्थ होत गेलो. एक चतकोर कागदही त्याच्याकडे नव्हता. या दारिद्रय़ाला काय म्हणावं? पण त्या मुलाकडे मी पाहिलं आणि म्हणालो, ‘हा मोठा झाला की माझ्याकडे घेऊन या. हे सुधाकर तुम्हाला माझा पत्ता देतील.’ पुण्याकडे परतताना मला त्या पोस्टमनचे अस्वस्थ करणारे डोळे दिसत होते.
पुढच्या घटना अगदी नेहमीसारख्या आहेत. काही वर्षांनी पोस्टमन व त्याचा मुलगा असे दोघे माझ्या स्टुडिओत आले. मित्रांच्या सहकार्याने आम्ही त्याची खडकमाळ आळीत शिवाजी मराठा हॉस्टेलची व आर्ट स्कूलची फी माफ करून व्यवस्था केली. दरमहा खर्चाची सोय केली. मुख्य म्हणजे कोऱ्या कागदाचा एक गठ्ठा चित्रं काढायला दिला. आणि नंतर मी सारं विसरून गेलो. पुणंही सोडलं. परदेश, माझी प्रदर्शनं यांत काळ भरकटत राहिला. एकदा मुंबईच्या माझ्या स्टुडिओची बेल वाजली. दार उघडलं तर समोर तरतरीत नवरा-बायको आणि एक छोटा मुलगा उभे होते. मी कोण म्हणून विचारणार, तेवढय़ात तोच म्हणाला, ‘सर, मी त्या अहमदनगरच्या पोस्टमनचा मुलगा! ही माझी बायको आणि मुलगा! मी आता कमर्शिअल कामं करतो.’ त्यानं दिलेली फुलं मी घेतली. आणि पुन्हा त्याच्या वडलांचे स्टेजवर मला पाहणारे आणि अस्वस्थ करणारे डोळे आठवले.
माझी बालमैत्रीण सावी सारखी रडायची. त्यामुळे मी नेहमी अस्वस्थ होत असे. तिला विचारलं की ती रडत सांगे, ‘परसातल्या भिंतीतल्या कोनाडय़ातून चिमणीचं घरटं पडलं आणि सारी अंडी फुटली.’ पुढे अचानक तिचे वडील वारले. मी भेटायला गेलो तर सावी सांत्वनाला आलेल्या माणसांशी शांतपणे बोलत होती. ती रडत नव्हती. आणि ही बया का रडत नाही म्हणून माझ्या डोळ्यांत पाणी येत होतं. नंतर ती क्लासला आली नाही. त्यांनी ते गावही सोडलं. जातानाही माझी तिची भेट झाली नाही. अजूनही तिच्या आठवणींनी मी अस्वस्थ असतो.
टिळक रोडवर माझा स्टुडिओ होता. त्याच्या कोपऱ्यावर कल्पना भेळची प्रसिद्ध गाडी होती. त्याच्या मालकाची पांढरीशुभ्र दाढी आणि कपाळावरच्या टिळ्यामुळे ते प्रेमळ संतासारखे वाटायचे. त्याच्या शेजारी उसाचं गुऱ्हाळ होतं. त्याचा मालक तामीळ सिनेमातल्या गुंडासारखा दिसायचा. तो गुंडच होता. पहाडासारखा कडक. सहा फु टी. काळा कुळकुळीत. लालभडक डोळे. बारीक डोक्यावरच्या केसांना तेल चोपडलेलं असायचं. गुऱ्हाळाच्या बाहेर त्यानं ऊस कापायला मोठा ओंडका उभा ठेवला होता. त्यावर तो मोठय़ा कोयत्यासारख्या हत्यारानं उसाचे कचाकचा तुकडे करताना दिसे. कल्पना भेळच्या गाडीपाशी आसपासच्या बंगल्यांतली कुटुंबं, कॉलेजची मुलं-मुली संध्याकाळी गर्दी करीत असत. पण उसाच्या गुऱ्हाळात मात्र भीतीने सामसूम असे. त्या ठिकाणी सतत पोलीसच दिसत असत. कोण होता तो? कुणी सांगे, त्याच्यावर हाफ मर्डरच्या केसेस आहेत. तो वडगावमधला दादा आहे. जमिनी बळकावतो. हे त्या भागातल्या आज नळाला पाणी येणार नाही अशा बातम्यांची काळजी करणाऱ्या मध्यमवर्गातल्या वस्तीत. या कुजबुजींनी त्याची व त्याच्या उसाच्या रसाची भीती त्या कोपऱ्यावर पसरलेली होती. त्यात मी एक होतो. मी माझ्या स्टुडिओच्या गेटमध्ये शिरताना तो हातात उसाच्या रसाचा ग्लास घेऊन उभा राहून माझ्याकडे पाहत असे. पण मला नगरच्या पोस्टमनची नजर अस्वस्थ करायची तशी ही नव्हती. मला त्याच्या नजरेची भीती वाटायची. तो मला का बोलावतोय? त्यामुळे मी त्याला टाळायला लागलो. सकाळी, दुपारी, संध्याकाळी त्याची नजर चुकवून मी स्टुडिओच्या गेटमधून आत शिरायचो. त्याकाळी माझ्याकडे फिल्म इंडस्ट्रीमधले आता मोठे झालेले नट- नटय़ा, कॅमेरामन, एडिटर्स, डायरेक्टर्स, लेखक यांचा राबता असायचा. वर येताना ते कल्पना भेळची ऑर्डर देऊनच माझ्या स्टुडिओत यायचे. आपले मराठीतले कवी, प्रकाशक, मुद्रक हेही असायचे. ते एक रुटीनच होतं. माझ्या स्टुडिओतले ते सोनेरी दिवस होते. पण एकदा असं झालं की, भेळ घेऊन माझा ऑफिस बॉय आला आणि त्यापाठोपाठ उसाच्या रसाचे पाच-सहा ग्लास घेऊन हा गुंड वरच्या तिसऱ्या मजल्यावरच्या स्टुडिओत आला. माझ्या असिस्टंटची, माझी टरकली होती. बसलेल्या मित्रांपुढे मला त्याला नाही म्हणता आले नाही. यावेळी मी त्याला प्रथमच जवळून पाहत होतो. त्याचे डोळे लाल होतेच, पण चेहरा कंपॅशनेट होता. त्यानं प्रत्येकाला उसाच्या रसाचे ग्लास दिले. मी ‘पैसे किती झाले?’ विचारताच त्याने खाली मान घालून कानाला हात लावले. रिकामे ग्लास घेऊन तो आडदांड गेला. माझ्यापाशी तो असे का वागतो आहे? त्याला काय पाहिजे? घरमालकांना कळले तेव्हा तेही म्हणाले, ‘जरा जपून राहा.’ पुढे बरेच दिवस त्याचं गुऱ्हाळ बंद होतं. माझ्या बाल्कनीतून मी पाहत असे. पण ते बंदच दिसायचं. बहुतेक तो गजाआड तरी गेला किंवा गावाकडे तडीपार झाला असेल. मी त्याला, उसाच्या रसाला, गुऱ्हाळ आणि त्याच्या भीतीला विसरून गेलो, आणि अचानक गुऱ्हाळ सुरू झालं. तो माझ्या स्टुडिओत येऊन उभा राहिला. त्याच्या कडेवर झबलं, टोपडं घातलेलं पोर होतं. पोराचा रंगही काळ्या बुटपॉलिशसारखा होता. सोन्याचे वाळे उठून दिसत होते. पांढऱ्याशुभ्र डोळ्यांतली त्याची बुबुळं टकमक बघत होती. ‘साहेब, हा माझा मुन्ना!’ म्हणत तो त्या पोराचे पापे घेत होता. ‘साहेब, याचा फोटू काढून द्या ना!’ असं तो म्हणाल्यावर मला कळलं, अरेच्चा! याचं हे काम माझ्याकडे होतं. मी त्याला समजावलं, ‘अरे, तो इतका लहान आहे. मी कसं त्याचं पोट्र्रेट करणार?’ त्याला ते कळेना. शेवटी माझ्या असिस्टंटने त्याचा एक फोटो काढला. काही दिवसांनी त्याला तो दिला. त्यावर तो नाखूशच होता. त्याने सांगितलं, साहेब जशी चित्रं काढतात तसं त्याला त्या पोराचं चित्र काढून गुऱ्हाळात लावायचं होतं. शेवटी फोटो कलर्स वापरून ते रंगवून, फ्रेम करून त्याला दिलं, तेव्हा तो हसला. घुटमळला. सारा आनंद त्याच्या पाषाणासारख्या चेहऱ्यावर एखाद्या बापाच्या प्रेमासारखा पसरला. त्याने ते गुऱ्हाळात लटकावलं. एके दिवशी मी सकाळीच स्टुडिओला आलो. गुऱ्हाळापाशी पोलीस आणि गर्दी जमली होती. गुऱ्हाळ जवळपास उद्ध्वस्त झालं होतं. मी विचारलं तेव्हा कळलं की, त्या गुंडाचा रात्री खून झाला होता. त्याचा रक्ताळलेला मृतदेह त्या लाकडी ओंडक्यावर झाकून ठेवला होता. मी गर्दीतून स्टुडिओच्या फाटकात आलो. मागे वळून पाहिलं, गुऱ्हाळात लटकवलेला त्याच्या मुलाचा मी रंगवलेला फोटो कोठेतरी ढिगात नाहीसा झाला असावा. मी अस्वस्थ झालो. अस्वस्थतेत उदास झालो.
आता आता ही अस्वस्थता या वादळानं, महामारीनं वरती डोकं काढून गल्लीबोळांत, गंगेच्या पात्रात वाहणाऱ्या प्रेतांना बघून, घरातल्या कोंडमाऱ्यातून डोकं वर काढीत आहे. हे खरं नव्हे. ही या पृथ्वीच्या पोटातून, ते हजारो वर्षांपासून दफन झालेल्या संस्कृतीच्या एकेका सांगाडय़ात लपलेली आहे. ती सर्वत्र आहे. ती समुद्र आटवून उभ्या केलेल्या स्कायस्क्रेपर्सच्या, अथवा त्याला बिलगून उभ्या राहिलेल्या झोपडपट्टय़ांच्या पायांत दडपलेली आहे. सडकांवर धावणाऱ्या गाडय़ांच्या धुरात अथवा काचा बंद करून आत बसलेल्या, ट्रिपला निघालेल्या फॅमिलीमध्ये मागच्या डिक्कीत लपलेली आहे. या अवस्थेला तोंडवळा नाहीये अथवा सावलीही नाहीये, जी तुम्ही जन्माला आलेल्या हॉस्पिटलमधील पाळण्यातल्या दुपटय़ात गुंडाळून घराघरांत येते. ही युनिव्हर्सल आहे. मायकल जॅक्सनवर लहान वयात झालेले अत्याचार त्याच्या डान्समधून येतात आणि त्यातून ती स्टेजवर येते. त्याची मी पेंटिंगमध्ये पूर्वी सीरिज केली होती. गुरुदत्तची ‘कागज के फूल’मधून पडद्यावर येते. ‘गर्म हवा’ या चित्रपटात बलराज सहानीच्या डोळ्यात ती क्षणभर दिसते. मोझार्ट, कालिदास, जीम मॉरिसन अथवा ‘एक होता काव्र्हर’ या चरित्रात पानापानांत ती तुमच्यापाशी येते. तुमच्या बेडवर उशीखाली तर ती असतेच. ‘नको देवराया अंत आता पाहू’ या अभंगात तुम्हाला ती ऐकू येते. फक्त तिला तुम्ही जवळ घेत नाही. पण मी तिला घरातला मेंबर करून घेतलं. आणि का नाही? स्वस्थ आणि अस्वस्थ यांतला हा फरक? मन आणि मेंदू यांतला दुरावा? तुकारामांनी केव्हाच सांगितलंय, ‘आपुलाचि वाद आपणाशी.’ एकनाथ हाच हिशेब मांडतात. हिशेबातले गोंधळ स्पष्ट करतात. म्हणून मी खुल्ला आहे.
बरं झालं, मी न्यायाधीश झालो नाही. खऱ्या जीवनाचा न्यायनिवाडा करण्याची नौबत माझ्यावर आली नाही. फ्रान्सिस बेकन हा एक ब्रिटिश गे चित्रकार. तो जन्मत: गे होता. त्यामुळे घरातून, शाळेतून, समाजातून त्याला बालवयापासूनच हेटाळणी मिळाली. शेवटी त्याच्या आजीने त्याचा सांभाळ केला. आयुष्यभर तो अस्वस्थ होता. पैशासाठी त्यानं अनेक व्यवसाय करण्याचे प्रयत्न केले, पण तो रमला नाही कशात. त्याला पेटिंग हे माध्यम सापडलं आणि त्याच्यातली ती धगधग, अस्वस्थता पेंटिंग्जमध्ये प्रकट झाली. पोप, पाखंडी धर्म, नाती, चेहऱ्यावर सोफिस्टिकेशनचे चढवलेले बुरखे त्याने त्याच्या चित्रांत फाडून टाकले. त्याच्या या आविष्काराने कचकडय़ाच्या जीवनाचं भयानक रूप जगानं पाहिलं. त्यात त्याचीच केलेली सेल्फ पोट्र्रेट्स पाहिली की समजतं, त्यानं भोगलेला त्रास, वेदना त्या चेहऱ्यांत फिस्कारलेल्या आहेत. क्रुसीफिक्शन या त्याच्या पेंटिंगमध्ये हीच उफाळलेली अस्वस्थता दिसते. त्यानं याच अस्वस्थतेला नवीन रूप दिलं. तो जगप्रसिद्ध झालाही. सारं आयुष्य तो स्वत:च्या टर्मवर जगला. त्या टर्मचं सूत्र अस्वस्थतेचं आहे.
अशा या अस्वस्थतेला रूप देऊन प्रत्यक्षात आणायला अलौकिक प्रतिभेचा योगी कलाकारच लागतो. क्रिएटिव्हिटी आणि अस्वस्थता या जुळ्या बहिणी आहेत. त्या आयुष्यभर एकमेकींशी भांडत राहतात. त्यातली एखादी रुसली तरी कलाकाराचा सामान्य माणूस व्हायला वेळ लागत नाही!